माझ्यासारखा साधा, सरळ, पांढरपेशी, व्हाईट कॉलर माणुस गुलाबी फेटा घालुन तमाशाला गेला, ह्याचं कारण आमच्या ध्यानमंदिरातल्या (ज्याला काही कोत्या मनाचे क्षुद्र जीव दारुचा गुत्ता म्हणतात..) रसिक समिक्षकांनी केलेलं चुकीचं समिक्षण…. !
दारु प्यायल्यावर माणुस खरंच खर बोलतो हे धादांत खोटं आहे….
मला माहित आहे की माझ्या ह्या वक्तव्यामुळे माझे काही देशी-बांधव दुखावले जातीलही पण जो आघात माझ्या मनावर झालाय त्याचं काय ? ज्यांच्या सह मी चकणा चरला त्या माझ्या सहचरांनी मला फसवलय. ज्यांच्या ग्लासवर ग्लास आपटुन आजपर्यंत ‘चिअर्स’ म्हणत होतो त्यांच्या डोक्यावर डोक आपटुन ‘चिटर्स’ म्हणावसं वाटतय…
एक वेळ त्यांनी मला तळलेले काजु दाखवुन सादळलेली बॉबी दिली असती तरी मी सहन केलं असतं…
एक वेळ त्यांनी अपेयपानाचं निमंत्रण देऊन एरंडेल तेलात राजबिंदु घालुन दिलं असतं तरी मी सहन केलं असतं… (हे राजबिंदु काय आहे हे एकदा पिऊन बघाच. सगळ्या रोगांवर रामबाण इलाज आहे. हे प्यायलं की तो रोग आणि तोंडाची चव, कायमचे नष्ट होतात.)
एक वेळ त्यांनी गुलाबपाणी म्हणुन माझ्यावर गोमुत्र शिंपडलं असतं तरी मला चाललं असतं…..
पण त्यांनी ह्याही पेक्षा वाईट केलं…
त्यांनी मला आशा दाखवुन…. त्यांनी मला आशा दाखवुन….
….इला अरुण ऐकवली हो…!
मला धुक्यातले ढग सांगुन डीडीटी पावडरच्या धुराळ्यात उभा केला…. त्यांनी भरजरी पैठणी दाखवुन हातात टॉवेल-टोपी ठेवली…!
……… मी होतो म्हणुन सहन केलं.. माझ्याजागी दुसरा कुणी शुद्धीवर असता तर निराशातीशयानी दारुच सोडली असती. नको तो गुत्ता आणि नको ती अघोरी फसवणुक… पण मी टिकुन आहे आणि नक्की काय झालं हे पण तुम्हाला सांगणार आहे…
त्याचं असं झालं…
त्यादिवशी तमाशाला जायचं म्हणुन मी सकाळपासुनच शुद्धीत होतो. दारु सोडुन आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टीचा आनंद हा शुद्धीत राहुनच घेता येतो हे मागच्या एका प्रसंगावरुन मी शिकलोय. माग एकदा आमच्या ध्यानमंदिरात ‘रंभा घायाळकर’ नावाची लावण्यवती कोनशीला समारंभासाठी पहिली वीट ठेवायला आली होती.
(हं… दुकानाच्या मालकानी होती ती दोन बेसिन पाडुन तिथं हौद बांधुन घेतला, तेंव्हाचीच गोष्ट….)
इतिहासात पहिल्यांदाच आणि शेवटचेच… सगळे जण शुभ्र वस्त्र, स्वच्छ नेत्र, स्पष्ट उच्चार आणि स्तब्ध देह घेऊन एका रांगेत, दोन जणात एका हाताचं अंतर ठेउन, आपापल्या पायजम्याची इस्त्री पुन्हा पुन्हा चेक करत, टोपीचं टोक हातानी पुन्हा पुन्हा पुढं ओढत, हसण्यात आपण जहागिरदार असल्याचा आविर्भाव घेऊन आणि मिश्यांना ‘मर्दावानी’ ताव देत…. बाईंच्या स्वागताला उभे होते.
