बेचिराख….

त्याच्या बेभान आवेगाच्या वर्षावातुन
ओसांडणारा
परमोच्च तृप्ततेचा एक स्वर्गीय स्पर्श,
तिच्या दमलेल्या श्वासातुन ओघळून
तिच्या पापण्यांवर रेंगाळताना
तिला बेचिराख करुन गेला….

तिच्या कणाकणातुन झिरपणा-या
कस्तुरीगंधानं
आधिच निष्प्रभ झालेला तो,
तिच्या डोळ्यावर चढलेला बेपर्वा कैफ पाहून
स्तिमितच झाला….

तिच्या हरण्यामुळे… आज तो जिंकुनही हरला होता…
त्याच्या जिंकण्यामुळे… आज ती हरुनही जिंकली होती…

धुंद रवी

बेईमान…

तिच्या मंद श्वासात
गंध होऊन फुललेल्या
त्याच्या धुंद प्रेमाच्या आर्त सुरांशिवाय
दुसरा सुरच ठाऊक नसणा-या
तिच्या केसातल्या ओल्या वीणेवर
त्याच्या शापीत बोटांनी मोहाचा राग छेडला.
आणि मग….

तिच्या घायाळ पापण्यांनी बहरलेल्या
त्याच्या जखमी ओठात
अडकुन पडलेली बेभान परिस्थिती
पुन्हा एकदा बेईमान झाली….

मग पुन्हा एकदा
तो पावसाची सर होऊन
तिच्यावर बरसत राहीला….

….. तिचा श्वास फुलवत राहिला !

धुंद रवी.

सगळं माझ्यावर सोड….

वादळापुर्वी शांत समुद्रात कोणत्याही क्षणी बुडणा-या होडीत
तिचा हात हातात घट्ट धरत तो म्हणाला….
 
“सहनशक्तीनं थकुन डोळे मिटल्यानंतरही डोळ्यात जीव ओतुन
इतकी वाट आपण का आणि कशाची बघतोय ? वादळ शमण्याची ?
की ह्या वादळी समुद्रात आपली निखळलेली होडी सुरक्षित किना-याला लागण्याच्या चमत्काराची ?
 
आपण आपल्या परीनं सगळे प्रयत्न केले, आता करण्यासारखं काही राहिलं नाहिये म्हणुन….
किंवा उद्याचा शेवट आजच होऊ नये म्हणुन…
….. आपण चमत्कारची वाट बघतोय का ?
 
का आपले प्रयत्न पुरेसे नसले तरी प्रामाणिक होते असं दुस-याला सांगुन
आपण स्वत:लाच फसवतोय… ?
सागरतळातल्या परीसानं आयुष्याचं सोनं करायच्या आपल्या स्वप्नाची जागा
किना-यावरच्या मातीनं कधी घेतली, कळालंच नाही…
अर्थात ते कळालं नाही तेच बरं होतं.
निदान आपल्या पराभवाची मिमांसा तरी करता आली.
 
तसही आपल्याकडे अपयशाच्या कारणांची कमी कधीच नव्हती.
पण ते शोधायला लागलं नाही तर दोष नशिबाला देता येतो…
….किंवा आपसुकंच जातो.
खरं तर आता कुठल्या स्पष्टिकरणाची गरज खरंच उरलीये का ?
आपण खचलोय. आपल्या होडीत साचलेलं पाणी उपसंत उपसंत सगळं संपुन जाणार आहे…
आपण बुडणार आहोत.
आपल्याला पोहताच येत नसतं तर जास्त बरं झालं असतं नाही ?
अपयशाची खंत करत बसण्यापेक्षा, असाह्यतेची किंव करत मेलो असतो…
 
मला माहिती आहे की आपण सोबत आहोत…
पण आपण आधारच मुळी बुडणा-याचा घेतोय का ?
आणि जर हेच आपलं प्रत्येक पाऊल सोबत असणं असेल तर….
….अशाश्वत प्रेमाचं हे सगळ्यात अमानुष उदाहरण असेल….
 
ह्या क्षणाला शाश्वत म्हणता येईल अशी एकच गोष्टा आहे…
आपण बुडतोय सखे… आपण बुडलोय……….!
 
त्याच्या हातातुन हात सोडवुन घेत ती म्हणाली….
तु कोण आहेस ?
सागराच्या बेफाम आणि बेलगाम लाटा
केवळ हौस म्हणुन छातीवर झेलत विलक्षण जगणारा तु
होडीत साचलेलं पाणी उपसंत उपसंत मरणारा असुच शकत नाहीस.
 
