“जळ्ला मेला बायकांचा जन्म….!”
हे वाक्य बायकोनी मला इतक्यादा ऐकवलं की ‘जळ्ला मेला जन्म-जळ्ळेल्या-बाईच्या नव-याचा जन्म’ असं मला वाटायला लागलं. बर बायकोचं नक्की काय बिनसलय ते सुद्धा कळत नव्हतं. त्यात ती अगदीच वैश्विक पातळीवर बोलत असल्यामुळे मला वैयक्तिक मुद्दे उकरुन आणि खोडुन दोन्ही काढता येईना. ढमढेरे वहिनींसारखं व्यक्तिगत हल्ला करण्याऐवजी ती समस्त स्त्री जातीच्या व्यथा फुण्फुणत होती, त्यामुळे उगाच ते भडकलेलं विश्वव्यापी वादळ अंगावर घेण्यात काही अर्थ नव्हता.
हो… स्त्री-पुरुष असा वाद झाला की ढमढेरे वहिनी डायरेक्ट पर्सनल अॅटॅक करतात. स्त्रीच्या (नुसत्या नाही, तर विवाहीत स्त्रीच्या) हळव्या मनातली खंत मांडणारी एक टचिंग कविता एकदा त्यांनी मिस्टर ढमढे-यांवर केली होती. शोकांतिका नावाच्या मासिकात ती छापुन सुद्धा आली होती.
तु भेटेपर्यंत,
आयुष्यात फक्त..
दुःख होतं, वेदना होत्या.
भोग होते, यातना होत्या.
हाल होते, आपेष्टा होत्या.
तु आयुष्यात आलास…
आणि मग…
आणि मग उरलेल्या आयुष्याची पण वाट लागली.
माझ्याही बायकोची गाडी हळुहळु ढमढेरे वहिनींच्या ट्रॅकवर यायला लागली तसं मी “आलोच” म्हणुन गेलोच. बाहेर जाऊन चाळीतल्या कट्यावर बसलो.
कट्ट्यावर आगलावे आजोबा बसले होते. बहुतेक त्यांच्या घरातल्या जळ्ळ्याजन्माचे चटके त्यांना बसले होते. मी विचारलं की काय झालं तर म्हणाले, “आज चेटकिणीनी शाप दिला!”
मला मान्य आहे की आगलावे आज्जी एकदम पांढ-या फटक्क गो-या आहेत आणि दात पडल्यामुळे त्या जरा अघोरी सुंदर दिसतात, पण म्हणुन त्यांनी आजोबांना शाप वगैरे दिला असेल हे न पटण्यासारखं होतं. उगाच का आज्जींना वाईट करताय? असं म्हणालो तर म्हणाले, “लग्नानंतर महिन्यातच मला कळालं की लग्नांनंतरच्या पहिल्या वटपौर्णिमेला जर नववधुनी वडाची पुजा केली तर तिला तो पती सात जन्म लाभतो, पण पुजा चुकली तर ती सुवासिनी नरकात जाते. मग मी काय केलं, आमची ही आंघोळीला गेल्यावर न्हाणीघराला बाहेरुन कडी लावली आणि पळुन गेलो. गेली अठ्ठेचाळीस वर्ष तिला वाटत होतं की ती कडी माझ्या आईनी लावली होती म्हणुन.
पण आज माझं हे रहस्य त्या हलकट वासुनान्यानी त्याच्या भोचक बायकोला आणि तिनी माझ्या बायकोला सांगितलं. मग बायकोनी मला शाप दिला की पुढचे ८३ जन्म ती माझीच बायको बनुन येईल.” मला आगलावे आजोबांविषयी कमालीची कणव वाटली. पण त्यांनी यावरचा उपाय आधिच शोधुन ठेवला होता… पुढच्या जन्मी अर्धवट आणि तिरसट पुरुष म्हणुन जन्म घेण्याचा. (म्हणजे ते ह्या जन्मात तसे नाहीत असा त्यांचा समज होता.) वासुनाना दिसल्यामुळे आजोबा त्यांच्या पाठीत गुद्दा घालयला निघुन गेले. थोड्यावेळानी सदाभाऊ कट्ट्यावर येऊन बसले.
सदाभाऊ स्वतःच्या मंडळींना ‘तीन मुलींच्या अपेक्षाभंगानंतर चौथ्या खेपेसाठी’ माहेरी सोडून आले होते. “बास की आता सदाभाऊ. अजुन किती?” असं त्यांना म्हणालो तर म्हणाले की, “झालं.. झालं. हे शेवटचंच. यावेळेला बायको नक्की मुलगा देणार बघा. तोडगाच असा भारी केलाय की….”