सगळ ठीक चाललं होतं आणि झालंही असतं जर जाता जाता बाईंचा गजरा पडला नसता. त्या गज-यासाठी तुंबळ युद्ध झालं. शुभ्र वस्त्र आधि मलिन आणि मग लाल झाली. स्वच्छ नेत्र आधि लाल आणि मग काळे-निळे झाले. स्तब्ध देह क्षुब्ध झाले. उच्चार मात्र स्पष्टच राहिले पण ते उद्धार ऐकवत नव्हते इतकंच…!
ह्या एकतर्फी स्वयंवरानंतर दुकानाच्या मालकाने सगळ्यांना (जरी लाईफ मेंबर नसले तरी) फ़्री ड्रॉप दिला…. पोलीस चौकीपर्यंत…. !
तिथं सगळ्यांना आत टाकता टाकता पोलीसांनी, सगळ्यांच्या वस्तु काढुन घेताना, हातात आलेला गजरा फेकुन दिला आणि पुन्हा एक निर्वाणीचं तुंबळ युद्ध ! त्या सामाजिक असंतोषातुन जन्मलेल्या जनक्षोभापुढे झुकुन पोलीसांनी सगळ्यांना गज-याची एक एक कळी दिली आणि तहाचे निशाण फडकवले…..
जिच्या फक्त गज-यासाठी, प्रेमात मस्ती करणारे दोस्तीत कुस्ती करायला लागले, जीवाला जीव देणारे शिवीवर शिवी द्यायला लागले, जिला नीट पाहता यावं म्हणुन आख्खा एक दिवस दारु न पिता देहयातना सोसायला तयार झाले, …अशा त्या मदनिका-सम्राज्ञी लावण्यवतीचं दर्शन मी शुद्धीत नसल्यामुळं मला झालं नाही… हाय रे दैवदुर्विलास !!
त्या दिवशी मला समजलं की एकदा चढली की मग घडण्यासारखं बाकी काही उरतच नाही. त्यामुळे जगण्यासारखं आणि बघण्यासारखं काही असेल तर नशेत नसणं खुप गरजेचं आहे.
तर सांगायचं असं की,
त्यादिवशी तमाशाला जायचं म्हणुन मी सकाळपासुनच शुद्धीत होतो. पहिल्या रांगेच तिकिट काढुन आत जाऊन बसलो. गंमत म्हणजे पहिल्या रांगेत मी एकटाच… माझे सगळे आप्तेष्ट, इतर रसिक दुस-या, तिस-या ते दहाव्या रांगेत…
रंभा घायाळकरच इतकं कौतुक ऐकलं होतो की कधी एकदा तो पडदा वर जातोय असं झालं होतं. उरातली धडधड वाढत चालली होती. धड धड धड धड असा आवाज अचानक टण टण टण टण ढिगीटिकी टिकीटिकी धिंगीक असा झाला अन घाबरलोच… मग कळालं की पडद्यामागुन ढोलकीचा आवाज येतोय…. तो ढोलकीचा आवाज शमतो न शमतो तोच एक पडद्यामागुनच एक अनाऊंसमेंट झाली.
“रशीक मायबापांना माणाचा मुजरा,
आवरुन बसा जरा सावरुन णजरा
घाला नोटाच्ये हार घ्यावा पिरेमाचा गजरा…..
कमजोर दिलवाल्यांच्या जीवाला धोका
वा-यावर पदर… तुमचा ढगामधी झोका
ही ढगातली हप्सरा चुकवील काळजाचा ठोका
आज नटरंगी नार उडवील लावण्यांचा बार
जनु मोसंबीचा झटका… जनु नारंगीचा वार
रावजी सांभाळुन बसा… जावाल कामातुन पार
या भावजी तुमच्यासाठी चंदनाचा पाट
फेटेवालं पावनं आज यव्वनाशी गाठ
ज्याची शिटी वाजनार न्हाई… त्येला घराकडची वाट….”
ह्या वाक्यावर प्रचंड शिट्ट्या पडल्या आणि त्या थांबेचना. ते पाहुन मी तर तोंडातच बोटं घातली आणि शिट्टी वाजवायच प्रयत्न करायला लागलो. मला आवाज हवा होता पण नुसतीच हवा.
