समजा तुम्हाला काही आऊटसोर्स करता आलं….

एखादा रविवार असाही येतो की दृष्ट लागावी. परवाच्या रविवारी बायको सकाळपासुनच गुणगुणत होती. ती अशी मुडात असली की आमचं सगळं घरच हसत असतं. देवघरातला दिवा हसत असतो…. दारातला उंबरा, खिडकीवरचा पडदा, स्वैपाकघरातला ओटा, माळ्यावरचा आकाशकंदिल सगळे हसत असतात.

बहुतेक वेळा ती नरड्याचा वापर करत असल्यानी आजचा ‘गळ्या’तून येणारा आवाज मला कमालीचा गोड वाटायला लागला. मी असं सांगितल्यावर तर ती अजुनच गोड गायला लागली. ताना, आलाप वगैरे घ्यायला लागली. मग रविवारच्या कामांची यादी देण्याऐवजी तिनी मला ‘नाष्ट्याला काय करु शकतीये’ याची यादी दिली आणि ‘तुमच्या आवडीचं काय हवं ते करेन’ वगैरे म्हणाली. स्वप्न नाही, खरंच. ती इतकी का खुष आहे हे मला कळत नव्हतं आणि त्यामुळे मग शंकेची पालच काय आख्खी घोरपड माझ्या मनात चुकचुकायला लागली. तिनी लवकर काय ते बोलुन मला मोकळं करुन टाकावं म्हणुन मी अस्वस्थ होतो. ती सुद्धा माझा फारसा अंत न बघता म्हणाली, “ऐका की गडे……

हुश्श…! तिच्या प्रेमळ वागण्यामागे काहीतरी आहे हे कळालं आणि मला हुश्श झालं. एखादा माणुस ‘वाईट का वागतोय’ याचं कारण आपण कधीच शोधायला जात नाही. पण तोच माणुस चांगला वागायला लागला तर तो ‘असं का करतोय’ हे कळेपर्यंत जीवात जीव येत नाही. त्यामुळे बायको चांगली का वागतीये हे ऐकायला मी आतुर झालो…

“ऐका की गडे… आपण धुण्या-भांड्याला बाई लावुयात का?” मी तेवीस-ताड उडालो. “अजुन थोडी महागाई वाढली तर मलाच दोन-चार घरी भांडी घासायला जावं लागेल अशी परिस्थिती असताना हे काय काढलंयस?” असं तिला विचारलं तर म्हणाली की, “गडे, तुम्ही फक्त हो म्हणा. तुम्ही देत असलेल्या पैशात हे बसवुन घर कसं चालवायचं ते मी बघते.” चांगदेवांच्या भेटीला भिंत चालवुन जाणा-या ज्ञानेश्वर महाराजांबद्दल मला जितका आदर आहे, त्यापेक्षा जास्त आदर मला, (देईल त्या पैशात) आमच्या घराच्या चार भिंती आणि छप्पर चालवणा-या बायकोविषयी आहे.

तरी पण काय करावं? असा विचार करत असतानाच बायकोनी मुगाची भजी, पुदिन्याची चटणी आणि गाजराचा हलवा आणून दिला. भजीभरल्या तोंडानी नाही म्हणवेना. मी ‘हो’ म्हणालो आणि अन्नदाता तथा भोक्ता पाककर्ता सुखी भव ह्याचालीवर ‘धुणंभांडी तथा फरशी झाडूपोता सुखी भव’ असा आशीर्वाद देऊन खाली चाळीतल्या कट्ट्यावर जाऊन बसलो.

कट्ट्यावर जाऊन बघतो तर काय???? कट्ट्यावर साक्षात सदाभाऊ. (हो, तेच हे अकाऊंटंट सदाभाऊ ज्यांचं काही दिवसांपूर्वी अपहरण झालं होतं आणि ज्यांनी खंडणीच्या पाच लाखातून टी.डी.एस. कापुन गुंडांना कंपनीचा चेक दिला होता आणि वरती व्हाऊचर वर पैसे मिळाल्याच्या सह्या मागत होते.)

पण हे आमचे नेहमीचे सदाभाऊ नव्हतेच. एक तर ते देवानंद सारखा केसांचा कोंबडा काढुन आले होते आणि नुकत्याच मिसरुड फुटलेल्या तरुणासारखे येणाजाणा-या साळकाया-माळकायांकडे त्या मधुबाला, साधना किंवा अगदीच तरूण असतील तर झीनतामान असल्यासारखे बघत होते. तोंडातून नुसती हवाच जात असतानाही शीळ वगैरे वाजवत होते. सारखा डोक्यावरचा कोंबडा उडवत होते.

