माझी लुंगी खरेदी – पुण्यातल्या दुकानातुन…..

मी एक नशीबवान माणुस आहे. आयुष्यानी मला सगळं सगळं दिलं. प्रेम करणारी बायको… ऐकुन घेणारी मुलगी…. समजुन घेणारा बॉस….. कौतुक करणारे मित्र… सांभाळुन घेणारे सहकारी….. आदर देणारे शेजारी आणि…..

….आणि अजुन काय हवं आयुष्यात? मी तर ढगातुनच चालायचो. जमिनीवर तरंगायचो…. पण मी हे विसरलो होतो की आपल्याला ढगात अढळपद मिळायला आपण काय ध्रुवबाळ नाही. अर्थात तो ध्रुवबाळ जरी पुण्यात खरेदीला आला असता तरी…. असो.

मला फक्त एक लुंगी घ्यायची होती हो… माझ्या विशेष अपेक्षा, आवड-निवड, निकष असलं काहिही नव्हतं… किती वेळ लागायला हवाय एक लुंगी घ्यायला? १० मिनिटं? मलाही असंच वाटलं होतं. एका दुकानात जायचं, लुंगी मागायची आणि पैसे देऊन यायचे…. १० मिनिटं !

….पण सुमारे १० तास लागले आणि दुकानं…. डझनभर !

…… आणि ह्या भयावह अनुभवानंतर काय घालणार मी ती लुंगी ? ती बघीतली तरी किंचाळत डोंगराकडे पळत जातो मी. मला तर लुंगी-फोबीयाच झालाय…. जर मी तिकडं दक्षिणेत रहायला असतो तर एव्हाना आत्महत्याच केली असती.

मी लुंगी खरेदी करायची म्हणुन आप्त-इष्टांना सोबत येणार का म्हणुन विचारलं तर…. प्रेम करणारी बायको तटस्थ झाली, ऐकुन घेणारी मुलगी बहिरी झाली, समजुन घेणा-या बॉसनी अजुन समजुन घेतलं आणि एक दिवसाची पगारी रजा दिली, कौतुक करणारे मित्र गायब झाले आणि शेजारी अजुन आदरानी पाहायला लागले. मग मी मंगल पांडेसारखा त्या शेकडो दुकानदारांसमोर एकटाच उभा राहिलो…

(मला खात्री आहे की तुम्ही मंगल पांडे हा पिक्चर पुर्ण पाहिला नाहीये. कारण हे वाचायला तुम्ही उरलाच नसता. भोपाळ गॅस दुर्घटनेनंतरची भारतातली सगळ्यात मोठी दुर्घटना होती ती ज्यात लोक बेशुद्ध पडले आणि परत शुद्धीवर आलेच नाहीत !) ………..असो. उगाच विषयांतर नको. ह्याविषयी पुन्हा कधीतरी लिहिन.

…..तर मी खरेदीसाठी एकटाच रस्त्यावर आलो.

दुकान नंबर १
ह्या दुकानात मालक एकटेच कान कोरत बसले होते. मी काहि बोलायला लागणार इतक्यात त्यांचा चेहरा इतका वाकडा व्हायचा की माझं धाडसंच व्हायचं नाही. एकशेतीस ग्रॅम मळ बाहेर काढल्यानंतर त्यांनी हात झटकला आणि पुन्हा खोदकाम चालु केले.
त्यांच्या मागेच खुप सुंदर सुंदर लुंग्या रचुन ठेवल्या होत्या. त्या पैठणीच्या मोहासाठी जसं वहिन्या आदेश बांदेकर भाऊजींचे अनाकलनीय अबोध असे विनोदाचे बाण सहन करायला तयार व्हायच्या, तसं मी सुद्धा त्या लुंग्यांसाठी कानातली घाण सहन करत तिथंच उभं राहिलो.

हाताला रग लागल्यानंतर जसं त्यांनी हात बदलायला घेतला तसं मी पण पवित्रा बदलला आणि दुकानात झेप घेतली.
मी : मालक, लुंगी हवीये.
दुकानदार : दुकानात माणुस नाहीये.
(मग तुम्ही काय बैल आहत काय ?, हा प्रश्न मी गिळला….)
मी : अहो…. हे काय इथेच तर आहेत, तुमच्या मागे… दाखवा ना !
दुकानदार : दाखवायला माणुस नाहीये.
मी : तुम्ही नुसतं समोर ठेवा. मी माझं बघतो.
दुकानदार : काढायला माणुस नाहीये.
मी : मग मी काढु का ?

मी असं म्हंटल्याबरोबर….. त्यांच्या कानातल्या मळापेक्षा घाण, नापसंतीदर्शक, तुच्छ कटाक्ष त्यांनी माझ्याकडे टाकला. ह्यावरुन मला दोन गोष्टी समजल्या.
०१. दुकानात माणुस नाही.
०२. गि-हाईक माणुस नाही.

मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.

दुकान नंबर २
पुढच्या दुकानात सगळी माणसं हजर होती. पण जरा विचित्र उभी होती. दोघं जण गालाला गाल लाऊन आणि तिसरा त्यांच्या डोक्याला गाल लाऊन असे बसले-उभे होते. बहुतेक मालक आले नसतील, त्यामुळे सगळे जण कोंडाळं करुन क्रिकेटची कॉमेंट्री ऐकत बसले होते. आणि गालांच्या मध्ये ट्रांझीस्टर होता.

सकाळ-सकाळी कुणी ते क्रिकेट ऐकत, बघत, बोलत असले ना की डोकंच भडकतं माझं ! इंग्रजांनी १५० वर्ष राज्य केल्याचा मला जेवढा राग नाही तेवढा त्यांनी इथे क्रिकेट आणल्याचा आहे. हा एक रिकामटेकड्या नतद्रष्ट लोकांचा दळभद्री खेळ आहे, असं माझं ठाम मत आहे… आधिच माझी क्रिकेटविषयी इतकी तळमळ आणि त्यात कामाच्या वेळेला हि भंकसगिरी…. तरिही मी आत शिरलो.

मी : मला लुंगी हवीय.
दुकानदार : दुकानात मालक नाहीयेत.
मी : मला मालकांची नाही, नविन लुंगी हवीये….. दादा, या इकडे आणि लुंगी दाखवा.
दादा : —
मी : दादा, लुंगी !
दादा : —
मी : ओ दादा, जरा लुंगी दाखवा ना !
दादा : दोनच ओवर थांबा. लंच टाईमला देतो.
मी : ओवर म्हणजे काय ? आणि सकाळी १० वाजता लंचटाईम ? लंचटाईमला तुम्ही जेवायला गेल्यावर कशी देणार लुंगी ?
दादा : आमचा नाय हो…. मॅचमधला.
(असं म्हणुन तो, “कशाला येतात मॅचच्यादिवशी येड्यावानी ” असं काहीतरी पुटपुटत पुन्हा निघुन गेला.)

माझ्या जीवाचा संताप संताप झाला. मी म्हंटलं की मालकांचा फोन नंबर द्या तर त्या निर्लज्ज माणसानी तो दिला. मी रागारागात फोन फिरवला तर तिथच एकाच्या खिशात वाजला. तो माणुस वेड्यासारखा हसत काय होता… नाचत काय होता…. कपड्यांचा ढिग उडवत काय होता…. (कुणीतरी कुणाला तरी सिक्स मारली तर ह्यांना काय होतं देवालाच ठाऊक…)
मी : उगाच आगाऊपणा करु नका. ह्यांचा नाही मालकांचा नंबर हवाय.
दादा : ह्येच तर आहेत मालक….

मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.

दुकान नंबर ०३
सदरच्या दुकानात मी सुमारे २० मिनिटे उभा राहिलो पण माझ्याकडे कुणी ढुंकुनही बघितलं नाही. ह्यावेळात एक भिकारी आला तर दुकानाचे मालक “ए हाड….” असं जोरात ओरडले….

तो भिकारी आणि मी….. गुपचुप दुकानाबाहेर पडलो.

दुकान नंबर ०४
थोडा वेळ बाजारात फेरफटका मारल्यानंतर एका दुकानात मालकच्या जागेवर मालक आणि सेवक असे दोन्ही वर्ग होते. पण गि-हाईकं नव्हती. मी आनंदाने आत शिरलो.

मी : मालक, मला लुंगी हवीये.
मालक : (माझ्यातुन आरपार बघत त्यांच्या माणसांना) …..ह्यांना लुंगी दाखवा.

मला बघुन एकजण कपड्यांच्या ढिगाखाली घुसला… दुसरा माळ्यावर चढला… तिसरा न आलेला फोन उचलुन बाहेर गेला. पण एकजण गुटखा खाण्यात मग्न असल्याने बरोब्बर जाळ्यात ‘घावला’.

मी : नमस्कार. मला लुंगी हवीये.
तो : सॉएब…. टोमाला पोण ऑट्टाच्चाच टॉयम घावोला कारॉव यॉयला… बॉल्लाआट्ता….
मी : तुम्ही जरा तो गुटखा थुंकुन येता का ? मी तुम्हाला नविन घेउन देईन…. (ते त्याचे माझ्या हाता-तोंडाशी आलेले ‘तुषारंचे वैभव’ पुसत मी म्हणालो.)
तो तिथच पलिकडे ‘थुकुन’ आणि तिथल्याच एका कापडाला तोंड पुसुन म्हणाला,
तो : बोला साहेब…
मी : मला लुंगी हवीये. एकदम ट्रॅडीशनल हवीये. पांढरी…किंवा लाईट रंगाची. चेक्स किंवा लाईनींग असलेली…
तो : अशी कुणी वापरत नाही साहेब आता…. नविन फॅशनची घ्या…
मी : मला तशीच हवीये… नाहीये का ?
तो : होती… पण मी आत्ताच त्याला तोंड पुसलं राव…. कुणी घेत नाही अशी, खुप दिवस पडली होती म्हणुन….
मी : ठिक आहे. दाखवा आहेत त्या….
सेल्समन : ही बघा… एकदम लेटस्ट डिझाईन…. अजुन बाजारात असा प्रकार यायचाय… (असं म्हणुन त्यानी मला प्लेन हिरवी लुंगी दाखवली.)
मी : कुठाय डिझाईन ?
सेल्समन : डिझाईन सोडा… रंग बघा साहेब… मोराकडे पण असा हिरवा रंग मिळायचा नाही. एकदम फ़्रेश… बाहेर पडलात तर वळुन वळुन पाहाणार लोकं….
(एक तर मी मोराशी कसलिही स्पर्धा करणार नव्हतो आणि लोकांनी वळुन वळुन बघायला मी काय ऑफिसला घालुन जाणार होतो काय…..?)

मी : पण हा हिरवा रंग जरा अंगावर येतोय हो….
सेल्समन : रंगाचं सोडा. कापड बघा साहेब…. एकदम हलकं… लुंगी घातलीये का नाही ते पण कळणार नाही…
मी : —— !!!! ????
सेल्समन : हात तर लाऊन बघा साहेब…. एकदम ढाक्क्याची मलमल….
मी : हं, मऊ आहे पण किती ट्रान्सफरंट आहे. चुकुन बाहेर गेलो तर लोक वळुन वळुन बघतील. जरा दुसरा प्रकार दाखवा ना…
सेल्समन : ह्याच प्रकारात हिरव्याच्या ऐवजी गुलाबी रंग दाखवु…. ?
मी : गुलाबी ?? छे… काहितरी दुसरं दाखवा ना….
सेल्समन : ………… हे बघा साहेब… एकदम कडक प्रकार…. मार्केटमध्ये कुठही दाखवा असा आयटम आणि फुकट घेउन जा हा….. एकदम लेटस्ट डिझाईन….

ह्यावरही काही डिझाईन नव्हतं त्यामुळे मी डिझाईनचं सोडुन रंग पाहायला लागलो…. छान होता रंग… हलकासा निळा त्यावर पांढ-या रेषा… पण एकदम कडक प्रकार होता… म्हणजे ते मणिपुरी का कुठल्या नृत्य प्रकारात ते चटया घालुन नाचतात ना तसं वाटायला लागलं….

मी : अजुन काय असेल तर दाखवा ना… नाही आवडलं हे पण….
(खरं तर त्यानी मला दोनच प्रकार दाखवले होते पण त्याचा चेहरा मी ‘त्याचा मानसिक छळ करुन अदखलपात्र गुन्हा करतोय’ असा झाला.)

सेल्समन : हे घ्या… हे सोडुन काहिच नाही आपल्याकडे… एकदम लेटेस्ट डिझाईन आणि रंग…. (असं म्हणुन त्यानी एक लुंगी टेबलावर आपटली.) खरंच एकदम लेटेस्ट डिझाईन आणि रंग… मी तरी कुठे पाहिला नव्हता…. काय वर्णन करु त्या लुंगीचं…
‘ आम्रखंडात शेजवान नुडल्स मिसळुन ते मिश्रण पालकाच्या गर्द हिरव्या पातळ भाजीत बुडवुन खाऊन पिवळ्या कापडावर जर एखादं आजारी मांजर ओकलं ‘ तर कसं दिसेल, अशा डिझाईन आणि रंगाची ती लुंगी होती.

मी ती पहिली हिरवी लुंगी घेउन त्याला अस्तर लावुन घ्यावं असा विचार करायला लागलो. त्याला किंमत विचारली तर २७० रुपये म्हणाला. ती उभी चटई १९५ रुपायाची होती. माझा चेहरा पाहुन त्याला काय कळायचं ते कळालं….
सेल्समन : ” घ्यायची नाही तर बघायची कशाला… परवडत नाही तर…………

मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.

दुकान नंबर ५
आता बराच वेळ झाला होता आणि माझी लुंगी खरेदी अजुन तशीच राहिली होती. एका दुकानात शिरलो तर तिथला माणुस म्हणाला की १ वाजलाय.
मी : मग ?
तो : काय नविन आहात काय पुण्यात ?
मी : काय संबंध ?
तो : हे विचारताय म्हणजे नविन आहात. १ वाजता आमचं दुकान बंद होतं. ४ ला परत उघडतं.
मी : का ?
तो : आम्ही माणसं आहोत. आम्हाला जेवायला लागतं.
मी : तीन तास ?
तो : वामकुक्षी…….
मी : दुपारच्या वेळेला ?
——-(एक हिडीस हास्य) ———
मी : म्हणजे कामाच्या वेळेला ?
तो : कुणाचं काम ?
मी : कुणाचं म्हणजे ? आमचं !
तो : मग तुम्ही नका झोपु… आम्ही झोपणार…
मी : पण आमचं काम तुमच्याकडे आहे. ते तुमचं पण कामच आहे ना….
तो : असं कोण म्हणतं…. ?
मी : मी…! तुमचं गि-हाईक….
तो : हे कुणी ठरवलं ? समजा तुम्हाला चक्का हवाय तर तुम्ही माझं गि-हाईक कसं…
मी : एक मिनिट.. चक्क घ्यायला मी तुमच्याकडे का येईन ? इथे येउन मी चक्का का मागेन ?
तो : मागितलात तरी मिळणार नाही.
मी : अरेच्चा… कापडाच्या दुकानात येउन चक्का मागायला मी काय वेडा आहे का ?
तो : ते मी कसं सांगु शकेन ?
मी : विषय बदलु नकात. माझा मुद्दा असा आहे की आमचं काम तुमच्याकडे आहे आणि ते तुमचं पण कामच आहेच.
तो : तर मग आमचा मुद्दा असा आहे की आमची कामं आम्ही आम्हाला हवं त्या वेळात करतो. १ ते ४ नाही म्हणजे नाही.

त्याच्याशी बोलणं अशक्य आहे असं वाटत असतानाच माझं घड्याळात लक्ष गेलं तर १२.५५ झाले होते.
मी : पण घड्याळात बघा… एकला अजुन ५ मिनिटं बाकी आहेत.
तो : तुमचं घड्याळ ५ मिनिटं मागे असेल.
मी : पण तुमच्याही भिंतीवरच्या घड्याळात १२.५५ झालेत.

त्या नालायक माणसानी, काच नसलेल्या त्या घड्याळात बोट घालुन काटे फिरवले आणि १२.५५ चा ०१.०० केला आणि म्हणाला ०१.०० वाजला, तुमच्या घड्याळातल्या ३.५५ ला या….

मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.

दुकान नंबर ६ व ७
एक नंतरही चालु असलेलं दुकान शोधता शोधता बराच वेळ गेला. पण शेवटी मी एक होजीअरीचं दुकान शोधलंच. ह्यावेळेस मी ठरवलं होतं की मिळेल त्या रंगाची, डिझाईनची, किमतीची लुंगी घ्यायचीच.

मी : मालक, लुंगी मिळेल का ?
होजीअरीन : काय राव तुम्ही ? होजीअरी मध्ये येऊन लुंगी मिळेल का म्हणुन विचारताय ? एक वेळ चेन्नईमध्ये मिळणार नाही पण इथे मिळणारच…. हॅ…हॅ…हॅ… !
( मी त्याच्या बरोबर त्या जोकवर हसण्याच्या मनःस्थितीत नव्हतो.)
मी : ….नाही दिड वाजतोय म्हणुन विचारलं.
होजीअरीन : मग? दिड वाजता लुंगी विकल्यानी काय अपशकुन होतो का ? हॅ…हॅ…हॅ… !
मी : नाही… बहुतक लोकांचं दुकान १ वाजता बंद होतं. ४ ला परत उघडतं.
होजीअरीन : आम्ही धंदा करायला आलोय झोपा काढायला नाही. हॅ…हॅ…हॅ… !
मी : व्वा…. मग एक लुंगी द्या.
होजीअरीन : कसली पाहिजे ? (इथे तो हसला नाही. म्हणजे त्याला न हसता बोलता येत होतं)
मी : कसलीही द्या.
होजीअरीन : रंग ?
मी : कुठलाही चालेल.
होजीअरीन : चेक्स चालेल ?
मी : पळेल.
होजीअरीन : लुंगी घालुन पळु नका पडाल…. हॅ…हॅ…हॅ…
मी :द्या २ लुंग्या.
होजीअरीन : ठिक आहे. पण इथे नाहीये.
मी : अहो, आत्ता तर म्हणालात की होजीअरी मध्ये येऊन लुंगी मिळेल का म्हणुन काय विचारताय….
होजीअरीन : म्हणजे ह्या दुकानात नाही आमच्या त्या बाजुच्या दुकानात लुंग्या ठेवतो. इथे फक्त बनियन, अंडरवेअर आणि शेरवानी ठेवतो. लुंग्या तिकडे… तुमचा साईज काय आहे ?
मी : लुंगीचा ?
होजीअरीन : अंडरवेअर-बनियनचा…(हॅ…हॅ…हॅ…) ….आलाय तर घ्या दोन जोडी….
मी : नाही, नको. आधि लुंगी घेतो.
होजीअरीन : आधि लुंगी कशी ? आधि अंडरवेअर-बनियन मग लुंगी. बाहेरुन अंडरवेअर घालायला आपण काय सुपरमॅन नाही. हॅ…हॅ…हॅ… हॅ…हॅ…हॅ… हॅ…हॅ…हॅ… हॅ…हॅ…हॅ…
मी : कुठय तुमचं बाजुचं दुकान… ?
होजीअरीन : बारक्या, ह्यांना आपल्या शेजारच्या दुकानात टाकुन ये….

दुकानदारांचं ‘टाकुन बोलणं’ नेहमीचंच पण हे ‘टाकुन येणं’ जरा नविनच होतं. बारक्या आणि मी त्या बाजुच्याच दुकानाकडे सुमारे १५ मिनिटं चालत राहिलो आणि जाता जाता कुठल्यातरी बारीक बोळात बारकु महाराज अंतर्धान पावले. त्या सातव्या दुकानापर्यंत मी पोहचु शकलो नाही. मग पुन्हा परत ह्याच दुकानात आलो तर शटर डाऊन…
त्यावर लिहलं होतं… दुपारी ०१.३० ते ०५.३० बंद ! (हॅ…हॅ…हॅ… हॅ…हॅ…हॅ… हॅ…हॅ…हॅ…)

ह्यावेळेस मी गुपचुप दुकानाबाहेरच होतो.

दुकान नंबर ०८

भुकेल्या पोटी तहानेने व्याकुळ झालेलो लुंग्याधिर असा तो मी ४ वाजेपर्यंत वणवण भटकत राहिलो. एक बरं आहे की आशा नेहमी अनुभवावर मात करते त्यामुळे आयुष्य थांबत नाही. मी पण न थांबता पुढच्या दुकानासमोर मानसिक तयारी करत उभा राहिलो. मी माझे तोंड उघडायच्या आतच दुकानातुन एक हाक आली…..

“बोला मालक….”

(…..तुम्हाला सांगतो टचकन डोळ्यात पाणी आलं माझ्या. ते दस्तुरखुद्द दुकानाचे मालक आणि मी एक क्षुद्र गि-हाईक…. माझी पायरी ओळखुन मी त्यांच्या दुकानाची पायरीही चढलो नव्हतो…. ते स्वतः आणि आपण स्वतःहुनच मला हाक मारताहेत…? मला बोलावताहेत, काय हवय ते विचारताहेत….? मला मालक म्हणताहेत…? खुप गहिवरुनच गेलो हो मी…. काय बोलावं सुचेनाच.
मग मी ते मायेचे दोन शब्द कानात भरुन घेतले, ते हर्षोन्मादाचे कढ आवरले, खिशातुन रुमाल काढला आणि डोळे पुसुन आत गेलो.)

दुकानदार : बोला मालक….
मी : मला लुंगी हवीये.
दुकानदार : वर बांधणार का खाली ?

(मी अवाक. वर का खाली म्हणजे काय ? त्यांना कंबरेच्यावर… ढेरीच्याखाली.. असं काही उत्तर अपेक्षित होतं का काय ? किंवा ते आपल्यात मुंजीमध्ये बटु बांधतो तसं मागुन पुढे आणि मग क्रॉस करुन परत मागे नेऊन मानेमागे गाठ असं लुंगी बांधण्याची काहीतरी फॅशन वगैरे आली असणार. पण माझ्या संपुर्ण देहाचा घेर पाहता किमान पावणेदोन तरी लुंग्या लागणार आणि वर आरशात मीच मला दिसायची भिती….)

मी : नाही, वर नाही…. मी खालीच बांधेन… नेहमीसारखी… साडीसारखी गोल गोल…. पण वरती पदर वगैरे घेणार नाही.
दुकानदार : मग खाली मोठ्ठी झालर देऊ का… ब्राईट निळ्याला खाली केशरी रेंगाची ? आणि चंदेरी रंगाची पट्टी असेल एकदम बारीक खाली….
(मी पुन्हा आवाक. एक तर ब्राईट निळी लुंगी… त्यात त्याला मोठ्ठी झालर…त्यात ती केशरी रंगाची ?? चेंदेरी पट्टी ??? मला ओळखणारी आसपासची २६४ माणसं मला बघुन लोळुन लोळुन हसताहेत, असं मला दिसायला लागलं.)

मी : नाही हो… असलं काही नको. एकदम साधी. पांढरी आणि सोबत बरा रंग.. चेक्स वगैरे दाखवा किंवा…
दुकानदार : चालेल आणि एक काम करु… .
(तो महान इसम मला काय हवंय हे न ऐकताच चालुच झाला होता….)
एक काम करु…. ….खालुन चुण्या घेऊन घट्ट बांधु आणि वर ओपनच ठेऊ… असा व्ही शेप….

(मी वच्याक… मला पुन्हा ते भयानक दृश्य दिसायला लागलं…. माझ्या पायाला खालुन लुंगी घट्ट बांधली आहे आणि वरुन ओपनच आहे. पण पडु नये म्हणुन मी दोन टोकं धरुन उभा आहे. पाऊस पडतोय आणि ‘दिनवाणा मी’ लुंगीत गारा वेचतोय…………..)

