फू बाई फू ग्रॅन्ड फिनाले.. स्टॅन्डींग ओव्हेशन

आणि उर्मिला माझी कविता म्हणते..

‘डान्स महाराष्ट्र डान्स’ ह्या झीमराठी वर होणा-या कार्यक्रमात ‘ग्लॅमर गर्ल उर्मिला मातोंडकर’ ह्यांनी अस्मादिकांच्या एका कवितेतल्या चार ओळी दस्तुरखुद्द अस्मादिकांचं नाव घेऊन म्हंटल्या.

ती कविता.. तो क्षण..

Urmila

साहित्य संमेलनापूर्व संमेलन आणि धुंद रवीचा ब्लॉग

मला सांगा एक ब्लॉगरला अजुन काय हवं..??

 

बाबाचे दोन शब्द.. आणि अस्मादिक ढगात.

 

कधीकधी एखाद्याचे कौतुकाचे दोन शब्दही तुम्हाला ढगात जायला पुरेसे असतात.. बाबाला.. म्हणजे अनिल अवचट.. माझी बावनखणी लेखमालिका पाठवत होतो.. पण तो वाचत असेल असं कधी वाटलंच नाही.. आणि एक दिवस एका लेखावर इमेलने त्याचा प्रतिसाद आला..

“वा वा, तू तर माझी सकाळ साजरी केलीस…”
– बाबा

मग काय..?? अस्मादिक ढगातच.
त्यानंतर फू बाई फू ग्रॅन्ड फिनाले मध्ये झालेल्या माझ्या एका स्कीटची लींक त्याला पाठवली आणि त्याच्या उत्तरानी तर एकदम ‘भारी लेखक’ वगैरे असल्यासारखं वाटलं.. त्यानी लिहलं होतं..

“वा मित्रा, उत्तम आहे. अगदी उत्स्फूर्त विनोद आहे. अनपेक्षित आहे.
फार , फार म्हणजे फार हसलो.”
– बाबा

मध्येच एका लेखाला त्यानी… “ह्या वेळची भट्टी जमली आहे…”  असं लिहलं आणि मग पुढचे लेख त्याच धुंदीत लिहले.. शेवटी एकदा त्याच्याकडे जाऊन एक लेख वाचण्याचं धाडस केलं.. त्यावेळेस बाबा चित्र काढत होता..

मला म्हणाला..
“हे चित्र म्हणजे तु जे वाचतोयेस त्याचं रेकॉर्डींग आहे. जेंव्हा जेंव्हा हे चित्र पाहीन तेंव्हा तेंव्हा तुझी आठवण होईल.. “

मी हे चित्र जेंव्हा जेंव्हा पाहतो.. बाबानी केलेल्या कौतुकाची आठवण होते.. 😉

Babach Chitra  Baba & Dhund Ravi

 

एक पत्र १७६० सासूबाईंकडून…

गेले वर्षभर मी ‘संवाद आणि एपीसोड कथा’ लिहीत असलेली कलर्स मराठी वरची मालिका ‘१७६० सासूबाई’ संपली..
आणि शूटींगच्या शेवटच्या दिवशी निर्मीतीताईचं एक ई-पत्र आलं..

अजुनही अधुनमधुन हे पत्र वाचतो.. आणि मग अंगावर मुठभर मांस चढतं…

Namaskar

It is exactly 1 year & 1 month ago that 1760 SasuBai went on-air. & today as I leave for the shooting of its last episode, it brings back all the beautiful memories of the wonderful journey.

Firstly & most importantly I Thank You with all my heart for believing in the project; for bringing this crazy Amba & her crazier Bagavatkar family to life on-screen. It would not have been possible without your faith in Me. Thank You for believing in Amba, Thank You for believing that I am Amba.

No journey is complete without it’s ups & downs, and surely we had our own too. But I really Thank You for standing by Me & the entire 1760 team through all the testing times. Thank You for helping us survive and win the hearts of millions of people.
I as an Actor is the one who the audience sees. But a lot goes behind it’s making. & I Thank You for helping Me ‘be’ the Amba that was actually conceived. I personally Thank You for all the valuable lessons I learnt during 1760 which helped me evolve not only as an actor, but also a person.

& it was possible only because you yourself are a gem of a person.

Many years after GanguBai, 1760 SasuBai was the one which helped me reclaim my glory on the television yet again. I really Thank You for giving me the opportunity to yet again rule over the hearts of millions of fans with ‘pure unadulterated simple family comedy’.

