उत्पात

अवघडल्या पोटावरुन
ती जेंव्हा फिरवायची हात
आईची माया पोरीला
जाणवायची आत

मायेचा धागा
       ती हळुवार नाळ
घट्ट पकडून ठेवी
       ते इवलंसं बाळ

दिवसभर चालायच्या मग
मायलेकींच्या गप्पा
भरून जायचा स्वप्नांनी
ओल्या मनाचा कप्पा

बापाला मात्र, नको होती
ही चिमुकली कळी
‘मुलगी होणार आपल्याला’
हे त्याच्या उतरेनाच गळी

तो म्हणाला… हा धागा तोडायचं, नसतं आलं ओठात….

तो म्हणाला… हा धागा तोडायचं
नसतं आलं ओठात
जर ’ती’ ऎवजी ’तो’ असता
वाढत तुझ्या पोटात

शहारलेलं बाळ तिचं
तिला घट्ट घट्ट बिलगलं
अन जगामधल्या प्रत्येक ‘ती’चं
अस्तित्वच हदरलं

प्रत्येक ‘ती’ मग पेटून उठली
हात त्याचा धरायला
तिचा हा जीवघेणा उन्माद पाहून
लागे प्रत्येक ‘तो’ थरथरायला

‘ती’ फुलंही बंड करुन उठली
अन ‘तो’ गंध क्षणात तडफडून मेला…
सावलीविना एकटा पडलेला
‘तो’ प्रकाश कुजुन सडून गेला…

मग क्रोधिष्ट हवा घेऊन आली
मुसळधार बरसता झंझावात
दिसेल जो ‘तो’, जळून मेला
विद्युल्लतेच्या संतापात

ति’च्या अस्तित्वाचा रौद्र तांडव
भीषण उत्पात करत गेला….
अन मायलेकींचा हळूवार कप्पा
नव्या स्वप्नांनी भरत गेला…

धुंद रवी

ते अनुभव सारे अद्‍भूत होते

आईच्या ह्‍दयाचे ठोके
लय श्वासाची स्पर्श अनोखे
गर्भ कोवळा नाजुक धोके
सरळ ढुशा अन‌ उलटे डोके
डोहात डुंबलो हलके हलके
नाळ हलवुनी गिरक्या झोके
लावावे कधी डोहाळे तिजला ….. मग लाड पुरवणे आपसुक होते
ते अनुभव सारे अद्‍भूत होते

बंध काचता सुटण्याची गडबड
नाळ कापता जगण्याची धडपड
धाप लागता उरातही धडधड
घाबरे पारवा पापण्यांची फडफड
विरह आईचा जीवाची तडफड
जीव घाबरा भितीनी रडरड
धरता घट्ट आईने उराशी… …. ते थेंब दुधाचे अमृत होते
ते अनुभव सारे अद्‍भूत होते

ते बालपणीचे, जग स्वप्नांचे
दिवस फुल पाखरी पंखांचे
गंध फुलांचे, रंग ढगांचे
गोष्टीमधल्या अजब जगांचे
कुतुहल भरलेल्या डोळ्यांचे
चकली चिवडा कडबोळ्यांचे
कुल्फीच्या चवदार कांडीचे
आज्जीच्या उबदार मांडीचे
निजल्यावर पदरात आईच्या… …. सुख अलगद बरसत बिलगत होते
ते अनुभव सारे अद्‍भूत होते

ते दिवस गुलाबी, बहरत्या कळ्यांचे
गालावरच्या मदहोष खळ्यांचे
उन्मत्त विषारी उन्माद नशेचे
एकांत किनारी भिजण्यास हवेसे
मोहात दडपलेले
केसात अडकलेले
मिठीत गुदमरताना श्वासात भडकलेले
अधरांच्या त्या प्याल्या मधुनी … बेधुंद हलाहल झिरपत होते
ते अनुभव सारे अद्‍भूत होते

दिवस मावळतीचे पाठवणींचे
सुखात भिजल्या आठवणींचे
कमरेत वाकल्या बाल मनाचे
तृप्त क्षणाचे विक्षिप्तपणाचे
पडक्या दाताचे बहि-या कानाचे
पानगळीतल्या पिकल्या पानाचे
जगणे बाकी राहुन गेल्याचे
राखेमधुनी वाहुन गेल्याचे
जे राख जाहले ते शरीर होते…. गर्भात नवे कुणी उमलत होते
ते अनुभव सारे अद्‍भूत होते

धुंद रवी.