केवीलवाणा मी : मालक तुम्ही फक्त लुंगी दाखवा. ती कशी बांधायची मी बघेन….
दुकानदार : दिवसा का रात्री ?
रडवेला मी : तुम्ही फक्त लुंगी दाखवा. ती कधी बांधायची मी बघेन मालक….
दुकानदार : तुमच्यासाठीच का पावण्यांसाठी ?
हताश मी : तुम्ही फक्त लुंगी दाखवा हो प्लीज.
दुकानदार : बर किती दिवस ठेवणार ?
निराश मी : अहो… तुम्ही लुंगी दाखवा ना प्लीज. मला दोन लुंग्या हव्यात. माझ्यासाठीच. रात्री घालायला. किती दिवस ठेवणार, ह्याच काय उत्तर देऊ मालक ?…. फाटेपर्यंत ठेवेन… म्हणजे जवळ ठेवेन. अंगावरुन रोज सकाळी काढणार….. तुम्ही लुंगी दाखवा ना प्लीज.
दुकानदार : बर.. ठिक आहे. तुमचं नशिब जोरावर आहे राव. आजच नविन माल आलाय. तिनंच लोकांनी वापरलाय… जवळजवळ ब्रॅंड न्यु !!
(जवळजवळ ब्रॅंड न्यु…. हे शब्द कानात घुमायला लागले. माझीच लुंगी आधि वापरलेले तुळु, पंजाबी आणि मद्रासी असे पुर्ण, अर्ध्या आणि पाव लुंगीतले तीन जण मला दिसायला लागले.) मी त्या दुकानातुन बाहेर पडणार इतक्यात…. शक्य तितक्या हिडीस आवाजात मालक हंबरले…
मालक : ए सोपान्या…. गि-हाईक बघ….

गि-हाईक बघ……………..? गि-हाईक बघ म्हणजे मग इतका वेळ काय चाललं होतं ? हा प्रश्न मला पडणार इतक्यात मालकांनी कानाचा ब्लु-टुथ काढला आणि फोन बंद केला…. ! ते ब्राईट निळी, खालुन चुण्या, किती दिवस ठेवणार हे सगळं दुस-याच कोणाला तरी होतं…. मी गुपचुप सोपानरावांसमोर झोळी पसरुन उभा राहिलो….

सोपानराव : हं…. ?
मी : मला लुंगी हवीये.
सोपानराव : असले लुगेसुंगे आयटम आमी इकत न्हाइ.
मी : ??
सोपानराव : चष्म्याचं दुकान सम्होर आहे.
मी : ????
सोपानराव : आम्ही निस्त मंडपाचं कापड, ड्येकोरशन, मांडव असले आयटम इकतो.
मी : अहो पण, बाहेर तर तुम्ही त्या बोर्डावर एका लुंगी घातलेल्या माणसाचं चित्र लावलय.
सोपानराव : हा मंग… आमचे मोठ्ठे मालक हेत ते… अन शेजारच्या रेनकोट-छत्रीच्या दुकानावर एका साधु म्हाराजांचा फोटु लावलाय म्हनजे त्यांनी काय लंगोट इकायचे काय ?

त्या अशुद्ध माणसाच्या तर्कशुद्ध बोलण्यानी बेशुद्ध होऊन…. मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.

दुकान नंबर ९
मी दिसेल त्या दुकानात डोकाऊन समोरचा माणुस माझा किती अपमान करेल ह्याचा अंदाज घेत हिंडत होतो. इतक्यात एका दुकानात मला एक मारवाडी भाभी बसलेल्या दिसल्या. मी आत शिरलो.

मी: भाभी, मला एक लुंगी हवीये.
तर एकदम…. आगीचा बंब जाताना जसा ठणठणाट होतो तसाच पण जरा जास्तच गंजलेल्या घंटेचा असा बसका आवाज झाला. मी इकडे तिकडे पाहिलं तर ती गाडी दिसलीच नाही. मग कळालं की भाभी बोलताहेत.

भाभी : थे एमएसईबीरो बील देवाने आया हो काई…. ?
(माझी भंबेरी उडाली. जिथं मी हिंदीचीच चिंधी करतो तिथं ही बया तर मारवाडी का राजस्थानी बोलत होती.)

मी : हिंदी बोलेंगे क्या ? गुजराती, राजस्थानी मेरे पल्लु नही पडती….
भाभी : (तिनी एक राजस्थानी कलाकुसर केलेली साडी हातात ठेवली आणि म्हणाली…) गुजराथनी साडीमाटे राजास्थानरी कलाकुसरकराडा पल्लु !
मी : आपका कुच गैसमज होगयला हय.. मेरे को घरमे डालने के लिये एक, दो लुंग्या चाहिये थ्या….

ती आत गेली आणि सतरंज्या घेउन आली. मग आम्ही दोघं ‘डम्ब-शरात्स’ खेळायला लागलो. मी तिला खाणाखुणा करुन सांगायला लागलो की असं पोटाभोवती बांधायचं, कंबरेइतक्या उंचीचं असं… वगैरे…
चनीयाचोळी, सिलेंडर, केरसुणी, छ्त्री, पोतं असे वेगवेगळे ट्राय मारल्यानंतर ती मान हलवत ‘ह्यां ह्यां ह्यां’ असं रेकत दुकानाबाहेर गेली आणि १० मिनिटांनी शेजारच्या दुकानातुन माझ्या कंबरेच्या उंचीचा पाणी साठवायचा प्लॅस्टीकचा ड्रम घेउन आली.

मी खचलोच. मला पडलेले यक्षप्रश्न असे –
१. मला पाणी साठवायचा प्लॅस्टीकचा ड्रम हवा जरी असता तरी मी कपड्यांच्या दुकानात का येईन ?
२. कपड्यांच्या दुकानात आलोच तर माझ्या पोटाकडे हात दाखवुन ड्रम का मागेन ?
३. मी चेह-यावरुन एमएसईबीचं बील द्यायला आलोय, असं वाटतं का ?
४. काही बायकांचे आवाज पुरषांसारखे का असतात…. ?
५. काही पुरुष मंडळी, मराठी किंवा हिंदी न येणा-या बायकांना दुकानावर का बसवतात ?

अनुत्तरीत मी : भाभी, आपका मिस्टर बाहेर गया है क्या..? ये दुकान मे कोई दुसरा मर्द वगैरा नही है क्या..? आप अकेले हो क्या ?

तिनी त्याचा काय अर्थ काढला काय माहित पण तिनी कोणलातरी फोन केला. अचानक तिचा नवरा आला आणि तिनी त्याला काहितरी कळवळुन सांगितलं. तो गरगरीत मारवाडी माझ्याकडे जळजळीत नजरेनी पाहायला लागला. ते तप्त वारं माझ्या दिशेनं वाहतय हे पाहुन मी……

….मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.

दुकान नंबर १०
आता बास झालं असा विचार करुन घरी जाणार होतो पण इतक्या अपमानानंतर मी साधि लुंगी घेऊ शकलो नाही हा अपमान मला सहनच होईना. सहज घड्याळात पाहिलं तर ०३.५५ वाजुन बराच वेळ झाला होता म्हणजे त्या दुकान नं ५ मधल्या ‘माणसा’ची वामकुक्षी झाली असणार.

खरं तर ते दुकान खुप लांब होतं पण मी डगमगलो नाही. डोळे फिरलेले पण नजर शाबुत, डोकं फिरलेलं पण विचार काबुत…. पाय बोंबलत होते पण दुकान बोलावत होतं… अंग ठणकत होतं पण ध्येय खुणवत होतं…. शेवटी मी त्या दुकानात पोहचलोच…

मी हश्श हुश्श करत तिथल्या एका स्टूलवर बसलो. खुप घामाघुम झालो होतो म्हणुन त्या वाद घालणा-या इसमाला पंखा लावायला सांगितला तर म्हणाला की आम्ही संध्याकाळी ५ नंतर पंखा लावत नाही. मी कारण विचारलं नाही, वादही घातला नाही. चुकुन मिळालंच तर बघावं म्हणुन पाणी मागितलं…

मी : जरा पाणी मिळेल का ?
तो : ए छोटु… जरा दोन स्पेशल कोकम सरबत घेऊन ये. (म्हणजे पाणी पण मिळणार नव्हतं तर…)
मी : आता तरी दुकान उघडं आहे का ?
तो : हे तुम्ही बाहेरुन विचारलं असतं तर ‘हो’ म्हणालो असतो, पण तुम्ही आत बसुन विचारता आहात. हे म्हणजे..
मी : मी तुमची माफी मागतो ह्या प्रश्नासाठी. पण मला लुंगी हवीये. दाखवता का ?
तो : आम्ही तयार कपडे विकत नाही. फक्त कापड विकतो. लुंगीच कापड देऊ शकलो असतो पण त्याची किरकोळ विक्री आपण करत नाही. तागाच्या तागा तुम्हाला घ्यायला लागेल.
मी : मला काय सगळ्या सोसायटीला लुंग्या वाटायच्या नाहीयेत. आणि हे सांगितलं का नाही मला ?
तो : मग मी हे काय करतोय असं तुम्हाला वाटतय ?
मी : म्हणजे मगाशी का नाही सांगितलंत ?
तो : कधी ?
मी : मी आलो होतो तेंव्हा. १२.३० ला…
तो : तुम्ही ०१.०० वाजता आला होता !
मी : हं… तेच ते… तेंव्हा का नाही सांगितलंत ?
तो : कारण तेंव्हा तुम्ही माझं गि-हाईक नव्ह्ता. दिसेल त्याला “आम्ही तयार कपडे विकत नाही. फक्त कापड विकतो.” असं सांगत बसायचं का आम्ही ?
मी : दिसेल त्याला नाही पण निदान जो दुकानात येईल त्याला तरी ?
तो : मग सांगितलं की तुम्हाला आत्ता…
मी : आत्ता नाही हो… तेंव्हा…
तो : तेंव्हा ०१.०० वाजला होता…

मी गर्भगळीत होऊन बसुन राहिलो. मी पुन्हा एकदा वादविवादात हरलो होतो. पुन्हा एकदा पदरी निराशाच पडली होती. इतक्यात छोटु दोन कोकम सरबत घेऊन आला. मग त्या दोघांनी सरबत पिलं आणि….

…आणि मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.

दुकान नंबर ११
थोडा वेळ शांत डोळे मिटुन बसलो एका दुकाना बाहेर. मग उठलो आणि नविन जोमाने लुंगी शोधायला लागलो. शेवटी मला ते दुकान सापडलंच. तिथे लुंग्यांचा एक वेगळा सेक्शन होता. मी जाऊन उभा राहिलो तर त्या सेल्समननी मला तिन वेगवेगळ्या रंगांच्या, त्यातल्या प्रत्येकातल्या वेगवेगळ्या तीन डिझाईन्सच्या आणि त्यात वेगवेगळ्या तीन किमतीच्या अशा सुमारे २६-२७ लुंग्या दाखवल्या.
मला २ पसंत पडल्या आणि मी भाव विचारला तर तो म्हणाला की…..
“नववर्षाची सूट वजा करुन दोन लुंग्यांचे ९० रुपये.” मी आनंदाने नाचुन पाकीटातुन ९० रुपये काढुन त्या दुकानदाराला दिले तर…..
……तर त्याच्या डोळ्यात पाणी ! मग तो भिकारी मला म्हणाला की “देव, तुमचं भलं करो. आज काल कोण देतय ९० रुपयांची भीक ? ”
मी खडबडुन जागा झालो. अजुनही त्याच दुकानाबाहेर होतो. पण खुप उशीर झाला होता. फाटकी का होईना पण तो लुंगी घातलेला भिकारी दूर गेला होता…. माझे ९० रुपये घेऊन.

स्वप्न फुकट असतात हि गोष्ट आज खोटी निघाली. पैसे गेल्याचं दुःख नव्हतं, लुंगी मिळाली नाही ह्याचा त्रास होत होता. आता एक शेवटचं दुकान बघायचं, नाहीतर ‘ते’ करायचंच असं ठरवलं…. त्यात खुप मोठी रिस्क होतीच पण आता प्रश्न इभ्रतीचा होता……

दुकान नंबर १२
मी रस्त्याच्या ह्या बाजुला होतो. ते कपड्यांचं शेवटचं दुकान त्या बाजुला होतं. मध्ये रस्ता आणि रस्त्यावर गाड्यांची, विक्रेत्यांची आणि माणसांची तुफान गर्दी… घड्याळात पावणेनऊ झाले होते म्हणजे अजुन १५ मिनिटांनी ते सगळे ‘माणुस’ असल्यामुळे जेवायला, झोपायला जाणार….
मी विजय दिनानाथ चौहानसारखं ‘अग्निपथ अग्निपथ’ असं म्हणत त्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहत शेवटी त्या दुकानापर्यंत पोहचलोच. तिथंच त्या दुकानाबाहेर पदपथावरुन त्या जोखमीच्या पण खुप कामाच्या वस्तुची खरेदी करुन आत शिरलो.

आयुष्याविषयी कमालीची विरक्ती वाटावी असे सगळ्यांचे चेहरे होते. कुणीही माझी दखल घ्यायला तयार नव्हते. मी आत गेलो. एकच प्रयत्न करावा आणि मगच ‘ते’ करावं असा विचार करुन काऊंटरवर जाऊन उभा राहिलो….

मी : मला लुंगी हवीये.
माणुस : उद्या या… आजची वेळ संपलीये.
मी : अहो पण ०८.५० झालेत आणि अजुन १० मिनिटं आहेत.
माणुस : हो… पण तो वेळ ह्या कपड्यांच्या घड्या घालायला लागतो. तुम्ही मदत केलीत तर ३ मिनिटात होईल आणि मग ७ मिनिटं उरतील.

मी घड्या घालायला घेतल्या. किती वेळ घालत होतो कुणास ठाउक पण तो माणुस म्हणाला, आता बास करा. ०९.०० वाजले. बाकीच्या घड्या उद्या करु.

आता मात्र माझी सहनशक्ती संपली. माझ्या संतापाचा ज्वालामुखी फुटला आणि मी तांडव करत माझे तिसरे नेत्र उघडले. ‘ते’ करण्याची वेळ आलीच होती…. रौद्रावतारात नृत्य करत मी दुकानाचे शटर खाली ओढले आणि नुकताच विकत घेतलेली ती जोखमीची पण खुप कामाची वस्तु बाहेर काढली.

…………………तो एक कोयता होता…!

चटकन उडी मारुन मी काऊंटरच्या पलिकडे गेलो आणि तो कोयता मालकांच्या मानेवर ठेवला…. आणि गरजलो…

” हरामखोरांनो…. किती छळणार रे नराधमांनो…? बास आता… खुप झालं. गुपचुप एका रांगेत कान धरुन उभं रहा नाहीतर तुमच्या मालकाचा गळा कापुन ठेवेन. मालक, खबरदार जर पैसे बाहेर काढाल तर… आत टाका सगळे पैसे नाहीतर हिशोबाची वही फाडुन टाकीन तुमची…”

(मग मालकाला एक गुद्दा घालुन त्यालाही त्या कामगारात उभा केला. अजुन माझा राग शांत झाला नव्हता…)

” काय समजता तुम्ही मला…. ? एमएसईबीची बीलं वाटणारा शिपाई ? नालायकांनो… गि-हाईक म्हणजे मातापिता. पण त्यांच्यासमोर एकेकटे कोकम पिता तुम्ही ? १ नंतर दुकान बंद ठेवता…. ५ नंतर पंखा बंद ठेवता होय…. एका लुंगीसाठी १२-१२ दुकानं फिरवता काय मला ? १२ उठाबशा काढा आणि स्वतःभोवती १२ वेळा फिरा….”

(कोयत्याच्या भितीनी कामगारांनी पटापटा तसं केलंही पण मालकांना एकही उठाबशी निट काढता येईना.. म्हणुन शेवटच्या ९ उठाबश्यांना मी सूट दिली आणि फे-या वाढवल्या.. अर्थात त्यानंतर सगळे पडलेच होते. पण मी उभाच होतो… त्वेषात… जोशात…)

” गलिच्छ माणसांनो… तुमच्या जन्माच्या वेळेस त्या नर्सनी आंघोळ घातल्यानंतर कधी कान धुतला होता का नाही तुम्ही? त्या तुमच्या घाणेंद्रियात गोम कशी घुसत नाही ? लाज वाटली पाहिजे तुम्हाला दुपारी झोपताना… आणि खबरदार जर बायकोला मराठी येत नसताना दुकानात बसवाल तर…. ड्रम मध्ये कोंबुन मारेन… केरसुणीने झोडपेन…. सतरंजीसकट धुवुन काढेन तुम्हाला…. अरे… अंडरवेअर आणि शेरवीनी ठेवता येते तुम्हाला पण लुंगी नाही काय… भामट्यांनो…. “

(माझ्या वेडेपणाची झांक मला त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होती. गुंडांपेक्षा लोक वेड्यांना जास्त घाबरतात हि नविनच माहिती मला कळाली. हळुहळु माझ्या रागाची जागा दुःखानी घेतली आणि माझ्या हातातला तो कोयता गळुन पडला. मग डोळ्यातुन आसवं गळायला लागली….. )

“…भिकारी समजता तुम्ही आम्हाला…. १२.५५ दुकान बंद करता आणि एक वाजलाय म्हणता…. एकेकटे कोकम पिता….. गुटखा खाऊन तोंडावर उडवता…. “

मला लहान मुलासारखं रडताना पाहुन सगळे माझ्याभोवती गोळा झाले. एकानी मला पाणी दिलं. मालक माझ्या पाठीवरुन हात फिरवयला लागले. त्यांनाच मिठी मारुन बराच रडल्यावर त्यांनी हातात एक गिफ्ट पॅक केलेली पिशवी ठेवली.

“लुंगी आहे….!” – ते म्हणाले.

माझा विश्वासच बसेना. त्यांचे आभार मानुन मी तडक घराकडे पळत सुटलो आणि घरी आल्यावर ते पॅकेट उघडुन लुंगी पाहिली. तीच ती….
‘ आम्रखंडात शेजवान नुडल्स मिसळुन ते मिश्रण पालकाच्या गर्द हिरव्या पातळ भाजीत बुडवुन खाऊन पिवळ्या कापडावर आजारी मांजर ओकलेली ‘

…हल्ली कुठं लुंगी दिसली की मी किंचाळत डोंगराकडे पळत जातो आणि चार-चार दिवस येत नाही. तिथं इतकं शांत वाटतं की इकडे यावंसं वाटतंच नाही. तिथे कायमचं सेटल व्हायचा विचार करतोय….

……….तसंही तिथं वल्कलं विकत घ्यायला लागत नाहीत….!

धुंद रवी.

Sketches 3

 

जनगणना..

एका कोंकणी माणसाने तेलगुत अनुवाद केलेला संस्कृतमधला असा एक हिब्रु श्लोक आहे की,
माजलेला ढग गडगडत राहतो, जोपर्यंत तो पर्वताला धडकत नाही.
माजलेला झेंडा फडफडत राहतो, जोपर्यंत तो पावसाला धडकत नाही. आणि…
माजलेला माणुस बडबडत राहतो, जोपर्यंत तो पुणेकराला धडकत नाही.

विक्रमादित्य अंबिलढगे असाच एक माजलेला ढग होता जो पुण्यातल्या पर्वताला धडकला आणि हवेतच विरुन गेला. तो असाच एक माजलेला झेंडा होता जो पुणेरी पावसात फाटुन गेला. शेवटी पुण्यात पाऊल टाकताना कोणाच्याही जिवाचा थरकाप होतो, ते उगीच नाही !

अंबिलढगे पेशानी शाळामास्तर. गाढवाचं पिल्लु लहानपणी कमालीचं गोंडस दिसतं आणि जरा मोठं झाल्यावर लाथा झाडायला लागतं, असंच ह्या अंबिलढगेचं झालेलं. हेडमास्तरांना सुरवातीला अगदी चुणचुणीत वाटणा-या ह्या अंबिलढगेनी नंतर नंतर असे काही कामचुकार रंग दाखवले की हेडामास्तराचे डोळे पांढरेच झाले. खरं तर हेडमास्तर त्याला उगाचच घाबरायचे. (“गंजलेला पत्रा आणि माजलेला कुत्रा यापासुन दूरच राहवं”, असं काहितरी म्हणायचे ते.)

अर्थात मास्तर व्हायची अंबिलढगेची लायकी नसली, तरी पात्रता नक्कीच होती. तो पात्र असण्याची ५-६ कारणे पुढिलप्रमाणे…

१. अंबिलढगेला दया, माया, प्रेम, क्षमा, करूणा, शांती, सहानभूती, जिव्हाळा, आपुलकी ह्या असल्या कुठल्याही भावनेनी स्पर्श केला नव्हता. त्यामुळे कितीही मुलं दिली तरी जीवाला त्रास न करुन घेता तो हाकु शकत होता…. हाणु शकत होता…. हाडहुडु शकत होता….! सर्व शिक्षा अभियान अंबिलढगे कोळुन प्यायला होता. (सर्व मुलं शिक्षा केली की सरळ होतात असे त्याचे अभियान होते.)
२. तो मराठी सोडून कोणताही विषय शिकवु शकत असे. (‘शिकवु शकत असे’ असे म्हणणे चुकीचे ठरेल. मराठी सोडून कोणत्याही विषयाचा तास घेऊ शकत असे, असे म्हणणे रास्त होईल. आणि खर तर पुर्वी तो मराठीचाही तास घ्यायचा पण एकदा हेडमस्तरांनी त्याला “अरे गनु, मानसातला न म्हन रे” असं म्हनताणा ऐकलं त्याचं व्याक्रनाचं ज्ञाण बघुन ते णतमस्तक झाले. आणि मराठी भाषा एका महान मराठी शिक्षकाला पारखी झाली.
(पारखी झाली म्हणजे काय ते अंबिलढगेच जास्त छान सांगु शकेल. ‘लग्नानंतर ती आईच्या वेड्या मायेला पारखी झाली’ ह्या वाक्याचा अर्थ त्यानी, मायाच्या आईनी तिचं लग्न गुजराथी माणासाशी लावुन दिल्यामुळे लग्नानंतर ती ‘माया वेडे’ ची ‘माया पारखी’ झाली, असा काढला होता. हे हेडमस्तरांनी ऐकलं असतं तर त्यांना वेड लागले असते… आणि मग विक्रमादित्य हेडमास्तर झाला असता. पण असे होणे नव्हते. त्यामुळे शाळा एका महान हेडमास्तरला अंबिलढगे झाली.)
३. मान इकडे-तिकडे न वळवता, एकाच वेळेस अंबिलढगे आख्या वर्गाकडे पाहु शकत असे. मास्तरचं लक्ष नाही असं पाहुन वर्गातला कोणताही उर्मट कार्टा काहीही खोड्या करुच शकत नसे, कारण मास्तर आपल्याकडेच बघतोय ह्याची प्रत्येक मुलाला खात्रीच असायची. (तिरळेपणा म्हणजे काही दोष नव्हे. आणि तो दोष असेलच तर पहाणा-याचा आहे, कारण पहाणा-याला तो तिरळा दिसतोय, त्याला नाही. त्याला तर सरळच दिसतय. म्हणजे तिरळे पाहणारेच……. – असं अंबिलढगे म्हणायचा.)
४. अंबिलढगेची शाळेत पडेल ते काम करायची तयारी असायची. (अर्थात, तो कामाची नुसती तयारीच करतो, प्रत्यक्षात ते काम करतच नाही, हे हेडमास्तरांच्या ब-याच उशीरा लक्षात आलं.) उपकंस – (एखादी गोष्ट जमणार नसेल तर त्याला स्पष्टपणे नाही म्हणणं ही कला आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त कला ’हो’ म्हणुन ते काम न करण्यात आहे, असा कलाकार अंबिलढगेचा सिद्धांतच होता.)
५. त्याचा मामा संस्थेच्या समितीवर संचालक होता. (मामा म्हणजे त्याच्या मानलेल्या आईचा आडनाव बंधु.)
६. भाग्य एकेकाचं ! (सदरचं भाग्य हे अंबिलढगेचं सौभाग्य नसुन विद्यार्थी आणि हेडमास्तर यांचं दुर्भाग्य ह्या अर्थानी घेण्यात यावं….)

