लघुपटांच्या जगात….

 

 

 

 

 

समजा तुमचं व्यक्तिमत्व दुभंगलं….

 

“सृष्टीच्या आरंभापूर्वी सर्वकाही निर्ग़ुण, निरामय आणि निर्विकार शुन्यच होते. या शुन्यातून ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्मिती केली. पण जे ब्रह्मदेवालाही निर्माण करायला जमलं नाही ते माणसानी करुन दाखवलं. त्यानी गुंता निर्माण करुन पुन्हा सगळ्याचं शून्य करुन दाखवलं. आणि ब्रह्मासारखं एकदाच निर्मिती करुन तो गप्प बसला नाही. तो गुंता करतच गेला. कारण त्याला सुटसुटीत जगण्यापेक्षा गुंत्यातच जास्त मोकळं वाटतं. नशीबातल्या गुंत्यात गुरफटला असुनही तो समाधानी नसतोच. मग दुस-याच्या गुंत्यात गुंतून तो गुंता वाढवायला पाहतो. ज्याला हे शक्य नसतं तो अंतर्मनातले गुंते शोधत बसतो आणि मग सोडवत बसतो… का वाढवत बसतो, कोणास ठाऊक? “

……..असं आमच्या चाळीतल्या ढमढेरेवहिनी एकदा म्हणाल्या होत्या.

कोण कुठल्या चाळीतल्या ढमढेरेवहिनी काय म्हणाल्या याचा आमच्याशी काय संबंध? असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ‘ढमढेरे वहिनी’ या नावावर जाऊ नका. त्यांच नाव ढमढेरे असण्याऐवजी ‘ब्रह्मवादिनी गार्गी’ असतं तर लोकांनी त्यांचं तत्वज्ञान डोक्यावर घेतलं असतं. चूक लोकांची नाही म्हणा. जर सॉक्रेटेसचं पुर्ण नाव ‘श्री. सॉक्रेटेस बाजीराव ढमढेरे’ असतं तर लोकांनी अनुल्लेखानी मारण्याइतकंही महत्व दिलं नसतं. पण खरं सांगायचं तर ‘कोणी म्हणलय’ हे महत्वाचं नसतंच, तर ‘काय म्हणलय’ हे असतं. आणि म्हणुन म्हणतो की ढमढेरे वहिनी म्हणतात ते खरं आहे…. ‘माणुस गुंता सोडून जगु शकत नाही, सोडवुन तर नाहीच नाही.’

आमच्या चाळीत तर एकसेएक गुंतेवाईक आहेत. कागदोपत्री भोपळेचं नाव असलेल्या खोलीत, आगलावेंच्या भाच्याचे पोटभाडेकरु सदाभाऊ राहतात; कारण सदाभाऊंच्या खोलीत मूळभाडेकरु असलेल्या भाच्याचे आगलावेमामा राहतात आणि भोपळे आगलावेंच्या खोलीत पोटभाडेकरु आहे. पण मी ह्या असल्या किरकोळ गुंत्यांविषयी नाही तर ह्यापेक्षा भयानक क्लिष्ट गुंत्यांविषयी बोलत होतो.

म्हणजे काय तर… एक दिवस अचानक वरच्या मजल्यावरुन कुत्र्याच्या भुंकण्याचे आवाज यायला लागले, पण प्रत्यक्षात ते कुत्र कोणाला कधी दिसतंच नव्हतं. मग लोकांनी त्या अदृष्य कुत्र्यावर सदृश्य पाळत ठेऊन त्याला भुंकताना रंगेतोंड पकडलं. रंगेतोंड असं म्हणण्याचं कारण की त्या मजल्यावर राहणारा बोंबले कुत्र्यासारखा मेकअप करुन (म्हणजे ‘कुत्रा करतो तसा मेकअप’ असं नाही, तर ‘मेकअप केल्यावर माणुस कुत्रा दिसेल’ असं..) भुंकताना सापडला. तो असं का करतोय? असं त्याला विचारलं तर म्हणाला की “मंग… मी कुत्रा आहे. भुंकू नको तर काय पचापचा थुंकू..??”

मग लोकांनी त्याच्या गळ्यात पट्टा बांधुन त्याला मनोविकारतज्ञाकडे नेला. त्या तज्ञानी बोंबल्याला विचारलं की कधी पासुन हे असं वाटतय तर म्हणाला, “अगदी पिल्लु असल्यापासुन.”

तुम्हाला गंमत वाटत असेल, पण आमचं काय झालं असेल विचार करा. बरं आता ते पिल्लुसुद्धा राहिलं नव्हतं. चांगलं धिप्पाड कुत्र झालं होतं. आम्ही तर हातात काठी घेऊनच फिरत होतो थोडे दिवस.

पण सगळीकडे हा इलाज चालत नाही. सगळेच गुंते काठीनी नाही सुटत, काही गाठीशी राहतातच. परवाच्या प्रसंगानंतर तर पटलंच आहे मला.

त्याचं काय झालं, परवा बॅंकेत जायची गरज पडली. मी स्वतःहुन पैसे न काढताच माझ्या खात्यातुन (जे काही उरले होते त्यातुनही) पैसे वजा झालेले. बॅंकेच्या ह्या अक्षम्य गुन्ह्याला माफ करणं अशक्य होतं. मी घरातुनच भांडणाच्या मुद्द्यांची उजळणी करुन गेलो. पण भांडायला आलेल्या ग्राहकांचा तपोभंग करायला एक मेनकाच बॅंकेनी तिथे स्वागतिका म्हणुन बसवली होती. “मी आपली काही मदत करु शकते का ?” ह्या तिच्या अत्यंत गोड आणि लाघवी स्वरानंतर माझं तर विश्वच बदललं आणि माझ्यातल्या पराभुत विश्वामित्रानी तिला माझी किरकोळ तक्रार सांगितली. यावर ती म्हणाली,

“मी माफी मागते तुमची. तुम्हाला त्रास देण्याचा बॅंकेचा कोणताही हेतू नाही. तुम्हाला झालेल्या तसदीबद्दल बॅंक दिलगीर आहे. आणि दुसरं असं की…. हरामखोरा…. होतस खंय? खंय नायसो झाल्ललं? आणि असां फसवन जाणा बरोबर न्हंय! काय गावलां तुका आमची अशी फसगत करून? आं!!! जलपरी-जलपरी म्हणान माझ्या पाठसुन लाळ घोटेपणा करित हिंडलस, आणी शेवटाक माझ्याच बाप्पाशीचां बल्यांव घेवन नायसो झालंस… तुका काय लाज, लज्जा… आसा काय नाय? ह्यी पोटात जी काय देणगी देवन गेलस, त्येचो हिशेब कोण देतलो?… तू काय तुझो बापूस?… सांग माका.. तुका काय वाटलां, काष्टी सोडुन प्याण्ट घालन हिंडलस तर कोण वळखुचो नाय?… तुझ्या अख्ख्या खानदानाक पुरान र्‍हवतलंय ह्यां लक्षात ठेव…”

तिनी जागेवरच माझं मालवणी वस्त्रहरण करुन टाकलं. सगळे लोक माझ्याकडे मीच तिचा खलनायक प्रियकर असल्यासारखे बघत होते. तिच्या असं ह्या बोंबलण्यामुळे माझ्या तर पोटातर गोळा आला होता… पण माझ्या पासबुकाशपथ सांगतो की तिच्या पोटचा गोळा माझा नाही…. ह्या गोळा प्रकरणामुळे सगळे लोक माझ्याभोवती गोळा झाले…. मला वाटलं की बॅंकेचा गार्ड आता मला तोफेचा गोळाच घालणार. पण असं काहीच झालं नाही. उलट मला मॅनेजर साहेबांचा केबीनमधे नेऊन मला बर्फाचा गोळा देण्यात आला. तिथे कळालं की ह्या मेनकेच्या व्यक्तिमत्वात दुभंग आहे. तिला स्प्लीट पर्सनॅलिटीचा काय तो त्रास आहे. म्हणजे आपण कोणीतरी वेगळीच व्यक्ती आहोत असं वाटण्याचा, गुंतागुंतीचा मानसिक आजार. त्यामुळेच तिची अशी अचानक ‘प्रियकर सोडुन गेलेली मालवणी कोळीण’ होते म्हणे.

त्यामानानी आमच्या बोंबल्याचं बरं होतं मग. बिस्कीटं दिली किंवा काठी आपटली की तो शांत. मानसशास्त्र तर म्हणतं की सगळ्याच माणसात हे असं व्यक्तिमत्वात दुभंग सुप्त स्वरुपात असतात. काही जणांचे बाहेर येतात, काहींचे येत नाहीत. असणार… बरोबर असणार त्या मानसतज्ञांचं….. !

तुम्ही कुणाला सांगणार नसाल तर सांगतो……

माझ्या बायकोला पण आहे हा त्रास. कधीकधी मला तिच्यातल्या ह्या दुभंगाची खुप भिती वाटते हो. एकदा रात्री दोन वाजता एकदम ओरडत उठली की…. “घ्या सुया, दाभन, काळी पोत, पिवळी पोत, पायपुसनं, खरबुजे मनी, फनी, कंगवा, चैन, बिचवी, कुंकूडबी,स्नो पावडर, मनगट्या, गजगा, पारामनी, दृष्टीमनी, बिब्बे……. “

सकाळ होईपर्यंत भीमरुपी म्हणत दरवाज्यात घाबरुन बसलो होतो मी. म्हंटलं अजुन काही विकायला काढलं हिनी तर पळुन जायचं…. पण सकाळी नॉर्मल वाटत होती. म्हणाली, “अहो  स्वप्न पडलं असेल.” (हे असलं स्वप्न? आपण कुठल्यातरी भटक्या वस्तीमधली खरबुजे मनी, स्नो पावडर, मनगट्या, गजगा विकणारी स्त्री आहोत, हे स्वप्न कसं पडेल कोणाला? आणि ह्या वस्तु नक्की काय आहेत, हे पण माहित नाहीये मला. मी तुम्हाला सांगतो… स्वप्न नाही… स्वप्न नाही…. व्यक्तिमत्व दुभंगच असणार हे !! चाळीतली लोकं मला तुमच्याकडे डिस्को मनी किंवा महेबुबा रिंग आहेत का हो? असं विचारत होती…. हलकट माणसं !

मला त्यांचा राग नाही हो, पण कधीतरी हे सगळं मला बायकोकडून विकत घ्यायला लागुन महागात जाणार आहे, याचं दुःख जास्त आहे….)

मी तर एकदम निराश झालोय. नाही बायकोच्या दुभंगासाठी नाही, तर माझ्याच जगासाठी. हट्‍ऽऽऽऽ काय एकसुरी जगतोय मी..! मी, माझ्यामध्ये मी, माझ्याबरोबर मीच… फुस्स! लोक कशी मस्तमस्त दोनदोन… तीनतीन व्यक्तिमत्व घेऊन जगतात. मी ठरवल की आपण पण दुभंगायचं. पण ‘काय व्हावं?’ काही सुचत नव्हतं. चाळीतल्या गोगटे आज्जींनी माझ्या      चेह-यावरची चिंता बरोबर हेरली. त्यांनी नेहमीच्या सवयीने खोदून खोदून विचारलं म्हणुन त्यांना डोक्यातला गुंता सांगितला तर म्हणाल्या, “अवघड आहे, पण जमलं तर माणुस होऊन बघा…!”  

ह्या आमच्या नेहमीच्या गोगटे आज्जी नसव्यात. त्यांच्यातलं एखाद्या ‘कुजगट बाईचं’ दुभंग असु शकेल. कारण गोगटे नामक महाकुजगट आजी इतका ‘साधासोपा आणि सुसह्य’ टोमणा मारुच शकत नाहीत. असो.

संध्याकाळी ढमढेरेवहिनी भेटल्या. विचार करुन तोंड उघडणारी जी काही थोडीफार माणसं चाळीत आहेत, त्यातल्याच एक. त्यांना ह्या दुभंगाबद्दल विचारलं. त्या ब-याच वेळ स्वप्नातच निघुन गेल्या. मग विचार करता करता त्या इतक्या उत्तेजीत झाल्या की आनंदातिशयानी त्यांना बोलताच येईना. असुरी आनंदाचे कढ आवरल्यानंतर म्हणाल्या, “किती छान कल्पना आहे. मला आवडेल असं दुभंग घेऊन जगायला. जे माझ्यातली ‘ही’ करु शकत नाहीये ते माझ्यातली ‘ती’ करु शकेल. आणि महत्वाचं हे की ‘माझ्यातला हीला’ त्याची कल्पनाच नसेल, त्यामुळे काही चूकीचं करताना अपराधीपणाची भावनाच नसेल. अगदी निश्चिंत मनानी सूड उगवता येईल.”

“सूड..??? तुम्हाला काय व्हायचय नक्की?”

“मला जर स्प्लीट पर्सनॅलिटी मिळणार असेल तर मी माझ्या सासुची सासु होईन….!” असं म्हणुन ढमढेरेवहिनी चक्क उड्या मारत मारत घरी निघुन गेल्या.

ढमढेरे वहिनींचं तर ठरलय. पण तुमचं काय…?

तुम्ही पण कधी कुठल्या गुंत्यात हरवुन जाता का हो? तुमच्यातलीच दाबलेली व्यक्तीरेखा कधीकधी बाहेर येते का हो? असं काही आपल्या जगात घडत असेल याची काही कुणकुण तुम्हाला घरच्यांकडून लागलीये का हो? आणि मग जर असलंच तुमच्या व्यक्तिमत्वात दुभंग, असलीच तुम्हाला स्प्लीट पर्सनॅलिटी तर काय जगायला आवडेल तुम्हाला??

मास्तर व्हाल आणि जगाला शिकवाल ?

का क्रांतीकारक होऊन स्वातंत्र्य टिकवाल ?

मोठे शास्त्रज्ञ व्हाल…? किंवा बॅंकेतला कारकुन ?

कोणी आदर्श व्यक्ती…. की असाल कारटून ?

कोण व्हाल ? काय जगाल ?

विचार करा. बघा…. काही सापडतय का उत्तर ते. माझा विचार अजुन चालुच आहे आणि तो पक्का झाला की कळवेनच….!

धुंद रवी

समजा संकटाच्या क्षणी तुम्हाला तीनच वस्तू नेता आल्या…

“…..फेकुन दे हे कच-यात !! “

छातीत धडकी भरावी असा वीजेचा कडकडाट होतो ना कधीकधी अगदी तस्साच आतल्या खोलीतुन बायकोचा आवाज आला. मी माझ्या एका कोकणस्थ मित्राशी बाहेरच्या खोलीत बोलत बसलो होतो. शास्त्र म्हणतं की ध्वनीच्या वेगापेक्षा प्रकाशाचा वेग जास्त असतो. ह्यालाच अनुसरुन बायकोचा ‘फेकुन दे हे कच-यात’ हा ध्वनी पोहचण्याआधिच एक लाल प्रकाश वेगानी माझ्याकडे येताना मला दिसला. सिर सलामत तो पगडी पचास हे लग्नानंतर शिकल्यामुळे, ती लाल रंगाचा प्रकाश फेकणारी वस्तू बघुन मी सिर झुकवलं.

गंमत म्हणजे ती वस्तू म्हणजे एक पगडीच होती, पण नेहमीची नाही तर वाळ्याची पगडी, ज्याच्या एका कडेला एक छोटा पंखा होता आणि डावीकडुन एक लाल रंगाचा प्रकाश टाकणारी बॅटरी बसवली होती. उन्हाळ्यात कधी प्रवासाला गेलो तर डोकं थंड रहावं म्हणुन वाळा,       वा-यासाठी पंखा आणि प्रवासात रात्री वाचन करता यावं म्हणुन बॅटरी अश्या त्यात सोई होत्या. पण उत्साहानी विकत घेऊनही गेल्या १७३ वर्षात मी ती एकदाही न वापरल्यानी ती घरातच पडली होती आणि त्याचा शेवट आज “…..फेकुन दे हे कच-यात !!” ह्या आदेशानी झाला. 