 

लग्नाच्या गाठी

 
जन्मोजन्मीचं वैर काढत
तो दिवसरात्र तिच्याशी भांडत असतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गामध्ये बांधत असतो

लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस
लग्नानंतर राहत नाही
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.

मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो
…आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.

आपला नवरा बैल आहे
असं प्रत्येक बाईला वाटत असतं
त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख
तिच्या मनात दाटत असतं

तो कधी कसा वागेल
ह्याची जरासुद्धा खात्री नसते
नको तेच नेमकं बोलून जाईल
जे बोलायचं त्याला कात्री असते.

मग जमेल तिथं, जमेल तेव्हा, जमेल तितकं
ती त्याला बोलत बसते
त्याच्या तेही डोक्यावरून जातं
पण ह्या नंदीबैलाची मान डोलत असते

त्याचा तो गबळा अवतार
तिला नीट्नेटकं राहयचं असतं
तिला सासू सूनेची सिरीयल
त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं

लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ
पळत कसला, रांगत असतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गामध्ये बांधत असतो

ती तरी थोडी त्याच्यासारखी असेल
असं प्रत्यक्षात घडत नाही
त्याच्या स्वप्नाचे पंख लावून
ती त्याच्या आकाशात उडत नाही

तो गच्चीत तिला घेऊन जातो
इंद्रधनुष्यावर चालायला
ती सोबत पापड कुरडया घेते
गच्चीत वाळत घालायला

त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
लखलखती शुक्राची चांदणी असते
हिच्या डोक्यात गोडा मसाला
आणि वर्षभराची भाजणी असते

प्रेमात रंगून नशेत झिंगून, खूपसं जवळ, काहीसं लांबून, थोडीशी घाई थोडसं थांबून
पौर्णिमेचा चंद्र त्याला तिच्या केसात माळायचा असतो
आणि त्याच वेळेस तिला मोरी धुवायची
किंवा संडास घासायचा असतो.

तिच्या केसांना येतो मग फिनेलचा वास
त्याच्या चंद्राचा गजरा गळुन जातो
ती झाडु मारुन तो कच-यात काढते
त्याचा स्वप्नांचा पाचोळा जळुन जातो

आपली बायको म्हैस आहे
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गामध्ये बांधत असतो
धुंद रवी

कवितांची वही चाळता चाळता

भरुन येतो पाऊस मनात
अन कवितांचा ढग गडगडायला लागतो….
पाऊस ढगातून पडतो त्याहुन
कवितांतून जास्त पडायला लागतो….

मी विचारलं एकदा, त्या वरूणराजाला
शब्दगंधार नभामध्ये,
कधी दुलई ओढुन निजलायेस का रे ?
कवितांमधल्या बेछुट पावसात
कधी ओलचिंब भिजलायेस का रे ?

तो “नाही” म्हणाला,
म्हणुन त्याला
पावसाच्या कवितांची….. एक वही दिली चाळायला
तर पहिल्याच कवितेत इतका भिजला
की लागला पुढच्या कविता टाळायला
कारण पहिलाच पाऊस, तिच्या विरहामधला…………………………………!

कारण पहिलाच पाऊस….
तिच्या विरहामधला
आला छातीत बोचरी कळ घेऊन
अस्वस्थ रात्र….
उध्वस्त गात्र….
अन श्वासात अघोरी छळ घेऊन

आधिच बरसत्या आठवणींची सर….
त्यात धुंद रातराणी…
त्यात कपटी रातकिडा
पाऊस पहिल्यांदाच वाचत होता
त्यानी बरसवलेल्या विरहपिडा

असाच एक दुसरा पाऊस
थेंबांचे पाचु पाडत होता
कुंचला घेऊन इन्द्रधनुचा
ताटवे फुलांचे काढत होता

एक पाऊस पागल होता
ओल्या मातीच्या गंधाचा
एक पाऊस शायर होता
अलवार मुक्तछंदाचा

काळ्या ढगाची शाल ओढलेला
एक पाऊस म्हातारा होता
एक पाऊस पिसाटलेला
उन्मत्त वादळवारा होता

एक पाऊस… तिच्या केसात
गुंतुन पडला…
…मग पडलाच नाही !
एक पाऊस… तिच्या मिठीत
अडकुन पेटला…
…मग विझलाच नाही !