अंबिलढगे कामचुकार होता हा हेडमास्तरांचा प्रॉब्लेम नव्हताच, पण त्याचं काम दुस-याच कोणी तरी केल्यानंतरही, ‘ते कसां वाईट झालय आणि आपण केलं असतं तर कसं चोख झालं असतं’ ह्याच्या फुशारक्या तो इतक्या मारायचा की हेडमास्तरांना त्याच्या गळ्यात शाळेची घंटा बांधुन त्याला नदीत ढकलुन द्यावं, असं वाटायचं. पण अंबिलढगेच्या द्वेषानी भरलेल्या मनाच्या फळ्यावर संयमाचा बोळा फिरवुन ते खडु गिळुन गप्प राहायचे.
पण त्या दिवशी तर कहरच झाला. आधिच निवडणुक आयोगानी लादलेल्या जनगणनेच्या कामानी ते त्रस्त होते. कसल्याही मोबदल्याशिवाय, उन्हातान्हात, दारोदारी “माहितीची भीक वाढा” अशा विनवण्या करत फिरुन त्यांना विलक्षण निराशा आली होती. आणि त्यात अंबिलढगे त्यांच्या काळ्या नशिबाच्या फळ्यावर अकलेचा गिरगोटकाला गिरवत बसला होता.

पहिल्यांदाच त्यांचा तोल सुटला आणि त्यांनी सरळ अंबिलढगेला आव्हानच दिलं…. “वर्गाबाहेर बसुन भाषण देणं सोप आहे. इतका स्वतःबद्दल गर्व असेल तर मी पत्ता देतो तिथं जाऊन जनगणनेची माहिती गोळा करुन या. तसही तुमची जनगणनेची काम दुस-यांनीच केलीत. निदान एका वाड्यात तरी जाऊन या. माहिती काढुन यशस्वी परत आलात तर उपमुख्याध्यापक करेन. पण तसेच आलात तर नोकरी गेली म्हणुन समजा…..! “

खरं तर अंबिलढगेला या ही कामाचा कंटाळा आला होता पण हेडमास्तरांची हि ऑफर त्याला एकदम आकर्षक वाटली आणि तो तयार झाला. तोपर्यंत त्याला माहित नव्हतं की हेडमास्तरांनी दिलेला पत्ता हा पुण्यातल्या एका वाड्याचा आहे. (ह्या वाड्याचा आणि जनगणेच्या कामाचा काहि एक संबंध नव्हता. पण ४७ वर्षांपुर्वी हेडमास्तरांना इथे एक अविस्मरणीय वाईट अनुभव आला होता आणि काट्यानं काटा काढावा असं ठरवुन मास्तरांनी अंबिलढगेचा काट्यानं गळा कापला.)

दिलेल्या पत्त्यावर अंबिलढगे पोहचला आणि वाड्याच्या दारातच त्याचा कचरा झाला कारण तिथे एका पुणेरी पाटीनी त्याचं स्वागत केलं…..
“आपली पायधुळ आमच्या वाड्यात झाडण्यापुर्वी हे वाचा.
फिरते विक्रेते, वर्गणी/मदत मागणारे, रस्ता चुकलेले, पत्ता विचारणारे, चोर, भामटे, राजकारणी, मोलकरणी, बोहारणी, भिकारी, डोंबारी, नातेवाईक, पोस्टमन, सेल्समन, मुंग्या/झुरळं आणि रातकिडे यांना आत येण्यास सक्त मनाई.
फक्त पार्कींगसाठी वाड्यात आल्यास वाहनाची आणि वाहन चालकाची हवा काढुन घेतली जाईल.
पुर्वपरवानगीशिवाय आत येऊ नये. फक्त परवानगीसाठी आत येऊ नये. (अपमान करुन बाहेर हकलण्यात येईल.)
ह्यानंतरही आत येण्यास आपण लायक असल्यास/ येण्याची गरज पडल्यास/ आत येऊ शकल्यास गाडी आत आणु नये, पाणी मागु नये, पावलांचा आवाज करु नये, माज करु नये, वाड्याच्या आवारात बसु नये, कामाशिवाय उभं राहु नये, गुटखा खाऊ नये, विनाकारण हसु नये, अवांतर गप्पा मारु नये, घंटी वाजवु नये, अंग खाजवु……………… “
(ह्या पुढेही नियम लिहले होते पण हेच वाचुन अंबिलढगेच्या जीवाचा इतकाच संताप संताप झाला की तो पुढचे नियम न वाचताच आत शिरला. आजपर्यंत त्यानी बायको, हेडमास्तर किंवा विद्यार्थ्यांचे पालक, ह्यांचंही कधीही ऐकुन घेतलं नव्हतं आणि इथे हा एवढा अपमान ? )

अंबिलढगेनी पहिलाच बंद दरवजा ठोठावला आणि आतुन एक अस्मानी कुचेष्टेनी भरलेला माणुसघाणा आवाज आला.
आवाज : बाहेर जा…. बाहेरचा सुचना फलक वाचा आणि मग बाहेरच रहा.
अंबिलढगे : दार उघडा.
आवाज : तुम्ही बहिरे आहात का अशिक्षित ? का बाहेरचा फलक वाचुनही तुम्हाला आत यायचय ?
अंबिलढगे : आधि दार उघडा, मग सांगतो.
आवाज : (आतुनच) अच्छा, म्हणजे तुम्ही ऐकु शकता, वाचु शकत नाही. कोण आपण ?
अंबिलढगे : मी विक्रमादित्य.
आवाज : मग हट्ट सोडु नका आणि तिकडे जंगलात जा वेताळाची गोष्ट ऐकायला….. इथे माणसं राहतात.
(काहिही भांडण वैर राग नसताना, कारण नसताना, संबंध नसताना समोरच्या माणसाला उगाचच कोणी इतकं टाकुन बोलु शकतं ह्यावर अंबिलढगेचा विश्वासच बसला नसता. कुठे ती आपली शाळेतली शान आणि कुठे हा घोर अपमान ?? हा अपमान विसरुन, “मी ब्रह्म आहे” या चालीवर अंबिलढगे म्हणाला…….

अंबिलढगे : मी विक्रमादित्य अंबिलढगे.
आवाज : मग अंबिलओढ्यात जा.
(हे टोनिंग इतकं घाण होतं की खरा ब्रह्म ज्या कमळावर बसलाय त्या कमळाच्या पाकळ्याही कोमेजुन गेल्या असत्या आणि ब्रह्मानी आपली तिनीही तोंड झाकुन घेतली असती….. असो…)
अंबिलढगे : अंबिलओढा? काय बोलताय तुम्ही?
आवाज : तुम्हाला अंबिलओढा माहित नाही?? म्हणजे तुम्ही पुण्याचे नाही. तरीच दुपारी ह्या भागात आलात. पत्ता तपासुन पहा जरा.
(खरं तर अंबिलओढा माहित असायला तो काही नायगरा धबधबा नव्हता, पण आतला माणुस जिथं कारणाशिवायही हिडीसफिडीस करत होता, तिथं ह्यावेळेस निदान त्याच्याकडे कारण तरी होतं !! )
अंबिलढगे : माझा पत्ता बरोबर आहे. तुमच्या वाळीत टाकलेल्या लोकांच्या यादीत मी नाही. दार उघडा.
आवाज : संध्याकाळी या. मी गाढ झोपलोय.
अंबिलढगे : हे सरकारी काम आहे. तुम्ही सरकारी कामात अडथळे आणताय.
आवाज : मी माझ्या गादीवर झोपुन सरकारच्या कामात अडथळे आणतोय? सरकारनी स्वतःच्या गादीवर झोपावं…. माझ्या गादीवर झोपायचं काय कारण?
(आतला डॅम्बिस माणुस टक्क जागा होता, काही झोपला वैगेरे नव्हता, त्यामुळे अंबिलढगे जरा वैतागलाच. थोडा वेळ तो तिथंच दार वाजवत उभा राहिला. पण दार उघडलंच नाही म्हणुन दुस-या दरवाज्याकडे निघाला आणि त्या क्षणीच दार उघडलं. म्हणजे आतला माणुस दरवाज्याच्या फटीला डोळे लावुन बाहेरची गंमत बघत बसला होता. सुमारे ७० वर्षांचे एक आण्णा नामक आजोबा बाहेर आले.)

आण्णा : ओ सरकार… थांबा…. या इकडे…. आता आमच्या झोपेत अडथळा आणलाच आहात तर बोला.
अंबिलढगे : मी जणगनणेच्या कामासाठी आलोय.
आण्णा : कसलं काम ??
अंबिलढगे : ज ण ग न णा
आण्णा : तुम्हाला ज न ग ण ना म्हणायचय का ?
अंबिलढगे : तेच ते…
आण्णा : असं कसं ? खून आणि खूण एकच काय ? *
अंबिलढगे : ओ काका… तुमचा मराठीचा तास नंतर घ्या. हि माहिती भरुन द्या आधि. नाव सांगा….
(आण्णा अचानक बेंबीच्या देठापासुन केकाटले….) …….वासुनानाऽऽऽऽऽऽ !
अंबिलढगे : अहो ओरडताय काय ? मी बहिरा नाही.
(अचानक पलिकडच्या घरातुन “काय आहे ?” असा आण्णांच्या कुचेष्टेनी भरलेल्या माणुसघाण्या आवाजाला भेदुन जाणारा एक तुच्छतेनी भरलेला माणुसद्वेष्टा आवाज आला.)
आण्णा : गि-हाईक !!
वासुनाना : थांबवुन ठेवा….. मी आलोच चहा घेऊन !
(न ण चा घोळ, वासुनाना, गि-हाईक हे सगळं अंबिलढगेच्या डोक्यावरुन गेलं. अर्थात त्याला काहि देणं घेणं ही नव्हतं. त्यामुळे त्यानी आपलं संभाषण पुढे चालु ठेवलं.)

अंबिलढगे : घ्या हा फॉर्म आणि हि माहिती भरुन द्या.
आण्णा : थांबा….. आपण जरा बसुन बोलु.
(इथे आल्यापासुन अंबिलढगेला पहिल्यांदाच बरं वाटलं. त्याला दिला गेलेला हा पहिला आदर होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. आण्णा अंबिलढगेच्या तोंडावर दार आपटुन आत गेले आणि बराच वेळ आलेच नाहीत. आण्णा घर आवरुन मग आपल्याला आत घेतील असा अंबिलढगेचा अंदाज होता, पण तो साफ चुकला. आण्णा बाहेर आले ते एका हातात एकच खुर्ची आणि दुस-या हातात मक्याची दोन उकडलेली कणसं आणि एक रिकामा कप घेऊन…. त्या दोन कणसांपैकी एकाला जोरदार साजुक तूप लावलेलं होतं….. दरम्यान आण्णांच्याच वयाचे वासुनाना त्यांची खुर्ची आणि थर्मास घेऊन आले होते…)
उपकंस आणि थोडं अवांतर – (पुणेकर चहा पण विचारत नाहीत हि धादांत खोटी माहिती आहे. वासुनाना थर्मासमध्ये आण्णांसाठीसुद्धा चहा घेऊन आले होते. तो पावकप चहा त्यांनी आण्णांच्या कान तुटलेल्या रिकाम्या कपात ओतला. मग आण्णांनी त्यांना तूप न लावलेलं छोटसं बेबीकॉर्न दिलं… मग नानांनी खिशातुन एक छोटी डबी काढुन त्यातलं साजुक तूप आपल्या कणिसाला लावलं…. असो…)
मुळ कंस पुन्हा चालु – (आता वासुनाना, आण्णा दरवाज्यात बसुन कणिस खात आणि अंबिलढगे उभा दात-ओठ खात असा तो संवाद पुन्हा चालु झाला….)

अंबिलढगे : घ्या हा फॉर्म आन माहिती भरुन द्या.
आण्णा : काय आहे हे? वधुवर सुचक मंडळात नावनोंदणी करायचा अर्ज? थोडा उशिर झाला तुम्हाला….
वासुनाना : ह्यॅ…ह्यॅ…ह्यॅ…
अंबिलढगे : अहो काहिही काय ?. जणगनणेचा फॉर्म आहे.
आण्णा : म्हणजे ज न ग ण ने चा फॉर्म आहे.
अंबिलढगे : तेच ते… त्यानी काय उत्तर बदलनार आहेत का तुमची ?
आण्णा : णक्कीच णाही बदलनार.
वासुनाना : ह्यॅ…ह्यॅ…ह्यॅ…
आण्णा : तुम्ही काय करता ?
अंबिलढगे : ते तुम्हाला काय करायचय ?
आण्णा : व्वा.. हे बरं आहे…. तुम्ही आम्हाला २३६ प्रश्न विचारणार आणि आम्ही काही विचारायचं नाही ?
अंबिलढगे : हे बघा उगाच वेळ वाया घालवु नका. पटकन उत्तर द्या, मी जातो.
आण्णा : मी रीटायर्ड आहे.
अंबिलढगे : मग ?
आण्णा : मग काय? गेला तर गेला वेळ वाया. वेळ वाचवुन राहिलेल्या वेळात मी काय वेताळाची गोष्ट ऐकु की काय, विक्रम??
वासुनाना – ह्यॅ…ह्यॅ…ह्यॅ…
(विक्रम-वेताळ हि असली कोटी अंबिलढगेच्या डोक्यावरुन गेली. पण आण्णांचा विनोद फुकट गेला नाही कारण वासुनानांनी दात काढले होते.)

अंबिलढगे : तुमच्या प्रश्णाला उत्तर द्यायला मी बांधिल नाही. सहकार्य करा. जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे.
आण्णा : तुम्हाला जणगनणा म्हणायचय का ? तुम्ही चुकुन जनगणना असं बरोबर म्हणालात…..
वासुनाना – ह्यॅ…ह्यॅ…ह्यॅ… ह्यॅ…ह्यॅ…ह्यॅ… ह्यॅ…ह्यॅ…ह्यॅ…
(आण्णांच्या ह्या विनोदावर बेहद्द खुष झालेले वासुनाना इतके हसले की ते खुर्चीवरुन घसरलेच. मग आण्णांनी दिलेलं ते कणिस त्यांच्या हातातुन खाली पडलं आणि वाया गेलं. मग त्याबदल्यात त्यांनी आण्णांचं लक्ष नाही असं पाहुन त्यांना दिलेला पावकप चहा उचलुन पिउन टाकला. आण्णा गि-हाईकाशी बोलण्यात गुंतले होते….. )

आण्णा : ठीक आहे, देतो तुम्हाला उत्तरं पण आधि सांगा तरी की आपण कोण आहात ? हल्ली खुप भामटे असे फिरतात आणि लुटतात हो….
अंबिलढगे : मी तुम्हाला भामटा दिसतोय का ?
आण्णा : समजा…. मी हो म्हणालो तर काय पोलिसंच्या स्वाधिन व्हाल का? आणि दुसरं, जर भामटे भामट्यांसारखे दिसत असते तर त्याला जागेवरच ठोकला नसता का? तुम्हाला सांगतो, मागं असाच एक सभ्य दिसणारा भामटा…………….
अंबिलढगे : बास….. ! मी शाळा शिक्षक आहे.
आण्णा : तो पण असंच म्हणालेला की मी शिक्षक आहे.
अंबिलढगे : कोण ?
आण्णा : तो भामटा.
वासुनाना – ह्यॅ…ह्यॅ…ह्यॅ…
अंबिलढगे : तुम्ही अपमान करताय माझा. मी इथे फुकटात काम करतोय आणि तुम्ही काय हे भामटा-भामटा लावलय?
आण्णा : फुकटात म्हणजे? आम्ही तुम्हाला दर प्रश्नामागे ५-५ रुपये द्यायचे की काय? म्हणजे एक तर आमची खाजगी माहिती तुम्हाला द्यायची आणि….
अंबिलढगे : खाजगी महिती ???
आण्णा : हो मग. हे काय इथे आमचा पिनकोड विचारलाय की…..!
वासुनाना – ह्यॅ…ह्यॅ…ह्यॅ…
अंबिलढगे : पिनकोड ?????????????????????

आण्णा : …….आणि हे बघा, चक्क चक्क बायकोचं नाव घ्यायला सांगितलय. बरं, नुसतच घ्यायचय की घास वैगेरे पण भरवायचा आहे.
(आपण चुकुन मेंटल हॉस्पीटलमध्ये आल्याची शंका अंबिलढगेच्या मनाला चाटुन गेली. खरंच आपला पत्ता चुकला तर नसेल असं त्याला (उभं) राहुन राहुन वाटायला लागलं, कारण शब्दाशब्दाला लाज काढणारा एक म्हातारा आणि वाक्यावाक्याला दात काढणारा दुसरा…. त्याला हे काहि बरोबर वाटेना….. तरीही धिरानं टिकुन तो बोलत राहिला….)

अंबिलढगे : तुम्हाला नाव लिहायला सांगितलय, उखाणा घ्यायला नाही. खाजगी काय आहे यात ?
आण्णा : वा रे वा…. एखाद्याच्या घरात घुसुन त्याला त्याच्या बायकोचं नाव, वय विचारणं हे खाजगी नाही ? चला, तुम्ही सांगा तुमच्या बायकोचं नाव आणि वय…. उखाण्यात पण चालेल….
अंबिलढगे : ओ काका, उगाच डोकं नका फिरवु… द्या पटकन १० मिनिटात फॉर्म भरुन किंवा काकुंना बोलवा….
आण्णा : माझी काकु तर माझ्या लहानपणीच वारली …
अंबिलढगे : तुमची काकु नाही हो…. म्हणजे तुमच्या बायकोला बोलवा हो…. नाहीतर मी तुमची तक्रार करेन….
आण्णा : तक्रार? का बरं….. मी बायकोला बोलावलं नाही म्हणुन? तिला बोलावयाचं असेल तर प्लॅन्चेट करावं लागेल. आत्मे येतात म्हणे प्लॅन्चेट करुन बोलावल्यावर. वासुनाना मी पाट आणतो, तुम्ही वाटी आणा. तसही तिनी मरण्यापुर्वी माझी ‘बर्ड-वॉचींग’ची दुर्बीण कुठे लपवुन ठेवली आहे, ते विचारायचंच आहे मला……
अंबिलढगे : बास झाली तुमची बडबड…. मी तक्रार करेन की तुम्ही माहिती देत नाही म्हणुन…
आण्णा : असं मी कधी म्हणालो.
अंबिलढगे : मग द्या ना हा फॉर्म…
आण्णा : घ्या.
अंबिलढगे : अहो, म्हणजे भरुन द्या….
आण्णा : तुम्हीच भरा, मी सांगतो…
अंबिलढगे : अशी परवानगी नाही आम्हाला… खाडाखोड पण चालत नाही
आण्णा : मग खाडाखोड न करता भरा
वासुनाना – ह्यॅ…ह्यॅ…ह्यॅ… काय हो, तुम्हाला जनगणनेचं ट्रेनिंग देत नाहित का हो?
(पहिल्यांदाच वासुनानांनी तोंडातुन दात सोडुन शब्द काढले होते. जनगणनेच्या कामाचं ट्रेनिंग आपण टाळलं याचं अंबिलढगेला पहिल्यांद वाईट वाटलं….)

अंबिलढगे : फॉर्म भरुन द्यायची आम्हाला परवानगी नाही !!!
आण्णा : मग निरिक्षरांचं काय करता तुम्ही ? (अंबिलढगेनी कधी कामच न केल्यामुळे खरच निरिक्षरांचं काय करतात हे त्याला ठाऊकच नव्हतं)
अंबिलढगे : तुम्ही निरिक्षर आहात का ?
आण्णा : नाही. मी पीएचडी झालोय. ‘अंबिलओढ्यात पडणारं ढगांचं पाणी’ हा विषय घेऊन.
वासुनाना – ह्यॅ…ह्यॅ…ह्यॅ…
आण्णा : पण आज मला लिहता वाचता येणार नाही.
अंबिलढगे : का ?
आण्णा : कारण माझा चष्मा दोरी बसवयला दुकानात टाकलाय. मिळेल महिन्यानी. तुम्ही विचारा काय काय हवीये माहिती ?
(पटापट प्रश्न संपवुन काम संपवुन टाकावं ह्या विचारानी अंबिलढगेनी प्रश्न वाचयला सुरवात केली. अंबिलढगेला कामाला लावणारा हा जगातला पहिला इसम होता.)

अंबिलढगे : पूर्ण नाव, आईवडलांची पूर्ण नावे, पत्ता, जात, जन्मतारीख, जन्मस्थान, शिक्षण, व्यवसाय, घरातल्या वस्तू , वाहने, खोल्यांची संख्या, फोन, इंटरनेट, भ्रमणध्वनी…..
आण्णा : जात??? हि जनगणना जातीनिहाय नाही, हे तुम्हाला सागितलं नाही का निवडणूक आयोगानी? जाती वरून कोणी हाक मारली तर कोर्टात केस दाखल होते आणि तुम्ही मला जात विचारताय?
वासुनाना – तुम्हाला प्रश्नोत्तरांचं ट्रेनिंग देत नाहित का हो?
आण्णा : अहो सरकार, जाती-विरहीत समाज घडविण्याची ही पहीली पायरी आहे. शेवटी माउंटबेटन देश सोडून जाताना जे म्हणत होता ते तुम्ही खरे करून दाखवित आहेत. तुमचा दांभिकपणा बंद करा आता.
(अंबिलढगेला कोण माउंटबेटन हे जसं कळालं नाही तसंच ते ‘दाम-भीकपणा’ हा काय प्रकार आहे ते समजलं नाही. पण काहितरी बंद करायचय इतकच त्याला कळालं. ते मुळीच बंद न करता तो पुढे भांडायला लागला.)

अंबिलढगे : कोण भीक मागतय ? द्यायची तर द्या माहिती, नाहीतर फाडुन टाका हा फॉर्म….. माझं काही जात नाही…. मी काढलाय काय हा फॉर्म…? आणि कोन कुठला माउंटबेटन तुम्हाला कुठतरी जाताना काहितरी बोलला तर माझ्यावर कशाला चिडताय ?
आण्णा : कोण कुठला माउंटबेटन?? शिक्षकच आहात ना तुम्ही ?
वासुनाना : तुम्हाला इतिहासाचं ट्रेनिंग देत नाहित का हो?
(वासुनाना फक्त दातच काढत होते तेच बरं होतं. अंबिलढगेला आत्तापर्यंत कोणत्याही प्रश्नाचं उतर मिळालं नव्हतं. वर अपमानच जास्त. बरं, असंच काम न करता जावं तर हेडमास्तरांचं आव्हान… ! सगळी उत्तर ठोकुन देऊ असा विचार करुन अंबिलढगे रागारागात परत निघाला)

आण्णा : ओ सरकार. कुठे निघालात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जनगणना प्रगणकाने खोटी माहिती लिहल्यास किंवा काम पूर्ण न केल्यास जनगणना अधिनियम १९४८ उपनियम २(ब) अन्वये फौजदारी गुन्हा दाखल केला जातो. दोषींना ३ वर्षांची कैद व १ हजार रुपये दंडाची कारवाई केली जाऊ शकते. तेंव्हा तुमची मनगणना बंद करा आणि जनगणना चालु करा.
(ह्या धमकीने अंबिलढगे तर हदरुनच गेला. काम टाळल्यामुळे एकदा त्याला ३ दिवस बिनपगारी रजा आणि १०० रुपये दंड झाला होता. पण ३ वर्षांची कैद व १ हजार रुपये दंड हे ऐकुनच त्याला घाम फुटला आणि आपला शाळेतला माज किती बिनबुडाचा असतो हे त्याला समजलं. त्यामुळे त्याचा :केविलवाणा हेडमास्तर मोड: ऑन झाला आणि तो व्यथाच मांडायला लागला.)