ती पगडी बायकोच्या वजनदार आदेशासकट माझ्या त्या मित्राच्या डोक्यात बसली. एकतर त्या पगडीचा वाळा कडक झालेला, त्यात पंखा, त्यात बॅटरी… असं सगळं त्या बिचा-या कोकणस्थ मित्राच्या डोक्यात बसलं. मी असं सारखं कोकणस्थ कोकणस्थ म्हणण्याचं कारण की कोकणस्थ असल्यामुळे त्याला हे सगळं नविन होतं. त्याला फक्त कुचकट आणि तुसडं वागुन शब्दबंबाळ करण्याची सवय… हे असं रक्तबंबाळ त्याला जरा अवघड गेलं.. त्यात त्याला पसा-याची सवय नव्हती. माझी बायको घरातल्या पसा-यात काहितरी महत्वाची वस्तू शोधण्याच्या उदात्त हेतुनी पसारा अजुनच वाढवत होती. हे असं बायकोनी घर आवरायला काढलं की माझी मोठी पंचाईत होती. वस्तु सापडणं कठिण होऊन जातं.

आमच्या घरातला तो विश्वाचा पसारा पाहुन मित्रच जास्त लाजुन गेला होता. म्हणाला….. “मी पण हल्ली तुझ्यासारखा देशस्थ होऊ घातलोय.”

का रे? असं का वाटलं तुला?

अरे परवा मला माझ्या कुडत्याची बटणंच सापडत नव्हती.

बास, एवढच? मग तु कसला रे देशस्थ? ज्यादिवशी तुला आख्खा कुडताच सापडणार नाही तेंव्हा म्हण स्वतःला देशस्थ….!!

वास्तविक हा इतकाही वाईट विनोद नव्हता आणि बायको नेमकं माझा कुठलातरी कुडता शोधतीये हे देवाशप्पथ मला माहिती नव्हतं. पण गैरसमज करुन घेण्याचा बायकोचा जन्मसिद्ध हक्क असल्यामुळे तिच्या कडुन आणखिन एक वाक्य प्रकाशवेगा पेक्षा जास्त वेगानी आलं…..

“असं होतं तर करायचं होतं एखाद्या घा-यागो-या कोकीशी लग्न…. मग तुम्हाला कळालं असतं की……..

मला काही कळो ना कळो त्या कोक्याला काय ते कळाल्यानी त्यानी घर सोडलं….! अर्थात बायकोनी विषय सोडला नव्हता. मी साठवलेल्या सुमारे १३९ गोष्टी तिनी आणुन माझ्या पायावर ओतल्या आणि म्हणाली की “हे असलं काही आणुन घरात कोंबलं ना की नाहीच मिळणार कुडता…. संध्याकाळ पर्यंत विचार करा की तुम्हाला ह्यातलं काय काय हवय…. जमल्यास फेकुन द्या सगळं…. आणि सगळं फेकुन देणं शक्य नसेल तर जास्तीत जास्त तीन वस्तु ठेवायची परवानगी देते तुम्हाला…. म्हणजे उद्या आणीबाणीच्या परिस्थितीत जर दोन-तीनच वस्तु न्यायच्या झाल्या तर कोणत्या वस्तु ठेवाल.. तेवढ्याच ठेवा…”

मी विचार करायला लागलो. उद्या खरच काही संकट आलं आणि घरातल्या तीनच वस्तु घेऊन निघायचं झालं तर काय नेईन मी? कितीही नको नको म्हंटलं तरी वीस-बावीसच्या खाली यादीच निघेना. वस्तु निवडताना माझी.. ‘देशस्थाची’.. तारांबळच उडाली….! विचार करत करत कधी घराबाहेर पडलो कळालच नाही. चौकातल्या चहाच्या टपरीवर चहा मारत बसलो.

थोड्यावेळानी माझ्याशेजारी अंमळ वेडा दिसणारा माणसासारखा एक प्राणी येऊन बसला. त्याच्या अवतारावरुन हे कोणीही सांगितलं असतं की तो एकतर अविचलीत शास्त्रज्ञ असणार किंवा अविवाहीत चित्रकार तरी.

तो चित्रकारच निघाला, कारण त्या टपरीबाहेर लोकांनी पचापच काढलेल्या गुटख्याच्या रांगोळ्यांमधुन वेगवेगळे आकार शोधत होता आणि त्यातल्या शेड्स बघुन फार खुष होत होता. मी त्याच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरवात केली. एका चित्रकाराच्या घरी चित्रं सोडून काय असणार हे ठाऊक असुनही त्याला विचारलं की तीनच वस्तू घेऊन पळायची वेळ आली तर काय निवडाल. त्याचं उत्तर मोठं अजीब होतं. म्हणाला, “अर्धवट काढलेली दोन चित्रं, एक रिकामी कलरट्युब आणि एक बटवा.”

अर्थात मला त्याचं उत्तर मॉडर्नआर्ट इतकंच ‘सोपं’ वाटलं…. कारण ते डोक्यावरुन चांगलं फूटभर उंचीवरुन गेलं. मग त्याला जरा रंगवुन सांगा म्हणालो, तर म्हणाला, “काढून झालेली चित्र नेण्यात काय हशील आहे? जे मी आधीच उपभोगलय, जे पूर्णत्वाला गेलय ते किती काळ कवटाळून बसणार. त्यापेक्षा अपूर्णता जपावी माणसानी. निदान पूर्णत्वाची ओढ त्यातला माणुस जिवंत ठेवते. आणि ती रिकामी कलरट्युब यासाठी की एकदा दोन दिवस काही खायलाच मिळालं नाही मला. पैसेच नव्हते. ते दोन दिवस भुकेल्या पोटी एक चित्र रंगवत बसलो होतो. मग रंगही संपले. तिस-या दिवशी थोडे पैसे मिळाले तेंव्हा आधी एक कलरट्युब आणली, चित्र पूर्ण केलं आणि मगच जेवलो. ती रिकामी कलरट्युब पाहिली की एखादं अॅवॉर्ड मिळाल्याचा आनंद होतो मला. माझ्यातला कलाकार जिवंत राहतो त्यानी. आणि बटव्याचं म्हणाल तर त्यात सोन्याची नाणी आहेत.”

“सोन्याची नाणी ?”      

“हो… कलाकारानी दळिद्री अवस्थेत आणि भणंग राहवं असा काही नियम आहे का? मी पूर्वी गरीब होतो, पण आता माझ्या चित्रांची किंमत हजारात असते. पण मी पूर्वी जगायचे तसाच जगतो अजुनही. त्या पैशाची फार ओढ नाही मला, पण जर पोटाची काळजी करायला लागणार नसेल तर मनाचे चोचले पुरवता येतात. या पैशातून मी हजारो कॅनव्हास, रंगांच्या बाटल्या आणुन हवी तेवढी चित्र काढु शकतो… आणि ते ही भरल्या पोटी. कला जपता येणार असेल तर एका कलाकाराला अजुन काय हवं?”

पोटाच्यामागे धावता धावता मी किती लांब आलोय याची आज पुन्हा जाणिव झाली,

कारण माझ्या त्या वीस-बावीस गोष्टींच्या यादीत माझं हार्मिनियम नव्हतंच. ‘फार वजन असलेल्या गोष्टी घ्यायला नको’ म्हणुन न घेतलेल्या त्या हार्मोनियमच्या आठवणींच ओझं माझ्या श्वासांना पेलवेनाच. मी घरी परतलो आणि गालावरुन मोरपिस फिरवावं तसं माझ्या हार्मोनियमवरुन हात फिरवायला लागलो. “इतक्या नाजुकपणे हात फिरवाल तर त्यावर साठलेल्या धूळीवरची धूळ पण झटकली जाणार नाही.” या बायकोच्या वाक्यानी भानावर आलो. त्या पेटीवरची (का मनावरची, कोणास ठाऊक!) धूळ झटकली आणि त्या तीन वस्तूंपैकी एक ‘हार्मोनियम’ न्यायचं हे ठरवुन टाकलं.

आमच्या ढमढेरेवहिनी म्हणजे अगदी जीव ओतुन संसार उभा केलेली बाई. त्यांना विचारलं तर, दणका घातल्यावर कधीकधी चालु होणारा आणि ढमढे-यांना कुठल्यातरी स्कीममध्ये चकटफू मिळालेला कृष्णधवल टिव्ही, माहेरुन आणलेला आरसा आणि नव-याशी भांडुन घेतलेली पैठणी ह्या वस्तु घेऊन वहिनी पळतील ह्याची खात्रीच होती मला. तरी विचारलंच मी ढमढेरे वहिनींनी तर एकदम भावनाकुलच झाल्या. थोडा वेळ बोलल्याच नाहीत आणि बोलल्या तेंव्हा माझ्यापेक्षा स्वतःशीच बोलल्या. म्हणाल्या,

“देवघरातला बाळकृष्ण, माझ्या आजीची एक जुनाट फाटलेली पण उबदार नववारी साडी आणि मी पहिल्या बाळंतपणाला माहेरी गेलेले तेंव्हा मिस्टर ढमढे-यांनी मला लिहलेलं पहिलं आणि शेवटचं पत्र !”

मी पुन्हा एकदा निःशब्द घरी परतलो. आपण किती चुकतो ना माणसांना ओळखायला…! नुसते हिशोब करुन आपण त्यातलं मुल्यच हरवुन बसतो आणि मग खुप मोठी किंमत चुकवतो. ढमढेरे वहिनी इतक्या श्रीमंत असतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं…

ढमढेरे वहिनींचं तर ठरलय. पण तुमचं काय?

घरात तुम्ही काय काय बिनकामाचं साठवुन ठेवलय ते कधी पाहयलय का हो तुम्ही? घरातल्या अनावश्यक वस्तू फेकल्या तर तुम्ही राहता ते घर बरंच मोठं आहे, असं लक्षात आलय का तुमच्या?

ह्या वस्तूंमध्ये तुमच्या कित्येक महत्वाच्या वस्तू हरवुन गेल्यात हे कळतय का तुम्हाला? देव न करो, पण समजा एखाद्या संकटाच्या क्षणी तुम्हाला तुमच्या घरातल्या तीनच वस्तु बाहेर न्यायच्या झाल्या तर कुठल्या कुठल्या न्याल?

 

क्रेडीट कार्ड्स

का ग्रिटिंग कार्ड्स ?

महत्वाची कागदपत्र

का मैत्रीणीची प्रेमपत्र ?  

पैशाचं पाकीट…?

का आठवणीत भिजलेलं आजोबांचं जाकीट ?

कशासाठी धावाल ? काय वाचवाल ? 

विचार करा… बघा…. काही सापडतय का उत्तर ते. माझा विचार अजुन चालुच आहे आणि तो पक्का झाला की कळवेनच….!

धुंद रवी

 

समजा तुम्ही बहिरे झालात…..

बाहेर काहिही पाहिलं तर ते घरी येऊन लगेच (आणि कधीच) मागायचं नाही, अशी सक्त ताकीद दिलीये मी मुलीला….

….आणि बायकोलाही.

अर्थात त्या दोघीही माझ्या आरडा-ओरडीला भीक घालत नाहीत हि गोष्ट वेगळी. मुलीचं ठीक आहे हो. मागुन मागुन काय मागेल? छोटासा खेळ नाहीतर थोडासा वेळ… देता येतो. किंवा जमणार नाही असं सांगुन विषय संपवुन टाकता येतो. पण बायको असं काही मागते की खिशाला परवडत असतं, पण मनाला नाही, त्यामुळे घेता येत नाही… आणि अवघड हे की न घेण्यासाठी काही कारण देता येत नाही.

परवा कुठुन तरी हळदी-कुंकवावरुन आली आणि म्हणाली की ह्यावेळेस आपण संक्रांतीला गंगावन किंवा कच-याची टोपली लुटुयात. इथं महागाईत मी इतका लुटलो गेलोय की डोक्यावर एकही केस उरला नाहीये आणि बायकोला गंगावनं लुटायची आहेत. आणि कच-याच्या टोपल्या घेऊन मी पैसे असे कच-यात नक्कीच टाकणार नव्हतो म्हणुन मी तिच्या कल्पनांनाच कच-याची टोपली दाखवली. तर म्हणाली की आपण शॉवर बसवुयात. मी बेशुद्ध पडलो. मीच काय कोणीही नवरा पडेल जर संक्रांतीला लुटण्यासाठी शॉवर आणुन चाळीतल्या प्रत्येक घरी जाऊन ते बसवायला लागले.

जरा भानावर आल्यावर बायको म्हणाली की “देव अक्कल वाटत होता तेंव्हा काय चाळणी घेऊन गेला होतात का? नळाची प्लॅस्टीकची तोटी लुटायची ऐपत नाही आपली, शॉवर कसले लुटताय? आपल्या बाथरुमसाठीच हवाय शॉवर मला.”

“बाथरुम ???????????????????” (हि इतकी प्रश्नचिन्ह यासाठी की आमच्या खोलीलाही जिथं रुम म्हणणं म्हणजे लोकरीच्या गुंड्याला आख्खा मेंढा म्हणण्यासारखं होतं, तिथं मोरीला बाथ-रुम म्हणणं म्हणजे हडाडलेल्या कुत्र्याला गेंडा म्हणण्यासारखं होतं…. असो.)

पहिल्या दोन गोष्टींना मी ह्याआधिच कच-याची टोपली दाखवली असल्यामुळे आता ते शक्य नव्हतं म्हणुन मी शॉवरच्या मागणीला चाळणी दाखवली. चाळणी दाखवली म्हणजे शॉवरच्या ऐवजी मोरीत चाळणी बांधली आणि त्यात पाईप सोडला.

मला मान्य आहे की माझी ही शॉवरची कल्पना जरा जास्तच पावटी होती पण म्हणुन बायकोनी ती चाळणी माझ्या डोक्यावर धरणं चुक होतं. पण एकदा तुम्ही लग्न करण्याची चुक केलीत की मग पुढे आयुष्यभर ‘चुक आणि बरोबर’ ह्या शब्दांना फारसा अर्थ नसतोच. सबब मी बायकोची चुक मुकपणे डोक्यावर घेतली आणि माझ्या देशी-शॉवरच्या शोधाला देश मुकला.

डोकं पुसत बाहेर आलो तर बायकोला बहुतेक फेफरं का काय ते येत होतं. म्हणजे ती तशी धडधाकट उभी होती, पण तिच्या भयानक चेह-याचा आकार कसाही बदलत होता…. भुवया वर-खाली, उभ्या आडव्या, वाकड्या तिकड्या होत होत्या…. गाल फुगत होते, फुटत होते, फुसफुसत होते….. ओठ आणि नाक जागवर न राहता वेगवेगळ्या रेषेत प्रवास करत होते…. डोळे बटाट्यात्यातुन आग ओकत होते, कचाट्यातुन राग ओकत होते….. निःशब्द राग !!