It is said that comedy is a serious business & we as a team dealt beautifully with it. Thank U for standing with 1760 SasuBai, thank u for the immense faith, thank u for understanding me during the misunderstandings (if any), thank u for all the 1760 memories.

& last but not at all the least Thank U for 1760 SasuBai itself!
God Bless U…

Thank You Thank You Thank You..

– Nirmitee Sawant

1760 Sasubbai

 1760 Katha - Ravindra Mathadhikari

हलकफुलकं.. पण बहारदार आणि स्मरणीय.

चाफा उमलतो आणि त्याचा गंध दुरपर्यंत दरवळून जीवाला वेड लावतो.
शब्दांचही असंच असतं…
त्यांचा गंध कुठे पसरेल सांगता येत नाही.

कॉमेडी एक्सप्रेसचं मी लिहलेलं एक स्कीट फारच सुंदर सादर झालं आणि त्याचं कौतुक करायला कोणीतरी मला फोन केला.
तो फोन होता ‘विच्छा माझी’ आणि ‘घडलय बिघडलय’ फेम आणि जवळजवळ माझ्या वयाइतका मराठी रंगभूमीचा अनुभव असलेले कलावंत श्री. विजय कदम यांचा.

Vijay Kadam & Dhund Ravi

त्यांनी घरी बोलावुन खुप कौतुक केलं…

मी लिहीत असलेली ध्यानीमनी बावनखणी  लेखमालिका आवर्जुन वाचत असल्याचंही सांगितलं..

आणि कौतुक म्हणुन त्यांनी लिहलेलं एक पुस्तक भेट दिलं…

 

IMG_20160126_213939  IMG_20160126_213759

सुमारे साडेचार तासांच्या गप्पांनंतर मी परत आलो तेंव्हा माझ्याकडे खुप काही होतं. त्याचा सविसत वृत्तांत टाकेनच. पण घरी पोहचलो तेंचा त्यांचीच एक मेल माझी वाट पाहत होती. त्यात लिहलं होतं…

रवी,
आजची भेट खूपच बहारदार आणि स्मरणीय झाली. आत्ता रसिकांना आवडेल असे चांगले काहीतरी लवकरच करूया.

सदिच्छा.
विजय कदम.

जे स्कीट पाहून विजय कदम सरांचा फोन आला होता, ते धमाल स्कीट…

 

साहित्यभूषण धुंद रवी

काही क्षणांच्या बेचव नशेसाठी, तंबाखुचुर्णपुर्णयुक्त-सुत्रबद्ध-धुम्रकांडीचा (म्हणजे सिगरेट हो..) किंवा सोमरसाच्या पेल्याचा आधार घडोघडी घेणा-या त्या तमाम दुर्दैवी जीवांना जर कायमची झींग किंवा न उतरणारी नशा करायला मिळाली तर ?

…तर जगणं म्हणजे रंगत गेलेली एक मैफलंच हो‌ऊन जा‌ईल. कधीच न संपणारी…. कधीच न उतरणारी…. अशीच एक नशा करुन आलोय मी…!!

गेले सहा महिने माणसात नव्हतोच…… कुणाच्याही संपर्कात नाही… माझ्या स्वतःच्याच ब्लॉगवर नाही…. कुठल्याही सोशल नेटवर्किंग सा‌ईटवर नाही…. घरी सुद्धा लॉजींग-बोर्डींगपुरताच…. कामाचा व्याप प्रंचंड पण तरी तिथेही फक्त डोकंच, मन नाही……

पण हे सगळं व्हायला कारणही तसंच………..

मागच्या महिन्यात २९ ऑगस्टला डॉ. जब्बार पटेल यांच्याकडुन मला साहित्यभूषण हे प्रमाणपत्र मिळालं..Dhund Ravi & Dr. Jabbar - Sahityabhushan 02

आणि….
आणि आता सुमारे ६ महिन्यांनी पुन्हा माणसात आलो. साहित्यभूषण प्रमाणपत्र मिळणं हा खूप मोठा आनंद तर होताच पण त्याहीपेक्षा मजा आली, धमाल केली ती काही महिने ह्या परीक्षेचा अभ्यास करताना आणि त्यानंतरच्या नशेमध्येच….

ह्या सगळ्यानं झालेली नशा उतरणं अशक्यच….. आणि ती उतरावी असं वाटतही नाहीये.