“कसला तोडगा?”
“मुलगाच होण्याचा गॅरेंटेड तोडगा. अभद्र अमावस्येला मध्यरात्री केळीच्या पानावर पेरुची कोशींबीर पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवली की मुलगा होणार म्हणजे होणारच.”
“पण तरिही मुलगीच झाली तर?”
“तर पुढच्या वेळेला भगद्र पौर्णिमेला भल्यापहाटे चिंचेच्या पाल्यावर केळीचं शिकरण आंब्याच्या झाडावर नेऊन ठेवायचं. हा तोडगा तर एकदम खात्रीचाच.”
“त्यापेक्षा तुम्ही प्रत्येक झाडाखाली फ्रुट सॅलेड का नाही ठेवत?” असं विचारलं तर सदाभाऊंना राग आला. म्हणाले “तुम्ही जळताय. खर सांगा, तुम्हालाही हवाय की नाही मुलगाच?”
सदाभाऊंच्या ह्या भिकार प्रश्नानी मी अचानक सहा-सात वर्ष मागं गेलो आणि दवाखान्यात पोहचलो. बायको ऑपरेशन टेबलवर होती आणि मी गॅसवर. मी पहिलटकर असल्यामुळे मी फार घाबरलो होतो. बायकोच अधुनमधुन धीर देत होती मला. तिला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले तसं एकटा पडलो मी. दवाखान्यात जोरदार गर्दी होती.
एखाद्या साडीच्या दुकानात सेल लागल्यावर आपल्या हातातून चांगली साडी जाऊ नये म्हणुन सगळ्या बायका एकाच वेळेला तिथे गर्दी करतात, तसंच इथेही चांगलं बाळ हातातून जाऊ नये म्हणुन ब-याच बायका डिलेव्हरायला आल्या होत्या. काऊंटरवर असं एकदम पाच-सहा बायका आल्यानी डॉक्टरांची तारांबळ उडाली होती. त्यात त्या बिचा-या बायका कण्हत, व्हिवळत, ओरडत होत्या. आयुष्यातला सर्वोच्च आनंद मिळण्याआधि टोकाची वेदना का भोगावी लागते.. कोणास ठाऊक?
बायकांच्या रडण्यात आता मुलांच्या रडण्याचेही आवाज मिळायला लागले. थोड्याच वेळात नर्स एका गोंडस बाळाला घेऊन आली… आणि माझ्या हातात ती ‘परी’ देत म्हणाली… “ही तुमची धनाची पेटी. आम्हाला पण हवी काहीतरी बक्षिसी.” मला खरंच जगातला सगळ्यात श्रीमंत माणुस असल्यासारखं वाटायला लागलं. मी जर कुठल्या संस्थानाचा राजा वगैरे असतो तर गळ्यातला कंठा किंवा हातातलं कडं काढुन दिलं असतं… हत्तीवरुन साखर वाटली असती… घोड्यावरुन चांदीची नाणी वाटली असती… उंटावरुन शेळ्या हकल्या असत्या…. काय करु आणि काय नको असं मला होऊन गेलं.
अनोळखी असुनही माझ्या आनंदाविषयी असुया वाटुन घेणारा एक नवजात बाप अत्यंत पराभूत चेह-यानी माझ्याशेजारी उभा होता. थोडं मन मोकळं करायचं म्हणुन मला म्हणाला, “आयला… लकी आहे राव तुम्ही. आमच्या बायकोनी केलाच वांदा. तरी तिला बजावलं होतं की मुलगी जन्माला घातली तर माझ्याशी गाठ आहे म्हणुन. पन नशीबात आनंदच नाय आपल्या! क्वांग्रॅट्स, तुम्हाला मुलगा झाला.”
“पण मला मुलगा नाही, मुलगी झालीये.” – मी.
मग एवढं आनंदी व्हायला काय झालय? मला वाटलं मुलगा झाला म्हनुन नाचताय.” – तो.
यावर कसं रिअॅक्ट व्हावं मला कळेनाच. फक्त तोच बाप दुःखी होता असं नाही, तर त्यादिवशी सगळ्याच बायकांना मुली झाल्याची आपत्ती कोसळल्यामुळे सगळ्या दवाखान्यावरच शोककळा पसरली होती. लोकं एकमेकांचं सांत्वन करत होते. “जाऊ द्या… घ्या सांभाळून… पुढल्या वेळेस होईल मुलगा” अशी एकमेकांची समजूत काढत होते. हा घृणास्पद प्रकार पाहुन एक नर्स म्हणाली, “लक्ष्मी आलीये घरी सगळ्यांच्या. कशाला उगाच उदास होताय. त्यांचं नशीब त्या घेऊन आल्या. मागच्या आठवड्यात सगळी मुलंच झाली. आज सगळ्या मुली. असं व्हायचंच.”