तोंडात चांदिचा चमचा घेऊन आला नसशीलही कदाचीत
पण शब्दांच सोनं घेऊन
गुलमोहराला फुलण्याचं वरदान आणि रातराणीला गंधाची मक्तेदारी देणारा तु
किना-यावरच्या मातीकरता आगतीक होऊच शकत नाहीस !
तु तो असुच शकत नाहीस…. !
 
फिनिक्स पक्षाचं राखेतुन उठणं कल्पनेतलं असेलही कदाचीत पण
निराशेच्या राखेतुन मनाचं उठुन भरारी घेणं नाही, ते..
ते आपल्या प्रेमाइतकंच सत्य आणि शक्य आहे….
…. हे तुच शिकवलंस ना मला ?
भरारी पंखांनी नाही मनानी घ्यायची असते, हे जगणारा आणि जगवणारा
आज चमत्कारची भीक मागतोय ?
 
वादळाशी पुसटशी दखलही न घेता
एखादा स्वच्छंदी ढग बनुन… प्रवाहाच्या विरोधात
कुठल्यातरी अतर्क्य जगात विसावणारा तुझ्यासारखा मनस्वी
ह्या फुट्कळ जगात यशापयशात आयुष्याचं सार शोधतोय ?
आणि ते नाही मिळालं म्हणुन नशिबाची लाचरी पत्करतोय ?
तु कोण आहेस ? तु माझा गुलमोहर असुच शकत नाहीस…
तु माझा वादळी पाऊस…. माझा गुलाबी वणवा….
माझा पारीजात असुच शकत नाहीस… !
 
फुलपाखरची तरलता गुंफुन,
जगावर रंग उधळत भासाच्या वलयात तरंगणारा बेधुंद इन्द्रधनु
बुडण्याच्या भितीने खचुच कसा शकतो ?
……आणि ते सुद्धा मी असताना ?
 
अर्थात
जिथं तुला आपल्या प्रेमाची शाश्वती आणि सामर्थ्य कळलंच नाही,
तिथं मरणावर मात करणारी जन्मभराची सोबत
आणि खचलेल्या पावलात जीव ओतणारा आधार ह्याची ताकद काय कळणार ?
 
हो. आपली होडी खचलीये. खरचं खचलीये.
पण आज नाही…. ती कधीच खचली होती. ती केंव्हाच निखळली होती.
………..निखळली होती पण बुडली नव्हती. कधी बुडणारही नव्हती.
 
माझ्या पंखांना आकाशाचं वेड देणा-या
तुझ्या प्रेमाच्या मलमली धाग्यात
……आपली होडी मी बांधुन ठेवली होती.
तुझं सोबत असणं डोळ्यात भरुन घेताना…
मग डोळे घट्ट मिटुन हलकं हलकं होताना
माझ्या पापण्यांवर मी होडी तरंगत ठेवली होती.
…आणि हे सगळं मी करु शकले, ते तु होतास म्हणुन !
नाहीतर हे वादळ पापण्यांवर थोपावणं तर दुरच
तुझ्याशिवाय, तुझ्या विरहातला जड श्वासही मला पेलवत नाही.
तु नसतास तर कधीच बुडलो असते मी आणि
…..मी आहे म्हणुन तुला कधीच बुडुन देणार नाही.
 
सगळ सगळ माझ्यावर सोड.
मी आहे…. मी आहे…. !
 
आता त्यांची होडी किना-याला लागत होती.
समुद्र अजुनही शांतच होता.
पण ही शांतता त्याला यत्किंचीतही न जाणवलेल्या वादळानंतरची शांतता होती.
सगळ तिच्यावर टाकुन तो कधीच तिच्या कुशीत झोपुन गेला होता.
होडीतलं पाणी उपसंत ती एकटीच जागी होती.
 
तसही…
स्वच्छंदी ढगातली मनस्वी धुंदी जपणा-या
विशाल आकशाला लहान होण्याची संधी कधिच नसते.
कारण
स्वप्नातल्या धुक्यात तरंगणारा तो इवलासा ढग
कधी वादळाच्या धक्क्यानी जागा झाला
तर आकाशाच्या कुशीत त्याला इतकचं ऐकायचं असतं…
 
” सगळ सगळ माझ्यावर सोड. मी आहे…. ! “
 
 
धुंद रवी.