तमाशा बघण्यासाठी जसं फेटा हा ड्रेस कोड असतो, तसं ‘शिट्टी येणं’ हे मिनिमम बेसिक कॉलिफिकेशन लागतं. मला माझ्या असंस्कृत आणि अशिक्षितपणाची लाज वाटायला लागली आणि आता ते आपल्याला घराकडाची वाट दाखवणार ह्या भितीनी माझा जीवच गोठला. पण पहिल्याच रांगेत बसण्याच मान घेतल्यामुळे असं काही झालं नाही.
मग अनाऊंसमेंट पुढे चालु झाली….
“…..तर तुमच्यासम्होर सर्श सादर करतोय….. रंभा घायाळकर प्रसुत…. १६ लावण्यवतींचा…. भव्य एकपात्री लावन्यांचा बहारदार प्रोग्राम…. ‘नाद नाय करायचा’…. ”
अन ह्या प्रोग्राम्ची सादर कर्ती हाये….
रंभाऽऽऽऽ रंभाऽऽऽऽऽऽ अंभाऽऽऽऽऽ भाऽऽऽऽऽ भाऽऽऽऽऽ
घायाळकरऽऽऽ याळकरऽऽऽ ळकरऽऽऽऽ ळकरऽऽऽऽ ळकरऽऽऽऽ “
पुन्हा शिट्टयांचा मुसळधार पाऊस पडला आणि मी…. नळी फुंकली सोनारे, इकडुन तिकडे गेले वारे !
मग हळु हळु पडदा वर गेला. आणि…. आणि पैठणीच्या ऐवजी टॉवेल-टोपी !! म्हणजे अगदी टॉवेल-टोपीवर नाही पण एक काळाकभिन्न, जाड्जुड मिश्या आणि घनदाट दाढीवाला अडवा-तिडवा रांगडा गडी, मावळ्याच्या फॅन्सी ड्रेसात, हातात डफ घेऊन, अंगार भरलेले डोळे माझ्यावर रोखत उभा होता.
तमाशात पोवाडा ??????????????
तमाशात ??????????????
पोवाडा ?????????????????????
“ह्यो रंभेचा बॉयफ्रेंड.. शाहीर आहे. पहिल्यांदा तेचा पोवाडा गपगुमान ऐकायला लागतो, मग रंभा येतीया !”-
गेली कित्येक वर्ष इमानेइतबारे तमाशाची वारी करणा-या एका भक्तानं मला माहिती पुरवली. मी जरा निराश झालो. हे म्हणजे भाग्यश्री हवी असेल तर हिमालय पण घ्यावाच लागेल असं झालं. पण हिमालय नकोच म्हणुन भाग्यश्री पण नको असं इथे चालणार नव्हतं. शेवटी इथे रंभा होती… रंभा ! जिच्या फक्त गज-यासाठी…. असो.
माझ्यावरची नजर न काढताच त्या शाहिरानं मला एक मुजरा केला. पहिल्या रांगेत बसण्याचा मान.. दुसरं काय ! मग त्याचा पोवाडा चालु झाला आणि मी गपगुमान ऐकु लागलो.
“….. वै-याची रात्रये… खुप अंधार पडलाये…. मावळे घाबरलेलेत…. तानाजी न डगमगता उभाये… कोंढाण्यानी आवाज दिलाये मराठ्यांना…. तानाजीनी यशवंतीला दोर बांधलाये आणि सगळे मावळे गड चढुन वर गेलेलेत… समोर मुघल बघताच तानाजीचा संताप संताप झालेलाये….. “
असं म्हणुन तो माझ्याकडेच रागारागानी पाहायला लागला. मी घाबरुन थोडा मागे सरकलो. तर तो अंगावर ओरडलाच.
” खबरदार… जागचा हलशील तर…”
मी घाबरुन “नाही…नाही” अशी मान हलवायला लागलो. तो पुढे म्हणाला,
” हे मराठ्याचं रक्त हे, असा सोडाणार नाही तुला लांडग्या…. शपथ हे मला स्वराज्याची… तुझं मुंडकं आणि कोंढाणा घेऊनच महाराजांना तोंड दाखवेन…”
तो मांडीवर हात आपटुन कसले कसले आवाज काढायला लागला. तो रागानी लाल झाला होता होता, मी भितीनं पांढरा पडलो होतो. पहिल्या रांगेत कुणी का बसत नाही हे मला आता कळालं. (आता तुम्हालाही माझ्या यातना कळाल्या असतील, आता कळालं असेल की माझ्या देशी-बांधवांनी मला कसा फसवला.) नको तो तमाशा पण नको ते युद्ध असा विचार करुन मी उठलो तर तो गरजला…..