….आणि इथंच काहितरी चुकतय असं मला जाणवलं, कारण ‘बायको आणि निःशब्द’ हे गणित काही जुळेना. आणि मग माझ्या लक्षात आलं की मगाशी आपल्या डोक्यावर पडलेलं पाणी कानातही गेलय आणि आपल्याला काहीच ऐकु येत नाहीये. तुम्हाला सांगतो, मी बहिरा झालोय याचा काय आनंद झाला मला ! बायको एक हात कमरेवर ठेऊन आणि दुस-या हातातलं लाटणं हवेत फिरवुन शब्दांचे भाले मला फेकुन मारत होती. पण माझ्या कर्णबधिर कवच-कुंडलांमुळे मी अपराजीत योद्धा असल्यासारखं तिच्यासमोर उभा राहिलो. तिनी लाटणं फेकुन मारलं. मी स्मितहास्य केलं. संतापातिरेकानी अंगात आल्यासारखं तिचं सगळं अंग थरथरायला लागलं… कुठली तरी आदिवासी बाई त्यांचं पारंपारीक झुलु लोकनृत्य करतीये असंच मला वाटायला लागलं आणि त्यात हा नाच ‘मुकपट’ असल्यामुळे अजुनच मजा यायला लागली. आता मी स्मितहास्याऐवजी दात बाहेर काढले. तिनी मला घराबाहेर काढलं.         

घराबाहेर आलो तर चाळीच्या व्हरांड्यात हिऽऽऽऽ गर्दी. माझ्यासाठी जरी हा सगळा मुकपट असला तरी चाळक-यांसाठी एक अद्भूत दृकश्राव्य नाट्यानुभव होता. बहुतेक कोणीतरी पाचकळ टिप्पणी पण केली असावी कारण सगळेच हसत होते. मी पण त्यांच्यात मिसळुन खो खो हसलो, तसे ते हिरमुसुनच गेले. आज एक गोष्ट हसत हसत शिकलो की आपल्या चेह-यावर अपमानाचं दुःख दिसलं नाही तर समोरच्यालाही दुखवण्याचं समाधान मिळत नाही. आपल्या इच्छेशिवाय आपल्याला कोणी दुखावु शकत नाही.

पुढे गेलो तर चाळीचे मालक भेटले. भेटले म्हणजे काय त्यांनी पाठलाग करुन पकडलं. आता मारल्या असतील त्यांनी खुप हाका मला. पण मला बहि-याला, काय ऐकु जाणार. ते अचानक हातवारे करुन काहितरी बोलायला लागले. त्यांचा आवेश पाहुन मला वाटलं की पुन्हा पारतंत्र्याचे दिवस आलेत आणि ते मला स्वातंत्र्य संग्रामात भाग घ्यायला सांगताहेत. थोड्यावेळानी ते मला लोकमान्य टिळकांसारखे दिसायला लागले. वाटलं ते म्हणताहेत की “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? राज्य चालवणे म्हणजे सूड उगवणे नव्हे… स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच.” त्यांचं बोलणं झालं आणि ते माझ्या उत्तराची वाट बघत थांबले.

मग मी पण म्हणालो की, “मी शेंगा खाल्ल्या नाहीत. मी टरफलं उचलणार नाही.” मालक निरुत्तर झाले. माझ्या कपाळाला हात लावुन ताप वगैरे आलाय का हे बघुन निघुन गेले.

(आता मला पामराला कसं कळणार की ते सत्याग्रहाविषयी नाही तर थकलेल्या घरभाड्याविषयी बोलत होते. असो…)

ऑफिसला जायला बसस्टॉपवर रांगेत उभं न राहता सगळ्यांच्या पुढे उभं राहिलो. का कोणास ठाऊक पण कोणीही काहिही बोललं नाही. बसमध्ये कंडक्टरला १००ची नोट दिली. त्यानी तोंडातल्या तोंडात श्लोक म्हणायला सुरवात केली म्हणुन मी सुद्धा हात जोडुन बसलो. गोंधळुन त्यानी तिकीट आणि चक्कचक्क शंभराचे सुट्टे दिले. बसमधुन उतरताना दोन-तीन लोकांच्या पायावर पाय पडला, तिघांना माझ्या हातातली पिशवी लागली, माझ्या धक्क्यानी एकजण दुस-याच बाईच्या अंगावर पडला आणि त्यांची चांगलीच जुंपली… पण का कोणास ठाऊक ह्याही वेळेस मला कोणीही काहिही बोललं नाही.  

ऑफिसमध्ये साहेब नेहमीसारखाच पिसाळला होता. मला केबीन मध्ये बोलवुन घेतलं आणि…. आणि बहुतेक ‘ख्याल’ किंवा ‘दादरा’ असा कुठला तरी राग आळवायला लागला. म्हणजे निदान त्याचा चेहरा तरी तसाच वाकडा वाकडा होत होता. मी त्या सुरांची मजा घेत मान डोलवत बसलो. मध्येच त्यानी मुठींनी टेबल वाजवायला सुरवात केली. मग स्वतःच्याच डोक्यावरचे केस ओढायला लागला. मी कौतुकाने पाहायला लागलो तसा खुर्चीवर उभा राहिला आणि तिथल्या तिथे दोन-तीन उड्या मारल्या. तो आवाज ऐकुन ऑफिसातले दोन सहकारी आले आणि मला उचलुन बाहेर घेऊन गेले. “अरे, किती मजा येत होती” असं म्हणालो तर दारुड्याला दंडाला धरतात तसं धरुन घरी सोडुन आले. साहेबांची ती मैफ़ल अधुरीच राहिली.

संपुर्ण दिवसात कशी शांतता, समाधान आणि आनंद भरुन राहिला होता. एका अलौकीक तृप्ततेचा अनुभव येत होता. पण संध्याकाळी माझी चिमुकली तिच्या शाळेत काय काय गंमत झाली ते खुप हसुन हसुन सांगत होती. काहिच समजेना तसं अस्वस्थ झालो. रात्री ‘बेला के फुल’ शिवाय झोपच येईना आणि मग हि शांतता खुप टोचायला लागली. बायकोशी गेल्या कित्येक जन्मात गप्पा मारल्या नाहीत असं वाटायला लागलं. आपण खरेच बहिरे झालो तर कसं जगु याची भिती वाटायला लागली. सकाळी बायकोच्या बडबडीनी उठलो आणि काय आनंद झाला म्हणुन सांगु?

तुम्ही बहि-या झालात तर काय ऐकु येत नाहीये याचं बरं वाटेल? काय चुकल्यासाचुकल्या सारखं वाटेल… आणि जगणं कसं असेल?” असं ढमढेरे वहिनींनी विचारलं तर म्हणाल्या की, “अशक्य आहे असं जगणं! यासाठी नाही की बाहेरचा आवाज येणार नाही, तर ह्यासाठी की आतला आवाज दाबता येणार नाही. बाहेरच्या आवाजात, गोंधळात ब-याचदा मनातला कोलाहल विरुन जातो. जर बाहेर स्मशान-शांतता असेल तर आतलं सगळं ऐकायला लागेल आणि मग आयुष्यात कधी शांतताच राहणार नाही. वेड लागेल मला….” 

कधी कधी ढमढेरे वाहिनी असं काही बोलतात की त्यांचा आवाज कानातून जातंच नाही..

ढमढेरे वहिनींचं तर ठरलय. पण तुमचं काय?

फुल वॉल्युमनी ढणाणणारं जग अचानक शांत झालं तर झेपेल का हो तुम्हाला ? कुठल्याही सबटायटलशिवायचा म्युट पिक्चर आवडेल का तुम्हाला ?

काही ऐकुच आलं नाही तर आयुष्यात चांगला फरक पडेल का वाईट ? समजा एका दिवसासाठी तुम्ही खरेच बहिरे झालात तर काय होईल हो…. ?

तृप्त, शांत, मस्त जगाल…?

का बेचैन, बेभान, अस्वस्थ व्हाल?

कर्कश्य आवाजांनी भरलेली, ती रोजची सकाळ मोकळी असेल,

का सुरांशिवाय संध्याकाळ म्हणजे केविलवाणी पोकळी असेल ?

वाटेल जगत रहावं असंच, स्वतःच्याच नादामध्ये

का मजा असेल त्या आरडाओरडीत… भांडणतंटा वादामध्ये ?

काय असेल? काय नसेल? काय कराल? कसं जगाल?

विचार करा… बघा…. काही सापडतय का उत्तर ते. माझा विचार अजुन चालुच आहे आणि तो पक्का झाला की कळवेनच….!

धुंद रवी

समजा तुमच्या हातात चुकीचं पान आलं… 

एखादी संध्याकाळ अशीही येते की आधिच हळवं असलेलं मन उदास होतं. आपल्याला उदास का वाटतय हेच जिथं कळत नसतं तिथे मनाची समजुत काय घालणार. अशा वेळेला गरज असते कोणीतरी समजावुन घेण्याची… समजावुन सांगण्याची…

असा त्रास झाला की चाळकरी समोरच्या राममंदिरात किर्तन ऐकायला जातात. मला तिथंही बरं वाटत नाही. कोरडं पुराण सांगणा-या महान किर्तनकारापेक्षा अनुभवानी ‘ओला’ झालेला एखादा दारुडा मला जास्त भावतो. म्हणुन मी चाळीतल्या वरच्या मजल्यावरच्या ‘फुसपांगें’ काकांकडे जातो. बरोब्बर पावणेनऊला ते ‘बसतात’ आणि सव्वानऊ नंतर त्यांच्यात एक श्रेष्ठ तत्वज्ञानी अवतरतो. मला अगदी लहाणपनापासुन ओळखतात आणि शुद्धीत असतील तर ती दाखवतात सुद्धा….  ‘ती’ म्हणजे ओळख.

परवाची संध्याकाळ अशीच काहीशी. त्या कातरवेळेतला उदासपणा हवेतून जगण्यात मिसळला आणि मग सव्वानऊची वाट पाहुन फुसपांगे काकांच्या घरी गेलो. थोडा वेळ इकडतिकडच्या गप्पा मारुन म्हणालो….

“काका, फार उदास वाटतय. म्हणजे काही झालय असं नाही. पण तरिही..”

“झालं कसं नाही? एकतर चुकीचं पान उचललंस आणि कळल्यावर टाकुनही दिलं नाहीस. मग हे होणारच ना….????”

….म्हणजे कालच्या माझ्या पानपट्टीवरच्या राड्याची बातमी सगळ्या चाळभर झाली म्हणायची.

तसं मी जेवणानंतर पान खात नाही, पण कधीकधी बायको इतकंच पौष्टीक जेवण बनवते की ते आधि चावणं आणि नंतर पचवणं अवघड होऊन जातं… बरं तिला काहिही म्हणालो तर “नाही आवडत माझा स्वैपाक तर मला कामावरुन काढुन टाका” असं म्हणते. तिला काही बोलण्यापेक्षा सरळ पानाच्या टपरीवर जातो. तिचे पदार्थ खिशात लपवले असतील तर ते बाहेर कुत्र्याला घालता येतात आणि जे खाल्लेत ते पानानी पचवायचा प्रयत्न करता येतो.

हल्ली मला बघुन गल्लीतली कुत्री पण पळुन जायला लागलीत.

काल रात्री तिनी ७-८ सात्वीक पालेभाज्या घालुन एक पौष्टीक ‘डाळ गंडोरी’ नावाचा पदार्थ केला होता. ‘इतक्या पालेभाज्या घातल्यामुळे तो बहुतेक वेळा तो गंडत असावा, म्हणुनच त्याला असं नाव पडलं असेल’ असा विनोद केला तर तो तिला पचला नाही. आणि मग तो ‘फक्त विनोद होता’ हे सिद्ध करण्यासाठी ती भाजी संपवावी लागली. मग रात्री पानाची टपरी.

माझ्याशेजारी आणखिन एक नवरा पानासाठी उभा होता. मग आपापली पानं घेऊन आम्ही निघालो. ते पान खाताना काहितरी चुकतय हे कळत होतं, चव काहितरी वेगळी लागत होती. पण मला वाटलं की बायकोनी केलेल्या नविन पदार्थाची चव तोंडावर रेंगाळतीये.

मी आजुनच जास्त चावुनचावुन ते पान खायला लागलो. डोळे जड झाले… डोकं गरगरायला लागलं आणि मग ह्या प्रकरणाचा उलगडा झाला. अदलाबदल झाल्यानी मी मसालापान खाण्याऐवजी १२०-३००वालं तंबाखुच पान खाण्यानी सदर प्रकरणाचा शेवट झाला होता.   

खरं सांगायचं झालं तर प्रकरणाचा शेवट नाही तर सुरवात पान खाण्यानी झाली. पुढं अजुन बरच काही झालं कारण पान आत गेलं आणि तंबाखुची कीक बसुन मनातलं बरच काही बाहेर आलं होतं.  सगळं काही सांगण्यासारखं नाही, पण जी निरागस स्तुतीसुमनं मी चाळीतल्या लोकांवर उधळली ती खालीलप्रमाणे –

  • चाळीमध्ये शोर है… चाळमालक चोर है ! मालकांच्या बैलालाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
  • हिम्मत असेल तर त्या दुस-या मजल्यावरच्या केसकर वकिलाच्या केसाला हात लावुन दाखवा… कसा लावणार? कारण केसकर तर टकला आहे. ह्यॅ… ह्यॅ… ह्यॅ…
  • वाघमारे रोज बायकोचा मार खातो….
  • भारत माता की जय….. वन्दे मातरम…. सायमन चले जाव, हम तुम्हारे साथ है !
  • माफ करा हं गोगटे आजी, मला वाटलं की मी माझ्याच घरी आलो… अरे बायको, तु आहेस होय? मला वाटलं मी त्या भांडकुदळ कजाग म्हातारीच्या घरी गेलो…. अरे गोगटे आजी.. तुम्हीच आहात होय… वाटलंच मला तुमच्या घरी आलोय….
  • नन्न ध्वनिगॆ निन्न ध्वनिय, सेरिदन्तॆ नम्म ध्वनिय

ना स्वरमु नी स्वरमु संगम्ममै, मन स्वरंगा अवतरिंचे .
तोमा मोरा स्वरेर मिलन… सृष्टि करे चालबोचतन
मिले सुर जो थारो म्हारो बणे आपणो सुर निरालो
मिले सूर मेरा तुम्हारा तो सुर्बने हमारा

(हे शेवटचं गाण मी फक्त म्हंटलं नाही तर सगळ्या भाषेत साभिनय सादरही केलं. माझ्या आणि त्यांच्या तारा न जुळल्यानी मधुर सुरांच्या धारा बरसल्या नाहीत. त्यात माझं नाचणं फारसं प्रेक्षणिय नसणार. पण म्हणुन अगदी आपल्या बायका-मुलांचे डोळे मिटुन त्यांना घरात आणि मला चाळीबाहेर हकलण्याची चाळीतल्या लोकांना काहीच गरज नव्हती. असो..!)

..आणि मी तंद्रीतून बाहेर आलो..

“जाऊ द्या हो फुसपांगे काका… पुन्हा त्या पानाच्या टपरीवर जायचं नाही असं ठरवलय मी.”

“कसली पानटपरी?”

“तुम्ही नाही का आत्ता म्हणालात की चुकीचं पान उचललंस आणि कळल्यावर टाकुनही दिलं नाही.”

“अरे ते खायचं पान नाही राजा. ते काय सवय होईपर्यंत जरा त्रास देतं आणि मग त्या त्रासाचीही सवय होते. आणि काही दिवसानी व्यसन.. ते सोड… मी खायच्या नाही खेळायच्या पानांविषयी बोलत होतो. पत्त्यांविषयी..! तु पत्त्यातलं चुकीचं पान उचललंस आणि कळल्यावर टाकुनही दिलं नाही. पत्ते माणसाशी खुप काही बोलत असतात, ते ऐकता आलं पाहिजे.”

