समजा संकटाच्या क्षणी तुम्हाला तीनच वस्तू नेता आल्या…

“…..फेकुन दे हे कच-यात !! “

छातीत धडकी भरावी असा वीजेचा कडकडाट होतो ना कधीकधी अगदी तस्साच आतल्या खोलीतुन बायकोचा आवाज आला. मी माझ्या एका कोकणस्थ मित्राशी बाहेरच्या खोलीत बोलत बसलो होतो. शास्त्र म्हणतं की ध्वनीच्या वेगापेक्षा प्रकाशाचा वेग जास्त असतो. ह्यालाच अनुसरुन बायकोचा ‘फेकुन दे हे कच-यात’ हा ध्वनी पोहचण्याआधिच एक लाल प्रकाश वेगानी माझ्याकडे येताना मला दिसला. सिर सलामत तो पगडी पचास हे लग्नानंतर शिकल्यामुळे, ती लाल रंगाचा प्रकाश फेकणारी वस्तू बघुन मी सिर झुकवलं.

गंमत म्हणजे ती वस्तू म्हणजे एक पगडीच होती, पण नेहमीची नाही तर वाळ्याची पगडी, ज्याच्या एका कडेला एक छोटा पंखा होता आणि डावीकडुन एक लाल रंगाचा प्रकाश टाकणारी बॅटरी बसवली होती. उन्हाळ्यात कधी प्रवासाला गेलो तर डोकं थंड रहावं म्हणुन वाळा,       वा-यासाठी पंखा आणि प्रवासात रात्री वाचन करता यावं म्हणुन बॅटरी अश्या त्यात सोई होत्या. पण उत्साहानी विकत घेऊनही गेल्या १७३ वर्षात मी ती एकदाही न वापरल्यानी ती घरातच पडली होती आणि त्याचा शेवट आज “…..फेकुन दे हे कच-यात !!” ह्या आदेशानी झाला. 

ती पगडी बायकोच्या वजनदार आदेशासकट माझ्या त्या मित्राच्या डोक्यात बसली. एकतर त्या पगडीचा वाळा कडक झालेला, त्यात पंखा, त्यात बॅटरी… असं सगळं त्या बिचा-या कोकणस्थ मित्राच्या डोक्यात बसलं. मी असं सारखं कोकणस्थ कोकणस्थ म्हणण्याचं कारण की कोकणस्थ असल्यामुळे त्याला हे सगळं नविन होतं. त्याला फक्त कुचकट आणि तुसडं वागुन शब्दबंबाळ करण्याची सवय… हे असं रक्तबंबाळ त्याला जरा अवघड गेलं.. त्यात त्याला पसा-याची सवय नव्हती. माझी बायको घरातल्या पसा-यात काहितरी महत्वाची वस्तू शोधण्याच्या उदात्त हेतुनी पसारा अजुनच वाढवत होती. हे असं बायकोनी घर आवरायला काढलं की माझी मोठी पंचाईत होती. वस्तु सापडणं कठिण होऊन जातं.

आमच्या घरातला तो विश्वाचा पसारा पाहुन मित्रच जास्त लाजुन गेला होता. म्हणाला….. “मी पण हल्ली तुझ्यासारखा देशस्थ होऊ घातलोय.”

का रे? असं का वाटलं तुला?

अरे परवा मला माझ्या कुडत्याची बटणंच सापडत नव्हती.

बास, एवढच? मग तु कसला रे देशस्थ? ज्यादिवशी तुला आख्खा कुडताच सापडणार नाही तेंव्हा म्हण स्वतःला देशस्थ….!!

वास्तविक हा इतकाही वाईट विनोद नव्हता आणि बायको नेमकं माझा कुठलातरी कुडता शोधतीये हे देवाशप्पथ मला माहिती नव्हतं. पण गैरसमज करुन घेण्याचा बायकोचा जन्मसिद्ध हक्क असल्यामुळे तिच्या कडुन आणखिन एक वाक्य प्रकाशवेगा पेक्षा जास्त वेगानी आलं…..

“असं होतं तर करायचं होतं एखाद्या घा-यागो-या कोकीशी लग्न…. मग तुम्हाला कळालं असतं की……..

