ज्वलंत असलं
तरी क्षणाचंच आयुष्य घेऊन संपणा-या
कापुरानं
रात्रीच्या गर्भातल्या गर्द काळोखाला शह द्यायचा नसतो.
रतीच्या मादक… खरं तर घातक सौंदर्यापुढे
चंद्रानं स्वत:ची मंत्रमुग्ध रेशीम किरणं
सुर्यानं सुवर्ण कुंडलं
आकाशानं हक्कचं शाश्वत क्षितिज
निसर्गानं अक्षय सर्वस्व आणि
आसमंतानी मनोहर अस्तित्व शुद्ध हरपुन गमावलय…
हे ठाऊक असुनही…..
त्यानी आपलं आयुष्यच काय…
पण आपले कल्पनाभास…. मोगरी वास आणि सगळे अम्रुतश्वासही पणाला लावले.
…..इतका विश्वास तर रातराणीलाही स्वत:च्या उन्मत्त गंधाचा नसेल.
पण…
असह्य वेदनांचं
हळवेपणाची असहाय्यता उपभोगणं
हे अमानुष तर असतच पण
त्याही पेक्षा ग्रुहीत असतं…..
त्यानी आयुष्यच जुगारात लावलं होतं आणि…… ….आणि तो हरला होता….!
राखेच्या उध्वस्त उदरात विखुरलेल्या निद्रिस्त पक्षाचं
राखेतुन उठुन भरारी घेणं
फक्त काल्पनीकचं असतं
……………हे त्याच्या अजाण जाणिवांना कधी जाणवलंच नसावं….
कारण आयुष्य हरुनही
त्याला पुन्हा एकदा
काळोखाच्या अभेद्य साम्राज्याला जिंकुन
एक मोकळा श्वास घ्यायचा होता…
………..तसही त्याच्याकडे आता हरण्यासारखं कही राहीलंच नव्हतं.
त्याच्या ह्या आव्हानाला आवाहन समजत ती म्हणाली
” तुझं जग, तुझा जीव, तुझी प्रत्येक गोष्ट
माझी गुलाम असताना
कशाचा जोरावर तुला माझा जीव जिंकायचाय ? “
तो म्हणाला
ह्या वेळेस मी माझ्या कविता जुगारावर लावेन…. !
आसुरी समाधानाच्या त्रुप्ततेनं भरलेला
तिचा नेहमीचा उग्र चेहरा
पहिल्यांदाच निस्तेज झाला.
आणि….
आणि न लढताच तिनी हार मानली…. आता ती त्याची गुलाम झाली होती.
आज पुन्हा एकदा तो त्याच्याच कवितांवर जगत होता…
आत्मसमर्पण करणा-या
तिच्या पराभुत गर्वाला
तिच्या उद्विग्न डोळ्यातला काळोख म्हणाला…
“जे जे काही अस्तित्वात आहे त्यावर फक्त आपलंच अधिराज्य असताना, हे आत्मसमर्पण का ? “
ती म्हणाली…
” तो त्याच्या श्वासांशिवाय जगु शकतो पण त्याच्या कवितांशिवाय नाही.
ह्यावेळेला जर तो हरला तर
त्याच्या आयुष्यात तर काही रहाणार नाहीच पण
त्याच्या कवित नसतील तर ह्या जगातही जगण्यासारखं काही उरणार नाही.
ह्या मॄतावह ब्रम्हांडावर राज्या करुन मरण्यापेक्षा
त्याचं स्वामित्व पत्करुन
त्याच्या कवितेत जगणं जास्त सुखावह आहे…. “
आता तोच काय…
……..ती सुद्धा त्याच्या कवितांवर जगत होती.
धुंद रवी.