सगळं माझ्यावर सोड….

वादळापुर्वी शांत समुद्रात कोणत्याही क्षणी बुडणा-या होडीत
तिचा हात हातात घट्ट धरत तो म्हणाला….
 
“सहनशक्तीनं थकुन डोळे मिटल्यानंतरही डोळ्यात जीव ओतुन
इतकी वाट आपण का आणि कशाची बघतोय ? वादळ शमण्याची ?
की ह्या वादळी समुद्रात आपली निखळलेली होडी सुरक्षित किना-याला लागण्याच्या चमत्काराची ?
 
आपण आपल्या परीनं सगळे प्रयत्न केले, आता करण्यासारखं काही राहिलं नाहिये म्हणुन….
किंवा उद्याचा शेवट आजच होऊ नये म्हणुन…
….. आपण चमत्कारची वाट बघतोय का ?
 
का आपले प्रयत्न पुरेसे नसले तरी प्रामाणिक होते असं दुस-याला सांगुन
आपण स्वत:लाच फसवतोय… ?
सागरतळातल्या परीसानं आयुष्याचं सोनं करायच्या आपल्या स्वप्नाची जागा
किना-यावरच्या मातीनं कधी घेतली, कळालंच नाही…
अर्थात ते कळालं नाही तेच बरं होतं.
निदान आपल्या पराभवाची मिमांसा तरी करता आली.
 
तसही आपल्याकडे अपयशाच्या कारणांची कमी कधीच नव्हती.
पण ते शोधायला लागलं नाही तर दोष नशिबाला देता येतो…
….किंवा आपसुकंच जातो.
खरं तर आता कुठल्या स्पष्टिकरणाची गरज खरंच उरलीये का ?
आपण खचलोय. आपल्या होडीत साचलेलं पाणी उपसंत उपसंत सगळं संपुन जाणार आहे…
आपण बुडणार आहोत.
आपल्याला पोहताच येत नसतं तर जास्त बरं झालं असतं नाही ?
अपयशाची खंत करत बसण्यापेक्षा, असाह्यतेची किंव करत मेलो असतो…
 
मला माहिती आहे की आपण सोबत आहोत…
पण आपण आधारच मुळी बुडणा-याचा घेतोय का ?
आणि जर हेच आपलं प्रत्येक पाऊल सोबत असणं असेल तर….
….अशाश्वत प्रेमाचं हे सगळ्यात अमानुष उदाहरण असेल….
 
ह्या क्षणाला शाश्वत म्हणता येईल अशी एकच गोष्टा आहे…
आपण बुडतोय सखे… आपण बुडलोय……….!
 
त्याच्या हातातुन हात सोडवुन घेत ती म्हणाली….
तु कोण आहेस ?
सागराच्या बेफाम आणि बेलगाम लाटा
केवळ हौस म्हणुन छातीवर झेलत विलक्षण जगणारा तु
होडीत साचलेलं पाणी उपसंत उपसंत मरणारा असुच शकत नाहीस.
 
तोंडात चांदिचा चमचा घेऊन आला नसशीलही कदाचीत
पण शब्दांच सोनं घेऊन
गुलमोहराला फुलण्याचं वरदान आणि रातराणीला गंधाची मक्तेदारी देणारा तु
किना-यावरच्या मातीकरता आगतीक होऊच शकत नाहीस !
तु तो असुच शकत नाहीस…. !
 
फिनिक्स पक्षाचं राखेतुन उठणं कल्पनेतलं असेलही कदाचीत पण
निराशेच्या राखेतुन मनाचं उठुन भरारी घेणं नाही, ते..
ते आपल्या प्रेमाइतकंच सत्य आणि शक्य आहे….
…. हे तुच शिकवलंस ना मला ?
भरारी पंखांनी नाही मनानी घ्यायची असते, हे जगणारा आणि जगवणारा
आज चमत्कारची भीक मागतोय ?
 
वादळाशी पुसटशी दखलही न घेता
एखादा स्वच्छंदी ढग बनुन… प्रवाहाच्या विरोधात
कुठल्यातरी अतर्क्य जगात विसावणारा तुझ्यासारखा मनस्वी
ह्या फुट्कळ जगात यशापयशात आयुष्याचं सार शोधतोय ?
आणि ते नाही मिळालं म्हणुन नशिबाची लाचरी पत्करतोय ?
तु कोण आहेस ? तु माझा गुलमोहर असुच शकत नाहीस…
तु माझा वादळी पाऊस…. माझा गुलाबी वणवा….
माझा पारीजात असुच शकत नाहीस… !
 
फुलपाखरची तरलता गुंफुन,
जगावर रंग उधळत भासाच्या वलयात तरंगणारा बेधुंद इन्द्रधनु
बुडण्याच्या भितीने खचुच कसा शकतो ?
……आणि ते सुद्धा मी असताना ?
 
अर्थात
जिथं तुला आपल्या प्रेमाची शाश्वती आणि सामर्थ्य कळलंच नाही,
तिथं मरणावर मात करणारी जन्मभराची सोबत
आणि खचलेल्या पावलात जीव ओतणारा आधार ह्याची ताकद काय कळणार ?
 
हो. आपली होडी खचलीये. खरचं खचलीये.
पण आज नाही…. ती कधीच खचली होती. ती केंव्हाच निखळली होती.
………..निखळली होती पण बुडली नव्हती. कधी बुडणारही नव्हती.
 
माझ्या पंखांना आकाशाचं वेड देणा-या
तुझ्या प्रेमाच्या मलमली धाग्यात
……आपली होडी मी बांधुन ठेवली होती.
तुझं सोबत असणं डोळ्यात भरुन घेताना…
मग डोळे घट्ट मिटुन हलकं हलकं होताना
माझ्या पापण्यांवर मी होडी तरंगत ठेवली होती.
…आणि हे सगळं मी करु शकले, ते तु होतास म्हणुन !
नाहीतर हे वादळ पापण्यांवर थोपावणं तर दुरच
तुझ्याशिवाय, तुझ्या विरहातला जड श्वासही मला पेलवत नाही.
तु नसतास तर कधीच बुडलो असते मी आणि
…..मी आहे म्हणुन तुला कधीच बुडुन देणार नाही.
 
सगळ सगळ माझ्यावर सोड.
मी आहे…. मी आहे…. !
 
आता त्यांची होडी किना-याला लागत होती.
समुद्र अजुनही शांतच होता.
पण ही शांतता त्याला यत्किंचीतही न जाणवलेल्या वादळानंतरची शांतता होती.
सगळ तिच्यावर टाकुन तो कधीच तिच्या कुशीत झोपुन गेला होता.
होडीतलं पाणी उपसंत ती एकटीच जागी होती.
 
तसही…
स्वच्छंदी ढगातली मनस्वी धुंदी जपणा-या
विशाल आकशाला लहान होण्याची संधी कधिच नसते.
कारण
स्वप्नातल्या धुक्यात तरंगणारा तो इवलासा ढग
कधी वादळाच्या धक्क्यानी जागा झाला
तर आकाशाच्या कुशीत त्याला इतकचं ऐकायचं असतं…
 
” सगळ सगळ माझ्यावर सोड. मी आहे…. ! “
 
 
धुंद रवी.

1 thought on “सगळं माझ्यावर सोड….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s