 

एक पाऊस तर फार आगाऊ
नेहमी रेंगाळतो तिच्या गालावर
कुणी वेडा प्रेमी, आधिच धुंदीत
आता येतो कसला भानावर ?

झपाटलेला पाऊसवारा
तिच्या मोकळ्या केसात शिरतो
जळुन जायला… तो ओला वणवा
त्याच्या श्वासांना पुरतो

तो मनात म्हणतो….
तिनी चिंब भिजावं
म्हणजे जवळ तिला धरता येईल
तिला वाटतं…
वीज पडावी
म्हणजे मिठीत त्याच्या शिरता येईल

पण लबाड पाऊस….
रिमझिम पडतो
अन आग भडकते भिजताना
अंधार वाढतो…
ती निरोप घेते
अन वीज चमकते निघताना

थांबवतो पाऊस तिला मग
अन चिंब भिजवतो वर्षांनी
ती आवेगाने मिठीत शिरते
मोहरते त्याच्या स्पर्शांनी

ते मोहरते…. क्षण ओघळते.. घेऊन सरींचे वादळ ते
बरसल्या कविता जोमानी
चाळता चाळता वही कवितांची
पाऊस भिजे पानोपानी

कुणास ठाऊक कुठे हरवली
वही माझी ती कवितांची
कुणास ठाऊक का हल्ली होते
बरसात ढगातून शब्दांची
धुंद रवी

एक तृप्त मैफ़ल…

 

एक ओलीचिंब पहाट….
थंडीला बिलगुन गाढ झोपलेल्या रात्रीच्या
मृदुल पापण्यांवरच्या…..
आर्त दवात न्हालेली… !
प्राजक्त ल्यालेली…. मार्दव प्यालेली….
मखमली धुक्याची मलमली शाल गुरफटलेली….
आरक्त रवीची तांबुस किरणं हलकेच ओढलेली…
ती विरघळुन तरीही आसक्त… भरभरुन तरीही अव्यक्त
ती सावरुन तरीही.. आतुर
तिच्या अतृप्त ओठात… बासरीचे सुर

 

अशा हळुवार पहाटेची
ती अलवार मैफ़ल…
सुरांच्या रेशीम-पदरात अलगद गुंफलेली
श्वासांच्याही नकळत भासांच्या वलयात नेणारी
पापण्यांवर हलकेच रेंगाळलेली
उरात भरुन राहिलेली…. गात्रात उरुन राहिलेली….
कण कण व्यापुन क्षण क्षण स्मरुन राहिलेली
डोळ्यातुन ओघळताना
ओठात थरथरुन राहिलेली….
तिच्या नादात विरघळुन गेलेली मंत्रमुग्ध पहाट
जाता जाता देऊन गेली एक नाजुक पाऊलवाट

 

त्या सुरात सजल्या वाटेवरती
पुन्हा निशीगंध-सुरांची मैफ़ल
मनाचा निशब्द पाचोळा…
देहावर फुललेला शहा-यांचा सडा…
एक अनावर मोह संपुन जाण्याचा… वाहुन जाण्याचा…..

पुढे असतो…
कधीही संपु नये असा एक भारावलेला प्रवास
आणि मागे उरते…
……………..एक तृप्त मैफ़ल !

धुंद रवी.

म्हातारीचा वाडा..

गर्द अंधा-या वाड्यामध्ये…
पिशाच्चांचा राडा
असा गावाच्या वेशीबाहेर….
म्हातारीचा वाडा
म्हातारीच्या वाड्यात म्हणे…
सत्तावन्न खोल्या
सावल्यांनी भरलेल्या अन
रक्तानं त्या ओल्या

गेला कोणी वाड्यामध्ये
तर येणे परत नाही
आणखिन एक सावली वाढे
तरी खोली भरत नाही

वाड्यामधल्या हरेक खोलीत
येतो म्हातारीचा वास
कधी ऐकु येते किंकाळी
कधी पुटपुटण्याचा भास

आमोशाच्या रात्री इथं
कुणी बाळ रडत असतं
वाड्यामागचं झाड वडाचं
दात विचकुन हसतं

कुबट कुजगट म्हातारीची
जळलेली कातडी
बाहेर लोंबता.. फुटका डोळा
अन मान जरा वाकडी

हळद कुंकु… मिरच्या लिंबु
पसरलं असतं घरभर
चिमुरड्यांच्या रक्तासाठी
चटावलेलं तळघर

तळघरात ह्या खेचुन नेतो
सरपटणारा पंजा
कोवळ्या जीवावर ताव मारतो
अतृप्त अघोरी मुंजा

सळसळणा-या जिभाच काढी
खळखळणारा ओढा
असा गावाच्या वेशीबाहेर..
म्हातारीचा वाडा

 

