कोहम…???

कधी कधी धुंदीतुन सावरतो तेंव्हा  विचार करतो की मी नक्की कोण आहे…?

वळिवाच्या अल्लड पावसाचा एक मस्तवाल थेंब ?
का… तिच्या केसातल्या ओल्या वीणोवर, त्याच्या शापीत बोटांनी छेडलेला मोहाचा राग ?

स्वत:वरंच भाळून चढलेल्या नशेमुळं उठणारा… रातराणीच्या श्वासातला गंध ?
का… आपल्या उन्मत्त गंधाच्या अस्मितेनं माजलेला एक बेफाम मोगरा… ?

किंवा…
ओल्याचिंब धुक्याची जहाल बरसात
चांदण्यांच्या ओठातुन पिऊन
झिंगणा-या रात्रीला सावरणारा स्वच्छंदी ढग असेन मी…

मी नक्की कोण आहे ?
मनस्वी वणवा… रिमझीम पाऊस….
हळवा प्राजक्त….
की वाद्ळी उन्माद ?

पण ह्या सगळ्याची उत्तरं सापडता सापडता पुन्हा कसलीतरी धुंदी चढते..
आणि मग…
…मोठ्या मुश्किलीनं मलाच सापडलेला मी पुन्हा हरवुन जातो.

थोडक्यात…
‘मी कोण’ हा प्रश्न अनुत्तरीतच !