“अर्रर्रर्रर्र… मागच्या आठवड्यात का नाय झाली बायको बाळंत? हिला ना अक्कलच नाय.” अशी एक खंत व्यक्त झाली आणि मग ती नर्स खचलीच. सगळ्यात कमाल केली ती एका बाईच्या नव-यानी आणि तिच्या सासूनी. मुलगी जन्माला घातली म्हणुन ते त्या बाईवर इतके वैतागले की तिला आणि पोरीला न बघताच निघुन गेले. मला सखेद आश्चर्य वाटलं. मुलगा होणं इतकं गरजेचं असतं का? त्याहीपेक्षा मुलगी होणं इतकं अपमानास्पद असतं का? एका पुरषाला असं वाटण्यासोबत एका स्त्रीलाही असं वाटतं तेंव्हा तर यासारखं दुर्दैव नाही. मधल्यामध्ये त्या मुलीच्या आईला मात्र अपराधी वाटतं….!
“बोला की आता? आता का गप्प बसलात?”
….असं सदाभाऊंनी विचारलं तसा भानावर आलो. पण पुढच्या विचारात हरवुन जाण्यासाठी. खरं तर, पोटात वाढणारा गर्भ मुलगा की मुलगी हे, स्त्री पुरुष बीज एकत्र येत असतानाच ठरत असतं आणि ते ठरवतं गर्भपेशीमधल्या रंगसूत्रांची तेविसावी जोडी. ही तेविसावी जोडी कुठली असावी हे कोणाच्याच हातात नाही. पण माणुस किती सहज सगळं स्त्रीच्या माथी मारतो. निसर्गाच्या कामात त्याला ढवळाढवळ कशाला करायची असते कोणास ठाऊक. माणसाला अपत्यांचं आणि स्वतःचंही जेंडर ठरवता येतं नाही हे किती बरं आहे. पण जे मिळालय त्यात समाधान मानायचं नाही हा स्वभाव असतो माणसाचा.
मग मी दिसेल त्याला हे विचारायला सुरवात केली की, पुढच्या जन्मी हेच जेंडर घेऊन यायला आवडेल? सुरवात बायकोपासुन केली. ती ज्या पद्धतीनं दुःखाचे पाढे वाचत होती, इतके तर आमच्या गणितांच्या मास्तरांनीही उभ्या हयातीत वाचले नसतील. त्यामुळे अर्थातच तीचं उत्तर ‘पुरुष’ असणार हे गृहीत होतं.
“अर्थातच स्त्री!” बायकोच्या उत्तरानी मी चकीतलोच.
माझा अडाणी चेहरा पाहुन ती पुढे म्हणाली, “तुम्हाला वाटलंच कसं की मी पुरुष म्हणेन? पुरुष असणं म्हणजे फार ग्रेट असतं असं कुठल्या पुरुषाला वाटत असेल तर मला त्याची फक्त किंव येईल कुठल्याही बाईला. पुरुष व्हायला असं काय करायला लागतं? आणि झालात पुरुष, तरी असं काय मिळतं? फार काही मिळवत आहात अशा मनोराज्यात असाल तर मग असे ‘अतृप्त आत्मे’ का असता? स्त्री व्हायला काय जगावं लागतं ते आम्हालांच माहित आणि तसं जगल्यावर काय मिळतं हे सुद्धा…! म्हणजे नक्की काय हे कळणं तुमच्या आवाक्याबाहेरचं आहे. तुमची कुवत फक्त पुरुष होण्यापर्यंतच.”
ती काय म्हणाली ते पुरुष असल्यानं मला खरंच समजलं नव्हतं, पण तिला काय म्हणायचय ते नक्कीच उमजलं होतं. एक अपरिचित, अव्यक्त अस्वस्थता घेऊन मी पुन्हा घराबाहेर पडलो.
गोगटे आज्जी नेहमीसारखंच चाळीच्या व्हरांड्यातून चोरुन आमच्या मारामारीची मजा घेत उभ्या होत्या. मी न विचारताच त्यांनीही “स्त्रीच व्हायला आवडेल” असं उत्तर सांगितलं. “दारु, बिडी, तंबाखु, गुटका, कसल्याही प्रकारचा नाद आणि उकिरडा फुंकणे यापैकी कशातच रस नाही मला. पुरुष होऊन करु काय?” हे त्याचं कारण ऐकुन मात्र मी चाळीच्या बाहेरच निघुन गेलो.