एक पोर चिमुकली.. रस्ता चुकली
खेळत गेली वाड्याकडे
हे बघणा-या गावक-याच्या
जीवाचा थरकाप उडे

पोर ती वेडी.. ओढली गेली
हडळीच्या अमलाखाली
ओलांडुन उंबरा वाड्याचा
भारावुन ती आत निघाली

घाबरुन… तरी धीर धरुन
आत गावकरी शिरला अंती
लागत गेले दरवाजे अन
खसखसली ती तटबंदी

बाधीत ती… संमोहीत ती
जीव निरागस भूल पडे
गावक-याला दिसला पंजा
सरपटताना तिच्याकडे

कुजबुजले कुणी खोल्यांमधुनी
होणार वाटते घात हिचा
तो धावला जीवाच्या आकांताने
धरुन ओढला हात तिचा

पण क्षणात त्याचा जीव गोठला….
श्वासाचा चोळामोळा
त्या चिमुकलीला नव्हता पंजा
लोंबत होता…. फुटका डोळा

चेकाळत मग आला पंजा
सावल्या लागल्या फेर धरु
होऊन चिमुकली, म्हातारीने
पचवले शेकडो वाटसरु

पुन्हा विचकले दात वडाने,
हसला रक्तपिपासु ओढा
असा गावाच्या वेशीबाहेर
…..म्हातारीचा वाडा

धुंद रवी.

शिकलो नाही म्हणुन……

पुन्हा एकदा बाब्या आज…
सर्व शिक्षा अभियान स्मरुन
पायाचे अंगठे धरुन…
भिंतीकडे थोबाड करुन…

तसही बाब्याला जमायची नाही
ती वर्गामधली दाटी वाटी
ठोंब्या कोप-यात उभा रहायचा
सांभाळत पाठी वरची पाटी

बाब्याला कधी
हे उमगलंच नाही
की शाळेतलं ज्ञान फक्त घोकायचं असतं…
आचरणात आणण्याच्या फंदात न पडता
घोकलेलं पेपरात ओकायचं असतं….

मास्तरांचे शब्द…. तो पड्ण्याआधिच झेलायचा
जे शिकवतील मास्तर ते बघायचा जगुन…

मग पायाचे अंगठे धरुन…
भिंतीकडे थोबाड करुन…
मराठीचे मास्तर म्हणायचे
झाडानी छाया
आणि लाडानी माया वाढते
त्यागानी आत्मा शुद्ध होतो
अन आध्यात्मिक काया वाढते

बाब्या गेला माया करायला
मास्तरांच्याच पोरीवर
मग मास्तरांनी धुतला त्याला
आणि वाळत घातला दोरीवर

हल्ली वहीमधल्या पानावर
आणि मुलीशेजारी बाकावर
तो दोन बोटांचा समास सोडतो
मास्तरांची मुलगी आठवली
तरी मराठीचा तास सोडतो

आता बाब्याचा आत्मा बेशुद्ध झालाय
आणि अशुद्ध विचार गेलेत मरुन

कारण पायाचे अंगठे धरुन…
भिंतीकडे थोबाड करुन…

सिकंदराच्या इतिहासातून
बाब्या खुप काही शिकला
आवेश तुफानी पुरुराजाचा
त्याचा दोन दिवस टिकला

मास्तरांनाच म्हणायचा मग
गाठ आहे माझ्याशी
सिकंदरा, जपुन वाग
जसा राजा वागतो राजाशी

असा बाणेदारपणा उठुन दिसतो
फक्त पुस्तकांच्याच पानावर
एका फटक्यात छाटल्या जातात
जर केल्या कुणी माना वर

ह्या बाणेदार पुरुराजाला
मास्तरांनी टाकलं चिरुन

मग पायाचे अंगठे धरुन…
भिंतीकडे थोबाड करुन…

उभ्या आडव्या पट्ट्या हाणुन
मास्तर पाढे घोकुन घ्यायचे
वर्गमुळ घनमुळ लसावि मसावि
त्या इवल्याश्या मेंदुत ठोकुन जायचे
तरी ती अडाणी भाजीवाली सुद्धा
बाब्याला हिशोबात गंडवुन जायची
अठराची भाजी छत्तीसला विकुन
वर खराब कांदे खपवुन जायची