अंबिलढगे : साहेब, थोडं समजुन घ्या हो… आमचं रोजचं काम सांभाळुन आम्ही हे करतोय. सरकारचे नोकर आम्ही, ते जे सांगतिल तसं करावं लागतं आम्हाला. जनगणना करणरे शिक्षक सुद्धा आपलीच माणसे असतात. त्यांना होणार त्रास कोणी समजुनच घेत नाहीत.
आण्णा : खरं आहे मास्तर तुमचं….. मी वाचलय पेपरात की खुप विचित्र अनुभव येतात तुम्हाला. लोक नीट बोलत नाहीत, साधं घरात सुद्धा बोलवत नाहीत, दहा मिनिटांच्या कामाला उगाचच तास-तास लावतात, चेष्टा करुन उगाचच हसतात….. छे! काही कौतुकच नाही लोकांना… मध्ये तर मी पेपरात वाचलं की एक जनगणना प्रगणक माहिती घ्यायला एका घरी गेला. त्या घरामध्ये एकटी महिला होती. मी जणगणना कर्मचारी आहे असे सांगुनही तिने दार उघडले नाही. नंतर शेजारी कळले की तिचा नवरा घरी आल्यावर विशिष्ट त-हेने दोनदा शिट्टी वाजवतो, मग नंतर ती दार उघडते. बोला आता ?
वासुनाना : तुम्हाला शिट्टी वाजवायचं ट्रेनिंग देत नाहित का हो?
(ह्या वेळेला लाज वासुनानांनी आणि दात आण्णांनी काढले होते. नक्की काय करावं ते अंबिलढगेला सुचत नव्हतं. तब्येत बरी नाही, पुन्हा येतो अशी थाप मारुन पळुन जावं, असा विचार तो करायला लागला. जान सलामत तो नोकरी पचास…. )

अंबिलढगेनी “मी जातो” असं म्हणताच आण्णा एकदम पिसाळलेच…..

आण्णा : खबरदार इथुन हललात तर….. ह्या वाड्यात भर दुपारी पाऊल टाकुन परत जाणारी पावलं अजुन उठायचीयेत…. अजिबात सोडाणार नाही तुम्हाला… मी म्हणत होतो की नंतर या, पण तुम्ही सरकारी कामाची धमकी दिलीत आणि मला गाढ झोपेतुन उठवलंत… आता तुम्हाला हे काम पुर्ण करावंच लागेल…..

अंबिलढगेला त्या दोन्ही म्हाता-याच्या घा-या डोळ्यात भिती वाटावी अशी एक वेडसर झांक दिसत होती. (‘घा-या डोळ्यात’ ह्या शब्दांवरुन काहिही अर्थ काढुन नये. घा-या म्हणजे घार जसं आपल्या सावजाकडे बघते तशा डोळ्यात असा त्याचा अर्थ आहे.) तर त्या घा-या डोळ्यांना घाबरुन तो तिथेच खिळुन राहिला. त्यानी खिशातुन पेन काढला आणि गुपचुप तो फॉर्म भरायला सुरवात केली, ते सुद्धा आण्णांच्या कोणत्याही उत्तराला आक्षेप न घेता….

प्रश्नोत्तरं संपल्यानंतर दिसणारा आण्णांचा फॉर्म खालीलप्रमाणे

नाव : नावात काय आहे ?
सध्याचा पत्ता : इस्पीक गोटु
कायमचा पत्ता : बदाम राजा
लिंग : किलिंग
जन्मतारीख : = भाज्य १००, हार ६३ क्षेप ९०. मसावि १, अपवर्तन + उत्तरात येणार्‍या लब्धीला १० ने गुणावे /१०० भागिले ६३, लब्धि १ बाकी ३७; ६३ भागिले ३७, लब्धि १, बाकी २६ वगैरे करून मिळालेली संख्या
जन्मठिकाण : ऑपरेशन टेबल
राष्ट्रीयत्व : कदाशीव पेठीय
जात – अजातशत्रु
शैक्षणिक पात्रता : फुलपात्र
कुटुंबप्रमुखांशी नाते : ना ते, ना हे, आहे ना ते
घरातल्या सदस्यांची संख्या : १/२

हा फॉर्म घेऊन अंबिलढगे जिवाच्या आकांताने पळत गेला. कुठे ? माहित नाही, कारण तो गावापर्यंत पोहचलाच नाही. सदरच्या फॉर्मचं अंबिलढगेनी काय केलं ? – माहित नाही, कारण तो आयोगापर्यंत पोहचलाच नाही. जनगणनेचं पुढं काय झालं ? ते ही माहित नाही.
पण एक नक्की जी काही भारताची लोकसंख्या असेल त्यात एक आकडा नक्कीच कमी असेल…. आण्णांचा नाही…. अंबिलढग्याचा…! कारण त्यानी स्वतःचाच फॉर्म भरला नव्हता आणि तो ज्या मेंटल हॉस्पीटलमध्ये भरती झाला तिथली जनगणना आधिच झाली होती.!

धुंद रवी.

देशी दारुचे दुकान आणि आध्यात्मिक साक्षात्कार….

कुतुहल हा माणसाला मिळालेला सगळ्यात मोठा शाप आहे. कुतुहलच्या वाटेला गेलं की होत्याचं नव्हतं होतं आणि नव्हत्याचं…..
नव्हत्याचं… मुळीच नव्हतं होतं.

ह्या कुतुहलाच्या नादात माणसाला पार बरबाद होताना पाहिलय. आजपर्यंत ह्या कुतुहलापायी मी कित्येकदा मार खाता खाता राहिलोय….. (……..आणि कित्येकदा खाल्लायही !!)

लहानपणी ट्रॅफीक पोलीसाची शिट्टी वाजवल्यावर काय होतं… कसं वाटतं ? ह्याचं कुतुहल असायचं. मग एकदा हळुच त्याचं लक्ष नसताना वाजवुन पाहिली. प्यायच्या पाण्याच्या पिंपात सोडलेले मासे नळातुन बाहेर येतात का ते पाहिलं. (येतात… विशेषतः जर वडलांनी ग्लास धरला असेल तर… येतातच.) दिवसातले २८ तास अभ्यास करायला लावणा-या हेड्मास्तरांची मुलगी रविवारी काय करते हे तिला पत्रातुन विचारुन पाहिलं. (त्याचं उत्तर परिक्षेच्या पेपरवर मिळालं.) १२०-३०० तंबाखुचं पान खाउन गिळुन पाहिलं, एकच वेळेला बिडी, सिगारेट आणि सिगार ओढली तर काय होईल…(नको.. नको त्या आठवणी…) हे पाहिलं. भावांची माहिती न काढताच मुलींना त्यांची माहिती विचारुन पाहिली. सर्कशीसाठी आणुन ठेवलेल्या अस्वलाच्या पिंज-याचा दरवाजा…… असो….
………पण ह्या प्रत्येक वेळेला मार खाता खाता राहिलो. (मार खाल्लेली कुतहलं इथे लिहणे इष्ट नाही, हे सुज्ञांना कळाले असेलच.) तेंव्हापासुन मनातलं कुतुहल दाबुन मी नाकासमोर चालत आलोय…. अगदी परवा परवा पर्यंत !

पण परवा मी पडलोच. परवा कुतुहलानी मला गाठलंच… मोह आड आलाच….. पाऊल वाकडं पडलंच…. माझ्या घरी येण्याच्या वाटेवर मला दोन अशी मोहाची दोन वळणं येतात. ज्या वळणांवर वळुन त्या वाटेवर हरवुन जावंसं वाटायचं…
एक म्हणजे….
रामदासस्वामींचा मठ ! (नाही… नाही…. हे ते रामदासस्वामी नाही… हे स्वामी म्हणजे रा. म. दासस्वामी. रामय्या मलिंगप्पा दासस्वामी. मागच्याच्या मागच्या जन्मी ते तुकाराम महाराजांच्या कोणाचेतरी कोणतरी होते म्हणे…. म्हणे म्हणजे तिथं गेल्यावर असे लोक म्हणाले. असो). ह्या मठात एकदा तरी नक्की काय होतं हे मला पाहायचंच होतं.

आणि दुसरं मोहाच वळण म्हणजे…
देशी दारुचे दुकान… दुकान म्हणजे फक्त देवाण नाही… घेवाण सुद्धा… म्हणजे देशी दारुचा गुत्ता !
तर मी काय सांगत होतो…. परवा माझं पाऊल वाकडं पडलंच….

त्या पहिल्या वळणावरच्या मठात घाबरत घाबरत मी आत गेलो. एकट्यानीच कुठे अनोळखी ठिकाणी जायला भिती वाटते हो…. आत गेलो आणि बघतो तर ही गर्दी… घाबरलोच. माझ्यासारखेच अनंत भक्तगण तिथे एकमेकांवर उच्छ्वास सोडत उभे होते. आत जाताच एका माणसानी मला कोप-याकडे बोट दाखवुन “आधि… शेवाळे महाराज” असं सांगितलं.

तिकडे गायीच्या तोंडाचा एक दगडी नळ होता. मला वाटलं की गरम पाण्याचं जिवंत कुंड असेल. तिथं खाली तर ग्रीन मार्बल बघुन वाटलं की इथे बहुतेक शेवाळे महराजांनी जिवंत समाधी घेतली असेल. त्या संगमरवरावर पाय ठेवतो तर काय…. ज्ञानेश्वरांच्या भिंतीसारखं आपोआप, पाऊल न उचलता त्या नळापर्यंत पोहचलो. पण तिथं आपोआप न थांबता एकदम त्या नळावरच्या गायीच्या शिंगावर आपटलोच. कपाळावर टेंगुळ आलं. मग कळालं की ग्रीन मार्बल वगैरे काही नाही तिथे शेवाळं साठलय. मला टेंगुळाचा प्रसाद देणा-या त्या हलकट माणसाला मी शोधायला लागलो. पण तो केंव्हाच त्या अनंतात विलीन झाला होता. मग मी ही पुढच्या येणा-या माणसाला कोप-याकडे बोट दाखवुन “आधि… शेवाळे महाराज” असं सांगितलं आणि प्रसाद पुढे वाटला. एका पायात ती हिरवी स्लीपर आणि दुस-या पायावर ती मेंदी घेऊन मी रांगेत उभं राहिलो.

“स्वामींना अस्वच्छेतेची खुप चीड ! ” अशी बहुमुल्य माहिती मला एका भक्तानी पुरवली. भक्तांच्या पदकमलांनी तिथे हिरवे हिरवे गार गालीचे असे साठत असतील तर कुणालाही चीड येईल.
“हि जागृत वास्तु आहे आणि तुम्हाला इथे ओम सतत जाणवत राहतो.” हि दुसरी माहिती मिळते न मिळते तोच एक माणुस गंध घेऊन आला. त्याच्या हातात ओमच्या आकाराचा एक आकडा होता, जो गंधात बुडवुन तो लोकांच्या कपाळावर लावत होता. ते गंध त्यानी इतक्या जोरात माझ्या कपाळावरच्या टेंगळावर लावलं की मला वाटतं ते मागुन पण दिसलं असेल. पण एक खरं झालं की तो ओम मला सतत जाणवत राहिला.

लोक मुर्ख असतात हो…. काय वाट्टेल ते करतात हो. कधी त्यांच अनुकरण करु नये. तिथं एका समाधीबाहेरची साखळी घेऊन लोक कपाळावर लावत होते, डोळ्यांना लावत होते, डोक्यावरुन फिरवत होते. मी पण एका सामाधीबाहेरची साखळी घेऊन कपाळावर लावली आणि सोडुन दिली. ती त्या समाधीवरच्या दरवाज्यावर आपटली. आणि तो दरवाजा च्क्क उघडला गेला. पाहातो तर काय…
चमत्कार !!

त्या जागृत समाधीतुन एक जिवंत बाई….. साध्वीच असणार कोणतरी ! “कोन पायजे ?” हे इतक्या भसाड्या आवाजात तिनी मला विचारलं की माझी तंद्री भंग पावली. मग तिथे मठाचा रखवालदार राहतो आणि ती त्याची बायको आहे ही अजुन एक बहुमुल्य माहिती मिळाली.
मिळेल तिथले अंगारे घेऊन लोक भरुन घेत होते, उदबत्त्या हुंगत होते, भंडारा उधळत होते, कुंकु कपाळावर लावत होते. मी पण तिथल्या एका भिंतीवरचं कुंकु कपाळावर लावलं.

लोकं काय असभ्य, बेशिस्त, असंस्कृत, बेजवाबदार, अशिक्षित, बेअक्क्ल आणि आर्वाच्य असतात हो. एक तर मठात येतानाही गुटखा वगैरे खाउन येतात आणि वर कुठही थुंकतात. ते कपाळावर लावलेलं थुंकु… माफ करा… कुंकु धुवायला मी पुन्हा शेवाळे महाराजांकडे गेलो. मग दुस-याही पायावर मेंदी काढुन घेऊन मी पुन्हा रांगेत आणि मग पुन्हा तो कपाळावर ओम कोरण्याचा कार्यक्रम झाला.

तिथं इतकी गर्दी होती की त्या रांगेत घामाघुम झालो. लोक एकमेकांना अगदी चिकटुन चिटकुन उभी होती. घाम आला म्हणुन रुमाल काढायला खिशात हात घातला तर हातात चुन्याची डबीच आली. कुणाच्या खिशात हात घातला होता कुणास ठाऊक ! मग पुन्हा तिथं ठेवायला गेलो तर तिथं आधिच एक डबी होती. मला काय समजायचं ते समजलं. मी गपचुप ती डबी खाली टाकली. ती तिस-याच भक्ताच्या पायावर पडली. त्याला वाटली त्याचीच.

(इथे सगळे भक्तांकडे जोरदार त्रिसुत्री होती. हातात फुलांचा हार, कपाळावर घामाची धार आणि तोंडात तंबाखुचा बार… )
तर त्याला वाटलं की त्याचीच डबी म्हणुन तो मागच्याला धक्का देऊन खाली वाकला. त्या मागच्याला वाटलं की तो पहिला नमस्कारालाच वाकलाय. देवाचंच काहितरी म्हणुन तो ही त्याच्या मागच्याला धक्का देऊन खाली वाकला. लोकं माकड असतात. कशाला कुणाचं अनुकरण करायच.. ! पण नाही…. मग त्या माणसाच्या मागचा वाकला, मग त्याच्या मागचा…. असं करत करत शेवटचा माणुस एकदम बाहेरच ढकलला गेला. मग तिथं छोटीशी झटापट झाली. त्या गोंधळाचा फायदा घेउन मी हळुच स्वामींच्या खोलीत शिरलो.
आत गेल्यावर रा. म. दासस्वामींचं दर्शन झालं. फॅन्सीड्रेस स्पर्धेत अफजलखानसारखं दिसणा-या कुणी जर तुकाराम महाराजांचा ड्रेस घातला तर कसं दिसेल तसे ते दिसत होते. डोळे मिटुन ते रामदासस्वामी (स्वतःच्याच) मनाचे श्लोक म्हणत होते. मध्ये त्यांनी डोळे उघडले आणि तुकाराममहाराजांचा अभंग वाचला….

आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदाचे
काय सांगो जाले काहीचियाबाही
पुढे चाली नाही आवडीने
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा मुखा आला

हा अभंग त्यांनी तिथं का म्हंटला ते काही कळालं नाही. त्यांना नमस्कार करुन बाहेर पडावं असा विचार करुन मी नतमस्तक होणारच होतो. पण त्याआधिच स्वामींच्या एका शिष्यानी माझं मुंडकं पकडुन त्यांच्या पायाशीच इतक्या जोरात आपटलं की तो कपाळावर कोरलेला ओमसुद्धा खाली पडला. आणि ओम पुन्हा त्या वास्तुतच राहिला.
नुसता ओम पडला असता तर काही वाटल नसतं, पण त्या ओम बरोबराच माझ्य खिशातुन शंभराची एक नोट पडली हो…! ती महाराजांनी उचलुन लगेच खिशात घातली आणि एकदम जोरात ओरडले, ” विचार वत्सा, विचार एक प्रश्न “
” ती माझी पडलेली नोट परत मिळेल का ?” असं मला विचारायचं होतं पण त्या शिष्याचा हात अजुनही माझ्या मानेवरच होता. खाजगी प्रश्न त्या गर्दीत विचारणं शक्यच नव्हतं म्हणुन काहितरी विचारायच म्हणुन मी विचारलं की आनंदाचे डोही आनंद तरंग ह्या अभंगाचा अर्थ कळेल का ? तर स्वामी म्हणाले की, ” आत्मनंदात आत्मवंचना झालेल्या आत्म्याला आत्मचिंतीत आत्ममननाची जोड दिली तर आत्मपरिक्षणानंतर जन्मणा-या आत्मविवेचनातच आध्यात्मिक आत्मसाक्षात्कार आत्म्याला होतो. “

मी त्या शंभर रुपायाच अखेरचं दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो ते पुन्हा कधी कुतुहलाच्या वाटेला जायचं नाही हे ठरवनुच…. !

पण अनुभवाच्या वळणावर सडकुन आपटुन शहाणा झाला तर तो माणुस कसला ! ते देशी दारुचं दुकान मला बोलावत राहिलं आणि एक दिवस मी दुस-या वळणावर वळालोच. आणि ज्या अभंगाचा अर्थ मला त्या मठात कळला नव्हता तो मला त्या गुत्त्यात कळाला.

त्याचं असं झालं…………
मला नेहमी रस्त्यावरुन जाताना तो दारुचा गुत्ता दिसायचा. जाता जाता काही क्षणांसाठी त्या गुत्त्याच्या दरवाज्यावरचा पडदा हलायचा आणि आत दिसायचे सगळे तृप्त चेहरे… समाधानाने ओथंबलेले… सुखाने डोळे काठोकाठ भरलेले…. पराकोटीच्या आनंदात रममाण…. शांत, प्रसन्न, उत्साही जीव… ध्यानमग्न…. आत्मतल्लीन….. पुण्यात्मेच !!
का नाही वाटणार हेवा…? का नाही होणार मोह….? का नाही वळणार पाऊल तिकडं… ? वळालंच एकदा….
गाडी थोडी लांबच लावली आणि चालत चालत त्या ध्यानमंदीराकडे निघालो. कुणी ओळखु नये म्हणुन तोंडावर रुमाल बांधला. छातीत जाम धडधड होत होती पण कुतुहलही तितकच होतं. कच खाऊन मागे वळणार तितक्यात पुन्हा पडदा हलला आणि पुन्हा त्या चेह-यांच दर्शन… मग दारात जाऊन उभं राहिलो.

तुम्हाला खोटं वाटेल पण, दारात दोन बायका दोन बाजुला स्वागताला उभ्या होत्या. ते भरतनाट्यम का कथ्थकला नेसतात तश्या जरीच्या साड्या नेसुन… दोघींच्या लांबसडक वेण्या, अगदी कंबरेपर्यंत…. त्यावर वेगवेगळ्या फुलांच्या वेण्या, चमक्या, वेगवेगळ्या रंगांचे मणी आणि गजरे…. डोळ्यात नीळं काजळ आणि गालावर (आपल्याकडे शाळेत स्नेहसंमेलनात लावतात तसं) गुलाबी रुज का काय ते…. हातात (‘त्या लमाणी आहेत काय’ असा संशय यावा इतक्या) बांगड्या… पायात जाडजुड पैंजण (त्याला घुंगरु आहेत की घंटा हे मी बराच वेळ पाहत राहिलो पण कळालं नाही)…. एकीच्या हातात आरतीची थाळी आणि दुसरी ‘प्रभात चित्र’वाल्या बाईसारखी एक पाय मागे दुमडुन फुलं टाकयासाठी तयार….

पडद्यावर पण काय छान छान चित्र असतात ना….!

मग त्या स्वागतानं गहिवरुन गेलेलो मी आत गेलो. आणि आतलं वर्णन काय सांगु महाराजा… ? तिथं जनसागरच लोटला होता. प्रंचंड गर्दी पण गोंधळ अजिबात नाही. सगळ शिस्तबद्ध…. ४ माणसं रांगेत होती… ७ रांगत होती…. ६ वेगवेगळ्या दिशेला तोंड करुन, पायांचे एकमेकांशी विविध कोन करुन बसली होती (हि बसलेली माणसं कुणाशी तरे बोलत होती पण बहुतेकांच्या समोर दुस-याचे पाय, पाठ किंवा भिंत होती. केवढी मानसीक ताकद पहा… कुणी असो नसो फरक पडुन द्यायचा नाही. नाहीतर आपण…)

….आणि सुमारे ११ माणसं अस्ताव्यस्त पडलेली होती…(सुमारे असं म्हणण्याचं कारण की नीट मोजता नाही आली. कोण कुणाच्या वर आहे, कुणाचं अंग कुठलं आहे आणि डोकं कुठंलं आहे काही कळत नव्हतं. मग हात आणि पाय मोजुन पाहिले तर हात २३ भरले आणि पाय २१… म्हणुन सरासरी ११. अर्थात खुप खालची खालची माणसं नाही मोजली. कारण ती मोजताना वेळ जात होता आणि तोपर्यंत रांगत असलेली माणसं पडत असल्यामुळे घोळ व्हायला लागला.)

हसु नकात…. भल्याभल्यांना जमणार नाहीत अशी योगासनं करणारे हे योगी….., (हो मग… योगीच ते… नाहीतर जमिनीवर बसुन, एक पाय स्वतःच्याच गळ्यात, दुसरा पाय समोरच्या बाकड्यावर, त्या पायावर एक योगी-बंधु, मांडीवर एक योगी-बंधु, एका हाताने भिंतीचा आधार घेतलेला आणि दुसरा हात सापडत नाहीये…अशा अवस्थेत मान खाली खाली नेऊन तोंडानी जमिनीवरचा ग्लास उचलायचा… ह्यासाठी कमीतकमी १३८ योगासनं माहित हवीत.)

