मधे, पुण्यातल्या पापी लोकांनी आयोजीत केलेला एक परिसंवाद ऐकण्याचं पुण्य लाभलं. थांबा, उगाच गैरसमज करुन घेऊ नका. पापी म्हणजे PAPI (पेन्शनर्स असोसिएशन ऑफ पुणे, इंडिया) असं पापी. तर ह्या पाप्यांच्या ‘बापट वाडा, पुणे ३०’ शाखेनी ‘अक्कलदाढा आणि महामंजिष्ठादी काढा – काळाची गरज’ ह्या विषयावर एक परिसंवाद आयोजीत केलेला. आमच्या साहेबांचे सासरे त्या शाखेचे उपखजिनदार असल्यानी हा परिसंवाद ऐकता आला (खरं तर ऐकुन घ्यावा लागला.) आणि जगण्यासाठी माणसाला कशाची नितांत गरज आहे हे समजलं.
ते जे कोण वक्ते होते ते ‘आता जगबुडी होणार आहे आणि हे शेवटचं भाषणं आहे’ असं समजुन सुमारे दोनशे एक्कोणचाळीस मिनिटं बोलत राहिले. गेल्या सदोतीस वर्षांची मळमळ त्यांनी बाहेर काढून घेतली असावी. संवादाच्या शेवटी काढ्याची एक बाटली फुकट मिळाली. (त्याचे पैसे साहेबांनी नंतर पगारातून कापुन घेतले. असो….)
साहेब काहिही म्हणेल पण पुढच्या वेळेला काही ऐकुन घ्यायचं नाही असं ठरवुन घरी आलो. कंटाळून कट्ट्यावर बसलो होतो तर मागुन एक आवाज आला…. “तुमच्याकडे एक काम होतं…. थोडं खाजगी !” चाळीतल्या ७७ वर्षांच्या आगलावे आजोबांनी एकदम दबक्या आवाजात हि विनंती केली आणि येणा-या संकटाच्या चाहुलीनी मला सकाळच्या थंडीतही घाम फुटला. माझा पुर्वानुभव पाहता मी आगलाव्यांना आजपर्यंत १३ वेळा खाजगी किंवा सार्वजनीक कामात मदत केली होती आणि त्यातल्या ११ वेळा शिव्या किंवा मार खाता खाता राहिलोय. (२ वेळा प्रसंग आलेच नाहीत, असं नाही तर, मार खाता खाता न राहता तो खाल्लाच. असो.)
मागे एकदा १५ ऑगस्टला ते माझ्याकडे पोपटाचा एक पिंजरा घेऊन आले आणि म्हणाले की “तुमच्याकडे एक काम होतं…. थोडं सामाजिक ! पंडित नेहरुंसारखं आपण ह्या पक्षाला मुक्त करुन आजचा स्वातंत्र्यदिन साजरा करुयात.”
मी घरी जाऊन नेहरुशर्ट घालुन आलो आणि त्या पोपटाला मुक्त केलं.
नेहरुंच्या कोटावरच्या गुलाबाची शपथ घेऊन सांगतो की तो पोपट तळमजल्यावरच्या वाघमारेचा होता, हे मला माहित नव्हतं. माझ्या पोपट उडवण्यावर वाघमा-यानी चाळीत खुप गोंधळ घातला. इतका गोंधळ तर त्यानी त्याची बायको ‘ढेकणे’बरोबर पळुन गेली होती तेंव्हाही घातला नव्हता. (ढेकण्याचं चाळीबाहेर घड्याळ दुरस्त करण्याचं दुकान आहे आणि ‘वेळ कोणावर सांगुन येत नाही’, असं तो कोटी वेळा तरी म्हणाला असेल. पण त्यानी केलेली वेळेवरची कोटी त्या वेळी आम्हाला कळाली नव्हती. चालायचच.)
सांगायचं इतकंच की आगलाव्यांचं काम म्हणजे जीवावर बेतणारं असतं. “काय काम आहे, आजोबा?” मी विचारलं. “माझ्यासाठी मुलगी बघाल का?”
“पण आजोबा, तुम्हाला तर आधीच तीन मुली, दोन मुलं आणि चौदा नातवंड आहेत. मग अजुन एक नात कशाला दत्तक घेताय?”