तिथं दोन रुपायच्या कोथिंबीरीसाठी
बाब्याचा बाप घासाघीस करायचा
अन आईनं हिशोब विचारल्यावर बाब्या
नऊ चोक छत्तीस म्हणायचा

हातचं पोर गणितानं घालवलं
चुकलं गणित हातचा राहिला
दोन-अन-दोन चारच नसतात
व्यवहारात बाब्या कच्चा राहिला
आयुष्याच्या गणिताचे
हिशोबच वेगळे
तो सोडवायला जायचा पाढे म्हणुन
मग पायाचे अंगठे धरुन…
भिंतीकडे थोबाड करुन…
भुगोलानी तर बाब्याला
पक्काच फसवलेला
महाराष्टाचा नकाशा दाखवुन
कर्नाटकात घुसवलेला

अक्षांश आणि रेखांश जरी
त्याचे तोंडपाठ होते
राज्याच्या चार दिशांना
सीमा प्रश्न आठ होते

भुगोल म्हणतं माणसाला शहर
मुक्या प्राण्यांसाठी जंगल आहे
बाब्याला मग कळायचंच नाही
का भाषेसाठी दंगल आहे
माणसाला माणसापासुन तोडते भाषा
बाब्या म्हणाला काळीज पिळवटुन

मग पायाचे अंगठे धरुन…
भिंतीकडे थोबाड करुन…
स्पेलिंगनी अपचन
व्याकरणानी बद्धकोष्ठ
गृहपाठ जालिम एनिमाच होता
बाब्यासाठी इंग्रजी म्हणजे
तामिळ तेलगु सिनेमाच होता

इंग्रजी ऑप्शनला टाकल्यासारखा
बाब्या तासाला ताणुन द्यायचा
आरती म्हणावी तसं तोंडातल्या तोंडात
घोळक्यात कविता टाळुन द्यायचा

इंग्रजीच्या मास्तरांची असायची
खाजगीमध्ये शिकवणी
पण बाब्यासाठी मुश्किल होती
हाता-तोंडाची मिळवणी

बाब्या नापास झाला इंग्लिशमध्ये
आता शिक्षणापासुन दुर झालाय…
शिक्षणाच्या पाट्या टाकण्यापेक्षा
पाट्या टाकणारा मजुर झालाय…

पण अठरा रुपायची भाजी हल्ली
पंधराच रुपयात आणतो तो
शिकलो नाही म्हणुन टिकलो
अभिमानानी म्हणतो तो…… !

धुंद रवी

भिकारी

 

हात होते बोटांविना अन
पाय होते पांगळे
बहुदा तो होता मुकाही
भीक त्याला ना मिळे

जखमांस त्याच्या दुर्गंध सारा
ना येणास येई किंवही
जीवघेणा गारठा पण
त्याला नसे जाणीवही

जखमांवरी वेदना भुकेची
निपचिप तो राही पडून
विषाद नाही… दुःख नाही..
ना तक्रारही जगण्याकडून

थकुन गेले यमदुत त्याची
ओढ जगन्याची बघुन
भरुन वाही आयुष्या सारे
चिंब त्या डोळ्यांमधुन

डोळेच त्याचे हात होते
वाट्टेल ते स्पर्शायचा
करुन पंख तो डोळ्यांचे
ढगातही हिंडायचा

जपायचा डॊल्यात आशा
अन असायचा आनंदी तो
असायचे डोळ्यात गाणे
मग गायचा स्वच्छंदी तो

पाहुनी हे भासात जगणे
कोणीजीव एक हेलावला
विसरुनी त्या गलिच्छ जखमा
मदतीस तो सरसावला

घेउन गेला भिका-यास तो
जखमांच्या उपचारासाठी
सतत राहिला बसुन उशाशी
भिका-याच्या आधारासाठी

औषधांनी मग चढली गुंगी
अस्वस्थ भिकारी शांत झोपला
कृतज्ञतेने मिटले डोळे
त्यांस वाटले …..देव पावला

देव कुठला… पशु तो होता
अवयवांचा व्यापार करी
त्यानी घेतले काधुन डोळे
भिकारी पुन्हा रस्त्यावरी

तो आता झाला खरा भिकारी
स्पर्श हरवले…. पंखही खुडले
वाचा गेली… आशा मेली
आयुष्यातले रंगही उडले

थंडी गरजली… भूक बरसली…
जखमांचे थारोळे उरले…
क्षणात मग तो भिकारी मेला
मागे हसरे डोळे उरले…

धुंद रवी.