मराठी भाषा व साहित्याबद्दल आस्था, आवड व अभिरूची निर्माण होण्यासाठी ‘साहित्यभूषण’ ह्या उच्चस्तरीय परीक्षेचे आयोजन होते आणि ह्यासाठी १००-१०० मार्कांच्या पाच प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतात……’ हे ऐकुन होतो. पण वाटलं तसं हे निरस किंवा किचकट नव्हतं. उलट हा अनुभव म्हणजे नुसती धमाल होती. दोन महिने रात्री दिड-दोन शिवाय झोपायचोच नाही आणि सकाळी उठुन पुन्हा कामाला… तरीही कधी एकदा घरी येतोय आणि अभ्यासाला बसतोय असं व्हायचं…..

सुमारे १८-२० पुस्तकं, काही कवितासंग्रह, ललित लेख, नाटकं आणि मराठी साहित्यप्रकार असा अभ्यासक्रम होता. Open Book Examination असल्यामुळे कॉपी करायला परवानगी होती. मी पहिलं पुस्तक उघडलं आणि इथुनंच माझ्या भारावलेल्या प्रवासाला सुरवात झाली…. रोज ह्या पुस्तकामधलं एक पात्र पकडायचो आणि ते पात्र हो‌ऊन जगताना वेगळय़ाच जगात निघुन जायचो….

जयवंत दळवींचं ’सारे घडीचे प्रवासी’ मधल्या आज्जीच्या तर प्रेमातच पडलो. आपल्या नातवाला शाळेत घालु नये म्हणुन सगळ्यांशी भांडणारी आजी, जितका आश्चर्याचा धक्का देते तितकंच आपण हसतो त्यामागचं कारण कळल्यावर. ह्या प्रेमळ आजीला दिवसातून तीन वेळा चोरुन विड्या ओढायची सवय आहे आणि आता नातु शाळेत गेल्यावर आपली पंचा‌ईत होणार ह्या कल्पनेनं ती बेचैन होते. तिचा लबाड नातु त्या विड्यांसाठी आजीनी दिलेल्या आठ पैशातुन दोन पैशाची अफरातफर करुन त्यातून लाडु खायचा… ते आता खाता येणार नाहीत म्हणुन त्याच्या जीवाची घालमेल…..

हि…… आणि अशीच झकास पात्र भेटली मला ह्या प्रवासात.

बाबाचं अमेरिका पण होतं अभ्यासाला. त्याची तर पारायणं केलीत. पण ’अमेरिका ह्या पुस्तकात अनिल अवचट यांच्यामधल्या लेखकापेक्षा पत्रकार कसा दिसतो ते सोदाहरण लिहा’, असा एक प्रश्न होता आणि त्यासाठी पुस्तक पुन्हा वाचलं.

(ह्याच पुस्तकानी बाबाच्या प्रेमात पडलो होतो आणि झपाटल्यासारखी त्याची सगळी पुस्तकं वाचुन काढली होती. मग त्याला जा‌ऊन भेटलो आणि मग जगणंच बदलुन गेलं.)

बाबातला कलाकार… त्याची बासरी, त्याचा यमन… मारवा, त्याची सामाजीक कळकळ, त्याचं मोकळं असणं, त्याची जगण्याची पद्धत इतकंच काय त्याची गोगलगाय, उंदीर…. नाचणारी बाहुली आणि त्याच्या प्रत्येक वेडेपणाच्या प्रेमात होतो मी… आणि आता त्याच्यातल्या पत्रकाराच्याही प्रेमात पडलो.

ते अमेरिकेतले सगळे प्रश्न आपल्याही किती जवळ आलेत असं वाटलं आणि जागा झालो. बाबाचं ’अंधेरनगरी निपाणी’ पण होतं अभ्यासाला. सुन्न झालो त्या विडी स्त्री-कामगारांचं जीवन वाचुन.
नुसता साडेसात मार्कांइतकंच ह्या प्रश्नाचं वजन राहिलं नाही तर त्याच्या ओझ्यानी दबुन गेलो. आपण किती सुखात जगतोय आणि आ‌अपल्याला रडण्याचा काहिही अधिकार नाही ह्या स्वार्थी विचारानी सुखावलो सुद्धा…. पण सध्या काही मित्रांसोबत जमेल तसं काम सुरु केलय आदिवासी वस्त्यांसाठी, अनाथ-आश्रमांसाठी. अगदीच काही नाही त्यांना तर भेटत राहायचा प्रयत्न करतोय. चार क्षण मोकळे सुखाचे तर देता येतील आपल्याला….