“काय सदाभाऊ, आज सूर्य कुठे उगवलाय आणि हे वारं कुठल्या दिशेला वाहतय” असं त्यांना विचारलं तर एकदम रोमॅंटीक चेहरा करुन म्हणाले, “आपल्याला काय करायचय की सूर्य कुठे उगावतोय? आपला संबंध खिडकीतून आपल्या उशीवर पसरलेल्या चंद्राशी…! आणि वारा कुठुन का येईना, त्यानी रातराणी भरुन आणली की झालं.” त्यांच्या बायकोला हे कळालं असतं तर त्यांनी उशीसकट चंद्र बंबात घातला असता आणि रातराणीच्या झींज्या उपटल्या असत्या. असो.

मला सदाभाऊंचा हा अवतार झेपेच ना. केवढा फरक?? वहिनी (कायमच्या) माहेरी गेल्या की काय? असं विचारलं तर म्हणाले की, “नाही. सद्ध्या जगायला वेळ मिळतोय. आमच्या कंपनीनी माझी ताणाची बहुतेक कामं दुसरीकडे आऊटसोर्स केलीत. आऊटसोर्स म्हणजे काय तर आपल्या काही कामांची जवाबदारी दुस-यावर टाकायची. त्यानी कामही पूर्ण होतात आणि वर वेळ, पैसा, उर्जा आणि श्रम सगळंच वाचतं.” त्या रजिस्टर, फायली आणि बिलांच्या मागे लपलेला चंद्र सदाभाऊंना आयुष्यात पहिल्यांदा दिसला होता.

किती छान… आवडलं मला हे आऊटसोर्स प्रकरण.

काम आऊटसोर्स झालं तर आमची नोकरीच जायची म्हणुन आयुष्यातलं ‘असं काय आहे’ जे कोणी स्वतःच्या उरावर घेतलं तर आपल्यात असा छान बदल होईल, असा विचार करायला लागलो. मला माझा आळस आणि झोप आऊटसोर्स करता आली तर आयुष्यात खुप काही करु शकेन असं वाटलं. आणि मग बसल्या बसल्या आपण ते बायकोला आऊटसोर्स केलय असं वाटुन एकदम तरतरी सुद्धा आली. (खरं तर तिला तिचा स्वतःचा आळस आणि झोप असताना माझ्यामुळे थोडा ताण जास्त होणार, पण आवडीनं करेल ती.)

दरम्यान सदाभाऊंच्या शिट्टीचा आवाज आता बाहेर यायला लागला आणि रस्त्यावरच्या त्या हिरॉईणी आमच्याकडे रागारागानी पाहायला लागल्या. देवाच्या कृपेनी भिक्षुकी करणारे एक गुरुजी मला दिसले (हे वाक्य ‘भिक्षुकी करणारे एक गुरुजी मला देवाच्या कृपेनी दिसले’ असे वाचावे.) आणि त्यांच्याशी बोलण्याचं निमित्त करुन मी त्या कट्ट्यावरुन सटकलो. मवाली पोरांबरोबर कट्ट्यावर सापडायचं नाही हा धडा तरुणपणीच वडीलांकडुन गालावर मिळालाय मला.

शंकानिरसन व्हावं म्हणुन त्यांनाही विचारलं. ‘स्वतःकडचं सुख, समाधान, शांती, तृप्ती हे सगळं दुस-याला देऊन त्यालाही सुखी करेन’ असं काहीतरी गुरुजींचं उत्तर असणार हे ठाऊक असुनही त्यांना ‘काय आऊटसोर्स करायला आवडेल’ ते विचारलं. त्यांनी एक मोठा उसासा सोडला. मी त्यांच्या जखमेवर ‘मिठाच्या पाण्यानी भरलेलं अभिषेकपात्र ठेवलय’ असा त्यांचा चेहरा झाला. ते म्हणाले, “अस्तेयं ब्रह्मचर्यं च त्यागो लोभस्तथैव च। व्रतानि पञ्च मिक्षूणामहिंसा परमाणि वै॥”

मला काहीही कळालेलं नाहीये, हे माझ्या मठ्ठ चेह-यावरुन त्यांना समजलंच. म्हणाले, “पंच भिक्षुव्रतें आऊटसोर्स करेन. १.चोरी न करणें, २.ब्रह्मचर्य, ३.त्याग, ४.लोभाचा अभाव आणि ५ अहिंसा. हे सगळं आऊटसोर्स करेन आणि जरा जगेन. च्यामारी ह्या मिळमिळीत जगण्याचा उबग आला आता.”

मी अवाक झालो. गुरुजींनी ‘च्यामारी’ म्हणणं म्हणजे थोर तत्वज्ञ आणि अध्यात्मिक गुरु श्री. फुसपांगे काका यांनी संध्याकाळी हात-पाय-तोंड धुवुन, शुभंकरोती म्हणण्यासारखं होतं.

थोर माणसांचं असंच असतं, त्यांच्या नुसत्या स्मरणानी त्यांचं दर्शन होतं. चाळीत फुसपांगे काका भेटले. मटण आणायला चालले होते.