(मग त्यांनी ‘चांगभलं’ म्हणुन ग्लास उचलला. त्या ग्लासातले दोन घोट आत गेले आणि ऑचाट तत्वज्ञान बाहेर आलं…. ऑचाट म्हणजे आपण चाट पडून तोंडाचा ऑ होतो असे.)

फुसपांगे काका पुढे म्हणाले, “आयुष्य हा एक रमीचा डाव असतो. तुम्ही हातात फक्त तेराच पानं धरु शकता. सुरवातीला तुमच्या हातात आलेले तेरा पत्ते काय आहेत, हे तुमच्या नशिबावर अवलंबुन असतं. मग जसजसा आयुष्याचा डाव पुढे जातो तसं तुम्हाला हातातले नको असलेले टाकुन देता येतात आणि खालुन नवे पत्ते घेता येतात. चांगलं पान सोडलस तर हरलास… आणि येईल ते प्रत्येक पान हातात ठेवायला गेलास तरी हरलास….. आयुष्याच्या डावात कुठले पत्ते ठेवायचे आणि कुठले टाकायचे हे कळालंच पाहिजे.

आता तुझंच बघ… तुझ्या लहानपणी, हार्मोनियम फिरणारी तुझी बोटं पाहिली की वाटायचं की तु मोठा कलाकार होणार. टाकलास ना ते पान? अरे, हातातली पान जरी नीट मांडली असतीस तरी डाव रंगला असता तुझा. पण तु चुकीची पानं उचललीस आणि हे तुला कळल्यावर ती चुकीची पान टाकलीही नाहीस. मग डाव भरकटल्यावर असा उदासपणा अधुनमधुन येणारच ना ??”

त्या किर्तनकार फुसपांगेबुवांच्या पाया पडुन आणखिनच जड अंतःकरणानी निघालो…. ढमढेरे वहिनी त्यांच्या शेजारीच राहतात. रेडिओचा आवाज बारीक करुन त्या आमचं बोलणं ऐकत होत्याच. त्यांना काहीच विचारलं नाही, पण मला काय विचारायचय हे त्यांना कळालं असावं. म्हणाल्या… “नका विचार करु एवढा… होतं असं कधीकधी. ठेवली जातात चुकीची पान हातात, पण अचानक जोकरही मिळतो आणि आत्तापर्यंत धरुन ठेवलेली सगळी विस्कळीत पानं छान जुळुन येतात. जी पानं गेली, ती गेली. ती विसरुन जा आणि पुढचा डाव मस्त आनंद घेत… गुणगुणत खेळा.”

हे म्हणता म्हणता त्यांनी रेडिओचा आवाज मोठा केला.

बरबादीयोंका सोग मनाना फुजुल था… बरबादीयोंका जश्‍न मनाता चला गया….

हर फिक्र को धुंए मे उडाता चला गया…

एकदम शांत झालो. डाव अजुनही आपल्या हातात आहे असं वाटलं आणि गुणगुणत घरी आलो.

ढमढेरे वहिनींचं तर ठरलय. पण तुमचं काय?

तुम्ही पण आयुष्यात कधी महत्वाची पानं टाकली आहेत का हो? तुम्ही पण सिक्वेन्ससाठी काही पानांची वाट बघताय का हो? तुम्ही पण चुकीची पान साठवुन ठेवली आहेत का हो? आणि इतकं वाट पाहुनही समजा तुमच्या हातात चुकीचं पान आलं तर काय करता… 

 

कामाचं नाही म्हणुन देता टाकुन ?

का लागेल उद्या म्हणुन ठेवता राखुन ?

टाकुन दिल्यावर ‘उगाच टाकलं’ म्हणुन कावत बसता ?

का येतील ते, जमतील तसे, पत्ते लावत बसता ?

काय करता राव? काय करता डाव?

कळवा….. अगदी बिनधास्त कळवा…. तुमच्या उत्तराची वाट बघतोय….

धुंद रवी

समजा सगळं जग ऐकतय…. काय सांगाल ?

 

मधे, पुण्यातल्या पापी लोकांनी आयोजीत केलेला एक परिसंवाद ऐकण्याचं पुण्य लाभलं. थांबा, उगाच गैरसमज करुन घेऊ नका. पापी म्हणजे PAPI (पेन्शनर्स सोसिएशन ऑफ पुणे, इंडिया) असं पापी. तर ह्या पाप्यांच्या ‘बापट वाडा, पुणे ३०’ शाखेनी ‘अक्कलदाढा आणि महामंजिष्ठादी काढा – काळाची गरज’ ह्या विषयावर एक परिसंवाद आयोजीत केलेला. आमच्या साहेबांचे सासरे त्या शाखेचे उपखजिनदार असल्यानी हा परिसंवाद ऐकता आला (खरं तर ऐकुन घ्यावा लागला.) आणि जगण्यासाठी माणसाला कशाची नितांत गरज आहे हे समजलं.

ते जे कोण वक्ते होते ते ‘आता जगबुडी होणार आहे आणि हे शेवटचं भाषणं आहे’ असं समजुन सुमारे दोनशे एक्कोणचाळीस मिनिटं बोलत राहिले. गेल्या सदोतीस वर्षांची मळमळ त्यांनी बाहेर काढून घेतली असावी. संवादाच्या शेवटी काढ्याची एक बाटली फुकट मिळाली. (त्याचे पैसे साहेबांनी नंतर पगारातून कापुन घेतले. असो….)

साहेब काहिही म्हणेल पण पुढच्या वेळेला काही ऐकुन घ्यायचं नाही असं ठरवुन घरी आलो. कंटाळून कट्ट्यावर बसलो होतो तर मागुन एक आवाज आला…. “तुमच्याकडे एक काम होतं…. थोडं खाजगी !” चाळीतल्या ७७ वर्षांच्या आगलावे आजोबांनी एकदम दबक्या आवाजात हि विनंती केली आणि येणा-या संकटाच्या चाहुलीनी मला सकाळच्या थंडीतही घाम फुटला. माझा पुर्वानुभव पाहता मी आगलाव्यांना आजपर्यंत १३ वेळा खाजगी किंवा सार्वजनीक कामात मदत केली होती आणि त्यातल्या ११ वेळा शिव्या किंवा मार खाता खाता राहिलोय. (२ वेळा प्रसंग आलेच नाहीत, असं नाही तर, मार खाता खाता न राहता तो खाल्लाच. असो.)

मागे एकदा १५ ऑगस्टला ते माझ्याकडे पोपटाचा एक पिंजरा घेऊन आले आणि म्हणाले की “तुमच्याकडे एक काम होतं…. थोडं सामाजिक ! पंडित नेहरुंसारखं आपण ह्या पक्षाला मुक्त करुन आजचा स्वातंत्र्यदिन साजरा करुयात.”

मी घरी जाऊन नेहरुशर्ट घालुन आलो आणि त्या पोपटाला मुक्त केलं.

नेहरुंच्या कोटावरच्या गुलाबाची शपथ घेऊन सांगतो की तो पोपट तळमजल्यावरच्या वाघमारेचा होता, हे मला माहित नव्हतं. माझ्या पोपट उडवण्यावर वाघमा-यानी चाळीत खुप गोंधळ घातला. इतका गोंधळ तर त्यानी त्याची बायको ‘ढेकणे’बरोबर पळुन गेली होती तेंव्हाही घातला नव्हता. (ढेकण्याचं चाळीबाहेर घड्याळ दुरस्त करण्याचं दुकान आहे आणि ‘वेळ कोणावर सांगुन येत नाही’, असं तो कोटी वेळा तरी म्हणाला असेल. पण त्यानी केलेली वेळेवरची कोटी त्या वेळी आम्हाला कळाली नव्हती. चालायचच.)

सांगायचं इतकंच की आगलाव्यांचं काम म्हणजे जीवावर बेतणारं असतं. “काय काम आहे, आजोबा?” मी विचारलं. “माझ्यासाठी मुलगी बघाल का?”

“पण आजोबा, तुम्हाला तर आधीच तीन मुली, दोन मुलं आणि चौदा नातवंड आहेत. मग अजुन एक नात कशाला दत्तक घेताय?”

“मुर्खासारखं बोलु नकात. मला लग्नासाठी मुलगी बघा असं म्हणतोय मी. ६५ ते ६८ वर्षांची चालेल. ६८ पेक्षा जास्त मोठी नको. अबोल हवी. बहिरी नको आणि……….”

आगलावे आजोबा ‘अखुडशिंगी बहुदुधी अपेक्षांची’ यादी वाचायला लागले. मला कळेना, एक तर ६८ वर्षांची मुलगी शोधायची कुठुन? आणि दुसरं म्हणजे आगलाव्यांच्या घरात ५२ वर्ष राहणा-या त्या ७२ वर्षाच्या मुलीला हे कळालं असतं तर तिनी मला खलबत्यात घालुन कुटलं असतं.

खरं तर कुठल्याही वयात माणुस लग्न का करतो हा प्रश्न असतोच, पण तरिही ह्या वयात आजोबांना लग्न का करायचय हे विचारलं तर म्हणाले की, “घरात कोणी ऐकतच नाही माझं. नवी नवरी घरात आली तर निदान २-३ वर्षं तरी कोणीतरी ऐकेल माझं.”

५२ वर्षांच्या सक्तमजुरीनंतरही आजोबांना तोच गुन्हा पुन्हा करायचा होता आणि त्यामागे कारण एकच………

‘…………….कोणीतरी आपलं ऐकुन घ्यावं!!’    

संध्याकाळी कामावरुन परत आलो तर चाळीच्या अंगणात हिऽऽऽऽऽऽ गर्दी. काहितरी समारंभ होता. आजोबांचा साखरपुडा तर नाही ना? असं वाटलं. पण कळालं की चोर पकडला म्हणुन आमच्या चाळीनी गुरख्याचा सत्कार ठेवला होता.

मला दोन गोष्टी समजल्या नाहीत.

१. आमच्या चाळीत चोरी करावी असं त्या चोराला का वाटले असावे? (इतके कल्पनादारिद्र्य ??)

२. शेळी इतकंच धष्टपुष्ट असलेल्या त्या गुरख्यानी तो रानरेड्यासारखा चोर कसा पकडला असावा? 

त्या गुरख्याला जरा कडेला घेउन विचारलं तर समजलं की त्यानी चोराला चोरी करताना फक्त पाहिलं होतं आणि तो आरडाओरडा करणारच होता पण त्या दोघांमध्ये एक तह झाला. गुरख्यानी चोराला चोरी करुन द्यायची आणि त्याबदल्यात चोरानी गुरख्याचं ऐकुन घ्यायचं. आधी चोराला हे सोप्पं वाटलं, पण दिवसा झोपणा-या आणि रात्रभर एकटाच फिरणा-या त्या गुरख्याला किती काय बोलायच होतं… नतद्रष्ट डासांपासुन ते अस्वच्छ संडासांपर्यंत तो गुरखा इतकं काही बोलला की शेवटी चोरानीच आरडाओरड केली आणि लोकांना गोळा करुन पोलीसचौकीत गेला.

हे चाळक-यांना कळालं असतं तर त्यांनी गुरख्याला चोरापेक्षा जास्त हाणला असता. पण हे माहित असुनही गुरख्यानी धोका पत्करला. आणि त्यामागे कारण एकच……..

‘…………….कोणीतरी आपलं ऐकुन घ्यावं!!’    

या सत्कार समारंभाच्या नावाखाली बराच वेळ चकाट्या पिटून घरी आलो. वातावरण तंग होतं कारण घरात शांतता होती. वादळानंतरची शांतता. अर्थात माझ्याच हातुन कुठलातरी अक्षम्य गुन्हा घडला असणार. पण काय तेच मला कळत नव्हतं… किंवा आठवत नव्हतं. मी बायकोनी तोफ डागण्याची वाट बघत बसलो, पण तीही धुरंधर एक शब्द बोलेल तर शपथ. मग तीच म्हणाली, “नाही आठवत आहे काही तर द्या ना सोडून. कशाला आठवण्याचे कष्ट घेताय? उगाच तुमच्या नाजुक मेंदूला परिश्रम. तसंही कधी लक्ष असतं का तुमचं माझ्याकडे? कधी ऐकुन घेता का माझं?” हे सगळं मी ऐकुन घेत होतो पण हा मुळ विषय नव्हताच, याच दुःख जास्त होतं.

दरम्यान लेकीनी मला छळायला सुरवात केली होती. थोडा वेळ बाहेर जाऊन खेळ हे तिला सतरा वेळा सांगुनही तिनी काही ऐकलं नाही. मग घातला एक धपाटा आणि हकलली बाहेर. या कलहाचा अंत गैरसमज खात्रीत बदलण्यानी झाला. बायकोला उगाचंच वाटतं की मी तिचं ऐकुन घेत नाही, माझी खंत होती की मुलगी माझं अगदीच ऐकत नाही आणि मुलीची तक्रार होती की आई ऐकुनच घेत नाही. विषय काहीही असु दे आशय एकच….

‘…………….कोणीतरी आपलं ऐकुन घ्यावं!!’    

दुस-या दिवशी ढमढेरे वहिनी भेटल्या. माझ्या डोक्यात येणारा प्रत्येक वेडेपणा त्या ईमानदारीत विनातक्रार ऐकुन घेतात. म्हणुन त्यांना म्हणालो की, “समोरच्यानी ऐकुन घ्यावं याची इतकी गरज का असते आपल्याला? असं काय मोठं सांगायचं असतं? समजा अगदी सगळं जग ऐकतय, तरी असं काय सांगणार आहोत आपण???”

वहिनी म्हणाल्या, “काय सांगायचय हे महत्वाचं नसतंच ब-याचदा. पण आपल्याकडे सांगायला ‘काहीतरी’ आहे आणि ते काहीतरी ऐकायला ‘कोणीतरी’ आहे, यासारखं दुसरं समाधान नसतं. ऐकायला कोणी नसेल तर जे घडलय त्याला काही अर्थच उरत नाही ना….

एखादं लहान मुल खेळताना जोरात पडतं. पण ते सांगायला आई आसपास नसेल तर बिचारं रडत सुद्धा नाही. आतल्याआत घुसमटुन जातं. आणि जर आई जवळ असेल तर पुढची चार मिनिटं आभाळ फाटल्यासारखं रड रड रडतं. पण पाचव्या मिनिटाला मोकळं असतं आणि खेळायलाही लागतं. क्षण असे वाहतेच हवे. ते साठुन राहिले तर डबकंच होणार.

आणि सगळं जग ऐकणार असेल तर एक गोष्ट नक्की सांगेन. एखाद्याला सुख द्यायचं असेल तर त्याला काहीतरी द्यायलाच लागतं असं नाही. काही घेण्यानी सुद्धा तुम्ही त्याला खुप आनंद देऊ शकता. ऐकुन घेण्यानी. समोरच्याचं जगणं सोपं होणार असेल तर चार शब्द ऐकुन घेणं काय अवघड असतं…..?”

ढमढेरे वहिनींच ऐकतो, हे मी चांगलं करतो. ह्यावेळेस अजुन एक चांगली गोष्ट केली. घरी गेलो आणि बायकोसमोर जाऊन उभं राहिलो…. तिचं ऐकुन घेण्यासाठी! पुढची दहा मिनिटं आभाळ फाटल्यासारखं बोलत राहिली. पण अकराव्या मिनिटाला एकदम शांत वाटली….. मोकळी वाटली. म्हणाली,

“चाफ्याचा वास काय भरुन राहिलाय ना घरात! आज काय तुम्ही फुलं आणलियेत मला द्यायला?……”

ढमढेरे वहिनींचं तर ठरलय. पण तुमचं काय?