साधनाता‌ईंच समिधा पुन्हा वाचण्याचा योग आला. समिधामधुन आनंदवनाचं दर्शन कसं घडतं ते लिहायचं होतं. मधल्या काळात सायली हेमेलकसा आणि आनंदवन ला राहुन आल्यानी सगळं पाहिलेलंच लिहतोय असं वाटत होतं. तिच्यामुळे सगळं आमटे कुटुंबच मला इतकं जवळ वाटतं की आनंदवनाविषयी लिहेन तितकं थोडंच होतं. ते समिधा मधलं जगच वेगळं आहे हो.

sadhana

नसेल वाचलं समिधा, प्रकाशवाटा तर जरुर वाचा. बाबा आमटेंविषयी तर आपल्याला ब-यापैकी माहिती आहेच पण समिधामधुन साधनाता‌ईंचही जीवन उलघडत जातं आणि त्या पुस्तकाला समिधा नाव का दिलं असेल ते ही समजतं.

बाबा आमटेयांच्या कर्मयज्ञात साधनाता‌ईनी आपल्या आयुष्याची समिधा अर्पण केली, हे जे म्हंटलय, ते पटतच आपल्याला.

माणसाच्या आयुष्यात कुठलही ध्येय असेल तर त्या मार्गाने जाताना येणारे अडथळे हे अडथळे नसतातच, तो फक्त अवघड टप्पा असतो जो पार करुन जायचा असतो. आणि तसा तो पार होतोही. त्यासाठी लागतं प्रचंड determination आणि passion.

आयुष्यात खुप काही मिळवुनही मानसिक समाधानासाठी काही शोधत असाल तर नक्की वाचा ही पुस्तकं…! खुप काही सापडुन जा‌ईल. कदाचित तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलुन जा‌ईल.

भारावुन जावं अशी पुस्तकं जशी होती वाचायला तशीच मस्त मस्त नाटकं पण होती अभ्यासाला. संगीत संशयकल्लोळ नाटक वाचताना बाकीचीही संगीत नाटकं बघितलीच पाहिजेत असं वाटलं. ’संशयकल्लोळमधिल फाल्गुनरावचा देशीपणा विशद करा’ हा प्रश्न सोडवताना फाल्गुनराव कसा बुरसटलेल्या विचारांचा आहे, हे लिहणं अपेक्षित असेल असं विचार करुन उत्तर लिहायला सुरवात केली आणि वेगळीच माहिती सापडली.

Govindगानारेल या मूळ फ्रेंच नाटकावरून प्रथम इंग्रजीत आणि मग मराठीत या गद्य नाटकाची निमिर्ती झाली. गोविंद बल्लाळ देवलांनी उद्बोधक नाट्यसंगीत लिहून त्यास शास्त्रीय संगीताचा साज चढविला. आधि १८९३ मध्ये गोविंद बल्लाळ देवलांनी फाल्गुनराव आणि तसबीरीचा घोटाळा हे नाटक लिहलं आणि मग त्याचं १९१६ मध्ये संशयकल्लोळ झालं. हे करताना त्यांनी मूळ फ्रेंच पात्राला देशीपणाचा साज चढवला आणि हे त्याचं देशीपण विशद करायचं होतं.

प्रश्नच समजायला अवघड असले तर उत्तर काय कपाळ देणार ? संशयकल्लोळमधिल विनोदाचे अधिष्ठान हा नाट्यम उपरोध आहे ह्या विधानाचा परामर्श घ्या… हा असाच एक प्रश्न होता ! ब-याचदा प्रश्नांची उत्तर शोधता शोधता वेगळीच आणि छान माहिती मिळत जायची आणि त्यात मजा जास्त होती.

’शांतता कोर्ट चालु आहे’ हे तेंडुलकरांचं नाटक वाचताना तर सरसरुन काटाच येतो अंगावर. झिणझिण्या येतात डोक्याला. बधिर करुन जातात एकेक प्रसंग…. ह्या नाटकाबरोबरच, नाटकाबाहेरचे अनेक किस्से महाजालावर वाचायला मिळाले. सुलभाता‌ईंचं मनोगत वाचताना तर भान हरपुनच गेलं… तुमच्यासाठी सुलभाता‌ईंच्या मनोगतामधला एक भाग देतोय….