आत्मसमर्पण

ज्वलंत असलं
तरी क्षणाचंच आयुष्य घेऊन संपणा-या
कापुरानं
रात्रीच्या गर्भातल्या गर्द काळोखाला शह द्यायचा नसतो.

रतीच्या मादक… खरं तर घातक सौंदर्यापुढे
चंद्रानं स्वत:ची मंत्रमुग्ध रेशीम किरणं
सुर्यानं सुवर्ण कुंडलं
आकाशानं हक्कचं शाश्वत क्षितिज
निसर्गानं अक्षय सर्वस्व आणि
आसमंतानी मनोहर अस्तित्व शुद्ध हरपुन गमावलय…
हे ठाऊक असुनही…..

त्यानी आपलं आयुष्यच काय…
पण आपले कल्पनाभास…. मोगरी वास आणि सगळे अम्रुतश्वासही पणाला लावले.

…..इतका विश्वास तर रातराणीलाही स्वत:च्या उन्मत्त गंधाचा नसेल.

पण…
असह्य वेदनांचं
हळवेपणाची असहाय्यता उपभोगणं
हे अमानुष तर असतच पण
त्याही पेक्षा ग्रुहीत असतं…..

त्यानी आयुष्यच जुगारात लावलं होतं आणि…… ….आणि तो हरला होता….!

राखेच्या उध्वस्त उदरात विखुरलेल्या निद्रिस्त पक्षाचं
राखेतुन उठुन भरारी घेणं
फक्त काल्पनीकचं असतं
……………हे त्याच्या अजाण जाणिवांना कधी जाणवलंच नसावं….

कारण आयुष्य हरुनही
त्याला पुन्हा एकदा
काळोखाच्या अभेद्य साम्राज्याला जिंकुन
एक मोकळा श्वास घ्यायचा होता…

………..तसही त्याच्याकडे आता हरण्यासारखं कही राहीलंच नव्हतं.

त्याच्या ह्या आव्हानाला आवाहन समजत ती म्हणाली
” तुझं जग, तुझा जीव, तुझी प्रत्येक गोष्ट
माझी गुलाम असताना
कशाचा जोरावर तुला माझा जीव जिंकायचाय ? “

तो म्हणाला
ह्या वेळेस मी माझ्या कविता जुगारावर लावेन…. !

आसुरी समाधानाच्या त्रुप्ततेनं भरलेला
तिचा नेहमीचा उग्र चेहरा
पहिल्यांदाच निस्तेज झाला.
आणि….

आणि न लढताच तिनी हार मानली…. आता ती त्याची गुलाम झाली होती.
आज पुन्हा एकदा तो त्याच्याच कवितांवर जगत होता…

आत्मसमर्पण करणा-या
तिच्या पराभुत गर्वाला
तिच्या उद्विग्न डोळ्यातला काळोख म्हणाला…
“जे जे काही अस्तित्वात आहे त्यावर फक्त आपलंच अधिराज्य असताना, हे आत्मसमर्पण का ? “

ती म्हणाली…

” तो त्याच्या श्वासांशिवाय जगु शकतो पण त्याच्या कवितांशिवाय नाही.
ह्यावेळेला जर तो हरला तर
त्याच्या आयुष्यात तर काही रहाणार नाहीच पण
त्याच्या कवित नसतील तर ह्या जगातही जगण्यासारखं काही उरणार नाही.

ह्या मॄतावह ब्रम्हांडावर राज्या करुन मरण्यापेक्षा
त्याचं स्वामित्व पत्करुन
त्याच्या कवितेत जगणं जास्त सुखावह आहे…. “

आता तोच काय…
……..ती सुद्धा त्याच्या कवितांवर जगत होती.

धुंद रवी.

आई…

लहानपणापासुन त्याचं जगणं जरा जगावेगळंच होतं.
त्याला त्याचं असं एक आकाश हवं होतं की जिथं कोणाचेही कसलेही नियम नसतील.
कुठल्याही अटी नसतील.
कुठलही क्षितिज नसेल.
जिथं फक्त त्याची स्वप्न असतील….

स्वप्न ? ………काय असतात स्वप्न ?
जे आपल्याला घडावंसं वाटतं त्याला स्वप्न म्हणायचं का जे घडणार नाहीये त्याला ?