वर्षानुवर्ष साठुन राहिलीये अशी काही गोष्ट आहे का हो तुमच्या मनात ? कितीही दमला असाल तरी झोपण्यापुर्वी डायरी लिहताच का तुम्ही ? ‘सांगण्यासारखं खुप काही पण ऐकायलाच कोणी नाही’ अस झालय का हो कधी ? आणि मग समजा सगळं जग ऐकतय, काय सांगाल तुम्ही?

द्याल शिव्या जगालाच आणि सगळी गरळ ओकाल?

का जागतिक शांतीवर एक ढासू भाषण ठोकाल?

मांडाल तुमची दुःख… का सुख वाटुन जाल?

का श्रोत्यांविना तडफडणा-या तुमच्या कविता वाचुन जाल?

काय बोलाल? काय सांगाल?

विचार करा… बघा…. काही सापडतय का उत्तर ते. माझा विचार अजुन चालुच आहे आणि तो पक्का झाला की कळवेनच….!

धुंद रवी

समजा तुम्हाला कर्णपिशाच्च असलं….

“……..आयुष्य तुमच्या कानात हळुच काहितरी सांगत असतं. ज्याला ते ऐकु येतं तो कधीच संकटात सापडत नाही”

पुन्हा एकदा मी बसस्टॉपवर पुस्तक वाचत उभा होतो. मला हे अगदी पटलंच. आमच्या कानात आयुष्यानी सांगितलेलं कधीच ऐकु येत नाही आणि मग आयुष्यभर आम्ही संकटात अडकत राहतो. ‘आमची हि’ आपल्या भसाड्या आवाजात सगळ्या चाळीला ऐकु जाईल इतक्या तारस्वरात कोकलते तरी ते मला ऐकु येत नाही, तिथं हे असं आयुष्याच कानात हलकेच कुजबुजणं कधी ऐकु येणार? असा विचार करत होतोच,

इतक्यात… “हि बस सोड, नाहीतर पस्तावशील.” असा एक आवाज कानात आला. मागे वळुन पाहिलं तर कोणीच नव्हतं.

थोडे दिवस पुस्तक वाचणं बंद करायला हवं कारण ‘आयुष्य कानात बोलतय’ असले भास व्हायला लागलेत. मी समोर आलेल्या बसमध्ये चढलो.

एखाद्या गुटखा खालेल्या माणसाला बराच वेळ थुंकायला मिळालं नाही तर त्याचं तोंड किती भरेल इतकी ती बस गच्च भरली होती. पण ‘तोंड’ मग ते गुपीतांनी भरलं असेल तर बाईचं आणि गुटख्यानी भरलं असेल तर पुरुषाचं, जास्त वेळ बंद राहु शकत नाही. त्यामुळे अशाच एका निशब्द गुटखासेवकानी तोफेचं तोंड खिडकीच्या दिशेनी वळवलं आणि बराच वेळ दाबुन धरलेली गुटख्याची एक लाट खिडकीबाहेर सोडुन दिली. ती बाहेरच्या वा-याला आदळुन आमच्या बसच्या वेगवेगळ्या खिडक्यांतुन पुन्हा आत आली. पहिल्याच खिडकीत बसलेल्या माणसाच्या चेह-यावर सगळ्यात जास्त तुषार उडाले. त्याचं स्वतःचं तोंड अशाच एका लाटेने भरल्यामुळे त्याला गालगुंड झाल्यासारखं वाटत होतं. त्यात हे तुषार ठिपके आल्यामुळे आता त्याला कांजिण्या झाल्यासारखा त्याचा चेहरा दिसायला लागला. हे बघुन त्याच्या शेजारची बाई घाबरली आणि जोरात शेजारी सरकली. तिच्या शेजारची बाई सिटावरुन खाली पडली आणि पडता पडता तिनी एक पट्टा धरला. तो पट्टा कंडक्टरच्या गळ्यातल्या तिकिटांच्या बॅगचा होता. तोच ओढल्यामुळे कंडक्टरपण खाली पडला.

हे बघुन कोणीतरी बेल मारली आणि ड्रायव्हरनी कचकुन ब्रेक मारल्यानी इतका वेळ दात काढणारे कित्येक जण आडवे झाले. मग ह्याचा राग म्हणुन कोणीतरी ड्रायव्हरच्या पाठीत गुद्दा घातला. कोणी? हे बघायला ड्रायव्हरनी मागे बघितलं आणि…..

….आणि तो मगाशी कानात आलेला आवाज खराच होता की भास याचा विचार करत मी सरकारी दवाखान्यात पस्तावत पडलो होतो.

वाहुन गेलेल्या कचरापेटीकडे रस्यावरचे पादचारी बघतात, तितक्याचं तटस्थ तिरस्काराने त्या सरकारी दवाखान्यातले वॉर्ड्बॉय, नर्स आणि डॉक्टर आमच्याकडे बघत होते. “पळुन जा….” असा एक आवाज कानात आला आणि मी चमकुन मागे पाहिलं. कोणीच नव्हतं. बहुतेक डोक्याला मार लागल्यामुळे असं झालं असणार.

काहितरी शिव्या पुटपुटत एक नर्स आत आली. ज्या कर्मचा-यावर तो रस्त्यावरचा कचरा उचलायचं काम येत असेल तो इतका तर वैतागणारच ना? त्या नर्सच्या एका हातात औषधांचा एक ट्रे आणि दुस-या हातात कंबरेला धरुन पकडलेला पेशंट होता. आत आल्याआल्या तिनी तो पेशंट एका रिकाम्या खाटेवर फेकला आणि ‘एखाद्या गिर्यारोहकानी शिखर सर केल्यानंतर उन्मादात पर्वताच्या टोकावर झेंडा रोवावा’ असं एका पेशंटाच्या कमरेत तिनी इंजक्शन रोवलं. तिनी अजुन थोडा जोर लावला असता तर त्या इंजक्शनची सुई आरपार जाऊन गादीत पण रुतली असती. मग शेजारच्या खाटेवर बसुन खोकणा-या एका आजोबांना तिनी एका धक्क्यात खाली पाडुन त्यांनाही एक इंजक्शन ठोकलं. वास्तविक ते एका पेशंटला भेटायला आले होते, पण आता त्यांना बरगडीचं आणि कमरेचं हाड मोडल्यामुळे इथेच भरती व्हावं लागलं. ती नर्स आमच्या दिशेनी वळली आणि मी खिडकीतून उडी मारुन पळुन गेलो. ‘पळून जा….’ हा आलेला आवाज मी आधीच ऐकायला हवा होता.

शारिरीक आणि मानसिक त्रासामुळे कामावर जाणं शक्यच नव्हतं. घरी परत आलो. चाळीतले जिने चढताना पुन्हा कानात एक आवाज आला…. “त्या सगळ्या बायका तुझा जीव घेतील, त्यापेक्षा पुन्हा त्याच दवाखान्यात जा”.

मला काही समजेना. म्हणजे, जीव घ्यायला कुठलिही बायको समर्थ असतेच, पण हे जरी खरं असलं तरी ‘सगळ्या बायका’ हे काय आहे ते मला समजेना. घरी गेलो तर सगळं घर चाळीतल्या ‘सगळ्या बायकांनी’ भरलेलं. आज भिशी होती आमच्याकडे. पैशाची भिशी लावायच्या ऐवजी, जिचा नंबर येईल तिनी आपली दुःख सगळ्यांना सांगायची आणि मग तिच्या नव-याचा सगळ्यांनी मिळुन हिशोब करायचा, असली भिशी होती ती. पहिलाच नंबर आमच्याच बायकोचा निघाला. माझ्या माथेफिरुपणाचे, निर्दयतेचे आणि चांडाळगिरीचे ६०-६२च किस्से कुठे सांगुन झाले होते आणि तेवढ्यात मी घरी पोहचलो. बायका गुटखा खात नाहीत याचं फार दुःख झालं मला कारण स्वतःच्या नव-याला बोलल्यासारखं त्या सगळ्या बायका इतकं घालुन पाडुन बोलल्या की शेवटी माझी शुद्ध हरपली….

शुद्धीवर आल्यावर बायकोला ते कानात आवाज येण्याविषयी सांगितलं तर म्हणाली की “अय्या, म्हणजे तुम्हाला कर्णपिशाच्च असणार…”

कर्णपिशाच्च???

पिशाच्च वगैरे ऐकुन मी जरा घाबरलोच. बायकोला अय्या म्हणण्याइतकी गंमत का वाटत होती कोणास ठाऊक?

“कर्णपिशाच्च म्हणजे काय?” – मी.

“म्हणजे स्वर्गातले काही निवांत आत्मे, इथे इहलोकावर येऊन काही माणसांच्या कानात बोलतात. त्यांना थोडंसं पुढचं भविष्य कळत म्हणे. ज्याला असं ऐकु येतं त्याला कर्णपिशाच्च आहे, असं म्हणतात.”

मला हे असले आवाज येताहेत म्हणजे मलाही कर्णपिशाच्च होतं तर !!

पहिल्या काही अनुभवात हे कर्णपिशाच्च मला मदत करतय असं वाटलं, पण पुढे पुढे जरा विचित्रच व्हायला लागलं. ऑफिसमध्ये साहेब ज्या खुर्चीवर बसणार आहेत ती मोडणार आहे, असं त्या पिशाच्चानी सांगितलं म्हणुन मी ती खुर्ची काढुन घेतली. साहेब सणसणीत आपटले. खुर्ची काढुन घेण्याऐवजी मी साहेबांना ओढायला हवं होतं, पण आयत्या वेळेला ते सुचलं नाही. साहेबांनी त्या कर्णपिशाच्च प्रकरणावर विश्वास ठेवला नाही आणि मेमो दिला.

नंतर त्या पिशाच्चानी चाळीत सांगितलं की गच्चीत कुरडया वाळत घालायला निघालेल्या बोंबले वहिनी पाय घसरुन जिन्यावरुन पडणार आहेत. मागचा अनुभव लक्षात ठेऊन मी जिना काढुन घेण्याऐवजी बोंबले वहिनींचा हात धरुन ओढलं. वहिनींनी त्या कर्णपिशाच्च प्रकरणावर विश्वास ठेवला नाही आणि उगाचच माझ्या स्वच्छ चारित्र्यावर कुरडईचे शिंतोडे उडाले.

त्या पिशाच्चानी काहीही सांगितलं तरी नुसतं ऐकुन घ्यायचं असं ठरवलं, तरी मनस्ताप होतच राहिला. मी लॉटरी काढली आणि पुढच्याच क्षणाला त्यानी सांगितलं की ती लागणार नाहीये. हे माहित असुनही आपण लॉटरी काढतोच कारण पुढचे काही दिवस ‘आपण करोडपती होणार’ आहोत हे स्वप्न जगता येतं…

सकाळी वर्तमानपत्र वाचायच्या आधिच काय घडलय, हे ते पिशाच्च सांगायला लागलं. अगदी पेपरात छापुन येणा-या रोजच्या भविष्यासकट. आता मला सांगा ‘सप्तमात मंगळ, भाग्यात शनि आणि लाभात शुक्र असल्यामुळे चोरट्या प्रेमप्रकरणात यश’ असं वाचल्यानंतर लगेच काय आपण दिसेल त्या बाईला मागणी घालुन प्रेमप्रकरण चालु करत नाही. पण त्या नालायक पिशाच्चानी दात काढले आणि आधी बायकोशी प्रेमप्रकरण चालु करा म्हणालं.

जुन्या आठवणी घेऊन बरसणा-या पावसानं आपल्याला बेसावध गाठण्यात जी मजा आहे ती पावसाळ्यात नाही. मी घराबाहेर पडतानाच ते नतद्र्ष्ट कानात म्हणालं की “छत्री घे सोबत.” माझी सगळी मजाच गेली. बायकोनी प्रेमानी खमंग कांदाभजी केलेली. पण ते म्हणालं की “जोरदार पोट बिघडणार आहे.” खाऊच शकलो नाही मग. बायको जाम भडकली. आनंद तर गेलाच, वर संकट पण ओढावुन घेतलं.

शेवटी मनःशांती साठी कानाची शांती करुन घेतली तेंव्हा कुठे ते कर्णपिशाच्च गेलं.

ढमढेरे वहिनी भेटल्या. म्हणाल्या,

“आपण महिन्याचा जमाखर्च डावलुन एखादा सिनेमा बघायला थेटरात जावं आणि आपल्या मागेच बसलेल्या बेअकली माणसाने स्वतःच्या बायकोला पुढची पुढची स्टोरी सांगायला सुरवात करावी. काय होईल…….? प्रचंड चिडचिड!! तो सिनेमा बघण्यातला आनंदच निघुन जाईल. आयुष्य हा असाच एक सस्पेन्स-थ्रिलर सिनेमा असतो. सस्पेन्स गेला तर जगण्यातला आनंदच निघुन जाईल. ब-याचदा एखादी गोष्ट मनासारखी नाही घडत, पण तोपर्यंत माणुस आशेवर जगत असतो. इतकंच काय, ती मनासारखी घडणार असेल पण आधिच कळालं तर त्यातलीही थोडी मजा जाणार. त्यामुळे असं एखादं कर्णपिशाच्च बसलंच कानावर तर ते सोडुन जाईपर्यंत त्याच्या मानगुटीवर बसेन.

…..आणि तरिही नाहीच सोडुन गेलं तर ज्योतिष्याचा धंदा चालु करेन आणि खुप पैसा कमवेन.. तसही सामान्य माणसाला ‘पैसा किंवा आनंद’ यातलं एकच काहितरी मिळतं….!””

ढमढेरे वहिनींचं तर ठरलय…… पण तुमचं काय ?

पुढचं कळावं, अशी इच्छा तुम्हाला होते का हो कधी ? काही गोष्टी थोड्या आधी कळाल्या असत्या तर खूप फरक पडला असता, असं वाटतं का? ते कळालं तर खरंच मजा येईल याची खात्री वाटते ? आणि समजा तुम्हाला कर्णपिशाच्च आलं तर काय होईल?

 

पुढचं कळालं तर धमाल येईल… खुप मजा वाटेल?

का जगणं म्हणजे ‘लय बोर’ कंटाळवाणी सजा वाटेल?

भविष्याची चिंता जाईल, वर्तमानाची काळजी मिटेल?

का पिशाच्चाच्या बडबडीनी फालतुमधे डोकं उठेल ?

 

चालवुन घ्याल? का घालवुन द्याल?

विचार करा… बघा…. काही सापडतय का उत्तर ते. माझा विचार अजुन चालुच आहे आणि तो पक्का झाला की कळवेनच….!

धुंद रवी

KP Bavankhani

समजा तुमच्या जोडीदाराला ‘लाय डिटेक्टर’ सापडला

कोणीतरी… कधीतरी… काहीतरी… विनाकारण शोध लावुन ठेवतो आणि त्यामुळे एखादा गरीब-बापडा त्याच्या आयुष्यातली शांती हरवुन बसतो. विलियम मार्स्टन नामक एका महापापी, महाचांडाळ, महाक्रुरकर्मा शास्त्रज्ञानं १९१३ मध्ये एक अगाऊपणा करुन ठेवला आणि त्याची शिक्षा भोगली आमच्या ढमढे-यानी. ह्या विघ्नसंतोषी विल्याच्या चुकीनी ढमढे-याच्या घरात (आणि त्यामुळे संसारात) आलेलं जळजळीत वादळ त्याचं जगणं मिळमिळीत… गिळगिळीत… पिळपिळीत करुन गेलं….!