तर हे सगळे हटयोगी, दिसत असले जरी जमिनीवर, तरी होते सगळे तरंगत. इतक्यात एका महात्म्याने मला टेबल समजुन, (मी आहे थोडा बुटका, त्यात त्याची काय चुक) माझ्या डोक्यावर ठेवलेला ग्लास माझ्यावर अमृताचा वर्षाव करुन गेला आणि मी चिंब भिजलो. आनंदाच्या लाटांवर लाटा उसळत होत्या आणि त्या आनंद-डोहात सगळे चिंब भिजले होते. सगळय़ांच्याच अंगात आनंद इतकाच ओसंडत होता की तुझं अंग, माझं अंग असा फरकच राहिला नव्हता. ह्या वातावरणात मी गहिवरुन गेलो आणि नकळत तोंडातुन शब्द बाहेर पडले…
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदाचे

कुठे ते दासस्वामी, जे डझनभर शब्द घेऊन सुद्धा मला काहिच समजावु शकले नाहीत. आणि कुठे ही मंडळी, ज्यांनी न बोलताच मला पहिला श्लोक समजावुनही दिला.
माझ्याही नकळत मी रांगेत उभा राहिलो आणि कधी एकदा माझा नंबर येईल ह्याची वाट पाहायला लागलो. मी असं ऐकलं होतं की प्रत्येकाच्या आयुष्यात सुंदर सुंदर गोष्टी घडतातच पण ब-याचदा खुप उशिरा. इथे नाही झालं असं… लगेच आला नंबर माझा…

काय आपण उगाच रडतो की महागाई… महागाई… ! इथे १ ग्लास ८ रुपायाला… ५ ग्लासवर २ ग्लास फ्री आणि ७ ग्लास घेतले तर तो ग्लास पण फ़्री… ! मंथली मेंबर्सना चकणा फ़्री… ! लाईफ मेंबर्सना पिक-अप आणि ड्रॉप फ्री… ! नुसता सेल लागला होता तिथं.

मी एक ग्लास घेतला आणि ओठापर्यंत आणला. जवळपास एखादा उंदीर मरुन पडला असणार नाहीतर एवढ्या सुंदर द्रवाचा वास असा येणंच शक्य नाही. मी तो ग्लास कसाबसा ओठाला लावला आणि नेमकं तेंव्हाच २-३ जणांच्या खाली गाडला गेलेला कोणतरी एक फिनीक्स पुन्हा भरारी घ्यायला उठला. मग त्याचा एक जोरदार धक्का मला आणि एका घोटात सगळं कुतुहल पोटात.

….उगाच त्या २६ व्या मजल्यावरुन खाली पडायला नको म्हणुन मी रांगत रांगत एका भिंतीच्या कडेला जाऊन बसलो. आणि मग भास व्हायला लागले किंवा…. किंवा भासही असतील…. नाहीतरी निघायचे भासच ! पण काही का असेना माझ्या कानातली ती भीकबाळी मला टोचायला लागली… डोक्यावरच्या त्या पगडीवरचे मोती कपाळावर आपटायला लागले… हातातलं गुलाबाचं फुल सापडेनाच… मस्तानी मात्र नाचता नाचता मध्येच तिरका डोळा का तिरकी मान असं काहीतरी करुन हसत होती…. मध्येच त्या पाणगेंड्याशी माझी कुस्ती झाली नसती तर मगरीला लोळावलाच असता मी… पण मला एक अजुन कळालं नाहीये की माझा रणगाडा कुणी चोरला….

हळुहळु जरा चढायला लागली आणि मग एकेक दुःख बाहेर पडायला लागली. आणि मी माझ्या बाबतीत आजपर्यंत जे काहिचियाबाही झाल होतं आणि मला आवड नसतानाही त्या अग्निपथावर मी कसा पुढे चालत राहिलो हे त्या भिंतीला सांगितलं. मग भिंत झाली म्हणुन काय झालं… भिंतीलाही कान असतात.
खुप हलकं वाटलं… मोकळं वाटलं… अगदी पिसासारखं… आणि मग मी पुढं पुढं जायला लागलो… अगदी आवडीनं… कसलाही आकस नाही, दुःख नाही… तक्रार नाही…. आता मला तुकाराममहराजांचा श्लोक उमजला.
काय सांगो जाले काहीचियाबाही
पुढे चाली नाही आवडीने

जोपर्यंत आपल्या मनातुन आयुष्यात घडलेलं ते काहिचियाबाही आपण कुणाला सांगत नाही तोपर्यंत पुढे आवडीनं नाही चालता येत.
….आणि आपण मुर्ख लोक त्या दारु पिउन बडबडणा-या माणसांना हसतो, जे खर तर समाधानानी चालत असतात… आवडीनं चालत असतात.

आपण… (म्हणजे तुम्ही… स्वतःला शहाणे म्हणवणारे,) नसाल एकटचं बडबडत पण आयुष्याची पाऊलवाट रडत रडत, रखडत रखडत चालता हे लक्षात ठेवा….)
आयुष्याला सामोर जायची लोकांची ती जिद्द पाहिली आणि चेह-यावरचा तो रुमाल नावाचा मुखवटा गळुन पडला. आणि मी आपोआप आवडीने पुढे चालायला लागलो. सुरवातीला दोन पावलं टाकायला पण त्रास झाला मग दोन ग्लास टाकल्यावर हवं तिथं तरंगतच जायला लागलो. आणि मग सुख-दुःख, समाधान-तक्रार, वेडा-शहाणा, जमिन-आकाश, जन्म-मृत्यु असा काही फरकच राहिला नाही.

श्रीकृष्ण गीतेत म्हणतात तेच खरं….
तुम्ही काय आणलय जे हरवेल ? जे घेतलत इथुनच घेतलंत…. जे दिलंत इथेच दिलंत…. (ह्याचा अर्थ दारु इथेच पिऊन ती पुन्हा ओकुन इथेच देणे असा घेऊ नये. ह्यातला गर्भित अर्थ ग्लासमध्ये घ्यावा.)

खरं सांगायचं तर जीव जेंव्हा गर्भात असतो तेंव्हाच सगळं सगळं ठरलेलं असतं. आपल्याला काय हवय ते त्या गर्भाला बरोबर कळतं आणि ते शोधत तो इच्छित स्थळी पोहचतोही. शेवटी माता एक निमित्त आहे. एक माया आहे. डोहाळे हा एक भास आहे. खरा जिव्हाळा असतो त्या समाधीत… त्या मोक्षात…. आत्म्याच्या प्रतिबिंबात….
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे

………….आणि शेवटाच्या कड्व्याचं म्हणाल तर त्यात मुद्रणदोष आहे. त्या कडव्यातलं पहिल वाक्य ‘ तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा’ असे नसुन, तो श्लोक ‘तुका म्हणे घसा ओतलासे ठर्रा’ असा आहे. ठर्रा म्हणजे मदिरा. तर तुकाराम महाराज म्हणतात,
तुका म्हणे घसा ओतलासे ठर्रा
अनुभव सरिसा मुखा आला

म्हणजे…. नुसत्या तोंडाला येणा-या वासावरुन दारुचा अनुभव नाही घेता येत, त्यासाठी दारु घश्यातच ओतावी लागते. एकदा का तुम्ही ठर्रा घशात ओतला की अनुभव तुमच्या मुखा आलाच म्हणुन समजा. काय मोठी गोष्ट सांगुन गेलेत पहा बुवा, की अनुभव घेतल्याशिवाय मजा नाही. मला सांगा, घरात बसुन मुसळधार पडणा-या पावसाचा आनंद खिडकीत बसुन मिळेल काय ? त्यासाठी बाहेर जाउन भिजायलाच हवं हो…. नुसतं गाण्याचे नोट्स वाचुन काय हरवुन जाता येईल काय ? त्यासाठी सुरांची नशाच अनुभवायला पाहिजे.
आणि साहेब… ठर्रा म्हणजे तर स्वर्गच की ! पाऊस पडुन जातो, सुर विरुन जातो… पण ठर्रा उरुन राहतो.

जे सगळ्यांना दिसतं ते दाखवतोच, पण जे कोणाला दिसणार नाही ते ही दाखवतो. त्या पडद्यावरच्या बायकांना मी स्वतः आरती ओवाळताना आणि माझ्यावर फुलं टाकताना मी पाहायलय. इथल्या काही योगी युगपुरषांनी तर त्यांचा नाचही पाहायलाय. एकदा याच तुम्ही अनुभव घ्यायला.
मी हल्ली ब-याचदा घेतो…
त्यामुळे हल्ली मला आनंदाचे झटके येतात… तरंगावंसं वाटतं…. स्वत:बद्दल प्रेम, करुणा आणि वात्सल्य दाटुन येतं…. कोणाचा राग येत नाही, हेवा नाही, मत्सर नाही… खरं सांगायचं तर अजुबाजुच्या जगाची जाणिवही नाही… फक्त समाधान आणि तुप्ती…. !
मला सांगा आध्यात्मात अजुन काय मिळतं…. आत्मसाक्षात्कार ह्याहुन काय वेगळा असतो हो…?

हल्ली मी असाच तल्लीन असतो. सगळी कुतुहलं आता शमवलीत पण हल्ली हल्ली ध्यानमंदीरात कुठल्या तरी बाईच्या तमाशाची जोरदार चर्चा असते. तमाशा वगैरेचा आपल्याला नाद नाय करायचा पण कुतुहल म्हणुन गेलोच तिथे तर सांगेनच तुम्हाला लवकर…

तोपर्यंत….
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदाचे

धुंद रवी.

एक कळकळीची विनंती –
सदरच्या लेखात आलेला श्री. तुकाराम महाराज आणि त्यांच्या अभंगाचा उल्लेख, ह्यात त्यांचा अपमान किंवा चेष्टा करण्याचा हेतु नसुन लेखातील एका दारुड्या माणसाने त्याच्या परीने लावलेला अभंगाचा अर्थ मनोरंजक पद्धतीने मांडला आहे. दारुच्या नशेतही भक्ती शोधण्याचा उपरोध विनोदाच्या रुपात मांडला गेला आहे. मला स्वतःला श्री. तुकाराम महाराज ह्यांविषयी नितांत आदर आणि प्रेम असुन माझ्या लिखाणामुळे जर कोणी दुखावला गेला असल्यास मी मनापासुन दिलगिरी व्यक्त करत आहे. पण सुज्ञ वाचकांना हे लिखाण कोठेही खटकणार नाही ह्याची खात्री आहेच. लोभ असावा.
धुंद रवी.

“असेल रंभा घायाळकर…… पण नाद नाय करायचा “

माझ्यासारखा साधा, सरळ, पांढरपेशी, व्हाईट कॉलर माणुस गुलाबी फेटा घालुन तमाशाला गेला, ह्याचं कारण आमच्या ध्यानमंदिरातल्या (ज्याला काही कोत्या मनाचे क्षुद्र जीव दारुचा गुत्ता म्हणतात..) रसिक समिक्षकांनी केलेलं चुकीचं समिक्षण…. !

दारु प्यायल्यावर माणुस खरंच खर बोलतो हे धादांत खोटं आहे….

मला माहित आहे की माझ्या ह्या वक्तव्यामुळे माझे काही देशी-बांधव दुखावले जातीलही पण जो आघात माझ्या मनावर झालाय त्याचं काय ? ज्यांच्या सह मी चकणा चरला त्या माझ्या सहचरांनी मला फसवलय. ज्यांच्या ग्लासवर ग्लास आपटुन आजपर्यंत ‘चिअर्स’ म्हणत होतो त्यांच्या डोक्यावर डोक आपटुन ‘चिटर्स’ म्हणावसं वाटतय…

एक वेळ त्यांनी मला तळलेले काजु दाखवुन सादळलेली बॉबी दिली असती तरी मी सहन केलं असतं…
एक वेळ त्यांनी अपेयपानाचं निमंत्रण देऊन एरंडेल तेलात राजबिंदु घालुन दिलं असतं तरी मी सहन केलं असतं… (हे राजबिंदु काय आहे हे एकदा पिऊन बघाच. सगळ्या रोगांवर रामबाण इलाज आहे. हे प्यायलं की तो रोग आणि तोंडाची चव, कायमचे नष्ट होतात.)
एक वेळ त्यांनी गुलाबपाणी म्हणुन माझ्यावर गोमुत्र शिंपडलं असतं तरी मला चाललं असतं…..
पण त्यांनी ह्याही पेक्षा वाईट केलं…

त्यांनी मला आशा दाखवुन…. त्यांनी मला आशा दाखवुन….
….इला अरुण ऐकवली हो…!
मला धुक्यातले ढग सांगुन डीडीटी पावडरच्या धुराळ्यात उभा केला…. त्यांनी भरजरी पैठणी दाखवुन हातात टॉवेल-टोपी ठेवली…!
……… मी होतो म्हणुन सहन केलं.. माझ्याजागी दुसरा कुणी शुद्धीवर असता तर निराशातीशयानी दारुच सोडली असती. नको तो गुत्ता आणि नको ती अघोरी फसवणुक… पण मी टिकुन आहे आणि नक्की काय झालं हे पण तुम्हाला सांगणार आहे…

त्याचं असं झालं…

त्यादिवशी तमाशाला जायचं म्हणुन मी सकाळपासुनच शुद्धीत होतो. दारु सोडुन आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टीचा आनंद हा शुद्धीत राहुनच घेता येतो हे मागच्या एका प्रसंगावरुन मी शिकलोय. माग एकदा आमच्या ध्यानमंदिरात ‘रंभा घायाळकर’ नावाची लावण्यवती कोनशीला समारंभासाठी पहिली वीट ठेवायला आली होती.
(हं… दुकानाच्या मालकानी होती ती दोन बेसिन पाडुन तिथं हौद बांधुन घेतला, तेंव्हाचीच गोष्ट….)

इतिहासात पहिल्यांदाच आणि शेवटचेच… सगळे जण शुभ्र वस्त्र, स्वच्छ नेत्र, स्पष्ट उच्चार आणि स्तब्ध देह घेऊन एका रांगेत, दोन जणात एका हाताचं अंतर ठेउन, आपापल्या पायजम्याची इस्त्री पुन्हा पुन्हा चेक करत, टोपीचं टोक हातानी पुन्हा पुन्हा पुढं ओढत, हसण्यात आपण जहागिरदार असल्याचा आविर्भाव घेऊन आणि मिश्यांना ‘मर्दावानी’ ताव देत…. बाईंच्या स्वागताला उभे होते.
सगळ ठीक चाललं होतं आणि झालंही असतं जर जाता जाता बाईंचा गजरा पडला नसता. त्या गज-यासाठी तुंबळ युद्ध झालं. शुभ्र वस्त्र आधि मलिन आणि मग लाल झाली. स्वच्छ नेत्र आधि लाल आणि मग काळे-निळे झाले. स्तब्ध देह क्षुब्ध झाले. उच्चार मात्र स्पष्टच राहिले पण ते उद्धार ऐकवत नव्हते इतकंच…!
ह्या एकतर्फी स्वयंवरानंतर दुकानाच्या मालकाने सगळ्यांना (जरी लाईफ मेंबर नसले तरी) फ़्री ड्रॉप दिला…. पोलीस चौकीपर्यंत…. !

तिथं सगळ्यांना आत टाकता टाकता पोलीसांनी, सगळ्यांच्या वस्तु काढुन घेताना, हातात आलेला गजरा फेकुन दिला आणि पुन्हा एक निर्वाणीचं तुंबळ युद्ध ! त्या सामाजिक असंतोषातुन जन्मलेल्या जनक्षोभापुढे झुकुन पोलीसांनी सगळ्यांना गज-याची एक एक कळी दिली आणि तहाचे निशाण फडकवले…..

जिच्या फक्त गज-यासाठी, प्रेमात मस्ती करणारे दोस्तीत कुस्ती करायला लागले, जीवाला जीव देणारे शिवीवर शिवी द्यायला लागले, जिला नीट पाहता यावं म्हणुन आख्खा एक दिवस दारु न पिता देहयातना सोसायला तयार झाले, …अशा त्या मदनिका-सम्राज्ञी लावण्यवतीचं दर्शन मी शुद्धीत नसल्यामुळं मला झालं नाही… हाय रे दैवदुर्विलास !!
त्या दिवशी मला समजलं की एकदा चढली की मग घडण्यासारखं बाकी काही उरतच नाही. त्यामुळे जगण्यासारखं आणि बघण्यासारखं काही असेल तर नशेत नसणं खुप गरजेचं आहे.

तर सांगायचं असं की,
त्यादिवशी तमाशाला जायचं म्हणुन मी सकाळपासुनच शुद्धीत होतो. पहिल्या रांगेच तिकिट काढुन आत जाऊन बसलो. गंमत म्हणजे पहिल्या रांगेत मी एकटाच… माझे सगळे आप्तेष्ट, इतर रसिक दुस-या, तिस-या ते दहाव्या रांगेत…

रंभा घायाळकरच इतकं कौतुक ऐकलं होतो की कधी एकदा तो पडदा वर जातोय असं झालं होतं. उरातली धडधड वाढत चालली होती. धड धड धड धड असा आवाज अचानक टण टण टण टण ढिगीटिकी टिकीटिकी धिंगीक असा झाला अन घाबरलोच… मग कळालं की पडद्यामागुन ढोलकीचा आवाज येतोय…. तो ढोलकीचा आवाज शमतो न शमतो तोच एक पडद्यामागुनच एक अनाऊंसमेंट झाली.

“रशीक मायबापांना माणाचा मुजरा,
आवरुन बसा जरा सावरुन णजरा
घाला नोटाच्ये हार घ्यावा पिरेमाचा गजरा…..

कमजोर दिलवाल्यांच्या जीवाला धोका
वा-यावर पदर… तुमचा ढगामधी झोका
ही ढगातली हप्सरा चुकवील काळजाचा ठोका

आज नटरंगी नार उडवील लावण्यांचा बार
जनु मोसंबीचा झटका… जनु नारंगीचा वार
रावजी सांभाळुन बसा… जावाल कामातुन पार

या भावजी तुमच्यासाठी चंदनाचा पाट
फेटेवालं पावनं आज यव्वनाशी गाठ
ज्याची शिटी वाजनार न्हाई… त्येला घराकडची वाट….”

ह्या वाक्यावर प्रचंड शिट्ट्या पडल्या आणि त्या थांबेचना. ते पाहुन मी तर तोंडातच बोटं घातली आणि शिट्टी वाजवायच प्रयत्न करायला लागलो. मला आवाज हवा होता पण नुसतीच हवा.
तमाशा बघण्यासाठी जसं फेटा हा ड्रेस कोड असतो, तसं ‘शिट्टी येणं’ हे मिनिमम बेसिक कॉलिफिकेशन लागतं. मला माझ्या असंस्कृत आणि अशिक्षितपणाची लाज वाटायला लागली आणि आता ते आपल्याला घराकडाची वाट दाखवणार ह्या भितीनी माझा जीवच गोठला. पण पहिल्याच रांगेत बसण्याच मान घेतल्यामुळे असं काही झालं नाही.

मग अनाऊंसमेंट पुढे चालु झाली….
“…..तर तुमच्यासम्होर सर्श सादर करतोय….. रंभा घायाळकर प्रसुत…. १६ लावण्यवतींचा…. भव्य एकपात्री लावन्यांचा बहारदार प्रोग्राम…. ‘नाद नाय करायचा’…. ”
अन ह्या प्रोग्राम्ची सादर कर्ती हाये….
रंभाऽऽऽऽ रंभाऽऽऽऽऽऽ अंभाऽऽऽऽऽ भाऽऽऽऽऽ भाऽऽऽऽऽ
घायाळकरऽऽऽ याळकरऽऽऽ ळकरऽऽऽऽ ळकरऽऽऽऽ ळकरऽऽऽऽ “

पुन्हा शिट्टयांचा मुसळधार पाऊस पडला आणि मी…. नळी फुंकली सोनारे, इकडुन तिकडे गेले वारे !

मग हळु हळु पडदा वर गेला. आणि…. आणि पैठणीच्या ऐवजी टॉवेल-टोपी !! म्हणजे अगदी टॉवेल-टोपीवर नाही पण एक काळाकभिन्न, जाड्जुड मिश्या आणि घनदाट दाढीवाला अडवा-तिडवा रांगडा गडी, मावळ्याच्या फॅन्सी ड्रेसात, हातात डफ घेऊन, अंगार भरलेले डोळे माझ्यावर रोखत उभा होता.

तमाशात पोवाडा ??????????????
तमाशात ??????????????
पोवाडा ?????????????????????

“ह्यो रंभेचा बॉयफ्रेंड.. शाहीर आहे. पहिल्यांदा तेचा पोवाडा गपगुमान ऐकायला लागतो, मग रंभा येतीया !”-
गेली कित्येक वर्ष इमानेइतबारे तमाशाची वारी करणा-या एका भक्तानं मला माहिती पुरवली. मी जरा निराश झालो. हे म्हणजे भाग्यश्री हवी असेल तर हिमालय पण घ्यावाच लागेल असं झालं. पण हिमालय नकोच म्हणुन भाग्यश्री पण नको असं इथे चालणार नव्हतं. शेवटी इथे रंभा होती… रंभा ! जिच्या फक्त गज-यासाठी…. असो.

माझ्यावरची नजर न काढताच त्या शाहिरानं मला एक मुजरा केला. पहिल्या रांगेत बसण्याचा मान.. दुसरं काय ! मग त्याचा पोवाडा चालु झाला आणि मी गपगुमान ऐकु लागलो.
“….. वै-याची रात्रये… खुप अंधार पडलाये…. मावळे घाबरलेलेत…. तानाजी न डगमगता उभाये… कोंढाण्यानी आवाज दिलाये मराठ्यांना…. तानाजीनी यशवंतीला दोर बांधलाये आणि सगळे मावळे गड चढुन वर गेलेलेत… समोर मुघल बघताच तानाजीचा संताप संताप झालेलाये….. “
असं म्हणुन तो माझ्याकडेच रागारागानी पाहायला लागला. मी घाबरुन थोडा मागे सरकलो. तर तो अंगावर ओरडलाच.
” खबरदार… जागचा हलशील तर…”
मी घाबरुन “नाही…नाही” अशी मान हलवायला लागलो. तो पुढे म्हणाला,
” हे मराठ्याचं रक्त हे, असा सोडाणार नाही तुला लांडग्या…. शपथ हे मला स्वराज्याची… तुझं मुंडकं आणि कोंढाणा घेऊनच महाराजांना तोंड दाखवेन…”
तो मांडीवर हात आपटुन कसले कसले आवाज काढायला लागला. तो रागानी लाल झाला होता होता, मी भितीनं पांढरा पडलो होतो. पहिल्या रांगेत कुणी का बसत नाही हे मला आता कळालं. (आता तुम्हालाही माझ्या यातना कळाल्या असतील, आता कळालं असेल की माझ्या देशी-बांधवांनी मला कसा फसवला.) नको तो तमाशा पण नको ते युद्ध असा विचार करुन मी उठलो तर तो गरजला…..
“भ्याडा, कुठे पळतोस ? चल हो तयार लढायला. हा तानाजी आज तुला जीता सोडत न्हाई…. “
….. आणि मला काही कळायच्या आत मी स्टेजवर होतो. त्याच्या हातात माझी गचांडी होती. माझा मानाचा फेटा मला कधीच सोडुन गेला होता. मग त्यानी मला मार मार मारलं….हाण हाण हाणलं….कुदलंल.. आपटलं… धोपटलं… आणि हा सगळा वेळ त्या मागच्या बायका, पोवाड्याच्या सुरात….
“मुघल धोपटला जी हा जी जी…
मुघल धोपटला जी हा जी जी….
मुघल धोपटला जी हा जी जी ” असं गातच होत्या.

कधी एकदा गड येतोय आणि हा सिंह जातोय असं झालं होतं मला….. मग पोवड्याची ३-४ रक्तरंजीत कडवी झाल्यानंतर एकदाचा सिंह पडला आणि मी जीवाच्या आकांताने उठुन पळायला लागलो. तर हा रेडा पुन्हा उठुन उभा… म्हणाला,
” ए भित्र्या…. माझ्या भाच्च्याला मारुन कुठं पळतोस रं xxxxxxxx …. ? हा ७८ वर्षाचा शेलार मामा जित्ता हाये अजुन….ये हिकडं, लढ माझ्याशी…”
(ह्या क्षणी मला जर देव प्रसन्न झाला असता तर मी खालील तीन वर मागुन घेतले असते.
१. लढाईसाठी एका घरातील एकच व्यक्ती असावी. नातलग घेऊ नयेत. विशेषतः मामा-भाच्चे…)
२. ६० वर्षावरील म्हाता-यांना लढाईत प्रवेश नसावा.
३. पोवाड्यामध्ये ४ पेक्षा जास्त कडवी नसावीत.)

