समजा तुमच्या जोडीदाराला ‘लाय डिटेक्टर’ सापडला

कोणीतरी… कधीतरी… काहीतरी… विनाकारण शोध लावुन ठेवतो आणि त्यामुळे एखादा गरीब-बापडा त्याच्या आयुष्यातली शांती हरवुन बसतो. विलियम मार्स्टन नामक एका महापापी, महाचांडाळ, महाक्रुरकर्मा शास्त्रज्ञानं १९१३ मध्ये एक अगाऊपणा करुन ठेवला आणि त्याची शिक्षा भोगली आमच्या ढमढे-यानी. ह्या विघ्नसंतोषी विल्याच्या चुकीनी ढमढे-याच्या घरात (आणि त्यामुळे संसारात) आलेलं जळजळीत वादळ त्याचं जगणं मिळमिळीत… गिळगिळीत… पिळपिळीत करुन गेलं….!

आमच्या लहानपणी ‘विज्ञान – शाप की वरदान’ असा एक निबंध पेपरात हटकुन यायचाच. ढमढे-या या विषयावर ७३ पानं तरी लिहु शकले असता. म्हणजे त्यानी ती मनातल्या मनात लिहली सुद्धा आणि शिव्या वगळुन राहिलेली ११ पानं त्यांनी मला बोलुनही दाखवली. ‘सगळ्या शास्त्रज्ञांना त्यांच्या शोधांसकट रणगाड्याखाली चिरडून किंवा आमच्या हिच्या पायाखाली तुडवुन मारलां पाहिजे’ …अशी त्याच्या निबंधाची सुरवात होती.

त्याचं काय झालं… परवा ढमढेरे ऑफिसमधुन थोडंसं (….म्हणजे नेहमीच्या उशिरापेक्षा जेमेतेम दोन-तीन तासच) उशिरा आला.

कुस्तीच्या आखाड्यात एखादा मल्ल अंगाला माती चोपडून, मांडीवर हात आपटून कसले तरी भीषण आवाज काढत, दुस-या मल्लाची कुस्तीसाठी वाट बघत असतो. अगदी तसंच ढमढेरे वहिनी घरच्या आखाड्यात एक हात कमरेवर आणि दुस-या हातानी खिडकीचा पडदा सारखा बाजुला करत दुस-या मल्लाची कुस्तीसाठी वाट बघत होत्या. त्यांचं दहा वर्षाचं कार्ट (सिनेमा बघताना ते पॉप्कॉन का काय खातात तसं) वाटीभर तळलेले दाणे घेऊन हि कुस्ती बघायला तयार झालं होतं. ढमढेरे आला आणि वहिनींनी शड्डू ठोकुन पहिला डाव टाकला…..

“आज(ही) उशीर झाला तुम्हाला?”

“हो गं… खूप काम होतं आज. जीव गेला अगदी इतक्या कामानी”

…असं ढमढे-यानी म्हणताच घरात एकदम टींव्ह…टींव्ह…टींव्ह…टींव्ह… असा रुग्णवाहिका येताना होतो तसा एक सायरन वाजायला लागला. काय होतय हे ढमढे-याला कळेनाच, पण काय झालय हे वहिनींना मात्र कळालं होतं. खरं तर ढमढेरे वहिनी आपलं ‘वजन’ कुठेही वापरत नाहीत, पण नव-याच्या खोटं बोलण्यानी त्या संतापल्या आणि रागात विवेक हरवुन त्यांनी स्वतःचा एक पाय ढमढे-याच्या एका पायावर जोरात दाबला. त्या वजनानी ढमढे-याच्या पायाची तीन बोटं आधि चपटी झाली आणि नंतर सुजल्यामुळे ती बोटं अंगठ्याएवढी दिसायला लागली. ती थर्ड डिग्री सहन न झाल्यानी त्यानी कळवळून आपला गुन्हा कबुल केला…

“एक मित्र भेटला आणि त्यासोबत श्रमपरिहार करण्यासाठी थोडीशी ‘घ्यायला’ गेलो होतो.” 

ढमढेरे वहिनींनी त्याच्या पायावरचा पाय काढला आणि आपला एक हात त्याच्या खिशात घातला. त्यात त्यांना हवं ते मिळालं नाही. हवं ते म्हणजे पैसे नव्हे. पैसे त्या आधिच काढुन घेत असत. हवं ते म्हणजे सिगरेटचं पाकीट. “किती ओवाळल्या उदबत्त्या आज?” त्यांनी विचारलं.

“दोन….” असं ढमढेरेचं म्हणुन पण झालं नव्हतं आणि पुन्हा एकदा तो टींव्ह…टींव्ह…टींव्ह…टींव्ह… करत सायरन वाजला.