आमच्या लहानपणी ‘विज्ञान – शाप की वरदान’ असा एक निबंध पेपरात हटकुन यायचाच. ढमढे-या या विषयावर ७३ पानं तरी लिहु शकले असता. म्हणजे त्यानी ती मनातल्या मनात लिहली सुद्धा आणि शिव्या वगळुन राहिलेली ११ पानं त्यांनी मला बोलुनही दाखवली. ‘सगळ्या शास्त्रज्ञांना त्यांच्या शोधांसकट रणगाड्याखाली चिरडून किंवा आमच्या हिच्या पायाखाली तुडवुन मारलां पाहिजे’ …अशी त्याच्या निबंधाची सुरवात होती.

त्याचं काय झालं… परवा ढमढेरे ऑफिसमधुन थोडंसं (….म्हणजे नेहमीच्या उशिरापेक्षा जेमेतेम दोन-तीन तासच) उशिरा आला.

कुस्तीच्या आखाड्यात एखादा मल्ल अंगाला माती चोपडून, मांडीवर हात आपटून कसले तरी भीषण आवाज काढत, दुस-या मल्लाची कुस्तीसाठी वाट बघत असतो. अगदी तसंच ढमढेरे वहिनी घरच्या आखाड्यात एक हात कमरेवर आणि दुस-या हातानी खिडकीचा पडदा सारखा बाजुला करत दुस-या मल्लाची कुस्तीसाठी वाट बघत होत्या. त्यांचं दहा वर्षाचं कार्ट (सिनेमा बघताना ते पॉप्कॉन का काय खातात तसं) वाटीभर तळलेले दाणे घेऊन हि कुस्ती बघायला तयार झालं होतं. ढमढेरे आला आणि वहिनींनी शड्डू ठोकुन पहिला डाव टाकला…..

“आज(ही) उशीर झाला तुम्हाला?”

“हो गं… खूप काम होतं आज. जीव गेला अगदी इतक्या कामानी”

…असं ढमढे-यानी म्हणताच घरात एकदम टींव्ह…टींव्ह…टींव्ह…टींव्ह… असा रुग्णवाहिका येताना होतो तसा एक सायरन वाजायला लागला. काय होतय हे ढमढे-याला कळेनाच, पण काय झालय हे वहिनींना मात्र कळालं होतं. खरं तर ढमढेरे वहिनी आपलं ‘वजन’ कुठेही वापरत नाहीत, पण नव-याच्या खोटं बोलण्यानी त्या संतापल्या आणि रागात विवेक हरवुन त्यांनी स्वतःचा एक पाय ढमढे-याच्या एका पायावर जोरात दाबला. त्या वजनानी ढमढे-याच्या पायाची तीन बोटं आधि चपटी झाली आणि नंतर सुजल्यामुळे ती बोटं अंगठ्याएवढी दिसायला लागली. ती थर्ड डिग्री सहन न झाल्यानी त्यानी कळवळून आपला गुन्हा कबुल केला…

“एक मित्र भेटला आणि त्यासोबत श्रमपरिहार करण्यासाठी थोडीशी ‘घ्यायला’ गेलो होतो.” 

ढमढेरे वहिनींनी त्याच्या पायावरचा पाय काढला आणि आपला एक हात त्याच्या खिशात घातला. त्यात त्यांना हवं ते मिळालं नाही. हवं ते म्हणजे पैसे नव्हे. पैसे त्या आधिच काढुन घेत असत. हवं ते म्हणजे सिगरेटचं पाकीट. “किती ओवाळल्या उदबत्त्या आज?” त्यांनी विचारलं.

“दोन….” असं ढमढेरेचं म्हणुन पण झालं नव्हतं आणि पुन्हा एकदा तो टींव्ह…टींव्ह…टींव्ह…टींव्ह… करत सायरन वाजला.

‘खोटं बोलु नकात’ ह्या वहिनींच्या इशा-याकडे दुर्लक्ष करत पण वहिनींच्या आग ओकणा-या डोळ्याकडे बघत ढमढेरे म्हणाला, “अगं तुझ्या डोळ्यांची आणि माझ्या लायटरची शपथ… दोनच ओढल्या.” पुन्हा एकदा सायरननी घर दणाणून सोडलं. वहिनींनी दात ओठ खाल्ले. त्यांच्या कार्ट्यानी दात काढुन दाणे खाल्ले आणि ढमढे-यानी वहिनींचे दोन जोरदार गुद्दे खाल्ले. त्या हल्ल्यानी त्याच्या तोंडातून आणि नाकातून दिवसभर ओढलेल्या सात-आठ सिगरेटींचा धूर बाहेर पडला आणि मग त्यानी दुसरा गुन्हाही कबुल केला…. “पावणे आठ सिगरेट…!” 

“पुन्हा कधीही एका दिवसात एका पेक्षा जास्त सिगरेट ओढल्या तर लायटरनी तुमची मिशी जाळून टाकेन.” वहिनींच्या ह्या इशा-यानी तो मिशीशिखान्त घाबरला. ढमढेरे वहिनींचा हा रुद्रावतार त्यानी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता. डोळ्यात सतत गोंधळलेला भाव घेऊन जगणा-या आणि शक्यतो नजरेला नजर न देणा-या बायकोनी आज आपलं तिसरं नेत्र उघडलय असं त्याला वाटलं… असत्य जळून राख करेल असं संतापी नेत्र! 

कुस्ती रंगात आली होती आणि ढमढे-यांचं कार्ट आता वाटी ठेऊन दाण्याचा आख्खा डबाच घेऊन आलं होतं. एकदा धरुन आपटल्यावर सुद्धा, जिंकणा-या पैलवानाचं समाधान होत नाही आणि मग पडलेला पैलवान उठताच तो नविन डाव टाकतो. वहिनींनी पुढचा डाव टाकला. 

“डबा संपवला का आज? कशी झाली होती भाजी?”

ह्या वहिनींच्या प्रश्नावर “म्हणजे काय? संपवलाच. एकदम बेश्ट झालेली भाजी.” असं नेहमीचं उत्तर त्यानी सरावानी दिलं आणि त्याच क्षणी सायरनच्या कल्पनेनी ते थरथरले. तो आवाज ऐकायला वहिनींचा जीव कानात गोळा झाला होता आणि त्याच्या पोटात एक मोठ्ठा गोळा आला होता.

पण काहीच आवाज झाला नाही. याचा अर्थ डबा संपला होता आणि भाजी चांगली झाली होती. पण तरिही काही तरी चूकतय असं वहिनींना वाटायला लागलं आणि त्यांनी तोच प्रश्न बदलून टाकला.

“डबा तुम्ही खाल्लात का? भाजी तुम्हाला आवडली का…?” यावर ढमढेरे भीतभीत “हो” म्हणाला. आणि मग……… आणि मग………  टींव्ह… टींव्ह…टींव्ह…टींव्ह… !!

वहिनींचा पारा चढल्यानी आधिच ढमढे-याची सगळी उतरली होती आणि त्यात हा सायरन त्याला काही सुचू देत नव्ह्ता. त्यात वहिनींनी त्यांचा डबा उघडून पाहिला. चाटून-पुसुन घासुन-धुवुन स्वच्छ…! म्हणजे ढमढे-यानी तो खाल्लेला असुच शकत नाही. “तुम्ही खरं बोलताय का मी पोट फाडुन तुमच्यातुन खरं बाहेर काढु” अशा नजरेने वहिनींनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यानी आणखिन एक गुन्हा कबुल केला….

त्याचा डबा आज(ही) ऑफिसात शिपायानी खाल्ला होता आणि त्यानीच ढमढे-याला भाजी ‘बेश्ट’ झाल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे बिचा-या ढमढे-याला बाहेर जाऊन मिसळ खावी लागली.

आज बहुतेक आपले सगळे गुन्हे उघडकीस येणार ह्या भितीनी ढमढे-यानी वहिनींसमोर हत्यारं टाकली आणि म्हणाले, “मला माफ कर. मी फार वाईट वागलो तुझ्याशी. चूकलो मी. मला पश्चात्ताप होतोय.” ह्यावर वहिनी काहीच बोलल्या नाहीत पण सायरननी मात्र त्याचं तोंड उघडलं. ढमढे-या खचलाच. म्हणाला “विश्वास ठेव. मी खरंच बोलतोय…. ‘मला पश्चात्ताप होतोय’ हे तुला पटवायला काय करु मी?”

“भांडी घासा.” असं म्हणुन वहिनी शेजारच्या बाईंशी गप्पा मारायला निघुन गेल्या. पण तरिही ढमढे-यानी ते स्विकारलं. बायकोनी आपल्याला धुण्यापेक्षा, भांडी धुणं बरं. ढमढे-या आयुष्यात पहिल्यांदाच कामानी दमला होते. तो न जेवताच झोपला.

थोड्या वेळानी सामसूम झाली आणि ढमढेरे वहिनींच्या घोरण्याचा आवाज चालु झाला. आता सायरनचा आवाज वहिनींच्या अघोरी घोरण्यापुढे ऐकु येणार नाही या अंदाजानी ढमढे-यानी एक डाव टाकला. त्यानी हळूच मुलाला उठवलं आणि ती ‘सायरनची काय भानगड आहे’ ते विचारलं. मुलाशी ब-याच वेळ वाटाघाटी झाल्यानंतर ‘प्रगतीपुस्तकावर न बघता सही करण्याच्या अटीवर’ तह झाला आणि मगच ते कार्ट रहस्य ओकायला तयार झालं…. “अहो बाबा, आईनं घरात कसलं तरी यंत्र आणुन ठेवलय. कोणी खोटं बोललं की ते बोंबा मारतय. सकाळपासुन दुपारपर्यंत ७ वेळा झोडपलाय आईनं मला. मी तर तोंडच बंद केलय तेंव्हापासुन. तुम्ही पण तोंड उघडु नका आणि उघडलत तर खरंच बोला.”

मग ढमढे-याला शोध लागला की विलियम मार्स्टन नावाच्या रिकामटेकड्या उपटसुंभानी १९१३ मध्ये ‘लाय डिटेक्टर’ नावाच्या असत्य शोधण्यासाठीच्या यंत्राचा शोध लावला आणि याच प्रकारातलं काहीतरी बायकोला मिळालय.

पण ह्या एका शोधानी त्यांचं आयुष्यच बदलून गेलं.

ढमढे-याची दारु, सिगरेट जवळजवळ बंद झालं. तो घरी लवकर यायला लागला. त्याला पैसे पुरायला लागले. मिसळ बंद झाली आणि पौष्टीक पदार्थ पोटात जायला लागले. मुलाचे उपद्व्याप कमी झाले. तो अभ्यास वगैरे करायला लागला. आयुष्य असं बदलल्यानंतर ढमढे-याला त्या शास्त्रज्ञाचा राग राहाणं स्वाभाविक होतं. पण एक दिवस अचानक त्या सायरनचा आवाज बंद झाला.

कधीकधी आमच्या हिच्या अंगावर नवी साडी दिसते आणि ती साडी तिनी माझ्यापासुन लपवुन आणलीये हे मला माहित असतं. पण तिला ‘हि कुठली साडी?’ असं विचारलं की म्हणते, “अय्या… तुमच्याच बरोबर नाही का घेतली?”

ती ‘अय्या’ म्हणते तिथेच ती खोटं बोलतीये हे कळतं मला. कारण मी काही विसरलो तर ती ‘अय्या’ म्हणणार नाही. मला टोमणे मारुन मारुन खच्ची करेल. तर बायकोला ब-याच ठिकाणी पकडता येईल म्हणुन ढमढेरे वहिनींकडे तो लाय डिटेक्टर उसना मागायला गेलो.

तर त्या म्हणाल्या, “मोडुन टाकलं ते यंत्र… आयुष्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं माहित असतात आपल्याला, पण आपल्याला जे ऐकायचं असतं तेच उत्तर समोरुन आल्यावर ते खरं मानण्यात खूप समाधान असतं. भले ते उत्तर खोटं का असेना. ‘मी कशी दिसतीये?’… ‘मी फार जाड तर झाली नाहीये ना?’….. ‘माझ्यावर तुम्ही पुर्वीइतकंच प्रेम करता ना?’… हे असले प्रश्न, ते यंत्र असताना विचारताच येत नव्हते हो..! टाकलं मोडुन मग ते यंत्र. मी खुष आणि मिस्टर ढमढेरे सुद्धा !”

ढमढेरे वहिनींचं तर तुम्ही ऐकलय. पण तुमचं काय?

तुमचा जोडीदार तुमच्याशी सगळं खरंच बोलतो का हो? तुम्हाला जोडीदाराचं ते खोटं पकडावंसं वाटत का हो? मिळालाच तुम्हाला लाय डिटेक्टर तर घ्याल त्याची टेस्ट? का तुम्हीच मारता थापा आणि गंडवता त्याला? मग समजा सापडला तुमच्या जोडीदाराला लाय डिटेक्टर तर काय होईल हो तुमचं?

हादरुन जाल की आता… येईल सगळं सत्य बाहेर?

का पेकाटात एक सणसणीत लाथ… असा होईल घरचा आहेर?

पकडली जाईल चोरी आणि तो सभ्य मुखवटा फाटेल?

का पहिल्यापासुन खरंच बोलायचो… याचं बरं वाटेल?

आलेल्या प्रसंगाला तोंड द्याल? का ते बंदच ठेवाल?

विचार करा. बघा…. काही सापडतय का उत्तर ते. माझा विचार अजुन चालुच आहे आणि तो पक्का झाला की कळवेनच….!

धुंद रवी

समजा तुम्हाला यंत्र काढुन ठेवता आलं…

कुठल्याही वाटाघाटींशिवाय ‘मनसोक्त’ आनंद मिळणं इतकं कठिण झालय हल्ली, की माणुस मिळेल त्यात आनंद शोधायला लागलाय… दिसेल त्यातून आनंद लुटायला लागलाय.

………मग ती गोष्ट, घटना वाईट का असेना !!

 

हे असं तत्वज्ञान पाजळण्याचं कारण की चाळीसमोरच्या अंगणात सकाळसकाळी जत्रा भरली होती. बरीच माणसं गोल रिंगण करुन काहीतरी बघत होती. गारुडी किंवा दरवेशी असं कोणीतरी असणार. मी पण कुतुहुलानी पुढे घुसुन पाहिलं तर…

चाळीतलेच वासुनाना, आगलावे आजोबांच्या छातीवर बसुन त्यांना गुद्दे घालत होते आणि खाली लोळलेले आगलावे आजोबा (कवळी तुटू नये म्हणुन ती खिशात घालुन) दात काढत होते. रविवार असल्यामुळे चाळकरी मंडळी ह्या दोन म्हाता-यांची जुंपलेली कुस्ती निवांत बघत बसले होते. मग आखाड्यात उभं असल्यासारखं ते  दोन्ही पैलवानांना चिथवायला लागले. सुक्या बोंबील तर सामन्याच्या निकालावर ‘बेटींग का काय’ ते पण घेत होता. नक्की काय झालय ते कोणालाच ठाऊक नव्हतं… पण लोकांना ते माहित असण्याची गरजही नव्हती. (सुखासारखंच, शरीरानीही उंची न गाठु शकलेल्या एखाद्या बुटक्या विदुषकाचं दुःख काय असेल’ याची काळजी प्रेक्षकांनी का करावी? प्रेक्षकांनी फक्त त्याच्या केवीलवाण्या धडपडण्याचा आनंद घ्यावा. तसही माणसाला दुस-याच्या शल्यात आनंद असतोच की..!)