काहीही असो…
स्वप्न बघायला आणि ती पुर्ण होणार असतील तर करायला ताकद लागते.
त्याच्यात होती ही ताकद आणि त्याला आभिमान पण होता त्याचा.
एक दिवस ती त्याच्या आयुष्यात आली आणि त्याला उमजलं की,
खरी ताकद पुर्ण करायला लागत नाही, ती लागते ते दुस-याची स्वप्न आपली मानुन पुर्ण करायला आणि त्या स्वप्नाळू जीवाला नविन स्वप्न द्यायला.

त्याच्या स्वप्नासाठी तीनी तिचं घरटं सोडलं आणि ती त्याच्या घरट्यात आली.
स्वप्न न बघणं एक वेळ सोप्प असतं पण सोडुन देणं खुप अवघड….
आपलं घरटं मागं सोडताना ती खुप काही सोडुन आली होती…..
खुप आठवणी… खुप क्षण…

तिच्या घरट्यात तिनी पहिल्यांदा डोळे उघडल्यानंतर, आईचे भरलेले डोळे बघुन
आईच्या कुशीत शिरल्याचा क्षण…
विजेच्या कडकडाटाला घाबरुन बाबांच्या कुशीत शिरल्याचा क्षण…
तिच्या इवल्याशा चोचीत आईनी भरवलेलातो मायेचा क्षण…
तिला उडता यावं म्हणुन तिच्या आईबाबांनी केलेल्या धडपडीचा क्षण….
तिनी पहिल्यांदा उडुन सगळं आकाश हिंडुन जग जिंकल्याचा क्षण…

त्याचं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं,
पण ’आपण इतक्या सहज आपलं जग सोडु शकतो का ?’ हा प्रश्न त्याच्यामनात आला आणि…
त्याच्या घशाला कोरड पडली. विचार करण्याची त्याची हिंमतच होईना. त्याचे हात थरथरायला लागले. त्याचे डोळे शांत होते… शांत कसले सुन्न होते.
तिच्या उपकराच्या ओझ्याखाली दबलेला तो सुन्न डोळ्यातुन इतकंच म्हणाला की…
“तु हे सगळं कसं करु शकली ?”

ती म्हणाली,
” तुला नाही कळणार…. त्यासाठी बाई असावं लागतं ! “

मध्ये काही क्षण गेले…
ती होती म्हणुन कुठेही सुखात जगत होते. पण एकमेकांसोबत कुठेही जगणारे ते पिलासाठी मात्र असं कुठेही जगायला तयार नव्हते.
त्यांना पिलासाठी एक छानसं आणि मोठ्ठं घर द्यायचं होतं.
त्यामुळे जगाची यत्किंचीतही फिकीर न करणा-या त्या दोघांसाठी प्रत्येक काडीला किंमत होती.
पिलाला द्यायचं घरटं आता थोडंसं राहीलय, ह्या वेडानी भारावलेले ते शेवटच्या चार काड्या आणायला बाहेर पडले ते, पावसाळी हवा पडलीये हे माहित असुनही…
ती पिलाला छातीशी धरुन…
आणि तो, दोघांचं असणं हृदयाशी धरुन घरट्यासाठी घरट्याबाहेर पडला ते स्वप्नांचे पंख लाऊनच.
ह्या स्वप्नांचं थोडं विचित्रच असतं. जगावेगळं जग असतं ते…
त्याचे सुर वेगळे असतात.
गंध वेगळे असतात. त्यांचे ॠतु वेगळे असतात.

निसर्गाचे नियम त्याला ठाऊकच नसतात कदाचीत.
पण निसर्गाला तरी स्वप्नांचा हळवेपणा कुठे ठाऊक असतो ?
नाहीतर पिलासाठी जीव ओतुन गुंफलेल्या त्या घरट्यावर अशी वीज का कडाडली असती ?
ती वीज कडाडलीही इतक्या अमानुषपणे की हजारो पावसाळे पाहिलेला तो वटवृक्षही त्याच्याच आधारानी उभ्या असलेल्या वेलीला घाबरुन बिलगला.

पाउस पडायच्या आधिच त्याच्या भांबावलेल्या डोळ्यात त्यांच्या घराचं स्वप्न बुडत होतं.

