योद्धा

 

तो एक महान योद्धा होता…. !
त्याच्या नुसत्या नावानीच थरकाप उडायचा शत्रुचा.
लढाण्या‌आधिच, त्याच्या नजरेच्या आगीत जळून जायचं समोरंचं सैन्य.
जीवाची पर्वाच नसयची त्याला.. ना स्वत:च्या ना दुस-याच्या…
एकदा उठलेली त्याची तलवार २-३ मुंडकी धडावेगळी करुनच खाली यायची.

आज पुन्हा एकदा त्याला रणांगणानी साद घातली होती.
क्षणाचाही विलंब न करता त्यानी शस्त्र उचलली आणि तो निघालाही.
त्याच्या डोळ्यातले निखारे आणि श्वासातली धग त्याला अजुनच खंबीर करत होती.

आशिर्वाद घ्यायला तो आ‌ई-वडलांच्या पाया पडला तेंव्हा…
आ‌ईचे लटपटलेले पाय त्याला दिसलेच नाहीत.
मायेचा तो ओलावा त्या युद्धांधळ्या कोरड्या डोळ्यांना कुठुन दिसणार ?

त्याच्या वडलांनी काळीज पिळवटुन मोठ्या काळजीनं त्याच्या पाठीवर ठेवलेला थरथरता हात,
त्यानी क्षणात हातात घेतला आणि सोडुनही दिला.
नखशिखांत युद्धज्वर भडकल्यानी बापाचा थंडगार हात त्याला जाणवलाच नाही.
“बाबा, नको ना जा‌ऊ रे “…म्हणुन त्याची चिमुरडी पोर त्याचा पाय घट्ट पकडुन बसली.
पण, एका प्रहरात चार जणाचे तुकडे पाडणा-या त्या अजस्त्रबाहुला,
ते फुलपाखरु स्वत:वेगळं करणं असं काय अवघड होतं ?

युद्धाचे चौघडे त्याच्या कानात इतकेच घुमत होते की
आपल्या बायकोचा साधा निरोप घ्यायचंही त्याच्या लक्षात राहीलं नाही.
त्या आवाजात, तिनी पदराच्या बोळ्यात दाबलेला हुंदका त्याला कुठुन ऐकु जाणार ?

दरवाज्याजवळ एकच क्षण तो थांबला…
पण तिला काही आशा वाटायच्या आतच
त्यानी म्यानेतुन तलवार थोडीशी बाहेर काढली आणि तलवारीकडे पहात राहीला.
तिच्या डोळ्यातला अश्रुंचा पडदा तिनं दुर सारण्या‌आधिच तो दुरवर निघुनही गेला होता.

तो एक महान योद्धा होता…. !
आणि हे… आजच्या घनघोर लढा‌ईनं पुन्हा एकदा सिद्धं झालं होत.
त्याच्या धैर्याच्या आणि शौर्याच्या ज्वालामुखीत सगळं राख राख हो‌ऊन गेलं होतं.
आज पुन्हा एकदा तो जिंकला होता…. जिंकला होता दोन्ही युद्ध !

एक शत्रुबरोबरचं …………..मातीतलं !
आणि दुसरं… स्वत:बरोबरचं …………..छातीतलं !
त्याच्या डोळ्यातले निखारे आता अश्रुंसोबत वाहत होते…
कारण त्याला आठवत होते आ‌ईचे लटपटलेले पाय आणि
त्यामुळे त्याच्या घशाला पडलेली कोरड… थरथरलेला श्वास आणि सुन्न झालेले डोळे…

बापाचा तो थंड हात पाठीवर पडल्यानंतर, कुणीतरी आपल्या पाठीवर तापलेली सळ‌ईच ठेवलीये,
असंच वाटलं होतं त्याला.

एकच क्षण धरु शकला होता बापाचा हात कारण सगळा दाह दाह झाला होता अंगाचा…
त्या चिमुरडीचे हात सोडावताना सगळी शक्तीच गेली होती त्याची. हातपाय अगदी गळुन गेले होते.

ह्यानंतर नजर दे‌ऊच शकला नसता तो बायकोला !
घाबरला होत की थांबवतील तिचे अश्रु जाण्यापासुन…. तसं तिच्या हुंद्क्यानी

एक क्षण अडलही होतं त्याचं पा‌ऊल दारात….  पण एकच क्षण..
त्यानंतर तो पुन्हा निग्रही झाला होता…

त्याला ठा‌ऊक होतं की
आज जर एक मुलगा, एक बाप, एक नवरा जिंकला तर
एक योद्धा रणांगणावर लढण्या‌आधिच हरेल……
नाती जपण्यासाठी, त्याला मातीशी बे‌ईमानी करणं शक्यच नव्ह्तं….
तो रणांगणावर गेला… जीवाची पर्वा न करता लढला, कारण

जस त्याला घरी थांबण्याचा पर्याय नव्ह्ता तसं रणांगणावर मरण्याचाही अधिकार नव्हता.
तो लढला आणि जिंकला… दोन्ही लढाया जिंकला !

बेलाशक…. तो एक महान योद्धा होता…. !
धुंद रवी

 

YODDHA 2

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s