तर… ‘मारणारा आणि मार खाणारा’ दोघांनाही ही मारामारी सहन होणार नाही आणि मारामारीच्या आधी यातला एखादा आटोपु शकतो, हे माहित असुनही चाळकरी मंडळी वाटाघाटींशिवायचा ‘मनसोक्त’ आनंद घेण्यात मग्न होती. मीच पुढे झालो आणि दोन जणांच्या मदतीने वासुनानांना बाजुला करण्याचा प्रयत्न केला. (सदरच्या दोघाही मदतगारांनी आगलावे आजोबांवर पैसे लावले होते म्हणे.) मी वासुनानांना बाजुला करण्याचा ‘प्रयत्न’ केला, असं म्हणण्याचं कारण की घट्ट पकडलेल्या एखाद्या खुडुक कोंबडीनं तिच्या जीवाच्या आकांतीनी सुटून पळू पहावं तसं नाना आमच्या हातातून सुटूनसुटून, सुटूनसुटून आगलावे आजोबांवर झेप घेत होते. वासुनानांच्या तोंडातून एकही शब्द नीट बाहेर पडत नव्हता. त्यांच्या हावभावावरुन त्यांना आगलाव्यांचा कानाचा चावा घ्यायचाय, इतकंच आम्हाला कळत होतं. पण का? कोणास ठाऊक!!

कोणास ठाऊक? तर चौघांना ठाऊक.

 

चौघं म्हणजे वासुनाना, आगलावे आजोबा, देव आणि ढमढेरे वहिनी. वहिनी खिडकीत बसुन मक्याचं कणिस खात, ही सगळी मजा घेत हसत होत्या. पण हे हसणं त्या चाळक-यांसारखं चेष्टेचं हसणं नव्हतं. त्या स्वतःशीच हसत होत्या…! काहीतरी महत्वाचं सापडल्यासारखं त्यांचे डोळे चमकत होते. मी असं ऐकलं होतं की एकटीच हसणारी या पृथ्वीतलावर चारच माणसं असतात.. राजा, साधु, वेडा आणि लहान मुल. त्या श्लोकात आता ढमढेरे वहिनींचं नाव टाकायला हवं.

दरम्यान वासुनानांचे शब्द खोकल्यात रुपांतरीत झाले होते आणि लागलेल्या ठसक्यातही आगलावे आजोबा खिदळत असल्यामुळे ते खिंकाळत होते. त्यामुळे काही विचारण्यासाठी चौघातले हे दोघे बाद होते. देवाची आधीचीच इतकी उत्तरं पेंडींग आहेत की त्याला ‘नक्की झालय काय?’ हा नविन प्रश्न विचारण्यात अर्थच नव्हता. म्हणुन ढमढेरे वहिनींना विचारायचं ठरवलं आणि ‘निकाल लागायच्या’ आधीच दोन्ही मल्लांना घरी पोहचवुन आलो.

 

थोड्या वेळानं चाळीमध्ये युद्धानंतरची असते तशी शांतता पसरली. कसलाच आवाज नाही. त्यामुळे मला दुपारी झोपच लागेना. चुळबुळत पडलो होतो तर दार वाजलं. उघडलं तर बाहेर ढमढे-या. फारच गंभीर होता आणि त्यातही बिथरलेला.

(म्हणजे वासुनाना गेले असणार. इतकं चिडणं त्यांना झेपणार नाही, असा मला अंदाज होताच.)

मला म्हणाला, “लगेच चल… डॉक्टरांकडे जायचय. एखादे डोक्याचे डॉक्टर आहेत का ओळखीचे?” (म्हणजे आगलावे आजोबा पिसाळले असणार. इतकं हसणं त्यांना सोसणार नाही, असा मला अंदाज होताच.)

“नाहीतर एखाद्या वकिलाकडे जाऊ.” – ढमढे-या.

“इतकं कशाला चिडतोस. आता तु बेटींगमध्ये हरलास म्हणुन आगलावे आजोबांवर केस करणार आहेस का? – मी.

“कसलं बेटींग? आगलावे आजोबा?? नाहीतर डॉक्टरांकडेच जाऊ. तु पण दाखवुन घे एकदा. मला वकिलाकडे जायचय ते आमच्या हीला घटस्फोट द्यायला.”

“का रे? काय झालं? एवढं काय केलं वहिनींनी? – मी असं विचारल्या विचारल्या त्यानी थरथरायला सुरवात केली. त्याच्या तोंडातून एकही शब्द नीट बाहेर पडेना आणि तो मगाचच्या वासुनानांसारखा फडफडायला लागला.

 

आता दोन्ही गोष्टींसाठी वहिनींना गाठणं गरजेचं होतं. मी त्यांच्या घरी गेलो. त्या सकाळसारखंच हसत होत्या…. एकटंच.

 

“सांगते सगळं…!” मी काही विचारायच्या आधीच ढमढेरे वहिनींनी सांगायला सुरवात केली. “गेले २२ वर्ष वासुनाना आणि आगलावे आजोबा दर रविवारी अंगणातल्या बाकड्यावर भेटतात आणि एकमेकांजवळ आयुष्यातली सगळी दुःख, त्रास, चिडचिडी, कुरबुरी, संताप आणि सांसारीक यातना ओकतात. पण बोलुन झाल्यावर आगलावे आजोबा जेवढे रिलॅक्स दिसायचे तेवढे वासुनाना दिसायचे नाहीत. उलट स्वतःच्या त्रासासोबत त्यांच्या डोक्यावर आगलावे आजोबांच्या व्यथांचंही ओझं व्हायचं. आगलावे आजोबा मात्र सगळं बोलुन टाकल्यानी एकदम मोकळे व्हायचे. आपल्या बोलण्याचा आगलाव्यांना त्रास कसा होत नाही हे वासुनानांनी आजोबांना विचारलं आणि ते कारण आगलावे आजोबांनी त्यांना सांगुन टाकलं. त्यानंतर जे झालं ते तुम्ही पाहिलंच. मी तर म्हणेन की ते ही कमीच झालं.”

“असं काय सागितलं त्यांनी नानांना?”

“गेले २२ वर्ष वासुनानांनी बोलायला सुरवात केली की कधीच बहिरे झालेले आगलावे आजोबा त्यांचं ‘श्रवणयंत्र’ काढुन ठेवायचे. वासुनानांनी ईमानदारीत आजोंबाची सगळी बडबड तासन् तास सहन केली होती. आणि आजोबांनी दोस्तीत कुस्ती करुन वासुनानांना फसवलं होतं… २२ वर्ष. यंत्रच काढुन ठेवल्यानी आजोबांना काही ऐकायलाच लागायचं नाही… सगळंच सोपं असायचं त्यांना. आणि म्हणुन वासुनानांना त्या यंत्रासकट आगलाव्यांचा कान खाऊन टाकायचा होता.

तुम्हाला सांगु… मला फार आवडलं आगलावे आजोबांचं. आणि मग मी पण तेच केलं. स्वतःलाच सांगितलं की आपण बहिरे आहोत आणि श्रवणयंत्राशिवाय आपल्याला काहीही ऐकु येत नाही. मग सकाळपासुन यंत्र काढुनच ठेवलं. ढमढे-यांचं कुजगट बोलणं नाही… भांडणं नाहीत… वाद नाहीत…. म्हणजे निदान माझ्याकडून नाही. त्यांनी असंबद्ध मुद्दे मांडले असतीलही कदाचीत पण माझी चिडचिड नाही… काही ऐकुच न आल्यानं काही बोलायची आणि जीव जाळायची वेळच आली नाही… शेजारच्या गोगटे आज्जींची लोकांना छळायला म्हंटलेली भजनं ऐकु आली नाहीत.. मागच्या झोपडपट्टीतून शिव्या ऐकु आल्या नाहीत. माझ्या हसण्यावर फार चिडले ढमढेरे… पण मी त्यावरही हसले. आगलावे आजोबा हसले तसंच. कारण सकाळपासुन माझ्या आयुष्यात आहे ते फक्त आनंद आणि शांती. बोला आता.”

 

मी ढमढे-याचा राजदूत असल्यामुळे त्याच्या वतीनी वहिनींना समजवायला सुरवात केली तसं त्यांनी हात कानापाशी नेला.. खाली आणला आणि हसायला लागल्या. त्यांनी यंत्रच काढुन ठेवल्यामुळे त्यांच्याशी पुढे बोलणं शक्यच नव्हतं. मी घरी निघुन आलो. माझा पराभूत चेहरा पाहुन ढमढे-या काय समजायचंय ते समजला. त्यानी वहिनींचा राग माझ्यावरच काढायला सुरवात केली. मी…. मी…. मी यंत्र काढून ठेवलं. आणि मग सवयच लागली असं करण्याची.   

 

मी पुन्हा इथे बदली करुन घेतल्यामुळे साहेब फार चिडलेला. फार टाकुन बोलला मला. एरवी मला वाटायचं की ‘आपण काही शाळेतलं पोर नाही की ह्यानी काहीही बोलावं आणि आपण ऐकुन घ्यावं. का सहन करायचा हा अपमान? कोण समजतो हा स्वतःला? एक दिवस ह्याला गोळी घालुन….’ वगैरे वगैरे. आजही तो मला फार वाईट बोलला असेल. अगदी तोंडाला येईल ते. मी शांतच होतो. त्याचं बोलुन झाल्यावर “साहेब, माझ्यासारख्या फालतु माणसासाठी कशाला तुमचं बीपी वाढवताय. मी प्रयत्न करेन तुम्हाला हवं तसं वागण्याचा.” असं म्हणालो तर तो ढासळलाच. बघतच राहिला आणि अस्पष्टसं सॉरीसारखं काहीतरी पुटपुटला. तसंही त्याच्या बोलण्याला काही अर्थ नसायचाच, पण जो थोडाफार जोर असायचा तो ही मी यंत्रासोबत काढुन टाकला. वाटलं, हे यापुर्वीच का नाही केलं.

 

एक नक्की की… या पुढे आपलं सगळं बेटींग आगलावे आजोबांवर. 

 

घरी येताना बसस्टॉपवर नेहमीचा भिकारी आला. मी भिका-यांना नेहमी भीक देत नाही, ते परवडत नाही. पण देतच नाही, असंही नाही. हा नेहमीचा भिकारी फार चालु होता. मी त्याला इतर भिका-यांची टिंगलटवाळी, दादागिरी करताना ब-याचदा पाहिलं होतं.

पण तो माझ्यासमोर आला की इतक्या भयाण सूरात रडायला लागायचा की मला ते सहनच व्हायचं नाही. त्याच्या व्हिवळण्यानी अगदी त्रासुन जायचो. भीक द्यायला ना नाही हो, पण ती माझ्यावर जबरदस्ती व्हायची अन् मी पैसे द्यायचो. आज मला पाहुन तो पुन्हा व्हिवळायला लागला. मला ऐकु आलं नाही त्यामुळे मी त्याची  दखलही घेतली नाही. तो चिडून निघुन गेला. आपण दखल घेतली नाही तर निम्मे प्रश्न आपोआप सुटतील, असं वाटलं.

 

घरी आल्यावर ढमढेरे वहिनींना यंत्र प्रकरणाची गंमत सांगितली. त्यांच्याकडेही अशा गमतीजमती होत्याच. खाली पाहिलं तर वासुनाना आणि आगलावे आजोबा एकमेकांशेजारी बसुन हसत होते. अर्थात दोघांच्याही कानात यंत्र नव्हती. आम्ही दोघंही त्यांना हसलो. वहिनी म्हणाल्या,

“हे असं यंत्र काढुन ठेवणं धमाल आहेच.. पण खरी मजा तेंव्हा येईल जेंव्हा ‘मन’ आपल्याशीच काही बोलताना हे यंत्र काढुन ठेवता येईल. “मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये” असं चिंतातूर मनाला सांगता आलं पाहिजे. ऐकावसं वाटलं तर लावायचं परत यंत्र. तसही आपल्या आयुष्यातले ९०% प्रश्न हे आभासी तरी असतात नाहीतर स्वतःहुन ओढुन घेतलेले तरी. उरलेले १०% सोडावणं आपल्या हातात नसतंच. म्हणजे सोडावण्यासारखे प्रश्न शुन्य. काय म्हणता?”

 

ढमढेरे वहिनींचं तर ठरलय. पण तुमचं काय?

 

तुम्हालाही कशाचा फार त्रास होतो का हो? सासूबाई किंवा साहेबांच्या टोमण्यांनी तुम्ही हैराण झाला आहात का हो? ‘आपल्याला त्रास होतो हे माहित असुनही काही गोष्टींची दखल का घेतो आपण’ असं वाटतं का हो? हे सगळं न ऐकु आलं नाही तर आयुष्यात फार फरक पडेल असं वाटतं का हो तुम्हाला? आणि मग समजा जर खरंच तुम्हाला यंत्र काढुन ठेवता आलं तर काय होईल ?

 

बंद होईल ‘ऐकुन घेणं’… अन् कचाट्यतून जीव सूटेल? 

संपून जाईल किचकिच कटकट…  मग अडचणीतून मार्ग सूचेल ?

नको ते कानी पडलंच नाही… तर खरंच कमी होईल त्रास ?

का यंत्र काढणं जमणारच नाही… कारण कसे जगणार नुसतेच भास ?

कानाचं यंत्र काढाल ? का कानाला खडा लावाल?

 

विचार करा. बघा…. काही सापडतय का उत्तर ते. माझा विचार अजुन चालुच आहे आणि तो पक्का झाला की कळवेनच….!

 

धुंद रवी

http://www.maifal.com

समजा तुम्हाला तेविसावी जोडी ठरवता आली…

“जळ्ला मेला बायकांचा जन्म….!”

हे वाक्य बायकोनी मला इतक्यादा ऐकवलं की ‘जळ्ला मेला जन्म-जळ्ळेल्या-बाईच्या नव-याचा जन्म’ असं मला वाटायला लागलं. बर बायकोचं नक्की काय बिनसलय ते सुद्धा कळत नव्हतं. त्यात ती अगदीच वैश्विक पातळीवर बोलत असल्यामुळे मला वैयक्तिक मुद्दे उकरुन आणि खोडुन दोन्ही काढता येईना. ढमढेरे वहिनींसारखं व्यक्तिगत हल्ला करण्याऐवजी ती समस्त स्त्री जातीच्या व्यथा फुण्फुणत होती, त्यामुळे उगाच ते भडकलेलं विश्वव्यापी वादळ अंगावर घेण्यात काही अर्थ नव्हता.

हो… स्त्री-पुरुष असा वाद झाला की ढमढेरे वहिनी डायरेक्ट पर्सनल अॅटॅक करतात. स्त्रीच्या (नुसत्या नाही, तर विवाहीत स्त्रीच्या) हळव्या मनातली खंत मांडणारी एक टचिंग कविता एकदा त्यांनी मिस्टर ढमढे-यांवर केली होती. शोकांतिका नावाच्या मासिकात ती छापुन सुद्धा आली होती.

तु भेटेपर्यंत,

आयुष्यात फक्त..

दुःख होतं, वेदना होत्या.

भोग होते, यातना होत्या.

हाल होते, आपेष्टा होत्या.

तु आयुष्यात आलास

आणि मग

आणि मग उरलेल्या आयुष्याची पण वाट लागली 

माझ्याही बायकोची गाडी हळुहळु ढमढेरे वहिनींच्या ट्रॅकवर यायला लागली तसं मी “आलोच” म्हणुन गेलोच. बाहेर जाऊन चाळीतल्या कट्यावर बसलो.

कट्ट्यावर आगलावे आजोबा बसले होते. बहुतेक त्यांच्या घरातल्या जळ्ळ्याजन्माचे चटके त्यांना बसले होते. मी विचारलं की काय झालं तर म्हणाले, “आज चेटकिणीनी शाप दिला!”