…तर शेलारमामा बरोबर अजुन ४-५ कडवी झाली ज्याचा शेवट “मुघल धोपटला जी हा जी जी… ” असा होता.
मग शेवटी युद्ध संपलं आणि शुद्ध हरपलेल्या मला स्टेजवरुन समोरच्या पिटात ढकलण्यात आले.

त्यानंतर खुप लावण्या झाल्या म्हणे. मी भानावर आलो तेंव्हा लोक बेभान झाले होते. ढगात झोके घेत होते… फेटे उडत होते…. शिट्ट्या वाजत होत्या….लोकं पार कामातुन गेली होती…. नारंगीचा वार झाला होता… पावन्यांची यव्वनाशी गाठ पडली होती. आता पहिली रांग भरली होती म्हणुन मी तिथंच पिटात बसलो. इतक्यात एक अनाऊंसमेंट झाली.
” तर रशीक मंडळी… तुमच्या विनंतीला मान देऊन एक शेवटची लावणी रंभाबाई सादर करतील.. ” मी पुन्हा जिवंत झालो.

ढोलकीची थाप आणि घुंगरांचा आवाज ऐकु यायला लागला तशी माझी धडधड वाढायला लागली. रंभा बाहेर आली… पण आख्खी नाही तिचा एकच हात विंगेबाहेर आला. त्या हातात गजरा होता आणि काही कळायच्या आत तिनं तो गजरा पब्लिकमध्ये भिरकावुन दिला.
तो हरामखोर गजरा माझ्याच डोक्यावर पडला आणि मग सुमारे ५६ जण त्या गज-यासाठी माझ्यावर तुटुन पडले. माझे आणि गज-याचे मिळुन १९३ तुकडे झाले. …..शेवटच्या लावणीला ४ वेळा वन्समोर मिळाला म्हणे.

……मी आता ठरवलय… कितीही नादखुळा तमाशा असला तरी जायचं नाही… सगळे नाद सोडायचे…. मोहावर नियंत्रण ठेवायचं…. कितीही सुंदर मोह असला तरी जीवापेक्षा थोडाच मोठा आहे… असेल ती रंभा…..

….असेल ती रंभा घायाळकर पण आता नाद नाय करायचा……………………..!

धुंद रवी.

जहॉं मेरी कश्ती डुबी…

मुझे तो अपनोंने लुटा… गै़रोंमे कहॉं दम था….
जहॉं मेरी कश्ती डुबी… वहॉं पानी बहोत कम था…

शाररिक वेदनांपेक्षा, मानासिक यातनांनी भरलेला हा जख्मी शेर लिहणारा घायाळ शायर माझ्यासारखाच कुणीतरी खुप आतुन दुखावलेला जीव असणार…. आपल्याच जवळच्या माणसांकडुन दुखावलेला…. आपल्याच हक्काच्या गोष्टींकडुन फसवला गेलेला…! म्हणुन हि पहिली ओळ की ‘मुझे तो अपनोंने लुटा… गै़रोंमे कहॉं दम था….’
…. आणि शेवटच्या ओळीचा अर्थ शेवटीच सांगेन…..

काय सांगु तुम्हाला की काय दुःख असतं आपल्याच कुणाकडुन तरी फसवलं जाण्याचं…. मी पण फसवलो गेलोय… माझ्यातल्याच त्या माझ्या तीन सखींनी, माझ्या आयुष्याच्या जोडीदारींनी, माझ्या हक्काच्या तीन गोष्टींनी मला लहानपणापासुन दगा दिलाय… त्या माझ्या गद्दार सहचारीणी म्हणजे….. माझी सहनशक्ती, स्मरणशक्ती आणि पचनशक्ती….

माझ्या सहनशक्तीचं तर विचारुच नका….
परवाचीच गोष्ट घ्या…. रात्रीची वेळ.. एकदम गर्द अंधार… येतोय का जातोय हेही कळत नव्हतं…. सुनसान रस्ता… आणि एक सुंऽऽऽऽदर ऊजळ मुलगी… मी पहातच राहिलो… भानावर आलो आणि पाहिलं तर समोर चार मवाली गुंड… त्यांनी तिला घेरलं आणि छेड काढायला लागले…. तुम्हाला सांगतो कुठे अन्याय पाहिला, कुठे अत्याचार पाहिला, कुठे जबरदस्ती पाहिली, कुठे गुन्हेगारी पाहिली की मला सहनच होत नाही… त्या गुंडांचा तिला होणारा त्रास पाहिला आणि सहनच झालं नाही मला… मी……. मी…….
………मी टिव्ही बंद केला आणि पांघरुण डोक्यावरुन घेऊन देवाचं नाव पुटपुटत झोपुन गेलो….. हे असं टिव्ही बंद करणं सोप्पं असतं, पण रोजच्या जीवनात सुद्धा माझी सहनशक्ती मला दगा देत आलीये……

मी खुप हळवा माणुस आहे हो…. नाही सहन होत मला काही…. भिती, राग, भांडणंच काय पण मला खुप प्रेम, माया असा भावनांचा अतिरेक पण सहन होत नाही. एकदा (म्हणजे आयुष्यात एकदाच) मी आणि बायको पिक्चरला गेलो होतो…. सहनच झाला नाही हो तो पिक्चर…. या तुम्हालाही एक झलक दाखवतो…

…पहिल्याच सीनमध्ये हिरो दवाखान्यात एका बेडवर झोपलाय…(त्यावर मृत्युशय्या असं लिहलय)… त्याच्या शेजारी अतिशय करुण डोळे आणि अतिशय लाल-भडक ओठ असलेली… नाही नाही, हिरॉईन नाही, त्याची आई… कधी एकदा आटपतय अशा चेह-यानी बसलीये… आणि तो म्हणतोय की “आई मी चाललो… एक शेवटची इच्छा…. मला लहानपणी भात भरवायचीस अगदी तस्सच्यातस्स भरव…. मग ती पर्स मधुन एक डबा काढते आणि त्याला लाळेरं बांधुन… चमचा त्याच्या घशात कोंबुन…. तस्सच्यातस्स भरवायला सुरवात करते… तो फुर्रर्रर्रर्रर्र करुन घास तिच्या तोंडावर उडवतो… ती त्याला थोबाडीत मारते… तो ताटली तिच्या तोंडावर फेकतो.. ती त्याच्या डोक्यात चमचा मारुन त्याला बेसीनमधे आपटते. आणि….

…..आणि मला पुढचं दिसेनाच… ते प्रेम मला सहनच होईना.. मी हमसुन हमसुन ओक्साबोक्शी रडायला लागलो. पुढच्या मागच्या एकेक रांगा रिकाम्या झाल्या आणि कुणी ओळखु नये म्हणुन बायको तोंडावर रुमाल बांधुन बसली. तेंव्हा पासुन मी पिक्चरचा आणि बायकोनी माझा धसकाच घेतलाय….

…….मला चेष्टा सहन होत नाही, अपमान सहन होत नाही, मनाला लागलेली रुखरुख, झालेली चूक, इतकच काय साधी भुक मला सहन होत नाही हो….. एकदा भुक लागली की काही सुचत नाही, कळत नाही… हात थरथरायला लागतात… कामाच्या महत्वाच्या कागदांचा बोळा केला जातो… त्या बोळ्याऐवजी तिथं भजी दिसायला लागतात…
एकदा तर भुकेनी इतका कडकडलो की घरी येऊन बायकोला “झालं असेल तसं जेवायला वाढ” म्हणालो. तिनी धुतलेले तांदुळ ताटात वाढुन दिले. खर तर तिची विनोदबुद्धी धुतल्या तांदळाइतकी स्वच्छ आहे पण मला तो विनोद सहनच झाला नाही. आत्मक्लेषात मी मुठीमुठीनी ते तांदुळ खायला सुरवात केली. त्या तांदळाची पावडर तर पचली नाहीच, पण तीन दातही गेले आणि वर लहान मुलीनी “बाबानी खडु का खाल्लेत ?” असं विचारलं. तेंव्हापासुन भात खाणं तर दुरंच… तो पहाणंही मला सहन होत नाही…..
त्यात तो पिक्चरमधला भात भरवण्याचा सीन आठवला तर तो भाताचा घास तोंडातल्या तोंडातच फिरत राहतो…..आणि शेवटी आत जायच्या ऐवजी बाहेर येतो…. ‘भात खायचा नाही’ हे मी हातावर गोंदवुनच घेतलय….
…..गोंदवुन घेतलय कारण कधी कधी विसरायला होतं हो…

माझ्या स्मरणशक्तीचं तर विचारुच नका….
बालपणी शाळेमध्ये असताना रात्री जागुन पाठ केलेल्या कविता दुस-या दिवशी आठवायच्या नाहीत. एकदा चुकुन, पंगेश माडगांवकरांच्या ‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’ ह्यातलं फुले विसरल्यामुळे ‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची मुले’ असं म्हणालो होतो. हसुन हसुन सगळीच मुल अंगावर पडली.
एकदा कविता पाठ झाली होती पण वेळ विसरलो आणि शाळेतच खेळत बसलो. मास्तर पेटलेच. त्यांनी बोलावलं आणि अत्यंत खोचट आवाजात म्हणाले की, “अस्मादिकांचं शुभनाम कळेल काय ?” मला ह्याचा अर्थ कळाला नाही, पण वाटलं की ते कविता म्हणायला सांगताहेत. स्मरणशक्तीनी दगा दिला आणि चक्क कविता आठवली…. आणि पाठ केल्याप्रमाणे मी ती जोशात म्हंटलीसुद्धा….
“आम्ही कोण म्हणुनी काय पुसशी ? आम्ही असु लाडके… देवाचे दिधले जग तये आम्हांस खेळावया “
मास्तरांच्या अंगाची लाही लाही झाली. ते पट्टीचे शिक्षक असल्यामुळे पट्टीमार्फत ती लाही लाही त्यांनी माझ्या हातावर वाजवायला सुरवात केली. मला मारता मारता म्हणाले, “देणा-याने देत जावे.. घेणा-याने घेत जावे”… माझा पुन्हा गैरसमज झाला आणि मी ती कविता पुर्ण केली…. “घेणा-याने एक दिवस, देणा-याचे हात ही घ्यावे”… मास्तरांनी खरंच त्यांचे हात दिले……….. पण माझ्या गालावर…. !

शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव हे कित्येकदा पाठ करुनही मी पेपरमध्ये दादा कोंडकेच लिहुन यायचो. स्मरणशक्तीवर विसंबुन एकदा दादा कोंडके असं उत्तर पाठ केलं तर उत्तर लक्षात राहिलं आणि मी पुन्हा दादा कोंडकेच लिहुन आलो. मग मास्तरांनी दिवसभर मला दादा कोंडकेच्या आवाजात पाढे म्हणायला लावले.
सन-सनावळ तर लक्षातच राहायचे नाही हो… कित्येकदा तर आईबापाच्या जन्माआधि पोराला जन्माला घातलय मी….

भूमितीच्या पेपरात समद्वीभूज त्रिकोण, समभूज चौकोन आणि समांतरभूज काहितरी, म्हणुन जे काहि काढायचो ते चुकुन आठवलं तरी माझा चेहरा वक्राकार होतो आणि अंगावर सरळ रेषेत काटे उभे राहतात. (पण आमच्या मास्तरांना सुद्धा ते आकार नीट माहित नसावेत. कारण माझ्या प्रत्येक आकृतीसमोर ते मोठ्ठं वर्तुळच काढायचे.) अर्थात बहुतेक सगळ्याच शिक्षकांना माझ्या पेपरावर हि गोळ्या गोळ्यांची रांगोळी काढायची संधी मिळायची.

पुढे मोठा झालो आणि स्मरणशक्तीच्या घोळांची संख्याही मोठी झाली. पायजम्यावर ऑफीसला जाणे… दुधासाठी म्हणुन पातेलं घेऊन जाणे आणि त्यात वर्तमानपत्र आणणे… वगैरे वगैरे… एकदा बायकोनी वजन पहायचा काटा आणायला सांगीतलेला…. विसरलो आणि तो चुकुन तिच्या वाढदिवसाला घेऊन आलो. (त्या दिवशी तिचा वाढदिवस होता हे शप्पथ माझ्या लक्षात नव्हतं हो….) एकदा…. एकदा… काय बरं सांगणार होतो मी…..
……………….असो. ह्या साठी एक वेगळा लेख लिहीन… आजचा विषय वेगळा आहे. उगाच त्या चविष्ट बासुंदीत ह्या अवांतर चारोळ्या जास्त नको…..
आणि पचनशक्ती… माझ्या पचनशक्तीचं तर विचारुच नका….
(खरंच विचारु नका…. ह्याचे किस्से अगदी गळ्यापर्यंत भरलेले आहेत. उगाच घशात बोट घालाल आणि त्या भडाभडा बाहेर आलेल्या चारोळ्यात बासुंदीच दिसायची नाही…..)

तुम्हाला सांगतो…. मला दुःख दगा झाल्याचं नाहीये… त्याची सवयच आहे मला… मला दुःख आहे ते माझ्या त्रि-शक्तींनी एकाच वेळेला दगा दिल्याचं… खरं तर मागच्या विदारक अनुभवानंतर पुण्यात पुन्हा कुणाचं ‘गि-हाईक व्हायचं नाही’ हे ठरवलं होतं…. पण पुन्हा एकदा स्मरणशक्तीनी दगा दिला, सगळं सगळं विसरलो…. सहनशक्तीनी दगा दिला…. एकदा ऑफिसवरुन येता येता मला भुक असह्य झाली आणि कोणत्या हॉटॆलमध्ये शिरतोय हे न पाहताच मी हॉटॆलमध्ये शिरलो….. ते एक साऊथ इंडीयन थाळीचं हॉटेल होतं.

मी आत गेलो तर मालक स्वच्छ पांढ-या लुंगीत कपाळावर पांढ-या गंधाचे उभे आडवे पट्टे ओढुन दोन्ही हात कोप-यापासुन जोडुन माझ्या स्वागताला उभे होते. मी पण त्यांच्याकडे पाहुन तसाच नमस्कार केला. तर त्यांनी ‘घालीन लोटांगण’सारख्या टाळ्या वाजवत स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घातली. मी पण.
त्यांनी कानाला हात लावला. मी पण.
त्यांनी नाकाला हात लावला. मी पण.
मग त्यांनी २-४ थोबाडीत मारुन घेतल्या. मी पण.
ते अचानक दोन पायांवर खालीच बसले. मी नाही.
मी तिथल्याच एका रिकाम्या टेबलावर हळुच बसुन घेतलं…. ते एकदम ओरडुन म्हणाले ” एन्डेश्वरा इनीक्य इन्न ओत्तरी आळकारं एन्डे हॉटॆली वेरानपाडआ “.
मी जाम घाबरलो. बहुतेक मी खाली न बसल्यामुळे ते चिडलेत असं वाटुन मी घाबरुन खाली बसलो. पण ते माझ्यासाठी नव्हतंच. त्यांची पुजा चालली होती. ती थोड्या वेळानी संपली आणि ते दरवाज्यातल्या फोटोंकडे वळाले.

बराच वेळ माझ्याकडे कुणीच फिरकलं नाही आणि ती प्रतिक्षा मला सहन होईना. तो अपमान मला सहन होईना. मग भुक सहन होईना. त्याचा परिणाम माझ्या स्मरणशक्तीवर व्हायला लागला. मी गजनीतल्या आमीरसारखं किंवा कुठल्याही पिक्चरमधल्या सुनीलशेट्टीसारखं बधिर चेह-यानी इकडे तिकडे पाहायला लागलो. माझा भांबावलेला चेहरा पाहुन माझ्या दिशेनी एक काळी आकृती केळ्याचं पान घेऊन येताना दिसली.

मी जरा चरकलोच. कारण मागं एकदा एका साऊथ इंडीयन मठात जेवणाचा योग आला होता. तिथं सगळं एकदम कडक सोवळ्यातलं होतं. त्यांनी माझे कपडे काढुन घेतले आणि मला नेसायला एक छोटा सोवळ्याचा पंचा दिला होता. आख्खा वेळ त्या मिनी स्कर्टमध्ये मी लाजुन चुर झालो होतो. जे समोर ताटात पडेल ते धपाधपा गिळुन बाहेर पडलो आणि ते न पचल्याने भडाभडा……. असो.

……….. हा माणुस तर तो पंचासदृश्य-मिनीस्कर्टही नाही तर केळ्याची पान घेऊन येत होता. ना ना शंका-कुशंकांनी माझं मन भरुन गेलं. इथे खुप कडक सोवळं तर नसेल ना? ह्या शंकेनी तर छातीच धडधडायला लागली. भुकेनं तडफडुन मेलो तरी चालेल पण केळ्याची पानं नेसुन जेवायला बसायचं नाही, असं ठरवुन टाकलं. माझ्या अब्रुची लक्तरं मी त्याला अशी केळीच्या झाडावर टांगु देणार नव्हतो…..

त्यानी ती केळ्याची पानं आणुन माझ्या टेबलवर आपटली आणि माझ्याकडे वरपासुन खाली बघत… केळीच्या पानांकडे कडे हात करत तो म्हणाला “इद एडतो…. नंग ळेन्दो तिन्नुम….?”

मी घाबरुन त्याचा अंदाज घ्यायला लागलो. तो ‘इद एडतो’ म्हणाला होता का ‘इथं फाडतो’… मला आठवेना. मी कपडे घट्ट पकडुन बसलो. (आणि…. ‘नंग ळेन्दो’ म्हणजे काय…. शी… काहितरीच….) त्या साऊथ इंडीयन दुःशासनापासुन वाचण्यासाठी मी नॉर्थ ईंडीयन कृष्णाचा धावा करायला लागलो. एक पाय टेबलाबाहेर काढुन पळुन जाण्याच्या पवित्र्यात असताना एक नजर दरवाज्यावर टाकली तर तिथं दुर्योधन हातात उदबत्ती घेउन डान्स करत होता आणि ती अभेद्य तटबंदी भेदुन जाणं शक्यच नव्हतं. पण देव धाऊन आला आणि मला स्पर्श न करताच तो दुःशासन निघुन गेला. मी पवित्रच राहिलो.

आता माझ्या स्मरणशक्तीनी दगा द्यायला सुरवात केली. दुःशासनानी जो काही प्रश्न विचारला होता त्याचं अर्थ काय आणि त्याचं उत्तर मी हो दिलय का नाही… मला काहीच आठवेना. हेच काय मी कुठल्या भाषेत बोलु शकतो हे ही आठवेना…. मालकांची पुजा संपली आणि दरवाजा मोकळा झाला. आता मी पळु शकत होतो. पण मालक गोडंसं हसले आणि म्हणाले… “वण्ण्क्कम. सावकास जेव्हा… हव्हा तेवढा ख्हा.. लिम्मीट नाय…. पन थालीत काय टाकु नका साहेब… ते आमच्या हाटेलचा एक नियम असतो… आमी कोनलाकाय वाया घालवुन देत नाय….भरपुर आनंद घ्या”

मला काय बरं वाटलं म्हणुन सांगु ! एक तर तो इसम पुणेकर मराठी नाही, साउथ इंडीयन आहे आणि मी साउथ इंडीयन नाही, पुणेकर मराठी आहे… हे मला समजलं होतं आणि दुसरं म्हणजे अनलिमिटेड थाळी !!
मी बकासुरासारखी त्या गाडीभर अन्नाची आणि ते घेऊन येणा-या आण्णाची वाट बघायला लागलो.

ब-याच वेळानी तो दोन्ही हातात काहितरी पांढरं पांढरं मूठ भरुन घेऊन आला. मी लाजत म्हणालो, अरे उगाच कशाला रांगोळी वैगेरे… त्यानी ते केळ्याच्या पानावर वाढलं. एवढं मीठ तर मी जन्मापासुन अगदी कालपर्यंत खाल्लं नसेल…. ते इतकं का वाढलं ते कळालं नाही…. मग तो गेला आणि सुमारे १६ वाट्या घेऊन आला. तिथं आठ टेबल्स होती. म्हणजे प्रत्येकी दोन दोन… पण तो इसम सगळ्या वाट्या माझ्याच टेबलवर ठेऊन गेला… आज त्यांचा भांडी घासायचा माणुस आला नसावा. थोड्या प्रयत्नांनी त्या वाटीत काय होतं हे सांगता आलं असतं…. असो….

“ये क्या है ?” – त्यानी माझ्या टेबलावर मांडलेल्या रुखवताकडे बघत मी विचारलं. “अर्रे.. आपीच तो बोला के स्पेशल साऊथेंडीयेन थाली” त्यानी माहिती वाढली.

हे मी कधी बोललो होतो कुणास ठाऊक. पण मी एकदम खुष झालो. थाळी म्हणजे जास्त काही रिस्क नसते. थोडं फार इकडे तिकडे. हे नाही आवडलं तर ते. हि भाजी नाही आवडली तर ती. पोळी नाही आवडली तर पुरी. रस्सा नाही आवडला तर सुकी भाजी. भात आपण खात नाही पण त्याबदल्यात थाळीवाले एक्स्ट्रॉ पोळ्या देतातच की…. जेऊन माणुस तृप्त झालाच पाहिजे….

भुकेनी माझ्या पोटातुन गुरगुर आवाज यायला लागले. मला पण गुरगुरवांसं वाटायला लागलं. पण ते काम मालक करत होते. दरम्यानच्या काळात एक नविन कस्टंबर आलं आणि माझ्या समोरच्या टेबलवर बसलं. त्यानी बसल्या बसल्या ऑर्डर दिली आणि त्यालाही एक केळीच पान आणि १६ वाट्या मिळाल्या. म्हणजे माझ्या टेबलवरच्या वाट्या माझ्याच होत्या….

मी अर्जुनासारखी लढायच्या आधिच कच खाल्ली. पण माझा पराभूत चेहरा पाहुन भगवान श्रीकृष्ण त्या हॉटेल मालकांच्या रुपाने पुन्हा धाऊन आले.
नाही… त्यांनी वाट्या कमी केल्या नाहीत, तर त्यांनी मला त्यांच्या नियमाची आठवण आणि युद्धाची जाणिव करुन दिली. “ते आमच्या हाटेलचा एक नियम असतो… आमी कोनलाकाय वाया घालवुन देत नाय….भरपुर आनंद घ्या”
मी श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि माझ्याच पचनशक्तीला आवाहन केलं. १६ वाट्या म्हणजे सुमारे सहा ते आठ पोळ्या….. कमरेचा आव्वळ पट्टा थोडा सैल करुन मी आनंद घ्यायला तय्यार झालो !

तो गेलेला माणुस एक मोठ्ठी परात घेऊन आला. मी पुन्हा लाजलो कारण मगाशीच मी पहिलं कस्टंबर असल्यामुळे मालकांनी मला उदबत्तीनी ओवाळलं होतं. मला वाटलं की आता ‘बोहोनी’ म्हणुन परातीत माझे पाय धुतात की काय….