नाटकाच्या तीन दिवस आधी तेंडुलकर आमची तालीम पाहायला आले. आदल्या दिवशीच त्यांच्या मोठ्या भावाचं निधन झालं होतं. अरविंदनं त्यांनी स्वगत लिहिण्याची विनंती केली. तेंडुलकर बहुतेक विरोध करण्याच्या मनःस्थितीत नव्हते. आम्ही ज्या हॉलमध्ये तालीम करायचो, त्या हॉलमध्ये तेंडुलकरांना बसवून आम्ही बाहेर गेलो. त्यांनी दहा-पंधरा मिनिटांत ते स्वगत लिहिलं, आमच्या हाती कागद दिले, आणि काही न बोलता ते निघून गेले.

नाटकाच्या दोन दिवस आधी ते स्वगत माझ्या हाती पडलं. रात्री जागून मी ते पाठ केलं, बसवलं. नाटकाचा शेवट अजून बसायचा होता. त्याचीही एक गंमतच झाली.
स्पर्धा रवींद्र नाट्यमंदिरात होती. पहिलं नाटक रात्री झालं आणि दुसर्या दिवशी दुपारी चार वाजता आमचा प्रयोग होता. रात्री उशीरा ते नाटक आटोपल्यावर आम्ही आमचा सेट लावला. रंगीत तालीम पूर्वी झालीच नव्हती. ती आता सेटवरच करायची, असं ठरलं होतं. पहाटे तीन वाजता सेट लावून झाला आणि आम्ही रंगीत तालमीला सुरुवात केली. तेंडुलकर ती पाहायला आले होते.

नाटकाच्या दुसर्या अंकात बेणारेला पिंजर्यात उभी करतात आणि नाटकाला वेगळं वळण लागतं. खटला सुरू होतो. बेणारेवर आरोप निश्चित केले जातात, आणि तिला शिक्षा ठोठावली जाते. ती तिथेच कोसळते. तेवढ्यात हॉलच्या बाहेर जमलेले लोक जोरजोरात दरवाजा ठोठावतात. दार उघडतं, आणि जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात सर्व मंडळी, बेणारे सोडून, बाहेर पडतात. खटला संपल्यावर परत ते नेहमीसारखे साधे, सरळ झालेले असतात. गरीब, बापडी वाटणारी, पण तशी नसणारी ती माणसं जाताना बेणारेला सांगतात की ती सारी केवळ गंमत होती, खेळ होता आणि बेणारेनं ते अजिबात मनावर घे‌ऊ नये. एकाच्याही चेहर्यावर आधीच्या हिंस्रपणाचा मागमूसही नसतो. हा प्रवेश आमचा नीट बसला नव्हता. रंगीत तालमीच्या वेळी ‘बेणारे कोसळते’ इथपर्यंतचा भाग आम्ही केला.

तोपर्यंत सकाळ झाली होती, आणि नोकरी करणारी मंडळी मागच्या मागे निघून गेली. तेंडुलकर चिडले. म्हणाले, ‘नाटकाचा शेवट कुठाय? हा असाच प्रयोग तुम्ही स्पर्धेत सादर करणार आहात का?’ मग ‘झाला अनंत हनुमंत’ची तालीम संपवून अरविंद आला, त्याने शेवटचा प्रवेश बसवला. संपूर्ण नाटकात त्याने प्रत्यक्ष उपस्थित राहून बसवलेला हा एकमेव प्रवेश. मग दुपारपर्यंत तालीम केली. अरविंदनं पहिल्या दोन अंकांची जरा साफसफा‌ई केली आणि स्पर्धेत आम्ही नाटक सादर केलं.

नाटक तर आवर्जुन बघाच पण हे मनोगतही पूर्ण वाचा….. खुप मजा येते.

benare
रायगडाला जेंव्हा जाग येते वाचताना, बघताना वसंत कानेटकरांचं नाट्यतंत्र समजुन घेता आलं. आंतरजालावर खुप माहिती मिळाली वाचायला. कोसला, रारंगढंग, आशा बगेंची पुस्तकं, अरविंद गोखलेंच्या कथा अशी पुस्तकं पण वाचली आणि रोज नविन जगात हरवुन गेलो. खांडेकरांचं ययाती होतं. ते वाचता वाचता, कधी इरावती कर्व्यांच्या युगान्तमध्ये आणि भैरप्पांच्या पर्वमध्ये शिरलो, समजलंच नाही. कुसुमाग्रजांचं विशाखा सुद्धा होतं अभ्यासाला…. (अजुन काय हवं ?)