सखे, तुझ्या ओल्या केसात

सखे, तुझ्या ओल्या केसात
सुरांचा उन्माद असु दे
तुझ्या केसातुन बरसावं… माझ्या शब्दांचं वादळ
त्याला कवितांचा नाद असु दे
तुझ्या रातराणी मेहेफ़िलिनं… छेडावी जीवघेणी गझंल,
माझ्या उध्वस्त जीवाची
त्याला उन्मुक्त दाद असु दे
तो मोहाचा घोट प्यायला…. मी कधी पासुन आतुर,
तुझ्या अनावर पाशाची
त्याला मनसोक्त साद असु दे

सखे, तुझ्या ओल्या श्वासात
माझा….
गुलमोहरी श्वास असु दे
तुझ्या देहावर फ़ुलावा….. माझ्या स्पर्शाचा सडा,
तुझ्या मस्तवाल कळ्यांना
माझ्या मिठीचा वास असु दे
तुझी कातरवेळ असावी….. माझ्या रात्रीला बिलगायला व्याकुळ,
तुझ्या संधी प्रकाशाला सुद्धा
माझ्या विरहाचा भास असु दे
तुझ्या पारीजातकानं झुरावं…….. माझ्या उन्मत्त बहाव्यासाठी,
तुझ्या वसंतातल्या श्रुंगाराला
माझ्या पानझडीचा ध्यास असु दे
धुंद रवी

पडदे

 

प्रिय आईस,
तु मेलीस हे तु बरं केलंस….
गेल्या कित्येक वर्षातली आम्हाला तुझी पटलेली एकमेव गोष्ट…
आम्ही तुझ्या मरणाची वाट बघण्याआधिच तु मेलीस
…हे किती छान केलंस.
तसही तुझी मळलेली सुरकुतलेली कातडी
आमच्या दिवाणखानातल्या पडद्यांना म्याचिंग नव्हतीच.
तुझ्या कपड्यांच्या गाठोड्यापेक्षाहि छोटं
शरीरचं मुटकळं घेऊन
पडुन राहीलीही असतीस कोप-यात…
पण नाही बांधुन घेतली आडगळीची खोली,
…..उगाच तुला मोह नको….!
जनाची आम्ही कधिच सोडली आणि मनाची ही न ठेवता
टाकलं ही असतं तुला अनाथ आश्रमात…
पण तिथंही पॆसे पडतात
आणि आणखिन एक ई.एम.आय. नकोय आम्हाला…
तु सोडवलंस आम्हाला…
तु मेलीस हे तु बरं केलंस….

आणखिन एक…
तु जन्म दिलास आम्हाला आणि वाढवलंस वॆगेरे…
हे असले काही ऎकवु नकोस…
हिशोब जड जातील तुला !

जनावरं पण आपल्या पिलाला जन्म देतातंच की….
पुनरुत्पादन ह निसर्गाचा नियमंच आहे.
त्यामुळे आमच्यावर उपकार केलेस ह्या भ्रमात राहु नकोस…

आम्ही पण सांभाळलच की तुला..
दोनदा दवाखान्यात पण नेलं होतं…. त्यातल्या एकदा तर हाफ़ डे टाकुन…

तसं तुझ्याकडुन कधी तक्रार ऎकली नाही कसलीच.
म्हणजे सुखातंच असणार तु…
पण तरीही तुला ब-याचदा एकट्यानेच रडताना पाहायलय मी…
पण काही सिरियस नसणार… काही कारणच नाही रडायला…

 

पण एक सांगु आई…
हल्ली मला पण असंच रडायला येतं…
आणि रडतो एकट्यानीच….
तुझी खुप आठवण येते आणि मग खुप भरून येतं…

तसं झालं काहीच नाहीये पण….
पण…
मुलगा मोठा झालाय माझा
आणि त्याला काही पटतंच नाही माझं….
दिवाणखान्यातले पडदे बदलायचं म्हणतोय….
हरकत नाही माझी….
पण….

पण… आपल्या घरात आडगळीची खोलीच नाहीये गं !

धुंद रवी