‘खोटं बोलु नकात’ ह्या वहिनींच्या इशा-याकडे दुर्लक्ष करत पण वहिनींच्या आग ओकणा-या डोळ्याकडे बघत ढमढेरे म्हणाला, “अगं तुझ्या डोळ्यांची आणि माझ्या लायटरची शपथ… दोनच ओढल्या.” पुन्हा एकदा सायरननी घर दणाणून सोडलं. वहिनींनी दात ओठ खाल्ले. त्यांच्या कार्ट्यानी दात काढुन दाणे खाल्ले आणि ढमढे-यानी वहिनींचे दोन जोरदार गुद्दे खाल्ले. त्या हल्ल्यानी त्याच्या तोंडातून आणि नाकातून दिवसभर ओढलेल्या सात-आठ सिगरेटींचा धूर बाहेर पडला आणि मग त्यानी दुसरा गुन्हाही कबुल केला…. “पावणे आठ सिगरेट…!” 

“पुन्हा कधीही एका दिवसात एका पेक्षा जास्त सिगरेट ओढल्या तर लायटरनी तुमची मिशी जाळून टाकेन.” वहिनींच्या ह्या इशा-यानी तो मिशीशिखान्त घाबरला. ढमढेरे वहिनींचा हा रुद्रावतार त्यानी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता. डोळ्यात सतत गोंधळलेला भाव घेऊन जगणा-या आणि शक्यतो नजरेला नजर न देणा-या बायकोनी आज आपलं तिसरं नेत्र उघडलय असं त्याला वाटलं… असत्य जळून राख करेल असं संतापी नेत्र! 

कुस्ती रंगात आली होती आणि ढमढे-यांचं कार्ट आता वाटी ठेऊन दाण्याचा आख्खा डबाच घेऊन आलं होतं. एकदा धरुन आपटल्यावर सुद्धा, जिंकणा-या पैलवानाचं समाधान होत नाही आणि मग पडलेला पैलवान उठताच तो नविन डाव टाकतो. वहिनींनी पुढचा डाव टाकला. 

“डबा संपवला का आज? कशी झाली होती भाजी?”

ह्या वहिनींच्या प्रश्नावर “म्हणजे काय? संपवलाच. एकदम बेश्ट झालेली भाजी.” असं नेहमीचं उत्तर त्यानी सरावानी दिलं आणि त्याच क्षणी सायरनच्या कल्पनेनी ते थरथरले. तो आवाज ऐकायला वहिनींचा जीव कानात गोळा झाला होता आणि त्याच्या पोटात एक मोठ्ठा गोळा आला होता.

पण काहीच आवाज झाला नाही. याचा अर्थ डबा संपला होता आणि भाजी चांगली झाली होती. पण तरिही काही तरी चूकतय असं वहिनींना वाटायला लागलं आणि त्यांनी तोच प्रश्न बदलून टाकला.

“डबा तुम्ही खाल्लात का? भाजी तुम्हाला आवडली का…?” यावर ढमढेरे भीतभीत “हो” म्हणाला. आणि मग……… आणि मग………  टींव्ह… टींव्ह…टींव्ह…टींव्ह… !!

वहिनींचा पारा चढल्यानी आधिच ढमढे-याची सगळी उतरली होती आणि त्यात हा सायरन त्याला काही सुचू देत नव्ह्ता. त्यात वहिनींनी त्यांचा डबा उघडून पाहिला. चाटून-पुसुन घासुन-धुवुन स्वच्छ…! म्हणजे ढमढे-यानी तो खाल्लेला असुच शकत नाही. “तुम्ही खरं बोलताय का मी पोट फाडुन तुमच्यातुन खरं बाहेर काढु” अशा नजरेने वहिनींनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यानी आणखिन एक गुन्हा कबुल केला….

त्याचा डबा आज(ही) ऑफिसात शिपायानी खाल्ला होता आणि त्यानीच ढमढे-याला भाजी ‘बेश्ट’ झाल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे बिचा-या ढमढे-याला बाहेर जाऊन मिसळ खावी लागली.

आज बहुतेक आपले सगळे गुन्हे उघडकीस येणार ह्या भितीनी ढमढे-यानी वहिनींसमोर हत्यारं टाकली आणि म्हणाले, “मला माफ कर. मी फार वाईट वागलो तुझ्याशी. चूकलो मी. मला पश्चात्ताप होतोय.” ह्यावर वहिनी काहीच बोलल्या नाहीत पण सायरननी मात्र त्याचं तोंड उघडलं. ढमढे-या खचलाच. म्हणाला “विश्वास ठेव. मी खरंच बोलतोय…. ‘मला पश्चात्ताप होतोय’ हे तुला पटवायला काय करु मी?”

“भांडी घासा.” असं म्हणुन वहिनी शेजारच्या बाईंशी गप्पा मारायला निघुन गेल्या. पण तरिही ढमढे-यानी ते स्विकारलं. बायकोनी आपल्याला धुण्यापेक्षा, भांडी धुणं बरं. ढमढे-या आयुष्यात पहिल्यांदाच कामानी दमला होते. तो न जेवताच झोपला.