मला मान्य आहे की आगलावे आज्जी एकदम पांढ-या फटक्क गो-या आहेत आणि दात पडल्यामुळे त्या जरा अघोरी सुंदर दिसतात, पण म्हणुन त्यांनी आजोबांना शाप वगैरे दिला असेल हे न पटण्यासारखं होतं. उगाच का आज्जींना वाईट करताय? असं म्हणालो तर म्हणाले, “लग्नानंतर महिन्यातच मला कळालं की लग्नांनंतरच्या पहिल्या वटपौर्णिमेला जर नववधुनी वडाची पुजा केली तर तिला तो पती सात जन्म लाभतो, पण पुजा चुकली तर ती सुवासिनी नरकात जाते. मग मी काय केलं, आमची ही आंघोळीला गेल्यावर न्हाणीघराला बाहेरुन कडी लावली आणि पळुन गेलो. गेली अठ्ठेचाळीस वर्ष तिला वाटत होतं की ती कडी माझ्या आईनी लावली होती म्हणुन.

पण आज माझं हे रहस्य त्या हलकट वासुनान्यानी त्याच्या भोचक बायकोला आणि तिनी माझ्या बायकोला सांगितलं. मग बायकोनी मला शाप दिला की पुढचे ८३ जन्म ती माझीच बायको बनुन येईल.” मला आगलावे आजोबांविषयी कमालीची कणव वाटली. पण त्यांनी यावरचा उपाय आधिच शोधुन ठेवला होता… पुढच्या जन्मी अर्धवट आणि तिरसट पुरुष म्हणुन जन्म घेण्याचा. (म्हणजे ते ह्या जन्मात तसे नाहीत असा त्यांचा समज होता.) वासुनाना दिसल्यामुळे आजोबा त्यांच्या पाठीत गुद्दा घालयला निघुन गेले. थोड्यावेळानी  सदाभाऊ कट्ट्यावर येऊन बसले.

सदाभाऊ स्वतःच्या मंडळींना ‘तीन मुलींच्या अपेक्षाभंगानंतर चौथ्या खेपेसाठी’ माहेरी सोडून आले होते. “बास की आता सदाभाऊ. अजुन किती?” असं त्यांना म्हणालो तर म्हणाले की, “झालं.. झालं. हे शेवटचंच. यावेळेला बायको नक्की मुलगा देणार बघा. तोडगाच असा भारी केलाय की….”

“कसला तोडगा?”

“मुलगाच होण्याचा गॅरेंटेड तोडगा. अभद्र अमावस्येला मध्यरात्री केळीच्या पानावर पेरुची कोशींबीर पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवली की मुलगा होणार म्हणजे होणारच.”

“पण तरिही मुलगीच झाली तर?”

“तर पुढच्या वेळेला भगद्र पौर्णिमेला भल्यापहाटे चिंचेच्या पाल्यावर केळीचं शिकरण आंब्याच्या झाडावर नेऊन ठेवायचं. हा तोडगा तर एकदम खात्रीचाच.” 

“त्यापेक्षा तुम्ही प्रत्येक झाडाखाली फ्रुट सॅलेड का नाही ठेवत?” असं विचारलं तर सदाभाऊंना राग आला. म्हणाले “तुम्ही जळताय. खर सांगा, तुम्हालाही हवाय की नाही मुलगाच?” 

सदाभाऊंच्या ह्या भिकार प्रश्नानी मी अचानक सहा-सात वर्ष मागं गेलो आणि दवाखान्यात पोहचलो. बायको ऑपरेशन टेबलवर होती आणि मी गॅसवर. मी पहिलटकर असल्यामुळे मी फार घाबरलो होतो. बायकोच अधुनमधुन धीर देत होती मला. तिला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले तसं एकटा पडलो मी. दवाखान्यात जोरदार गर्दी होती.

एखाद्या साडीच्या दुकानात सेल लागल्यावर आपल्या हातातून चांगली साडी जाऊ नये म्हणुन सगळ्या बायका एकाच वेळेला तिथे गर्दी करतात, तसंच इथेही चांगलं बाळ हातातून जाऊ नये म्हणुन ब-याच बायका डिलेव्हरायला आल्या होत्या. काऊंटरवर असं एकदम पाच-सहा बायका आल्यानी डॉक्टरांची तारांबळ उडाली होती. त्यात त्या बिचा-या बायका कण्हत, व्हिवळत, ओरडत होत्या. आयुष्यातला सर्वोच्च आनंद मिळण्याआधि टोकाची वेदना का भोगावी लागते.. कोणास ठाऊक?

बायकांच्या रडण्यात आता मुलांच्या रडण्याचेही आवाज मिळायला लागले. थोड्याच वेळात नर्स एका गोंडस बाळाला घेऊन आली… आणि माझ्या हातात ती ‘परी’ देत म्हणाली… “ही तुमची धनाची पेटी. आम्हाला पण हवी काहीतरी बक्षिसी.” मला खरंच जगातला सगळ्यात श्रीमंत माणुस असल्यासारखं वाटायला लागलं. मी जर कुठल्या संस्थानाचा राजा वगैरे असतो तर गळ्यातला कंठा किंवा हातातलं कडं काढुन दिलं असतं… हत्तीवरुन साखर वाटली असती… घोड्यावरुन चांदीची नाणी वाटली असती… उंटावरुन शेळ्या हकल्या असत्या…. काय करु आणि काय नको असं मला होऊन गेलं.

अनोळखी असुनही माझ्या आनंदाविषयी असुया वाटुन घेणारा एक नवजात बाप अत्यंत पराभूत चेह-यानी माझ्याशेजारी उभा होता. थोडं मन मोकळं करायचं म्हणुन मला म्हणाला, “आयला… लकी आहे राव तुम्ही. आमच्या बायकोनी केलाच वांदा. तरी तिला बजावलं होतं की मुलगी जन्माला घातली तर माझ्याशी गाठ आहे म्हणुन. पन नशीबात आनंदच नाय आपल्या! क्वांग्रॅट्स, तुम्हाला मुलगा झाला.”

“पण मला मुलगा नाही, मुलगी झालीये.” – मी.   

मग एवढं आनंदी व्हायला काय झालय? मला वाटलं मुलगा झाला म्हनुन नाचताय.” – तो.

यावर कसं रिअॅक्ट व्हावं मला कळेनाच. फक्त तोच बाप दुःखी होता असं नाही, तर त्यादिवशी सगळ्याच बायकांना मुली झाल्याची आपत्ती कोसळल्यामुळे सगळ्या दवाखान्यावरच शोककळा पसरली होती. लोकं एकमेकांचं सांत्वन करत होते. “जाऊ द्या… घ्या सांभाळून… पुढल्या वेळेस होईल मुलगा” अशी एकमेकांची समजूत काढत होते. हा घृणास्पद प्रकार पाहुन एक नर्स म्हणाली, “लक्ष्मी आलीये घरी सगळ्यांच्या. कशाला उगाच उदास होताय. त्यांचं नशीब त्या घेऊन आल्या. मागच्या आठवड्यात सगळी मुलंच झाली. आज सगळ्या मुली. असं व्हायचंच.”

“अर्रर्रर्रर्र… मागच्या आठवड्यात का नाय झाली बायको बाळंत? हिला ना अक्कलच नाय.” अशी एक खंत व्यक्त झाली आणि मग ती नर्स खचलीच. सगळ्यात कमाल केली ती एका बाईच्या नव-यानी आणि तिच्या सासूनी. मुलगी जन्माला घातली म्हणुन ते त्या बाईवर इतके वैतागले की तिला आणि पोरीला न बघताच निघुन गेले. मला सखेद आश्चर्य वाटलं. मुलगा होणं इतकं गरजेचं असतं का? त्याहीपेक्षा मुलगी होणं इतकं अपमानास्पद असतं का? एका पुरषाला असं वाटण्यासोबत एका स्त्रीलाही असं वाटतं तेंव्हा तर यासारखं दुर्दैव नाही. मधल्यामध्ये त्या मुलीच्या आईला मात्र अपराधी वाटतं….!

“बोला की आता? आता का गप्प बसलात?”

….असं सदाभाऊंनी विचारलं तसा भानावर आलो. पण पुढच्या विचारात हरवुन जाण्यासाठी. खरं तर, पोटात वाढणारा गर्भ मुलगा की मुलगी हे, स्त्री पुरुष बीज एकत्र येत असतानाच ठरत असतं आणि ते ठरवतं गर्भपेशीमधल्या रंगसूत्रांची तेविसावी जोडी. ही तेविसावी जोडी कुठली असावी हे कोणाच्याच हातात नाही. पण माणुस किती सहज सगळं स्त्रीच्या माथी मारतो. निसर्गाच्या कामात त्याला ढवळाढवळ कशाला करायची असते कोणास ठाऊक. माणसाला अपत्यांचं आणि स्वतःचंही जेंडर ठरवता येतं नाही हे किती बरं आहे. पण जे मिळालय त्यात समाधान मानायचं नाही हा स्वभाव असतो माणसाचा.

मग मी दिसेल त्याला हे विचारायला सुरवात केली की, पुढच्या जन्मी हेच जेंडर घेऊन यायला आवडेल? सुरवात बायकोपासुन केली. ती ज्या पद्धतीनं दुःखाचे पाढे वाचत होती, इतके तर आमच्या गणितांच्या मास्तरांनीही उभ्या हयातीत वाचले नसतील. त्यामुळे अर्थातच तीचं उत्तर ‘पुरुष’ असणार हे गृहीत होतं.

“अर्थातच स्त्री!” बायकोच्या उत्तरानी मी चकीतलोच.

माझा अडाणी चेहरा पाहुन ती पुढे म्हणाली, “तुम्हाला वाटलंच कसं की मी पुरुष म्हणेन? पुरुष असणं म्हणजे फार ग्रेट असतं असं कुठल्या पुरुषाला वाटत असेल तर मला त्याची फक्त किंव येईल कुठल्याही बाईला. पुरुष व्हायला असं काय करायला लागतं? आणि झालात पुरुष, तरी असं काय मिळतं? फार काही मिळवत आहात अशा मनोराज्यात असाल तर मग असे ‘अतृप्त आत्मे’ का असता? स्त्री व्हायला काय जगावं लागतं ते आम्हालांच माहित आणि तसं जगल्यावर काय मिळतं हे सुद्धा…! म्हणजे नक्की काय हे कळणं तुमच्या आवाक्याबाहेरचं आहे. तुमची कुवत फक्त पुरुष होण्यापर्यंतच.”

ती काय म्हणाली ते पुरुष असल्यानं मला खरंच समजलं नव्हतं, पण तिला काय म्हणायचय ते नक्कीच उमजलं होतं. एक अपरिचित, अव्यक्त अस्वस्थता घेऊन मी पुन्हा घराबाहेर पडलो.

गोगटे आज्जी नेहमीसारखंच चाळीच्या व्हरांड्यातून चोरुन आमच्या मारामारीची मजा घेत उभ्या होत्या. मी न विचारताच त्यांनीही “स्त्रीच व्हायला आवडेल” असं उत्तर सांगितलं. “दारु, बिडी, तंबाखु, गुटका, कसल्याही प्रकारचा नाद आणि उकिरडा फुंकणे यापैकी कशातच रस नाही मला. पुरुष होऊन करु काय?” हे त्याचं कारण ऐकुन मात्र मी चाळीच्या बाहेरच निघुन गेलो.

चाळीबाहेर एक नात्यातल्याच बाई भेटल्या. स्त्री-मुक्ती संघटनेचं काम करतात. मला वाटलं की स्त्री-मुक्तीचा सर्वात सोपा उपाय म्हणजे पुरुष होणं. पण त्या म्हणाल्या, “पुरुष का स्त्री हे विचारण्याआधि स्त्री म्हणजे काय ते स्पष्ट करा. जर तुम्हाला ‘करणेषु दासी, शयनेषु रम्भा’ असली स्त्री ची व्याख्या अपेक्षित असेल तर अडलय माझं खेटर. या पलिकडे दिसते का कधी तुम्हाला ती स्त्री? पाखंडीपणा करुन स्त्री म्हणजे ‘अनंतकाळची माता’ वगैरे कोणी ऐकवलं ना तर ‘कमरेत लाथा’ घालु आम्ही. जोडव्यांची बेडी, मंगळसुत्राच्या लगाम, नथीची वेसण आणि कपाळावरचा तो गुलामगिरीचा टिळा… यातून ज्यादिवशी स्त्री मुक्त होईल त्यादिवशी ‘स्त्री का पुरुष?’ हा विचार करेन मी. चिडचिड याची की मूर्ख बायका हे असले जोखड स्वतःच अगदी आनंदानी निवडून निवडून घालतात. त्यांना मुक्त करेपर्यंत लागतील तितके जन्म स्त्री आणि फक्त स्त्रीच !!”

एकही स्त्री अशी मिळाली नाही जिला स्त्री व्हायचं नव्हतं आणि…. एकही पुरुष नव्हता ज्याला स्त्री व्हायचा विचारही झेपला असेल.

वाटलं, असं कोणी असेल तर त्याची कारणंही जाणुन घ्यायला फार आवडेल. कोणी असेल तर…!

चाळीत परत आलो. ढमढेरे वहिनींच उत्तर काय असणार हे ठाऊक असुनही त्यांना म्हणालो की तुम्हाला ‘पुरुष आणि स्त्री’ यातला लिंगभेद खरंच जाणवतो का? आणि ‘पुरुष आहे का स्त्री’ यात काय फरक पडतो? ह्या प्रश्नावर वहिनींनी तर माझं जागेवरच भस्म करुन टाकलं. म्हणाल्या, “त्याचं काय आहे की सगळ्या प्राण्यांसारखा नर आणि मादी हा नैसर्गिक लिंगभेद आपल्या माणुसप्राण्यातही असतोच. पण ‘पुरुष आणि स्त्री’ असा सामाजिक आशय असणारा ‘जेंडर डिफरन्स’ मात्र माणसांमध्येच असतो.

…..आणि फरकाचं म्हणाल तर फार फरक नाहीच. जो फरक आहे तो ‘शेकोटी आणि यज्ञ’ यामध्ये आहे इतकाच..! चटके दोन्हीकडे आहेत, पण पुरुष होणं म्हणजे चकाट्या पिटता पिटता चार काड्या जाळुन उब घेणं आणि स्त्री होणं म्हणजे संसाराच्या यज्ञात आयुष्याची आहुती देणं… बाकी शुन्य.”

ढमढेरे वहिनींचं तर ठरलय. स्त्री व्हायचं माझं धारिष्ट्य आणि लायकी दोन्ही नाही. पण तुमचं काय?

आत्ता आहात त्याऐवजी दुसरं जेंडर घेऊन जन्मलो असतो तर आयुष्य वेगळं असलं असतं, असं वाटत का हो तुम्हाला? पुरुष काय अन् स्त्री काय, फारसा फरक नाही.. हे पटतं का हो तुम्हाला? तुम्हाला होणारा त्रास तुमच्या ह्या जन्मातल्या जेंडरमुळे आहे का हो? समजा जर पुढच्या जन्मी निवडता आली तुम्हाला ती जेंडर ठरवणारी तेविसावी जोडी तर कोण व्हाल? पुरुष? स्त्री? कोण…..?

जळ्ळा मेला बायकांचा जन्म… म्हणुन पुरुष व्हाल? का स्त्री आहात आणि स्त्री होणार… म्हणुन खुष व्हाल?

‘पुरुषच होणं फायद्याचं’ म्हणत… करत राहाल माज ? का स्त्रीच होऊन कावेबाज पुरुषांची… काढत राहाल लाज?

काय नको? काय हवं? विचार करा. बघा…. काही सापडतय का उत्तर ते.

धुंद रवी

http://www.maifal.com