“भ्याडा, कुठे पळतोस ? चल हो तयार लढायला. हा तानाजी आज तुला जीता सोडत न्हाई…. “
….. आणि मला काही कळायच्या आत मी स्टेजवर होतो. त्याच्या हातात माझी गचांडी होती. माझा मानाचा फेटा मला कधीच सोडुन गेला होता. मग त्यानी मला मार मार मारलं….हाण हाण हाणलं….कुदलंल.. आपटलं… धोपटलं… आणि हा सगळा वेळ त्या मागच्या बायका, पोवाड्याच्या सुरात….
“मुघल धोपटला जी हा जी जी…
मुघल धोपटला जी हा जी जी….
मुघल धोपटला जी हा जी जी ” असं गातच होत्या.
कधी एकदा गड येतोय आणि हा सिंह जातोय असं झालं होतं मला….. मग पोवड्याची ३-४ रक्तरंजीत कडवी झाल्यानंतर एकदाचा सिंह पडला आणि मी जीवाच्या आकांताने उठुन पळायला लागलो. तर हा रेडा पुन्हा उठुन उभा… म्हणाला,
” ए भित्र्या…. माझ्या भाच्च्याला मारुन कुठं पळतोस रं xxxxxxxx …. ? हा ७८ वर्षाचा शेलार मामा जित्ता हाये अजुन….ये हिकडं, लढ माझ्याशी…”
(ह्या क्षणी मला जर देव प्रसन्न झाला असता तर मी खालील तीन वर मागुन घेतले असते.
१. लढाईसाठी एका घरातील एकच व्यक्ती असावी. नातलग घेऊ नयेत. विशेषतः मामा-भाच्चे…)
२. ६० वर्षावरील म्हाता-यांना लढाईत प्रवेश नसावा.
३. पोवाड्यामध्ये ४ पेक्षा जास्त कडवी नसावीत.)
…तर शेलारमामा बरोबर अजुन ४-५ कडवी झाली ज्याचा शेवट “मुघल धोपटला जी हा जी जी… ” असा होता.
मग शेवटी युद्ध संपलं आणि शुद्ध हरपलेल्या मला स्टेजवरुन समोरच्या पिटात ढकलण्यात आले.
त्यानंतर खुप लावण्या झाल्या म्हणे. मी भानावर आलो तेंव्हा लोक बेभान झाले होते. ढगात झोके घेत होते… फेटे उडत होते…. शिट्ट्या वाजत होत्या….लोकं पार कामातुन गेली होती…. नारंगीचा वार झाला होता… पावन्यांची यव्वनाशी गाठ पडली होती. आता पहिली रांग भरली होती म्हणुन मी तिथंच पिटात बसलो. इतक्यात एक अनाऊंसमेंट झाली.
” तर रशीक मंडळी… तुमच्या विनंतीला मान देऊन एक शेवटची लावणी रंभाबाई सादर करतील.. ” मी पुन्हा जिवंत झालो.
ढोलकीची थाप आणि घुंगरांचा आवाज ऐकु यायला लागला तशी माझी धडधड वाढायला लागली. रंभा बाहेर आली… पण आख्खी नाही तिचा एकच हात विंगेबाहेर आला. त्या हातात गजरा होता आणि काही कळायच्या आत तिनं तो गजरा पब्लिकमध्ये भिरकावुन दिला.
तो हरामखोर गजरा माझ्याच डोक्यावर पडला आणि मग सुमारे ५६ जण त्या गज-यासाठी माझ्यावर तुटुन पडले. माझे आणि गज-याचे मिळुन १९३ तुकडे झाले. …..शेवटच्या लावणीला ४ वेळा वन्समोर मिळाला म्हणे.
……मी आता ठरवलय… कितीही नादखुळा तमाशा असला तरी जायचं नाही… सगळे नाद सोडायचे…. मोहावर नियंत्रण ठेवायचं…. कितीही सुंदर मोह असला तरी जीवापेक्षा थोडाच मोठा आहे… असेल ती रंभा…..
….असेल ती रंभा घायाळकर पण आता नाद नाय करायचा……………………..!
धुंद रवी.