अभिमन्युसारखं चक्रव्युव्हाच्या आत आतच जात राहिलो.
तसही बाहेर यायचंच नव्हत मला….!

व्यावहारिक मराठी असाही एक विषय होता परीक्षेला. इथे जरा आपल्या लेखन-क्षमतेला वाव होता.. ह्या प्रश्नपत्रिकेत एक गोष्ट लिहायची होती….. दुरचित्रवाणीसाठी एक जाहिरात लिहायची होती…. वाचकांच्या पत्रव्यवहारातला मसुदा लिहायचा होता. (पुणेकर असल्यानं दुस-यांच्या चुका काढणं, हे फारसं अवघड गेलं नाही.) मराठी वृत्तपत्रात येणारे इंग्रजी शब्द शोधुन त्यांना सहज सोपे मराठी शब्द द्यायचे होते… (म्हणजे आपल्याकडे जो इंग्रजी पॅकेटचा, पाकीट असा मराठी अपभ्रंश झालाय त्याला मी मराठीत नविन शब्द दिला – खिशवी. म्हणजे खिशातली पिशवी.) असे वीस शब्द तयार करायचे होते. मजा मजा होती सगळी.

याच प्रश्नपत्रिकेत काही म्हणी दिल्या होत्या आणि त्या बदल्यात नविन म्हणी लिहायच्या होत्या. पण नविन म्हणीच हव्या, जुन्या म्हणीचा फक्त अर्थ सांगायचा नव्हता. उदा. न कर्त्याचा वार शनिवार. ह्या म्हणीसाठी माझी म्हण होती – सुताराचा कोंबडा आरवत नाही, करेना काम म्हणे करवत नाही.
दोन सोप्प्या म्हणी तुम्हाला देतो सोडवायला…….बघा जमतय का ?
१. घरोघरी मातीच्या चुली
२. चार दिवस सासूचे.

नाही जमत आहे..? गंमत आहे ! आणि जमलं तर मजाच आहे.

साहित्यविचार ह्या नावाच एक मराठी भाषेतले सौंदर्यस्वरुप, सौंदर्यनिकष, महत्वाची वैशिष्ट्ये, संकल्पना, साहित्यकृती असा एक तांत्रिक पेपर पण होता. खुप माहिती काढायला लागली ही प्रश्नपत्रिका सोडावताना. प्रतिमा, प्रतिक आणि रुपक हे सगळं सारखंच वाटायचं मला पण ते कसं वेगळं आहे हे सोदाहरण लिहायचं होतं…. एकदम मजा आली हे शोधताना आणि वाचताना…. साहित्यकला आणि इतर ललितकला यांच्या साम्यभेदांची सविस्तर चिकित्सा करायची होती…. शोधली आणि केली. सगळ्यात शेवटी एक प्रकल्प पण करायचा होता.

हे… आणि असं बरंच काही………………

५०० मार्कांच्या ह्या परीक्षेत मला ३३९ मार्क्स मिळाले. पण त्याहुन खुप जास्त काही मिळालय. ह्या परीक्षेत जी मुलगी पहिली आली तिच्या आणि माझ्या मार्कात फक्त १४ मार्कांचाच फरक होता. आणि आमच्या आनंदात तर तो ही नाही. कारण आमचे मार्क्स कळायच्या आधिच तो मिळाला होता. मी तर अजुनही त्याच धुंदीत आहे..

अजुन खुप वाचावंसं वाटतय… लिहावंसं वाटतय आणि जे करायला परत आलोय. पुन्हा लिहायला सुरवात केलीच आहे. ब्लॉगवर टाकत राहीन. थोडक्यात, प्रत्येकानी एकदा तरी द्यावीच अशी ही परीक्षा आहे. पास आणि नापास असं काहीच नाहीये यात. आहे तो फक्त आनंद…. तुम्हाला एका वेगळ्या जगात जगता ये‌ईल, वेगळ्या नशेत गुंगता ये‌ईल….

ह्या सगळ्यानं होणारी नशा उतरणं अशक्यच….. आणि ती उतरावी असं वाटतही नाही.

धुंद रवीNews Sahityabhushan Kothrud Plus 01