थोड्या वेळानी सामसूम झाली आणि ढमढेरे वहिनींच्या घोरण्याचा आवाज चालु झाला. आता सायरनचा आवाज वहिनींच्या अघोरी घोरण्यापुढे ऐकु येणार नाही या अंदाजानी ढमढे-यानी एक डाव टाकला. त्यानी हळूच मुलाला उठवलं आणि ती ‘सायरनची काय भानगड आहे’ ते विचारलं. मुलाशी ब-याच वेळ वाटाघाटी झाल्यानंतर ‘प्रगतीपुस्तकावर न बघता सही करण्याच्या अटीवर’ तह झाला आणि मगच ते कार्ट रहस्य ओकायला तयार झालं…. “अहो बाबा, आईनं घरात कसलं तरी यंत्र आणुन ठेवलय. कोणी खोटं बोललं की ते बोंबा मारतय. सकाळपासुन दुपारपर्यंत ७ वेळा झोडपलाय आईनं मला. मी तर तोंडच बंद केलय तेंव्हापासुन. तुम्ही पण तोंड उघडु नका आणि उघडलत तर खरंच बोला.”

मग ढमढे-याला शोध लागला की विलियम मार्स्टन नावाच्या रिकामटेकड्या उपटसुंभानी १९१३ मध्ये ‘लाय डिटेक्टर’ नावाच्या असत्य शोधण्यासाठीच्या यंत्राचा शोध लावला आणि याच प्रकारातलं काहीतरी बायकोला मिळालय.

पण ह्या एका शोधानी त्यांचं आयुष्यच बदलून गेलं.

ढमढे-याची दारु, सिगरेट जवळजवळ बंद झालं. तो घरी लवकर यायला लागला. त्याला पैसे पुरायला लागले. मिसळ बंद झाली आणि पौष्टीक पदार्थ पोटात जायला लागले. मुलाचे उपद्व्याप कमी झाले. तो अभ्यास वगैरे करायला लागला. आयुष्य असं बदलल्यानंतर ढमढे-याला त्या शास्त्रज्ञाचा राग राहाणं स्वाभाविक होतं. पण एक दिवस अचानक त्या सायरनचा आवाज बंद झाला.

कधीकधी आमच्या हिच्या अंगावर नवी साडी दिसते आणि ती साडी तिनी माझ्यापासुन लपवुन आणलीये हे मला माहित असतं. पण तिला ‘हि कुठली साडी?’ असं विचारलं की म्हणते, “अय्या… तुमच्याच बरोबर नाही का घेतली?”

ती ‘अय्या’ म्हणते तिथेच ती खोटं बोलतीये हे कळतं मला. कारण मी काही विसरलो तर ती ‘अय्या’ म्हणणार नाही. मला टोमणे मारुन मारुन खच्ची करेल. तर बायकोला ब-याच ठिकाणी पकडता येईल म्हणुन ढमढेरे वहिनींकडे तो लाय डिटेक्टर उसना मागायला गेलो.

तर त्या म्हणाल्या, “मोडुन टाकलं ते यंत्र… आयुष्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं माहित असतात आपल्याला, पण आपल्याला जे ऐकायचं असतं तेच उत्तर समोरुन आल्यावर ते खरं मानण्यात खूप समाधान असतं. भले ते उत्तर खोटं का असेना. ‘मी कशी दिसतीये?’… ‘मी फार जाड तर झाली नाहीये ना?’….. ‘माझ्यावर तुम्ही पुर्वीइतकंच प्रेम करता ना?’… हे असले प्रश्न, ते यंत्र असताना विचारताच येत नव्हते हो..! टाकलं मोडुन मग ते यंत्र. मी खुष आणि मिस्टर ढमढेरे सुद्धा !”

ढमढेरे वहिनींचं तर तुम्ही ऐकलय. पण तुमचं काय?

तुमचा जोडीदार तुमच्याशी सगळं खरंच बोलतो का हो? तुम्हाला जोडीदाराचं ते खोटं पकडावंसं वाटत का हो? मिळालाच तुम्हाला लाय डिटेक्टर तर घ्याल त्याची टेस्ट? का तुम्हीच मारता थापा आणि गंडवता त्याला? मग समजा सापडला तुमच्या जोडीदाराला लाय डिटेक्टर तर काय होईल हो तुमचं?

हादरुन जाल की आता… येईल सगळं सत्य बाहेर?

का पेकाटात एक सणसणीत लाथ… असा होईल घरचा आहेर?

पकडली जाईल चोरी आणि तो सभ्य मुखवटा फाटेल?

का पहिल्यापासुन खरंच बोलायचो… याचं बरं वाटेल?

आलेल्या प्रसंगाला तोंड द्याल? का ते बंदच ठेवाल?

विचार करा. बघा…. काही सापडतय का उत्तर ते. माझा विचार अजुन चालुच आहे आणि तो पक्का झाला की कळवेनच….!

धुंद रवी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s