मला काही कळो ना कळो त्या कोक्याला काय ते कळाल्यानी त्यानी घर सोडलं….! अर्थात बायकोनी विषय सोडला नव्हता. मी साठवलेल्या सुमारे १३९ गोष्टी तिनी आणुन माझ्या पायावर ओतल्या आणि म्हणाली की “हे असलं काही आणुन घरात कोंबलं ना की नाहीच मिळणार कुडता…. संध्याकाळ पर्यंत विचार करा की तुम्हाला ह्यातलं काय काय हवय…. जमल्यास फेकुन द्या सगळं…. आणि सगळं फेकुन देणं शक्य नसेल तर जास्तीत जास्त तीन वस्तु ठेवायची परवानगी देते तुम्हाला…. म्हणजे उद्या आणीबाणीच्या परिस्थितीत जर दोन-तीनच वस्तु न्यायच्या झाल्या तर कोणत्या वस्तु ठेवाल.. तेवढ्याच ठेवा…”

मी विचार करायला लागलो. उद्या खरच काही संकट आलं आणि घरातल्या तीनच वस्तु घेऊन निघायचं झालं तर काय नेईन मी? कितीही नको नको म्हंटलं तरी वीस-बावीसच्या खाली यादीच निघेना. वस्तु निवडताना माझी.. ‘देशस्थाची’.. तारांबळच उडाली….! विचार करत करत कधी घराबाहेर पडलो कळालच नाही. चौकातल्या चहाच्या टपरीवर चहा मारत बसलो.

थोड्यावेळानी माझ्याशेजारी अंमळ वेडा दिसणारा माणसासारखा एक प्राणी येऊन बसला. त्याच्या अवतारावरुन हे कोणीही सांगितलं असतं की तो एकतर अविचलीत शास्त्रज्ञ असणार किंवा अविवाहीत चित्रकार तरी.

तो चित्रकारच निघाला, कारण त्या टपरीबाहेर लोकांनी पचापच काढलेल्या गुटख्याच्या रांगोळ्यांमधुन वेगवेगळे आकार शोधत होता आणि त्यातल्या शेड्स बघुन फार खुष होत होता. मी त्याच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरवात केली. एका चित्रकाराच्या घरी चित्रं सोडून काय असणार हे ठाऊक असुनही त्याला विचारलं की तीनच वस्तू घेऊन पळायची वेळ आली तर काय निवडाल. त्याचं उत्तर मोठं अजीब होतं. म्हणाला, “अर्धवट काढलेली दोन चित्रं, एक रिकामी कलरट्युब आणि एक बटवा.”

अर्थात मला त्याचं उत्तर मॉडर्नआर्ट इतकंच ‘सोपं’ वाटलं…. कारण ते डोक्यावरुन चांगलं फूटभर उंचीवरुन गेलं. मग त्याला जरा रंगवुन सांगा म्हणालो, तर म्हणाला, “काढून झालेली चित्र नेण्यात काय हशील आहे? जे मी आधीच उपभोगलय, जे पूर्णत्वाला गेलय ते किती काळ कवटाळून बसणार. त्यापेक्षा अपूर्णता जपावी माणसानी. निदान पूर्णत्वाची ओढ त्यातला माणुस जिवंत ठेवते. आणि ती रिकामी कलरट्युब यासाठी की एकदा दोन दिवस काही खायलाच मिळालं नाही मला. पैसेच नव्हते. ते दोन दिवस भुकेल्या पोटी एक चित्र रंगवत बसलो होतो. मग रंगही संपले. तिस-या दिवशी थोडे पैसे मिळाले तेंव्हा आधी एक कलरट्युब आणली, चित्र पूर्ण केलं आणि मगच जेवलो. ती रिकामी कलरट्युब पाहिली की एखादं अॅवॉर्ड मिळाल्याचा आनंद होतो मला. माझ्यातला कलाकार जिवंत राहतो त्यानी. आणि बटव्याचं म्हणाल तर त्यात सोन्याची नाणी आहेत.”

“सोन्याची नाणी ?”      

“हो… कलाकारानी दळिद्री अवस्थेत आणि भणंग राहवं असा काही नियम आहे का? मी पूर्वी गरीब होतो, पण आता माझ्या चित्रांची किंमत हजारात असते. पण मी पूर्वी जगायचे तसाच जगतो अजुनही. त्या पैशाची फार ओढ नाही मला, पण जर पोटाची काळजी करायला लागणार नसेल तर मनाचे चोचले पुरवता येतात. या पैशातून मी हजारो कॅनव्हास, रंगांच्या बाटल्या आणुन हवी तेवढी चित्र काढु शकतो… आणि ते ही भरल्या पोटी. कला जपता येणार असेल तर एका कलाकाराला अजुन काय हवं?”