त्याला माहितीच नव्हतं की स्वप्न ही एखाद्या नाजुक फुलांवर पडलेल्या दवबिंदुंसारखी असतात.
ती फक्त पहायची असतात.
त्यांना स्पर्श करायला गेलं की ती मातीत मिसळुन जातात…. …….फुलांसकट !

मातीचा गंध जीवाला वेडाउन टाकतो, ते उगाच नाही…
कारण तो कोणाच्या तरी स्वप्नांचा गंध असतो.

त्या ओल्या वातावरणातही त्याच्या घशाला कोरड पडली. विचार करण्याची त्याची हिंमतच होईना. त्याचे हात थरथरायला लागले. तो पुन्हा एकदा सुन्न झाला होता.
पिलाला छातीशी धरुन ती पुन्हा घरट्यापाशी पोहचली होती. तिनी एक क्षण.. एकच क्षण त्या घरट्याकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी घरटं सोडुन ती त्याच्याकडे झेपावली.
त्याचे थरथरते हात तिनी ओंजळीत धरुन त्याला शांत केलं आणि त्याला जवळ घेऊन ती घरट्यात परतली सुद्धा…

निसर्गाला स्वप्नांचा हळवेपणा ठाऊक नसतो तसं त्याचं सामर्थ्य पण माहित नसतं. फुलावरचं ते दवबिंदु साधंहललं सुद्धा नव्हतं.
तिचं पिल्लु सुरक्षित होतं. तो सुरक्षित होता. त्याचं घरटं सुरक्षित होतं.
पाचसाचं थैमान तिनं तिच्या पंखांवर थोपवुन धरलं होतं. ते तिघंही एकाच विश्वासानं तिच्याकडे पहात होते.
“तु हे सगळं कसं करु शकतेस ?” ह्या त्याच्या अपेक्षित प्रश्नाला तिनं नेहेमिचंच उत्तर दिलं.
“तुला नाही कळणार…. त्यासाठी बाई असावं लागतं !”

स्वप्न डोळ्यात असतात तोपर्यंतच ठीक असतं. ती एकदा श्वासात मिसळली की त्यांच्याशिवाय जगणंच कठीण होतं. आपण आपल्या पिलाला त्याचं स्वतःचं असं एक आकाश द्यायचं असं त्या दोघांनी ठरवलं आणि त्या दवबिंदुच्या ओझ्यानी फुलंच वाकलं.
पिलासाठीच पिलाला सोडुन त्यांना रोज लांब उडावं लागणार होतं…. ते ही पिलाला रोज दुस-याच्याच घरात सोडुन…. स्वप्न तुम्हाला मरु देत नाहीत, पण ती तुम्हाला जगुही देत नाहीत.
तिला तिच्या स्वप्नातलं आकाश खुणावत राहीलं आणि नऊ महिने आणि त्यानंतरचा प्रत्येक क्षण पिलाला जवळ ठेवणारी ती निग्रही झाली.
त्यांनी पिलाला त्या घरट्यात सोडलं आणि जड पंखांनी ते निघाले.
तो खुप अस्वस्थ झाला होता. त्याच्या घशाला कोरड पडली. विचार करण्याची त्याची हिंमतच होईना. त्याचे हात थरथरायला लागले होते. तो अजुन एकदा सुन्न झाला होता.
अशा वेळेला त्याला नेहेमीचाच एक आधार होता…. तिचा !

मोठ्या विश्वासानी त्यानी तिच्याकडे पाहिलं…पण…
पण ती स्वतःच कोसळली होती……. ……..खचली होती. त्याच्यासाठी स्वतःचं घरटं सोडताना असलेली तिच्या पायातली ताकद संपली होती.
त्या निसर्गाला थोपवुन धरणारे तिचे पंख गळुन पडले होते.
ती रडत होती. खुप रडत होती.
तिची ही अवस्था बघुन तो उठला आणि पिलाला आणण्यासाठी निघाला.
ती म्हणाली, “थांब राजा, थोडंसं थांब. ते समोरचं आकाश खेचुन आणु आणि मग पिलाकडे येऊ. ते वाट बघत असेल आपली आणि त्याच्या आकाशाची. माझ्यावर विश्वास ठेव. आपल्याला जमेल ते.”

त्याला कळेना… काहीच कळेना…
ना तिचं रडणं… ना खचणं… ना उठणं आणि ना उडणं…. तो म्हणाला,
” मला नाही कळणार… खरंच नाही कळणार… ह्यासाठी कदाचीत बाई असावं लागेल. “

ती म्हणाली,
खरंय तुझं… तुला नाही कळणार… कारण हे कळायला बाई तर असवं लागेलच पण त्याही पेक्षा आई असावं लागेल.”