“मुर्खासारखं बोलु नकात. मला लग्नासाठी मुलगी बघा असं म्हणतोय मी. ६५ ते ६८ वर्षांची चालेल. ६८ पेक्षा जास्त मोठी नको. अबोल हवी. बहिरी नको आणि……….”
आगलावे आजोबा ‘अखुडशिंगी बहुदुधी अपेक्षांची’ यादी वाचायला लागले. मला कळेना, एक तर ६८ वर्षांची मुलगी शोधायची कुठुन? आणि दुसरं म्हणजे आगलाव्यांच्या घरात ५२ वर्ष राहणा-या त्या ७२ वर्षाच्या मुलीला हे कळालं असतं तर तिनी मला खलबत्यात घालुन कुटलं असतं.
खरं तर कुठल्याही वयात माणुस लग्न का करतो हा प्रश्न असतोच, पण तरिही ह्या वयात आजोबांना लग्न का करायचय हे विचारलं तर म्हणाले की, “घरात कोणी ऐकतच नाही माझं. नवी नवरी घरात आली तर निदान २-३ वर्षं तरी कोणीतरी ऐकेल माझं.”
५२ वर्षांच्या सक्तमजुरीनंतरही आजोबांना तोच गुन्हा पुन्हा करायचा होता आणि त्यामागे कारण एकच………
‘…………….कोणीतरी आपलं ऐकुन घ्यावं!!’
संध्याकाळी कामावरुन परत आलो तर चाळीच्या अंगणात हिऽऽऽऽऽऽ गर्दी. काहितरी समारंभ होता. आजोबांचा साखरपुडा तर नाही ना? असं वाटलं. पण कळालं की चोर पकडला म्हणुन आमच्या चाळीनी गुरख्याचा सत्कार ठेवला होता.
मला दोन गोष्टी समजल्या नाहीत.
१. आमच्या चाळीत चोरी करावी असं त्या चोराला का वाटले असावे? (इतके कल्पनादारिद्र्य ??)
२. शेळी इतकंच धष्टपुष्ट असलेल्या त्या गुरख्यानी तो रानरेड्यासारखा चोर कसा पकडला असावा?
त्या गुरख्याला जरा कडेला घेउन विचारलं तर समजलं की त्यानी चोराला चोरी करताना फक्त पाहिलं होतं आणि तो आरडाओरडा करणारच होता पण त्या दोघांमध्ये एक तह झाला. गुरख्यानी चोराला चोरी करुन द्यायची आणि त्याबदल्यात चोरानी गुरख्याचं ऐकुन घ्यायचं. आधी चोराला हे सोप्पं वाटलं, पण दिवसा झोपणा-या आणि रात्रभर एकटाच फिरणा-या त्या गुरख्याला किती काय बोलायच होतं… नतद्रष्ट डासांपासुन ते अस्वच्छ संडासांपर्यंत तो गुरखा इतकं काही बोलला की शेवटी चोरानीच आरडाओरड केली आणि लोकांना गोळा करुन पोलीसचौकीत गेला.
हे चाळक-यांना कळालं असतं तर त्यांनी गुरख्याला चोरापेक्षा जास्त हाणला असता. पण हे माहित असुनही गुरख्यानी धोका पत्करला. आणि त्यामागे कारण एकच……..
‘…………….कोणीतरी आपलं ऐकुन घ्यावं!!’
या सत्कार समारंभाच्या नावाखाली बराच वेळ चकाट्या पिटून घरी आलो. वातावरण तंग होतं कारण घरात शांतता होती. वादळानंतरची शांतता. अर्थात माझ्याच हातुन कुठलातरी अक्षम्य गुन्हा घडला असणार. पण काय तेच मला कळत नव्हतं… किंवा आठवत नव्हतं. मी बायकोनी तोफ डागण्याची वाट बघत बसलो, पण तीही धुरंधर एक शब्द बोलेल तर शपथ. मग तीच म्हणाली, “नाही आठवत आहे काही तर द्या ना सोडून. कशाला आठवण्याचे कष्ट घेताय? उगाच तुमच्या नाजुक मेंदूला परिश्रम. तसंही कधी लक्ष असतं का तुमचं माझ्याकडे? कधी ऐकुन घेता का माझं?” हे सगळं मी ऐकुन घेत होतो पण हा मुळ विषय नव्हताच, याच दुःख जास्त होतं.