पोटाच्यामागे धावता धावता मी किती लांब आलोय याची आज पुन्हा जाणिव झाली,

कारण माझ्या त्या वीस-बावीस गोष्टींच्या यादीत माझं हार्मिनियम नव्हतंच. ‘फार वजन असलेल्या गोष्टी घ्यायला नको’ म्हणुन न घेतलेल्या त्या हार्मोनियमच्या आठवणींच ओझं माझ्या श्वासांना पेलवेनाच. मी घरी परतलो आणि गालावरुन मोरपिस फिरवावं तसं माझ्या हार्मोनियमवरुन हात फिरवायला लागलो. “इतक्या नाजुकपणे हात फिरवाल तर त्यावर साठलेल्या धूळीवरची धूळ पण झटकली जाणार नाही.” या बायकोच्या वाक्यानी भानावर आलो. त्या पेटीवरची (का मनावरची, कोणास ठाऊक!) धूळ झटकली आणि त्या तीन वस्तूंपैकी एक ‘हार्मोनियम’ न्यायचं हे ठरवुन टाकलं.

आमच्या ढमढेरेवहिनी म्हणजे अगदी जीव ओतुन संसार उभा केलेली बाई. त्यांना विचारलं तर, दणका घातल्यावर कधीकधी चालु होणारा आणि ढमढे-यांना कुठल्यातरी स्कीममध्ये चकटफू मिळालेला कृष्णधवल टिव्ही, माहेरुन आणलेला आरसा आणि नव-याशी भांडुन घेतलेली पैठणी ह्या वस्तु घेऊन वहिनी पळतील ह्याची खात्रीच होती मला. तरी विचारलंच मी ढमढेरे वहिनींनी तर एकदम भावनाकुलच झाल्या. थोडा वेळ बोलल्याच नाहीत आणि बोलल्या तेंव्हा माझ्यापेक्षा स्वतःशीच बोलल्या. म्हणाल्या,

“देवघरातला बाळकृष्ण, माझ्या आजीची एक जुनाट फाटलेली पण उबदार नववारी साडी आणि मी पहिल्या बाळंतपणाला माहेरी गेलेले तेंव्हा मिस्टर ढमढे-यांनी मला लिहलेलं पहिलं आणि शेवटचं पत्र !”

मी पुन्हा एकदा निःशब्द घरी परतलो. आपण किती चुकतो ना माणसांना ओळखायला…! नुसते हिशोब करुन आपण त्यातलं मुल्यच हरवुन बसतो आणि मग खुप मोठी किंमत चुकवतो. ढमढेरे वहिनी इतक्या श्रीमंत असतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं…

ढमढेरे वहिनींचं तर ठरलय. पण तुमचं काय?

घरात तुम्ही काय काय बिनकामाचं साठवुन ठेवलय ते कधी पाहयलय का हो तुम्ही? घरातल्या अनावश्यक वस्तू फेकल्या तर तुम्ही राहता ते घर बरंच मोठं आहे, असं लक्षात आलय का तुमच्या?

ह्या वस्तूंमध्ये तुमच्या कित्येक महत्वाच्या वस्तू हरवुन गेल्यात हे कळतय का तुम्हाला? देव न करो, पण समजा एखाद्या संकटाच्या क्षणी तुम्हाला तुमच्या घरातल्या तीनच वस्तु बाहेर न्यायच्या झाल्या तर कुठल्या कुठल्या न्याल?

 

क्रेडीट कार्ड्स

का ग्रिटिंग कार्ड्स ?

महत्वाची कागदपत्र

का मैत्रीणीची प्रेमपत्र ?  

पैशाचं पाकीट…?

का आठवणीत भिजलेलं आजोबांचं जाकीट ?

कशासाठी धावाल ? काय वाचवाल ? 

विचार करा… बघा…. काही सापडतय का उत्तर ते. माझा विचार अजुन चालुच आहे आणि तो पक्का झाला की कळवेनच….!

धुंद रवी

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s