कुठलाच पुरुष कधी बाई होऊ शकत नाही, …. आई तर नाहीच नाही !

धुद रवी.

लायकी…

 

तिचा निरागस प्रामाणिकपणा
माझ्या श्वासताल्या अधीर वादळानं शांतपणे लुटला……

……आणि तरीही ती म्हणाली की
तुझ्या पापात मी अर्धी वाटेकरी आहे.

वाल्मीकि होण्याची पात्रता माझ्यात नसेलही कदाचित
पण निदान…

निदान माझ्या रक्तातला वाल्या तरी
माझ्या लायकीशी प्रामाणिक हवा होता……..!!!

धुंद रवी

समाधान

 
तिनी मोहाचं अस्वस्थ वादळ ओल्या केसांतुन मोकळं करत
असुसलेला मुसळधार पाऊस त्याच्या श्वासावर बरसु दिला…
आणि….

….तिच्या बेहोष निरांजनातली घायाळ ज्योत
चौकटीत विझवुन जगण्यात अंधार रेटणा-या…
त्या शापीत वाल्मीकीला,
मोहाच्या रानात पंख लाऊन तिच्या नभात उडणारा
तो पापी वाल्याच जास्त समाधानी वाटला….

त्या अलगद कातरवेळी
’तिच्या जगात स्वत:ला उधळून घेणं’ विसरण्यसाठी
त्यानी बेचॆन मनाचं ओझं
पापण्यांवर ठेवत डोळे मिटले… तेंव्हा…

तेंव्हा… तिच्या गालावरुन ओघळणारा अम्रुताचा थेंब
स्वत:च्या ओठांवर जपण्याच्या कल्पनांनी त्याला जास्तच कॆफ चढला….

त्याच्या मिटल्या डोळातल्या बेसुर असहाय्यतेला
त्याचं मोहावरचं नियंत्रण समजुन,
त्याकडे आदराने पहात ती म्हणाली…….. “तु महान आहेस “

ह्यावर डोळे न उघडता वाल्मीकी म्हणाला
” मी स्वत:पेक्षाही त्या मोहाच्या क्षणांशी प्रामाणिक रहायला हवय का ?
जर नाही…
तर मग मी महान असण्यापेक्षा…
वाल्या असताना जास्त सुखी का होतो ? “

धुंद रवी

आवेग..

एका गारव्याच्या शाश्वत बाहुपाशात
स्वत:चं निरागस अस्तित्व झोकुन देत
……………………एक नाजुक पहाट विरघळून गेली.

आपल्या नुकत्याच उमललेल्या आतुर पापण्यांच्या तरल पाकळ्यांवर
त्याच्या अलगद श्वासातले धुंद तरंग
बेहोष सुरांचं वादळ समजुन
साठवायला
तिचे कवितांनी भरलेले मॄण्मयी डोळे
आता अगतिक झाले होते…

आसमंतात अस्वस्थ शहारा फुलवणारी
त्याच्या बेफिकिर अमॄतभासाची मोहक चाहुल
तिच्या आसक्त पापण्यांवर
ओठांचं पाखरु ठेवत होती….

मनस्वी अबोलीच्या
निश:ब्द पाशात अडकलेला
स्वच्छंदी पाऊस…. ओठांवर थोपवुन
थरथरत्या मातीचा शहारता गंध घेऊन उठणा-या
बेधुंद…. मखमली…. गुलमोहरी सुरांना
तिनी केसात गुंतवलं आणि…

ओसरत्या रात्रीचं ते बरसतं दव
ओल्याचिंब श्वासांवर गुरफटून घेणा-या गारव्याचा
पारीजातकी स्पर्श
तिच्या रोमारोमात मोहाची रगिणी छेडुन गेला….

स्वप्नाळू जाईच्या हलव्या कळीचा
तो उमलता लाजाळू शहारा
त्यानं ओठांच्या ओंजळीत धरुन
एक बेसावध फुंकर घातली अन…

………………आवेगानं ती त्याच्या
उबदार मिठीच्या बेभान धुक्यात हरवुन गेली…

… मग त्यानंतर घडण्यासारखं बाकी, असं काही उरलं नव्ह्तंच…

धुंद रवी.