रातराणीच्या कळ्यांवर… भाळला पाऊस होता
रुंजताना पाकळ्यांशी… गंधाळला पाऊस होता
पेटले आभाळ सारे कोणत्या वणव्यात हे
सावळ्या गाली धरेच्या रेंगाळला पाऊस होता
तो पद्मिनिचा कांत सुद्धा गुंतला रात्रीमध्ये
सोडताना कुंतलांना तिनी माळला पाऊस होता
उन्मादल्या वर्षा ऋतुचा हा जोर नव्हता वादळी
पाहुनी ओले तुला चेकाळला पाऊस होता
जाळले मी घाव सारे जाळल्या जखमा जुन्या
वगळल्या त्यातून कविता गाळला पाऊस होता
आधिच होता जीवघेणा गंध श्वासांचा तुझ्या
मोकळ्या केसामध्ये घोटाळला पाऊस होता
पाहिले मी पावसाला मिठीत भिजताना तुझ्या
अन् पाहणे पाहुन माझे ओशाळला पाऊस होता
धुंद रवी