पण नाही हो….. त्यांनी त्यापेक्षा वाईट केलं होतं. माझ्यावर आकाशच कोसळलं होतं…. पेपर फुटला आणि सत्वपरीक्षेत मी नापास झालो होतो…. मग धरणी दुभंगली आणि मी आत गाडलो गेलो…. दुर्योधन आणि दुःशासनानी डाव साधला होता… भर सभेत मला…. …………………….!
त्या दुःशासनानी माझ्या वस्त्राला हात घातला असता तरी मला चाललं असतं पण त्यानी स्पेशल साऊथ इंडीयन थाळीवाल्या परातीला हात घातला आणि त्या परातीतला डोंगर माझ्या पानावर उलटा केला….
……………………………………………………………………………………….भाताचा डोंगर…. !!
त्या १६ वाट्यापण नानाविध प्रकारच्या, रंगांच्या, प्रतीच्या, चवीच्या, आकारमानाच्या, वासाच्या, भासाच्या, त्रासाच्या द्रवांनी भरुन गेल्या…. समोरचा कस्टंबर तर त्या स्पेशल थाळीवर तुटुन पडला होता. त्या महाकाय डोंगराचे त्यानी १६ मोठ्ठे मोठ्ठे गोळे केले होते. प्रत्येक गोळ्यावर तो एक वाटी उलटी करायचा आणि तो ढीग तोंडाची गुहा उघडुन आत सोडुन द्यायचा…. धडाम…!
प्रत्येक घासाला होणारा मच्याक-मच्याक आवाज आणि दर तीन घासानी त्याचा ‘आसमंत हदरवुन टाकणारा’ ढेकर ह्यानी मला मळमळायला लागलं….. हॉटेलचा नियम तो तंतोतंत पाळत होता. तो आनंद घेत होता आणि तेही काहीही वाया न घालवत… अगदी त्या गुहेच्या दरवाज्यातुन निसटलेला एखादा रस्श्याचा ओघळही त्याच्या हनुवटीवरुन खाली कोसळला तरी त्याच्या मांडीपर्यंत पोहचायच्या आधिच तो झेलायचा आणि चाटुन टाकायचा….

माझ्या सहनशक्ती आणि स्मरणशक्तीनी तर साथ सोडलीच होती आणि आता मी फक्त पचनशक्तीच्या भरवशावर जिवंत राहु शकलो असतो. पण तो भाताचा डोंगर फोडुन मी चमच्यात २०-२२ शीतं घेतली आणि मनाचा हिय्या करुन तोंडाशी आणली की तो बकासुर अर्वाच्य ढेकर द्यायचा आणि माझा चेहरा, आवेश आणि चमचा गळुन पडायचा…. ह्या गतीनी मला तो भात संपवायला सात महिने तरी लागले असते.

काहितरी करणे अपरिहार्य होते. तेवढा भात खाणं तर शक्यच नव्हतं. तेवढा काय केवढाच भात खाणं शक्य नव्हतं. मी एक मध्यम आकाराचा गोळा केला, पानाबाहेर ठेऊन त्याला नमस्कार केला आणि मोठ्यांने म्हणालो की, “देवाला !!” हे पाहुन मालक प्रसन्न हसले आणि माझा एक घास खपला होता….मग काही गोळे मी ह्या पुढील देवतात नमस्कार करुन वाटुन टाकले.
एक देवीदेवता, एक वास्तुदेवता, एक नागदेवता, एक गृहदेवता, एक निसर्गदेवता, एक कामदेवता, एक दामदेवता, एक ग्रामदेवता, एक अग्नीदेवता, एक वायुदेवता, एक सुर्यदेवता, एक वरुणदेवता, एक तरूणदेवता, एक बालदेवता, एक कालदेवता, एक जलदेवता, एक फलदेवता, एक फुलदेवता, एक कुलदेवता, एक कुळदेवता, एक मुळदेवता, एक खोडदेवता….. दोन जोडदेवता …. एक….. (ह्या पुढे काही सुचेनाच हो…. मग शेवटचे चार… रमेश देवता, सीमा देवता, अजिंक्य देवता आणि कपिल देवता…… म्हणुन ती चित्रावत संपवली. पण ह्यात २८ गोळे संपले होते.)

…..तरी अजुन बराच भात राहिला होता. मी भाताची शीतं केळीच्या पानांच्या रेषा आहेत अशी सजवायला सुरवात केली. त्या हिरव्यागार केळीच्या पानावर ह्या पिवळ्या रेषा एकदम उठुन दिसत होत्या… (मग तुम्हाला काय वाटलं…. पांढरा होता भात ? छे…..!!)
एकेक वाट्या गट्टागट घशात रिकाम्या करुन प्रत्येकाखाली एकेक छोटा गोळा सरकवला. त्या बकासुराचं लक्ष नाहीये असं वाटुन २ गोळे त्याच्या पानात सरकवले. त्यानी ते करताना पाहिलं म्हणुन अजुन २ सरकवले. इतकं केल्यानंतरही दोन ओंजळ भात राहिलाच होता आणि तो आनंद पोटातच ढकलावा लागणार होता…. पण आधिच त्या वाट्यावर वाट्या रिचवल्यानी तो ……..आनंद पोटात माझ्या माईना रे माईना !

भात आत जायला विरोध करत होता, मी जबरदस्ती करत होतो. आधि तोंडावर, मग गळ्यावर, मग छातीवर आणि नंतर पोटावर अश्या क्रमाने बुक्क्या मारल्या की जायचा खाली….. पण हळुहळु करत ट्रॅफिक जाम होतं गेलं आणि आतली शीतं बाहेर डोकवायला लागली. देवाची कृपा की भात संपला होता आणि मी युद्ध जिंकलो होतो…. मी युद्ध जिंकलो होतो…. मी युद्ध जिंकलो होतो….

पण इतक्यात तो दुःशासन पुन्हा एक परात घेऊन आला आणि शेवतचा वार करत म्हणाला, “राईस ?”. त्यानी राईस म्हंटल्या बरोब्बर राईसची एक प्रचंड लाट पोटातुन वर उसळुन आली आणि….. “ब्ळोगळ्ळ्ळ्ळोळोळोभडऑक्ळ्ळ्ळ्ळ ड्ळळ्ड्श्ळ्श्ळ्ळश्ळ्श्ळॆळळॆळ्र्व्व्ळ्र्व्ल्ळ्ळ्व्र्ल र्ळ्ळ्ळ्ळ्ळ्भ्ळ्क्भ्ळ्क्भ्ळ्क”

आता रिकाम्या पोटी मला बरं वाटत होतं. मग मला भगवान श्रीकृष्णांची गीता आठवली. “तुम क्या लाये थे, जो तुमने खो दिया?….. जो लिया यॅहिसे लिया, जो दिया यॅहिपे दिया…. क्यु व्यर्थ चिंता करते हो…. जीवन यही है….”

…..मी ‘जीवन’ शोधत मोरीकडे गेलो.

बकासुर तिसरा डोगर संपवुन शेवटच्या पठारावर आला होता. मी सरळ जाऊन मोरीत अंघोळीला बसलो. कसेबसे चार थेंब नळातुन बाहेर पडले आणि पाणी संपलं. सहनशक्ती, स्मरणशक्ती आणि पचनशक्ती…. आणि आता नशिबाचा दगा….. !

माझा त्या थाळीवर, त्या मालकांवर, त्या वाढप्यावर राग नाहीये… वो तो गैर थे !
राग नशीबावर….ते तर माझंच होतं ना ? पण माझ्याच नशिबाच्या फे-यात अडकुन मी पार लुटलो होतो…. दुर्दैवाच्या भोव-यात अडकुन मी पार बुडलो होतो. दुःख लुटण्याचं किंवा बुडण्याचं नव्ह्तं हो…. दुःख ह्याचंच की….

मुझे तो अपनोंने लुटा… गै़रोंमे कहॉं दम था….
जहॉं मेरी कश्ती डुबी… वहॉं पानी बहोत कम था…

धुंद रवी.

नववर्षाचे काही संकल्प..

नववर्षाचे १२ संकल्प… कारणांसहित…

मित्र मैत्रीणींनो
माझे नववर्षाचे काही संकल्प इथे देत आहे. नुसते संकल्प सांगण्यात काय मजा ? म्हणुन त्याची कारणं पण देत आहे.
संकल्प १. – बायकोशी कधीही भांडणार नाही.
कारण – ह्याची सुमारे ६७ कारणं देऊ शकेन पण तुर्तास…..
अ. – ती तिच्या चुका मान्य करत नाही.
ब. – जीभेला हाड नसतं, हे ती सिद्ध करते.
क. – परवा तिनी तिचे सगळे दोष मान्य केले पण पुढे म्हणाली की, ” माझ्यात हे सगळे दोष आहेतच म्हणुनच तर तुझ्याशी लग्न केलय. जर हे दोष नसते तर कुणीतरी बरा नसता का मिळाला आणि एकदा जरा आरशात……..

………………………..असो…. !

 

संकल्प २. – पुण्यातल्या पीएमटी बसमध्ये पाऊल टाकणार नाही.
(बसमध्ये बसणार नाही, असे लिहले नाहीये कारण आजपर्यंत मला कधीच बसायला मिळाले नाहीये.)
कारण –
अ. – उरलेले सुट्टे पैसे, चपला आणि सगळी हाडं परत मिळत नाही.
ब. – हव्या त्या स्टॉपवर उतरता येत नाही. जिथं उतरावं लागतं तिथं खाली कुणाची तरी दुचाकी असतेच. तो जिथं सोडेल तिथुन परत (बस करुनच) यावं लागतं.
क. – पुढुन चढुन देत नाहीत, सर्कस करायचा अनुभव नसल्यास मागुन चढता येत नाही. ड्रायव्हर तोंडात गुटका असल्याने बोलत नाही, कंडक्टर ऐकत नाही.
ड. – तिकीट चुकवुन…. म्हणजे चुकुन राहिल्यास चेकर बापाचा उद्धार….

………………………..असो…. !

 

संकल्प ३. – खोटं बोलणार नाही.
(हे जरा अशक्य कोटीतलं होतय का ? बर मग … खोटं बोलुन ऑफीसला दांडी मारणार नाही.)
कारण –
अ. – हयात व्यक्तींना मारल्यानी ब्रह्महत्येचं पाप लागतं.
ब. – ह्या दांडीची नोटीस देता येत नाही त्यामुळे सुट्टीची खातरी नसते. ती मिळालीच तर पकडले जाण्याची भिती दिवसभर वाटत राहते. सुट्टीचा आनंद मिळत नाही.
क. – नेमकं बॉसच्या हातुन पण त्याच दिवशी ब्रह्महत्येचं पातक घडले असल्यास तो तिथं थेटरात भेटण्याची दाट शक्यता असते. ..आणि दुःख विसरायला आलोय हे कारण त्याला पटत नाही. त्याचं तिथं येण्याचं कारण सांगायची त्याला गरज नसते.
ड. – खरच ती हयात व्यक्ती कधी गचकली तर जाणं अवघड होतं आणि मग नविन हयात व्यक्तीच्या हत्येचं पाप….

………………………..असो…. !

 

संकल्प ४. – दारु पिणार नाही.
कारण –
अ. – तोल जातो.
ब. – पैसे जातात
ड. – शुद्ध जाते.
ई. – दृष्टी जाते.
फ. – मजा जाते.
ग. – इज्जत जाते.

संकल्प ५. – तमाशा बघणार नाही.
एकमेव कारण –
अ. – रंभा घायाळकर प्रकरण…..
संकल्प ६. – कितीही ओळखीची वाटली तरी समोरची बाई जोपर्यंत ओळख देत नाही, तोपर्यंत मी बघुन हसणार नाही.
कारण –
अ. – तिच्याकडुन डाव्या गालावर…
ब. – संधीसाधु समाजाकडुन सर्वांगावर….
संकल्प ७. – लांबच्या प्रवासात केळी नेणार नाही.
कारण –
अ. – घाटात केळ्याचा असह्य्य वास सुटतो. मळमळतं. कधीकधी ओकारी होते….. ब-याचदा ओकारी होते…. नेहमीच ओकारी होते.
ब. – केळी चुकुन सामानाखाली गेल्यास पिशवीतच शिकरण होतं.
क. – केळीमुळे पोट गच्च होतं.
ड. – केळीचे करपट ढेकर खुप…. ………………………..असो…. !
संकल्प ८. – घड्याळ न बघता, पिशवी न घेता, सुट्टॆ पैसे न घेता, वाईट मूड नसेल तर, अपमान पचवण्याची तयारी नसेल तर आणि दुसरा पर्याय असेल तर पुण्यातल्या पितळेबंधु मिठाईवाले ह्या दुकानात पाऊल टाकणार नाही.
कारण –
अ. – गर्दीत ताटकळत उभं राहुन चक्कर येते पण आपला नंबर येत नाही.
ब. – १ वाजला की काहिही झालं तरी दुकान बंद होते. (माग एकदा त्यांच्या दुकानाला आग लागली होती म्हणे. आगीचा बंब पोहचता पोहचता १ वाजला तर ह्यांनी दुकान बंद केलं आणि म्हणाले आता ४ वाजता या…. १ वाजता बंद म्हणजे बंद !! )
क. – पिशवी विसरली तर ते देत नाहीत. अंगुर बासुंदी पण ओंजळीत घ्या म्हणतात. पिशवीचे पैसे देतो म्हणालो तर आमचा धंदा मिठाईचा आहे, पिशव्या विकण्याचा नाही, असा आपमान करतात.
ड. – सुट्टे पैसे नसतील तर त्याच्या बदल्यात श्रीखंडाच्या गोळ्या देतात.
संकल्प ९. – योगासनं आणि व्यायाम करणार नाही.
कारण –
अ. – योगासनं करताना काही चूक झाली तर ते सोडवताना खुप त्रास होतो. काल डाव्या पायाचं तिसरं बोट मी उजव्या हाताच्या करंगळीत पकडल्यानंतर पाठीचा मणका माकडहाडात अड्कुनच बसला हो…. बायकोनी पेकाटात लाथ घातली तेंव्हा…… असो…
ब. – व्यायाम केला की खुप थकायला होतं…. गळुन जायला होतं…. चक्कर येते….. आजारी पडायला होतं…….. तब्येत बिघडते.
क. – इतकं करुन कुणी एक झापड जरी मारली तरी…..

………………………..असो…. !
संकल्प १०. – हिमेश रेशमीयाच्या आवाजातलं गाणं आणि सुनील शेट्टीचा अभिनय ह्यांच्या वाटेला जाणार नाही.
कारण –
अ. – डीप्रेशन येतं….
ब. – बीपी वाढतं….
क. – डोकं फोडावसं वाटतं (स्वतःचं)
ड. – जीव घ्यावासा वाटतो (त्यांचा)
ई. – कपडे फाडावेसे वाटतात (पुन्हा स्वतःचेच)
फ. – भयानक स्वप्न पडतात. भास होतात…
ग. – पुन्हा कधीतरी ते दिसेल, ऐकु येईल असं वाटत राहतं…

संकल्प ११. –  वाहतुकीचे नियम मोडणार नाही.
कारण –
अ. – मागच्या आठवड्यात मी मोटार-सायकल रेस मधे पहिला आलो. मग त्याच चौकात मला बक्षिस म्हणुन १०० रुपयांची पावती देण्यात आली. आता मी ठरवलय सगळे पुढे गेले तरी चालतील पण सिग्नल तोडायचा नाही.
ब. – झेब्रा क्रॉसिंगवर उभं राहिलो तर, “वेळ जात नाही म्हणुन आम्ही हे पट्टे मारलेले नाहियेत” अशी बहुमुल्य माहिती एका मामानी मला १०० रुपयात दिली.
क. – परवा मी १०५ रुपयाचा उसाचा रस प्यायला. आता पी वन…पी टु… बघायचं ठरवलय.
ड. – घाई गडबडीत जोरात जात असताना रस्त्यावर मध्येच उभ्या असलेल्या मामाला….

………………………..असो…. !
संकल्प १२. – ऑफिसमध्ये साहित्यलेखन करणार नाही. विशेषतः विनोदी लेखन….
कारण –
अ. – त्या प्रसुति वेदना होत असतानाच्या कळा ऑफिसात देता येत नाहित.
ब. – वेगवेगळ्या पात्रांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्याकडे तटस्थपणे पाहताना… हसताना विचित्र आवाज येतो. बाकीचे लोक ‘काय यडं आहे’ अशा नजरेने बघतात.
क. – काही लिहुन झालं की समोरच्याला वाचुन दाखवावसं वाटतं. एकदा समोर क्लायंट होता आणि एकदा बॉस….. (प्रतिसाद म्हणुन मेमो मिळाला….!)
ड. – रसिक मित्र-मैत्रीणींचे झकास प्रतिसाद वाचले की तिथेच बॉसच्या तोंडावर राजीनामा मारावासा वाटतो….

अजुनही काही संकल्प करतोच आहे. नक्की ठरलं की इथे टाकेनच.. तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद पाठिशी असतील तरच हे संकल्प पुर्ण होतील…

तुमचाच…
धुंद रवी.

‘च्यामायला… माझं चुकतय कुठे… ?’

गेल्या तीन दिवसात माझ्या हातुन अक्षम्य अपराध झालेत आणि माझे सगळे गुन्हे मला मान्य आहेत. पण प्लीज एकदा माझं ऐका आणि मला सांगा की….
‘च्यामायला… माझं चुकतय कुठे… ?’

परवा धोब्याला इस्त्रीसाठी होते-नव्हते ते कपडे दिले आणि काल टॉवेलवर त्या मुर्ख धोब्याची (का मुर्ख मी कोणास ठाउक… !) वाट बघत बसलो. आता ऑफीसला उशीर होणार आणि विनाकारण बॉसच्या शिव्या खाव्या लागणार ह्या विचारानी संतापलो आणि त्या धोब्याच्या घरी जाऊन त्याला धुवावं असं विचार करायला लागलो.
पण बनियन आणि टॉवेलवर जाणं प्रशस्त दिसणार नाही म्हणुन त्याला फोनवरच धुवायचं ठरवलं. त्याला फोन लावल्यावर एक आगाऊ आवाजाच्या बाईनी मला डोक्याला झिणखिण्या आणणारा एक मेसेज दिला…
” आपण ज्या व्यक्तीशी संपर्क साधु इच्छित आहात, ती व्यक्ती सद्ध्या भारताबाहेर प्रवास करत आहे “.
बेगडेवाडी का घेभडेवाडी… अशा कुठल्यातरी गावावरुन आलेला आपला धोबी कुठं पोहचला अशा विचारात मी बेशुद्ध पडणार इतक्यात दारावरची बेल वाचली. मी जरासं घाबरत… (किंवा लाजत असेल) दार उघडलं…
आणि पाहतो तर काय….
तोच तो आमचा हरामखोर धोबी दात काढत… जणु काही मला दिवाळीची भेट म्हणुन त्यानी कपडे आणले आहेत अशा कौतुकात…. जीवाचा संताप संताप व्हावा इतक्या प्रसन्न चेह-यानी…. मळक्या बनियनवर उभा.
मी निशःब्द आणि निशःस्त्र असल्यानं, कृतकृत्य होऊन अत्यंत कृतज्ञतेने त्यानी केलेल्या लज्जारक्षणासाठी आभार मानुन माझे कपडे ताब्यात घेतले. नेहमीप्रमाणे त्याच्याकडे द्यायला सुट्टे पैसे नसल्यानी त्यालाच ते लक्षात ठेवायला सांगुन, त्याच्या परदेशवारीविषयी विचारताच म्हणाला,
” हं…हं… ते व्हय… त्यो माझा डायलरटोन आहे.”
माझ्या तोंडाला फेस आला.
मला कळेना….
तीन किलोमीटर बनियनवर (तो ही मळका.. आणि ते ही धोबी असताना…) येणा-या, अक्षम्य अपराध करुन दात काढणा-या आणि असली इंटरनॅशनल रिंगटोन असणा-या त्या धोब्याचं दरवाज्यापलिकडचं ते स्वछ… आनंदी… मोकळं जग….!!
आणि दरवाज्याच्या आतलं माझं चिडचिडलेलं… मरगळलेलं….. कसलाही टोन नसलेलं बेसुर जग…. ??
‘च्यामायला… माझं चुकतय कुठे… ?’

——————–

“काय….. ? तीस रुपये ???”
हे मी इतक्या जोरात ओरडलो की…..
थांबा… तुम्हाला सविस्तरच सांगतो.
काय झालं, काल मस्त पावसाळी हवा होती म्हणुन बायकोला जरा भजी किंवा काहीतरी चटपटीत कर असं म्हणालो तर रागातीशयानी बघायला लागली. जसं काही मी तिला शाही रबडीच करायला सांगीतलं होती. “आटे डाल का भाव पता है क्या” असं काहीतरी हिंदीत वैगेरे बोलायला लागली.
त्यात मी हिंदीत तिच्याशी भांडु शकत नाही, हे तिला माहित आहे. (तसं मी तिच्याशी कुठल्याच भाषेत भांडु शकत नाही, पण ह्या वेळेस न भांडण्याचं कारण ‘बायकोच्या रागाचा उसळलेला डोंब नसुन माझी हिदीची बोंब’ हे होतं.) पिठाचा आणि डाळीचा भजीशी संबंध काय, मला कळेना.
“मग निदान कोथिंबीरीच्या वड्या तरी करं” असं म्हणालो तर कपाटातुन थर्मामीटर घेऊन आली आणि मला ताप आलाय का बघायला लागली.
च्यामायला… मला कळेनाच… माझं चुकतय कुठे… ?
मग इंग्रजीत बडबड करत मी कोथींबीर आणायला बाहेर पडलो. (तसं ती अगदी उच्चविद्याविभुषीत आहे, पण का कोण जाणे, माझं इंग्रजी तिला जडंच जातं थोडं. बहुतेक मी एकदम हाय क्लास शब्द वापरत असणार. ………असो..!)
तर मी सरळ भाजीवालीकडे गेलो. (ही मराठी बाई आहे. मागे एकदा एका हिंदी भाजीवाल्याकडे गेलो आणि “जरा सव्वाशे ग्रॅम पडवळ देना” असं म्हणालो तर अजुबाजुच्या बायका इतक्या हसल्या की त्यानी ते प्लॅस्टीकच्या पिशवीत घालुन वर फुकट दिलं असतं, तरी मी घेतलं नसतं.).
तर मी त्या मराठी बाईकडे कोथिंबीर मागितली आणि ह्या वेळेस आजुबाजुची लोकं माझ्याकडे आदरानी पाहयला लागली. त्या बाईनी मला कोथिंबीर, तिही न मागता एका पिशवीत घालुन दिली आणि म्हणाली “तीस रुपये !”
“काय….. ? तीस रुपये ???”
हे मी इतक्या जोरात ओरडलो की…..
जाऊ द्या.. कशाला उगाच स्वतःची झालेली शोभा सांगा. नाही परवडत एखाद्याला ३० रुपयाची कोथिंबीर. पण म्हणुन काय…. असो…. त्या अमानुष, असुरी, असह्य, अविस्मरणीय धक्क्यातुन मी सावरायच्या आधिच मला एक फोन आला. पलिकडुन एक गोड बाई… माफ करा, गोड आवाजाची बाई जे म्हणाली ते पुढिलप्रमाणे,
“सर… आमच्या कंपनीकडुन तुमची एका लकी कुपनसाठी निवड करण्यात आली आहे आणि त्यानुसार २ वर्षातुन १० वेळा, ७ दिवस आणि ६ रात्री तुम्हाला काश्मीरला एका ५ स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सुवर्णसंधी आहे. पण त्यासाठी तुम्हाला ३ दिवसाच्या आत फक्त ९०,००० रुपये भरायचे आहेत. तर कधी येताय… ?”
त्या सगळ्या आकड्यांनी मला इतकं गरगरलं की मी काय बोलतोय मलाच कळेना. मी तिला म्हणालो की हे कुपन तुम्ही दुस-या कोणाला तरी विकुन त्या बदल्यात मला कोथिंबीरीच्या ३ गड्ड्या द्याल का ?
तिनी मला इंग्रजी भाषेत (बीप बीप) शिव्या घातल्या… गड्डी परत दिली म्हणुन भाजीवालीनी मराठीत (बाप बाप) शिव्या घातल्या आणी तसंच घरी परत आलो म्हणुन बायकोनी हिंदीत मेरे इज्जत की धंज्जीया उडा दी !
का वागतात ह्या सगळ्या बायका असं ? च्यामायला… मला सांगा, माझं चुकतय कुठे… ?