दरम्यान लेकीनी मला छळायला सुरवात केली होती. थोडा वेळ बाहेर जाऊन खेळ हे तिला सतरा वेळा सांगुनही तिनी काही ऐकलं नाही. मग घातला एक धपाटा आणि हकलली बाहेर. या कलहाचा अंत गैरसमज खात्रीत बदलण्यानी झाला. बायकोला उगाचंच वाटतं की मी तिचं ऐकुन घेत नाही, माझी खंत होती की मुलगी माझं अगदीच ऐकत नाही आणि मुलीची तक्रार होती की आई ऐकुनच घेत नाही. विषय काहीही असु दे आशय एकच….
‘…………….कोणीतरी आपलं ऐकुन घ्यावं!!’
दुस-या दिवशी ढमढेरे वहिनी भेटल्या. माझ्या डोक्यात येणारा प्रत्येक वेडेपणा त्या ईमानदारीत विनातक्रार ऐकुन घेतात. म्हणुन त्यांना म्हणालो की, “समोरच्यानी ऐकुन घ्यावं याची इतकी गरज का असते आपल्याला? असं काय मोठं सांगायचं असतं? समजा अगदी सगळं जग ऐकतय, तरी असं काय सांगणार आहोत आपण???”
वहिनी म्हणाल्या, “काय सांगायचय हे महत्वाचं नसतंच ब-याचदा. पण आपल्याकडे सांगायला ‘काहीतरी’ आहे आणि ते काहीतरी ऐकायला ‘कोणीतरी’ आहे, यासारखं दुसरं समाधान नसतं. ऐकायला कोणी नसेल तर जे घडलय त्याला काही अर्थच उरत नाही ना….
एखादं लहान मुल खेळताना जोरात पडतं. पण ते सांगायला आई आसपास नसेल तर बिचारं रडत सुद्धा नाही. आतल्याआत घुसमटुन जातं. आणि जर आई जवळ असेल तर पुढची चार मिनिटं आभाळ फाटल्यासारखं रड रड रडतं. पण पाचव्या मिनिटाला मोकळं असतं आणि खेळायलाही लागतं. क्षण असे वाहतेच हवे. ते साठुन राहिले तर डबकंच होणार.
आणि सगळं जग ऐकणार असेल तर एक गोष्ट नक्की सांगेन. एखाद्याला सुख द्यायचं असेल तर त्याला काहीतरी द्यायलाच लागतं असं नाही. काही घेण्यानी सुद्धा तुम्ही त्याला खुप आनंद देऊ शकता. ऐकुन घेण्यानी. समोरच्याचं जगणं सोपं होणार असेल तर चार शब्द ऐकुन घेणं काय अवघड असतं…..?”
ढमढेरे वहिनींच ऐकतो, हे मी चांगलं करतो. ह्यावेळेस अजुन एक चांगली गोष्ट केली. घरी गेलो आणि बायकोसमोर जाऊन उभं राहिलो…. तिचं ऐकुन घेण्यासाठी! पुढची दहा मिनिटं आभाळ फाटल्यासारखं बोलत राहिली. पण अकराव्या मिनिटाला एकदम शांत वाटली….. मोकळी वाटली. म्हणाली,
“चाफ्याचा वास काय भरुन राहिलाय ना घरात! आज काय तुम्ही फुलं आणलियेत मला द्यायला?……”
ढमढेरे वहिनींचं तर ठरलय. पण तुमचं काय?
वर्षानुवर्ष साठुन राहिलीये अशी काही गोष्ट आहे का हो तुमच्या मनात ? कितीही दमला असाल तरी झोपण्यापुर्वी डायरी लिहताच का तुम्ही ? ‘सांगण्यासारखं खुप काही पण ऐकायलाच कोणी नाही’ अस झालय का हो कधी ? आणि मग समजा सगळं जग ऐकतय, काय सांगाल तुम्ही?
द्याल शिव्या जगालाच आणि सगळी गरळ ओकाल?
का जागतिक शांतीवर एक ढासू भाषण ठोकाल?
मांडाल तुमची दुःख… का सुख वाटुन जाल?
का श्रोत्यांविना तडफडणा-या तुमच्या कविता वाचुन जाल?
काय बोलाल? काय सांगाल?
विचार करा… बघा…. काही सापडतय का उत्तर ते. माझा विचार अजुन चालुच आहे आणि तो पक्का झाला की कळवेनच….!
धुंद रवी