गंमत म्हणजे दर रविवारी विनाथांबा मटण खाऊनही त्यांना मटणाचं दुकान कुठय तेच माहीत नव्हतं. इतकी वर्षं कोणाच्या ना कोणाच्या गळ्यात त्यांनी हे काम मारल्यानी त्यांना गरजच पडली नाही कधी. आउटसोर्सिंगचा इतका मोठा अनुभव असलेले माहानुभव भेटल्यानंतर त्यांना ‘जगण्यातल्या आउटसोर्सिंग’ विषयी विचारणं स्वाभाविकच होतं. ते म्हणाले,

“दुःख, वेदना, त्रास, मत्सर, हेवा हे असलं काही आऊटसोर्स करणं म्हणजे मुर्खपणाच. ह्या सगळया गोष्टी आहेत म्हणुन तर सुखाला अर्थ आहे, किंमत आहे, अस्तित्व आहे. दुःख गेलं की सुख पण गेलंच. मरणापुर्वी आऊटसोर्स करण्यासारखी एकच गोष्ट माझ्याकडे आहे. आणि ते म्हणजे मी भोगत असलेलं जिवंत मरण.”

“जिवंत मरण?? तुम्हाला नक्की काय दुस-यावर सोपवायला आवडेल ?”

“सर्व प्राणीजगतामध्ये मनुष्य हा असा एकमेव प्राणी आहे ज्याला ‘हे’ जिवंत मरण भोगायला लागतं. ‘हे’ तुम्हाला शांत जगु देत नाही… पायांवर उभं राहु देत नाही… एका जागी बसु देत नाही…  तुम्हाला अस्वस्थ ठेवतं…. तुमची शक्तीच काढुन घेतं…. अन्नावरची वासनाच उडवतं…. तुमच्या मूळावरच उठतं असं जिवंत मरण……… मूळव्याध! मला माझा मूळव्याधीचा त्रास आऊटसोर्स करायला आवडेल.” असं म्हणुन फुसपांगे काका मटण आणि तिखट मसाला आणायला निघुन गेले.

……..मूळावर उठलेल्या व्याधीसुद्धा माणसाला बदलवत नाहीत, हेच खरं.

घरी येता येता ढमढेरे वहिनींकडे गेलो. त्या म्हणाल्या,

“जरा जास्तच उशिर केलात हो ह्या आऊटसोर्स प्रकरणाला. पुर्वी विचारलं असतं तर बाळंतपण आऊटसोर्स केलं असतं. तुम्हाला सांगते, आमच्या पिंट्याच्या वेळेला फार त्रास झालेला हो. इतकं मळमळायचं… चक्कर यायची… करपट ढेकर यायचे… सारख्या उलट्या व्हायच्या. अस्से पाय सुजायचे माझे आणि कंबर पण जड व्हायची. त्यात आमचा पिंट्या ह्यांच्यावर गेल्यानी गाढव फार लाथा झाडायचा. आणि बाळंत होणार होते तेंव्हा…..”

घाबरुन मी त्यांना मध्येच थांबवत विचारलं की ‘आत्ता काय आऊटसोर्स कराल’ तर म्हणाल्या,

“सासुरवास आऊटसोर्स करेन. आणि तो ही नणंदेकडे. गरीबगाय वाटते ना तिला तिची आई. घे म्हणाव अंगावर ही मारकी म्हैस आणि बस ओरडत…….!”

घरी आल्यावर बायकोला आउटसोर्सिंग नावाच्या नविन जगाची माहिती दिली आणि गमतीनं विचारलं की तिलाही काही आऊटसोर्स करायचं आहे का? तर म्हणाली, “अय्या, अजुन एकदा? सकाळीच नाही का धुण्या-भांड्याच्या बाईचं ठरलं आपलं?”

……पुन्हा एकदा बायको माझ्या दोन पावलं पुढेच निघाली.

ढमढेरे वहिनींचं तर ठरलय. पण तुमचं काय?

तुमच्याही आयुष्यात असं काही आहे का हो जे तुम्हाला जमत नाहीये, झेपत नाहीये, आवडत नाहीये, पण झक मारत करावं लागतय? अशीही काही कामं, कर्तव्य, जबरदस्ती, चिडचिड आहे का तुमच्या आयुष्यात, जी कोणी परस्पर पावणेबारा केली तर फार आवडेल तुम्हाला? आणि समजा करता आलं तुम्हाला असं बरच काही आऊटसोर्स तर काय काय आऊटसोर्स कराल….?

अंघोळ, व्यायाम…. अन बायकोसोबत खरेदीला जाणं? फक्त धुणीभांडी….. का घरातली सगळीच कामं?

बालपण कुरतडणारी… ती अमानुष शाळा? का म्हातारपणात धुसफुसणा-या… ज्वानीच्या आगीच्या ज्वाळा?

जिवंत मरणं? मरत जगणं? का दोन्ही मधला प्रवास? स्वप्नामधलं वास्तव…? का वास्तवातला भास?

काय आऊटसोर्स कराल? अन तेच का कराल?  विचार करा. बघा…. काही सापडतय का उत्तर ते. माझा विचार अजुन चालुच आहे आणि तो पक्का झाला की कळवेनच….!

धुंद रवी

www.maifal.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s