——————–

आज सकाळी माझ्या ५ वर्षाच्या मुलीचा अभ्यास घ्यायला बसलो होतो. आजकालची मुलं म्हणजे भारी उर्मट आणि आगाऊ आहेत हो ! जराही अभ्यास करायला नको दुसरं काय…
आमच्या वेळेला कसं… म्हणजे मी अभ्यासात जरी हा नसलो तरी एकदम हा ही नव्हतो. म्हणजे खुप काही अगदी हे नाही पण म्हणजे… आमच्या वेळेला अभ्यासापेक्षा व्यवहारज्ञान जास्त महत्वाचं असायचं.. म्हणजे पास नापास काय… म्हणजे अगदी सगळ्याच विषयात किंवा प्रत्येक वर्षी असं नाही पण… असो….
तर मग मी तिच्या होमवर्कची वही घेतली आणि पहिला बॉम्ब इंग्रजीचा. म्हणजे मला तसा काही प्रॉब्लेम नाहीये इंग्लिशचा… पण तिच्या आईलाच जिथं माझं हाय क्लास इंग्लिश कळत नाही, तिथं त्या चिरमुरडीला काय कळणार. मी वही उघडली पण इंग्लिश सारखं काही दिसेना. काहीतरी ‘फोनीक साऊंड’ असा होमवर्क होता. मला कळेना हो… हे फिजिक्स किंवा इंजीनीयरींग चे विषय हल्ली ज्युनिअर केजीला कधीपासुन आलेत ?
मग कळालं… म्हणजे मुलीकडुनच कळालं की इंग्रजी अक्षरांचे उच्चार आपण ज्या प्रकारे करतो त्याला ‘फोनीक साऊंड’ म्हणायचं. अर्थात हे सांगताना ती तिच्या आईसारखं डोळ्यातुन “बावळाट” असं म्हणायला विसरली नाही. नंतर ती ते तोंडानी पण म्हणाली. पण माझी चुक नव्हती हो…. आम्ही Z ला झेडच म्हणायचो… आता त्याला ज्ज्ज्ज्ज्ज्ज्सस्स्स्स्झ्झ्झ्झ्झी म्हणतात हे मला बापड्याला कसं कळणार. बर तो विषय टाळुन तिला आय फॉर आयस्क्रिम असं शिकवायला गेलो तर म्हणाली, “चूक ! आय सेझ ई, आय फॉर ईग्लु… नॉट आयस्क्रीम !!”
आमच्या इंग्रजीच्या दाते मास्तरांची शपथ…. ती काय बोलली मला अजुन कळालं नाहीये.
पोमोग्रएनेट म्हणजे नक्की कुठलं फळ.. माहित नव्हतं. मुळ्याला इंग्रजीत काय म्हणायचं… माहित नव्हतं. त्या इंग्रजी कविता वैगेरे आपल्याला कधी जमल्याच नाहीत. गाणी म्हणता येत नाहीत, चित्र काढता येत नाहीत. पर्पल आणि व्हायोलेट ह्याला माझ्याकडे एकच जांभळा हा शब्द आहे हो…. पण तिच्याकडुन तीच ती नजर पुन्हा आल्यानी मी ते ही बंद केलं…. माझं नशीब तिला गणित विषय नाही, नाहीतर….
काय आहे….. माझं गणित पण इंग्लिश सारखं जरा हाय क्लासच आहे. पण म्हणुन जे घडलय ते सगळं तिनी जाऊन आईला सांगणं चुकच होतं.
मग दोघींनी मिळुन माझी शाळा घेतली…. हल्ली माझा मराठी बाणा जरा जागा व्हायला लागलाय पण आज बायको आणि उद्या मुलगी फाडुन खातील म्हणुन गप्प आहे.

एक सांगु तुम्हाला, मी सोडुन बाकीचे सगळे बरोबरच असतात. तो धोबी, ती भाजीवाली, ती टेली-कॉलर, बायको, मुलगी, हे तर असतातच पण वॉचमन, बसचा कंड्क्टर, दुकानदार, ट्रॅफिक पोलीस, भिकारी, ती मराठी माणसं , हिंदी माणसं, इंग्रजी माणसं, कन्नड, तेलगु, हिब्रु माणसं…. आजुबाजुची दिसणारी सगळीच माणसं… सगळेच बरोबर असतात… मी सोडुन !
मला मान्य आहे की मी चुक आहे. पण मला एक सांगा….

” च्यामायला… माझं चुकतय कुठे… ?”

धुंद रवी.

घाणघापुरचा SMS

आयुष्यात वादळं ही येणारंच…. आणि आलेली वादळं तुमचं आयुष्य बदलुन टाकणारंच…

पण मोठी मोठी वादळं येताना काय भारी भारी कारणं असतात हो लोकांकडे ! अघोरी अन्याय, जीवघेणी फसवणुक, पराकोटीचे अपयश, सूड, महत्वाकांक्षा अशा मराठी कादंबरीत वाचलेल्या पण सामान्य माणसाला कधीच अनुभवायला न मिळालेल्या गोष्टींनी खुप वादळं येतात म्हणे….
काही काही लोक तर ह्या ही पेक्षा नशीबवान असतात. लग्नाआधि प्रेमभंग, लग्नानंतर अपेक्षाभंग, मग अनपेक्षित चढलेले प्रेमरंग… मग बायकोला कळाल्यानी झालेला रसभंग…. अशी एकदम रोमॅंटीक वादळं पण असतात हं !
आमचं एवढं नशीब कुठलं… प्रेमच नाही त्यामुळे प्रेमभंग नाही तसच अपेक्षा नाही त्यामुळे अपेक्षाभंग नाही. तरी माझ्या आयुष्यात वादळ आलंच…. तुम्हाला वाटेल की एका कपडे धुण्याच्या साबणाची पावडर बनवण्याच्या कंपनीत काम करणा-या माणसाच्या आयुष्यात कसलं आलंय वादळ ??

पण नाही हं ! वादळ आलं…. वादळ आलं एका SMS नी…

मागच्या आठवड्यात रात्री एका नातेवाईकाचा SMS आला… रात्री १०.४२ ला.
अरे काय विक्षिप्त आणि विचित्र असतात लोकं ! १०.४२ ही काय SMS करण्याची वेळ आहे का ? (खरं सांगायचं, तर मला कुठल्याही वेळेच्या बाबतीत असंच वाटतं. खात्यातुन पैसे वजा झाल्याचा SMS मला जेवताना येतो. बीलाची रिमांयडर्स मला झोपताना येतात. निमंत्रणाचे SMS मला तो कार्यक्रम झाल्यानंतर येतात. एकदाच व्हॅलेंटाईन-डे ला एक SMS आला होता. कुणाचा ते कळालं नाही कारण तेंव्हा मोबाईल बायकोच्या हातात होता. आणि तिला ‘माझ्याविषयी काहितरी निनावी पत्र आल्यासारखा’ तिचा चेहरा झाला होता. मला वाटलं आता मोबाईलच फेकुन मारतीये का काय, पण तो SMS डीलीट करण्यावरच भागलं. तो कुणाचा होता, काय होता हे नाही कळालं, पण त्या कल्पना-विलासात अजुनही माझे काही क्षण खुप छान जातात. …..असो. सुखाची इतकी सवय चांगली नाही !)

मी तो SMS वाचायला लागलो…. “हा SMS घाणघापुरचा….”

मी जाम टरकलो. कारण घाणघापुर म्हणजे भूत, डाकीणी, पिशाच्च, हडळ असे ब्रह्मसंबंध जर मानगुटीवर बसले असतील तर ते उतरवायला लोक इथे जातात, अशी एक ऐकीव माहिती होती.
(अनुभव घ्यावा म्हणुन मी पण एकदा गेलो होतो… बायकोला घेउन. त्या दंतकथेवर विश्वास ठेऊन, जातानाची दोन रीझर्व्हेशन्स आणि येतानाचं मात्र एकच केलं.
कसलं काय हो ! येताना पण ‘हि’ माझ्या बरोबरंच.. ते ही त्या रीझर्व्ह्ड सीटवर बसुन… मी मात्र आख्खा प्रवास उभ्यानी पायावर, मानगुटीवर आणि मनावर ओझं घेउन केला.
मग पुढे कळालं की हल्लीची भुतंही खुप हुशार झालीत. घाणघापुरच्या वेशीजवळ आली की मानगुटीवरुन उतरुन झाडावर जाउन बसतात. तो बिचारा झपाटलेला, दर्शन घेऊन हलक्या मनानी (आणि मानेनी) घाणघापुरच्या बाहेर आला की झाडावरचं भुत पुन्हा झाडावरुन मानगुटीवर आणि मानगुटीवरुन घरी !! पुढच्या वेळेला हिला घाणघापुरला नेताना आधि तिथली सगळी झाडं पाडण्याची विनंती मी तिथल्या कलेक्टर साहेबांना करणार आहे. असो….)

तर मी पुढचा SMS वाचायला लागलो. “हा SMS घाणघापुरचा प्रसाद आहे…..”.

हुश्श ! मला क्षणभर हुश्श झालं. क्षणभरच कारण एक अभद्र विचार माझ्या मनात आला की हल्लीच्या भुतांची नावं आरती, प्रसाद, भक्ती अशी मॉडर्न आणि ऑफ्बीट नसतील ना ?
हो…. नाहीतर येऊन बसायचा मानगुटीवर… घाणघापुरचा प्रसाद ! (अर्थात मला घाबरायचं कारण नाहीये. आमची ‘ही’ थोडीच बसु देणार आहे त्याला तिथं. मग… तिच्या हक्काचं ‘झाड’ आहे मी !)

…. मी SMS पुढं वाचायला लागलो. “हा SMS घाणघापुरचा प्रसाद आहे. हा SMS तुम्ही जर पाच लोकांना पाठवला तर तुमची एक सरप्राईज मिळेल. जर दहा लोकांना पाठवला तर तीन सरप्राईजेस आणि पंधरा लोकांना पाठवला तर पाच सरप्राईजेस मिळतील.”.

तुम्हाला सांगतो, माझं आयुष्य ‘उगाच कशाला’ ह्या दोन शब्दांमुळे खुप वाईट गेलं आहे. चांगलं सुखासुखी दिवस चालले होते तर उगाच कशाला एकटं राहयचं म्हणुन लग्न केलं. मग उगाच कशाला वाद म्हणुन बरच काही उगाचाच सहन करतोय. उगाच कशाला रिस्क म्हणुन ऑफीसमध्ये जे पडेल ते काम करतो. आताही उगाच कशाला खर्च म्हणुन सोडुन देणार होतो तर पुढचा SMS वाचला…
“…जर तुम्ही हा पुढे न पाठवता डीलीट केलात तर… तर कोप होऊन लवकरच तुमच्यावर घाणघापुरला यायची वेळ येईल.”
‘म्हणजे काय’ ते मला कळालंच ! मागच्या वेळेला मी घाणघापुरला गेलो होतो तेंव्हा ह्या अशा ‘ घाणघापुरला यायला लागणा-या लोकांचं ‘ दर्शन मला झालं होतं. त्या मानगुटीवरच्या कुणी… कुणाला खांबावर चढवलं होतं, कुणी कुणाला लोळवलं होतं, कुणी कुणाला स्वतःचेच कपडे फाडायला, डोकं आपटायला, स्वतःचेच केस ओढायला लावलं होतं. हे सगळ ठीक होतं हो, पण एका विवाहित माणसाला खळखळुन हसताना पाहिलं आणि सरसरुन काटाच आला अंगावर.
भुत लागल्यानंतर माणुस काय दुर फेकला जातो वस्तुस्थितीपासुन… !!”

…तर उगाच कशाला विषाची परीक्षा… म्हणुन मी SMS करायचं ठरवलं…. आधि पाच लोकांनाच करणार होतो, पण मग नंतर अजुन पाच SMS मध्ये जर दोन जास्तीची सरप्राईजेस मिळणार असतील तर उगाच कशाला संधी घालवा, असं विचार करुन मी त्या रात्री १.४३ वाजता दहा लोकांना SMS केले.

झालं…! त्या SMS मध्ये लिहिलं तसंच झालं. पुढच्या काही दिवसात मला तीन सरप्राईजेस मिळाली आणि माझं आयुष्य बदलुन गेलं. हा घाणघापुरचा SMS इतका पॉवरफुल असेल असं वाटलं नव्हतं….

सरप्राईजसाठी उतावीळ झालेला असा तो मी….सकाळ सकाळी एकदम सज्ज होतो.

पण नेमकी लाईट गेल्यानी गिझरवर पाणी गरम करता आलं नाही. ‘त्या’ स्वाभिमानी स्त्री नं गॅसवर पाणी गरम करायला ढळढळीत नकार दिला. मग गार पाण्यानी आंघोळ करावी लागली. टॉवेल पण ओलाच मिळाला. बनियन तर सापडेनाच. अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा बायकोनी चुकुन ओटा पुसायला घेतला होता. पण ह्या विषयावर तिच्याशी बोलण्यात काहिच अर्थ नसतो. माग एकदा असं झालं होतं तर म्हणाली होती,
“बनियन कुठला आणि फडकं कुठलं हे कळतच नाही. फडक्याला भोकं नाहीयेत, एवढाच तर फरक आहे.”
काय बोलायचं ह्यावर ?
मी काहिही तक्रार न करता आवरुन निघालो तर… बाईक पंक्चर ! रिक्षा मिळेना म्हणुन बस स्टॉपपर्यंत चालत आलो. सगळ्या जगाची गर्दी त्या स्टॉपवर झाली होती. पहिल्या चार गाड्या तर सोडुनच दिल्या, पण असं केलं तर संध्याकाळपर्यंत तिथंच उभं राहायला लागेल म्हणुन दंड थोपटले आणि तयार झालो. त्या सक्तीच्या कुस्तीनंतर कसाबसा आत शिरलो तोपर्यंत माझ्यात बराच बदल झाला होता….
एकदम टरटरुन फुगवलेला फुगा बरीचशी हवा गेल्यानंतर जसा मऊ होतो आणि चुरगाळुन जातो, तसा झालो. सहा महिन्यांपुर्वी गाठोड्यात बांधलेले कपडे घालावेत, असे दिसायला लागले. चष्म्याच्या काड्या, ज्या आधि काचांना काटकोनात होत्या, त्या सरळ रेषेत आल्या. एखाद्या गवताच्या झोपडीचं चक्रीवादळानंतर जे व्हावं, ते केसाचं झालं.
त्यानंतर…”कुठं बसलात ?” असं कंडक्टरनी विचारल्यावर, “बसलोय कुठे ? अजुन उभाच आहे” असं हलकट उत्तर त्याला दिलं. मग त्यानी काहिही कारण न देता मला खाली उतरवुन दिलं. अर्थात पुन्हा दुस-या बसमध्ये बसायची तयारी नव्हती म्हणुन रिक्षाचा भुर्दंड सोसुन ऑफिसला पोहचलो. दरम्यान जे काही सरप्राईज मला मिळायचं होतं ते पावलोपावली मिळालं होतं आणि दुसरं सरप्राईज माझी ऑफीसमध्ये वाट पाहत होतं…
नेहमीप्रमाणे साहेब जरा उशीराच आले. त्यांचे लाल डोळे पाहता कालची जरा जास्त झाली असावी. आल्या आल्या त्यांनी सगळ्या स्टाफला बोलावलं आणि ते म्हणाले…
“आपल्या कंपनीत दिवसरात्र काम करणारे खुप मेहनती लोक आहेत. रात्र रात्र जागुन कंपनीचा विचार करणा-या ह्या माणसांमुळेच आपली कंपनी इथपर्यंत आलीये. अशाच एका गुणी माणसाला मी प्रमोशन द्यायचं ठरवलय. नुसतं प्रमोशनच नाही तर त्याची बदली सगळ्यात कार्यक्षम विभागात केली आहे.”
त्या SMS चा परिणाम की साहेबांनी माझं नाव घेतलं… माझं !
माझं कौतुक केल्यानंतर ते माझ्या कानात म्हणाले ” ह्या वेळेस तुझी फक्त बदली करतोय ‘तक्रार निवारण’ विभागात, पण पुढच्या वेळेस जर रात्री १-१.३० ला असा दळभद्री SMS करुन जर झोपमोड केलीस तर घाणघापुरला नविन ब्रांच उघडुन तिथं तुझी बदली करेन.”
त्यांचे ते निद्रानाशामुळे झालेले लाल डोळे पाउन मी काळा-निळा पडलो. साहेबांनी… कसला साहेब… त्या नालायक नराधमानी माझी बदली ‘तक्रार निवारण’ मध्ये केलीच पण तक्रारीसाठी माझा नंबर छापला हो… !

लोकांचे काय वाट्टेल ते फोन येतात. साबणाला झाग येत नाही, साबणाचे डाग जात नाहीत, साबणाला फेस येत नाही हे ऐकुन ऐकुन तर माझ्या तोंडाला फेस आलाय. परवा एका बाईच्या मुलानी थोडी पावडर खाल्ली तर मलाच झापडलं हो तिनी. म्हणाली तुम्ही हर्बल पावडर का काढत नाही ? आता काय कपडे धुण्याची पावडर पण हर्बल काढुन त्यात स्ट्रॉबेरी, मॅंगो, बनाना असे फ्लेवर टाकायचे ? तरी फोन येणार की आमच्या मुलाला ऍप्पल खुप आवडतं, तुम्ही ऍप्पल फ्लेवर का काढत नाही ? एका हिरवे नावाच्या बाईचा फोन आला की आमच्या येल्लो पावडरनी त्यांच्या पिंक ड्रेसला ब्लु डाग पडले. त्या विविध रंगांनी मी इतका गडबडलो की चुकुन त्यांनाच पिंकी म्हणुन हाक मारली. पार धुतलाच त्यांनी मला. समोर असतो तर आमच्याच पावडरनी धुवुन मला रंगवला असता. काही आगाऊ लोक प्रात्याक्षिक द्यायला घरी बोलावतात. आता काय लोकांच्या घरी जाउन कपडे धुवु ?
पुर्वी मला स्वप्नात अप्सरा दिसायच्या आणि त्यात वातावरण निर्मितीसाठी साबणाचे फुगे वैगेरे उडत असायचे. आता खुप भयानक स्वप्न पडतात हो….
सार्वजनीक नळावर मी मध्यभागी बसलोय आणि सगळ्या बायका कोंडाळा करुन…घेराव घालुन उभ्या आहेत आणि आमच्याच पावडर वरुन मला घालुन पाडुन बोलताहेत आणि माझ्या तोंडातुन साबणाचे फुगे बाहेर पडताहेत असं काहीतरी….
ह्या सगळ्याला तो SMS कारणीभुत आहे. मी फक्त पाचच लोकांना तो SMS केला असता तर एकच सरप्राईज मिळालं असतं किंवा कमीत-कमी मी माझ्या साहेबांना तरी हा SMS करायला नाही हवा होता, असं आता वाटाण्यात काहीच अर्थ नव्हता….
मला अजुन एक सरप्राईज येणार होतं आणि मला ती झेलायलाच लागणार होतं….
‘…….मी पाटावर उघडाबंब बसलो आहे. पाटापुढे (आमच्याच पावडरनी) रांगोळी काढलेली आहे. बायको पावडरचं उटणं अंगावर लावत आहे. त्या पावडरचं कुंकु कपाळावर ओढत आहे. अक्षता म्हणुन डोक्यावर पावडर….’
हे असलं स्वप्न तुम्हाला पडलं तर तुम्ही पण पिसाळुन जाल. गेल्या दोन सरप्राईज मधेच मी इतका संपलोय की विचारुच नका. त्या येणा-या फोन्समुळे रात्र-रात्र झोप येत नाही. झोप आलीच तर स्वप्नांचा तर कहर झाला आहे. ह्या आत्ता सांगितलेल्या स्वप्नात तर एकच बाई होती पण एखाद्या भयानक भयपटाचा पुढचा भाग जास्तच भयावह असावा अशी स्वप्न पडतात हो…
त्या नळावरच्या बायकांनी मला पाटावर बसवलं आहे. पुन्हा पाटाभोवती पावडरची रांगोळी आहे आणि त्या बायका माझ्याभोवती फेर धरुन भोंडला म्हणताहेत….
“श्रीकांता कमलकांता अस्से कस्से झाले… अस्से कस्से झाले माझ्या नशिबी आले…
वेड्याच्या बायकोनी आणली होती पावडर.. तिकडुन आला वेडा त्यानी डोकाउन पाहिले..
पिठीसाखर म्हणुन त्यानी चाटुन टाकले…”
हे गाणं संपतं-न-संपतं तोच…..
“१ SMS करु बाई २ SMS करु
२ SMS करु बाई ३ SMS करु
३ SMS करु बाई ४ SMS करु
४ SMS करु बाई ५ SMS करु
पाचव्या SMS ला सरप्राईज…”

सरप्राईज हा शब्द आला की एकदम खडबडुन जागा होतो आणि बराच वेळ छाती धडधडत राहते. मग उरलेला वेळ जागुन काढतो…. आता सगळ सहन शक्तीच्या पलिकडे चाललय.
त्या SMS टाकणा-या नातेवाईकाला शोधुन… त्याच्या हातातुन मोबाईल हिसकावुन… त्यावर दणादणा नाचुन तो मोबाईल तोडुन टाकावा आणि त्यातलं सीमकार्ड खलबत्त्यात कुटुन त्या चु-यावर पेट्रोल टाकुन त्याला काडी लावाविशी वाटते हल्ली. कुठे मोबाईल खणखणला की डोकं भणभणतं. मळके कपडे दिसले की खुप धडधडतं. कुठेही वाळत टाकलेले जरी कपडे दिसले की आग लावाविशी वाटते.

………..हे सगळं मी एकदा बायकोला सांगितलं. तिनी क्षणाचाही विलंब न लावता कुठल्या तरी स्पेशालिस्ट ची अपॉईंट्मेंट घेतली. बाहेरगावचा कुणीतरी नावाजलेला स्पेशालिस्ट असावा कारण त्याच्याकडे आम्ही चक्क ST मधुन चाललो होते. त्या गाडीतुन खाली उतरल्यावर पाहतो तर काय….. तिसरं सरप्राईज….

घाणघापुर…. !!

जातानाचं तिच्या एकटीचंच रिझर्व्हेशन होतं आणि इथली झाडं पण कुणीतरी तोडली आहेत. त्यामुळे सध्या इथेच असतो.

तुम्हाला म्हणुन सांगतो…. इथे आणले गेलेले ८०% लोक हे १५ SMS केलेले आणि उरलेले २०% माझ्यासारखे १० SMS केलेले आहेत. पण एकही माणुस असा नव्हता की ज्यानं तो SMS डीलीट केलाय. त्यामुळे कधिही जर तुम्हाला असा काही SMS आला तर…
एक- तो SMS लगेच डीलीट करा आणि दोन- त्या SMS पाठवणा-या माणसाला शोधुन त्याचा निःपात करा. आणि जर तुम्हाला माझं न ऐकता तो SMS पुढं पाठवायचा असेल तर…

तर… घाणघापुरमध्ये तुमचं स्वागत आहे !!

धुंद रवी.