चाळीबाहेर एक नात्यातल्याच बाई भेटल्या. स्त्री-मुक्ती संघटनेचं काम करतात. मला वाटलं की स्त्री-मुक्तीचा सर्वात सोपा उपाय म्हणजे पुरुष होणं. पण त्या म्हणाल्या, “पुरुष का स्त्री हे विचारण्याआधि स्त्री म्हणजे काय ते स्पष्ट करा. जर तुम्हाला ‘करणेषु दासी, शयनेषु रम्भा’ असली स्त्री ची व्याख्या अपेक्षित असेल तर अडलय माझं खेटर. या पलिकडे दिसते का कधी तुम्हाला ती स्त्री? पाखंडीपणा करुन स्त्री म्हणजे ‘अनंतकाळची माता’ वगैरे कोणी ऐकवलं ना तर ‘कमरेत लाथा’ घालु आम्ही. जोडव्यांची बेडी, मंगळसुत्राच्या लगाम, नथीची वेसण आणि कपाळावरचा तो गुलामगिरीचा टिळा… यातून ज्यादिवशी स्त्री मुक्त होईल त्यादिवशी ‘स्त्री का पुरुष?’ हा विचार करेन मी. चिडचिड याची की मूर्ख बायका हे असले जोखड स्वतःच अगदी आनंदानी निवडून निवडून घालतात. त्यांना मुक्त करेपर्यंत लागतील तितके जन्म स्त्री आणि फक्त स्त्रीच !!”
एकही स्त्री अशी मिळाली नाही जिला स्त्री व्हायचं नव्हतं आणि…. एकही पुरुष नव्हता ज्याला स्त्री व्हायचा विचारही झेपला असेल.
वाटलं, असं कोणी असेल तर त्याची कारणंही जाणुन घ्यायला फार आवडेल. कोणी असेल तर…!
चाळीत परत आलो. ढमढेरे वहिनींच उत्तर काय असणार हे ठाऊक असुनही त्यांना म्हणालो की तुम्हाला ‘पुरुष आणि स्त्री’ यातला लिंगभेद खरंच जाणवतो का? आणि ‘पुरुष आहे का स्त्री’ यात काय फरक पडतो? ह्या प्रश्नावर वहिनींनी तर माझं जागेवरच भस्म करुन टाकलं. म्हणाल्या, “त्याचं काय आहे की सगळ्या प्राण्यांसारखा नर आणि मादी हा नैसर्गिक लिंगभेद आपल्या माणुसप्राण्यातही असतोच. पण ‘पुरुष आणि स्त्री’ असा सामाजिक आशय असणारा ‘जेंडर डिफरन्स’ मात्र माणसांमध्येच असतो.
…..आणि फरकाचं म्हणाल तर फार फरक नाहीच. जो फरक आहे तो ‘शेकोटी आणि यज्ञ’ यामध्ये आहे इतकाच..! चटके दोन्हीकडे आहेत, पण पुरुष होणं म्हणजे चकाट्या पिटता पिटता चार काड्या जाळुन उब घेणं आणि स्त्री होणं म्हणजे संसाराच्या यज्ञात आयुष्याची आहुती देणं… बाकी शुन्य.”
ढमढेरे वहिनींचं तर ठरलय. स्त्री व्हायचं माझं धारिष्ट्य आणि लायकी दोन्ही नाही. पण तुमचं काय?
आत्ता आहात त्याऐवजी दुसरं जेंडर घेऊन जन्मलो असतो तर आयुष्य वेगळं असलं असतं, असं वाटत का हो तुम्हाला? पुरुष काय अन् स्त्री काय, फारसा फरक नाही.. हे पटतं का हो तुम्हाला? तुम्हाला होणारा त्रास तुमच्या ह्या जन्मातल्या जेंडरमुळे आहे का हो? समजा जर पुढच्या जन्मी निवडता आली तुम्हाला ती जेंडर ठरवणारी तेविसावी जोडी तर कोण व्हाल? पुरुष? स्त्री? कोण…..?
जळ्ळा मेला बायकांचा जन्म… म्हणुन पुरुष व्हाल? का स्त्री आहात आणि स्त्री होणार… म्हणुन खुष व्हाल?
‘पुरुषच होणं फायद्याचं’ म्हणत… करत राहाल माज ? का स्त्रीच होऊन कावेबाज पुरुषांची… काढत राहाल लाज?
काय नको? काय हवं? विचार करा. बघा…. काही सापडतय का उत्तर ते.
धुंद रवी